Monday, April 20, 2026

जिंजी - दुर्ग राजागिरी म्हणजे राजगड (तामिळनाडू) भाग २

मागच्या लेखात आपण पाच दरवाजे पार करून साक्षात वीर हनुमानाचं डोळे भरून दर्शन घेतलं… आणि तिथेच थांबलो. अर्थात, तो विराम फक्त लेखापुरताच होता, प्रत्यक्षात मात्र पुढची वाटचाल सुरूच होती.

सहाव्या दरवाजाची तटबंदी

डोळे भरून हनुमानदर्शन घेतल्यावर मग जाणीव झाली, की वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या मागे उंच आणि मोठी तटबंदी आहे. ही दगडी असून वर ढासळलेल्या भागाकडे पाहिल्यावर हेही लक्षात येतं की, आतमध्ये ही तटबंदी भाजलेल्या विटांची असून मजबुतीसाठी बाहेरील बाजूने दगडी थर लावलेला आहे.

सहावा दरवाजा

हा दरवाजा उंचीला जास्त नाही आणि दरीच्या टोकाच्या बाजूला आहे. यावरही भाजलेल्या विटांचे बांधकाम आहे. पलीकडे गेल्यावर आतमध्ये असलेले खांब दिसतात, आणि उतारही आहे. बाजूला उंच तटबंदीने संरक्षित आहे.

बालेकिल्ल्याची तटबंदी

दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे वर बघायचं, इथे सर्वांचे कॅमेरे वर जाणार नाहीत तरच नवल! अहाहा.. काय तटबंदी दिसते इथून, क्या बातच... उंचच उंच दगडी शिळा, वरून पाण्याचे ओघळ येऊन चितारलेली गेलेली सुंदर नक्षी, त्यावर ही अभेद्य दगडी तटबंदी, आणि त्यावर लालबुंद विटांनी साकारलेल्या चर्या, अगदी फुलाच्या पाकळीसारख्या! तीन स्तरात उत्तम केक बनवावा, असा भास इथे बघून होतो.

सातवा दरवाजा

तटबंदी वर दिसत असली तर इथून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता मात्र ह्या सर्व शिळांना वळसा मारून जातो. उजवीकडे हा दगडी कडा ठेवत पुढे जात राहिल्यास उजवीकडे हा दरवाजा दिसतो. इतर दरवाजाप्रमाणेच हाही दगडी असून वर विटांच्या चर्या आहेत. डावीकडे छोट्याशा बुरुजावर बार्टीझन झाडीमागून डोकावताना दिसतो, तर उजवीकडे वरती अभेद्य बालेकिल्ला.

बुरुज आणि बालेकिल्ल्याला जोडणारा पूल

दरवाज्यातून पलीकडे आल्यावर चढ आहे. हा चढून वर आल्यावर समोरच एक बुरुज दिसला. ह्या बुरुजाच्या उजवीकडे मागे एक पूल दिसला, ज्याने उजवीकडचा बालेकिल्ला या वाटेला जोडलेला आहे. या पुलावर जायला समोरच्या बुरुजाच्या डावीकडून वळसा मारून वाट आहे.

संरक्षण व्यवस्था अफाट आहे ही. अरुंद वाट डावीकडे तटबंदीपलीकडे दरी. हा बुरुज कितीतरी जणांना थोपवून धरू शकतो.

इथून शत्रू सुटलाच तर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी हा पूल ही एकमेव वाट आहे. मुळात पुलापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्यापैकी पायऱ्या चढाव्या लागतात. हा सगळा मोकळा भाग आहे, म्हणजे जो बुरुज ओलांडला त्याच्या टप्प्यात हा भागही येतोच. त्यानंतर हा पूल आहे, जो साधारण ३० फूट लांब आहे. सध्या हा लोखंडी असून संरक्षणासाठी दोन्ही बाजूंना रेलिंग लावलेलं आहे, परंतु पूर्वीच्या काळी ही बांधणी कशी असावी, हे कुतूहल नक्की वाटतं.

इतिहासात हा पूल नेमका कधी बांधला, ते कळत नाही, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने याचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. एक तर हा मार्गही पूर्ण मोकळा आहे, लपायला जराही जागा नाही. कडेला तोल गेल्यास खाली सरळ साठ फूट खोल दरी!

पुलावर जाणाऱ्या पायऱ्या

आठवा दरवाजा

बरं, एवढे अडथळे पार करत पुलावर शत्रू पोचलाच तर पुलाच्या पलीकडच्या टोकाला डावीकडे मोठा बुरुज आहे. त्यावर बंदुकीचा मारा करायला जागा आहे. पुलाच्या जराशा उजवीकडे दरवाजा आहे. बुरुज आणि हा दरवाजा यांच्या मध्ये, म्हणजे पुलाच्या समोरच्या टोकाला, तटबंदीवर बार्टीझन आहे. सगळीकडून धुव्वाधार पाऊसच की बंदुकीच्या गोळ्या किंवा बाणांचा... काय शक्यता आहे इथून पुढे जायची??

या सर्व गोष्टींमुळे संरक्षणाच्या दृष्टीने हा सहाजिकच अभेद्य आहे. बंदुकीच्या माऱ्यातून वाचायला जागाच नाही. त्यामुळे "well-disciplined infantry would always prevail… let their numbers be ever so great", हे साधारण "अशा अरुंद आणि उघड्या मार्गांमुळे, मोजक्या सैनिकांनीही प्रचंड सैन्य रोखता येतं" अश्या आशयाचं रॉबर्ट ऑर्मीचं वाक्य अगदी तंतोतंत जुळतं.

नशीब, आम्ही त्या इतिहासात नव्हतो. आणि "हरीतात्या" असते तर त्यांनी इतिहास वर्तमान बनवून डोळ्यासमोर उभा केलानी असता आणि मग आमची खैर नव्हती...

"अरे शत्रू शेवटी आलाच त्या बुरुजाआडून, पण आम्ही पण भले बहाद्दर बसलेलो बार्टीझन मध्ये बंदुका घेऊन लपून, पण महाराज कुठे? तर स्वतः त्या बुरुजावर छाती काढून उभे.. केला आम्ही मारा सगळीकडून शत्रूवर.. गेला गनीम टप-टप करत सगळा दरीत..." काय बहार आली असती हे ऐकायला..

पण भानावर आलो, ना हरितात्या होते, ना शत्रू आणि ना महाराज.. आम्ही भटके म्हणून इथे आलो होतो. सहज चालत, फोटो काढत पूल पार केला.

छोटे मित्र

या दरवाजाच्या पलीकडे समोरच धान्यकोठार आहे, पण आधी न बघता दरवाजा पार केल्यावर लोकांशी गप्पा मारत बसलो. चार-पाच हिंदी शब्दांपलीकडे त्यांचं हिंदी जात नव्हतं, आणि तामिळ बाबत मी तर ठार अशिक्षित! पण लहान, गोड मुलांबरोबर छान गप्पा झाल्या. फोटोत मागे जे दिसतंय ना, तेच. नंतर ते कोठार पाहिलं, पण फोटो काढायचं लक्षातच राहिलं नाही. राहिना का.. धान्यकोठार पाहिलं तरी.

नववा दरवाजा

यापुढे वर अजूनही अवशेष-वास्तू आहेत. ते बघण्यासाठी जाताना हा शेवटचा, नववा दरवाजा लागतो. हाही दरवाजा दगडी असून वर भाजलेल्या विटांचे बांधकाम आहे. मात्र यावरची नक्षी अप्रतिम आहे. डावीकडे वरती बार्टीझन आहे, उजवीकडेही कदाचित आधी असावं, पण आता शिल्लक नाही.

या दरवाजाच्या आतल्या खांबांवर मात्र नक्षीकाम कोरलेलं आहे. यातील बरीचशी नक्षी कमळ किंवा फुलांची आहे, तर दोन खांबांवर चक्क कोदंडधारी राम आणि लक्ष्मण आहेत. दरवाजाच्या मागच्या तटबंदीत मोठमोठ्या जंग्या आहेत, ज्या आतून दिसतात. दरवाज्यात येताना मात्र त्या लक्षात आल्या नव्हत्या.

काही अवशेष

या माथ्यावर पाण्याच्या टाक्या आणि अजूनही काही वास्तू आहेत, जसे धान्यकोठार, चौकी, खजिन्याची जागा. याबरोबर राजसदरही आहे.

राजसदर

ही राजसदर तुबाकी कृष्णप्पा नायक या राजाने बांधली, असं नमूद केलेलं आहे. ही वास्तू मोठी आहे. हिला १५ खांब आहेत आणि त्यात कमानी आहेत.

जैन चौकी

या वास्तूला "जैन चौकी" म्हणतात. असं का? याचं कारण मला माहिती नाही. पण ही वास्तू मोठी, म्हणजे राजसदरेपेक्षा प्रशस्त आहे. हिला ४५ खांब आहेत. आजूबाजूला झाडी मात्र खूप वाढलेली होती.

रंगनाथ मंदिर

वाटेतले अवशेष पाहत येत असलो, तरी बघायचं होतं, हे मंदिर! म्हणजे रंगनाथ मंदिर. हे मंदिर द्रविड शैलीत बांधलेलं आहे. अतिशय देखणं आहे. चहूबाजूंनी सुंदर कोरीव काम केलेलं आहे. आणि या सुंदरतेचा कळस म्हणजे शब्दशः "कळस"च! या मंदिराचा कळस खूपच सुंदर आणि घुमटाकार आहे.

खालील मंदिर दगडी बांधकामाचं आहे, परंतु हा घुमटाकार कळस विटांमध्ये बांधलेला आहे. त्यामुळे दोन वेगवेगळे रंग स्पष्ट दिसतात, एक कळसाचा आणि एक खालच्या मंदिराचा. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर छोटासा मंडप चार खांबांवर तोललेला आहे. या मंडपाला तीन बाजूंनी सुंदर पन्हाळीसारखी बांधणी केलेली आहे.

शिलालेख - आंतरजालावरून साभार

मंदिराबाहेरील पायरीवर एक शिलालेख आहे. सुमारे १३व्या शतकातील असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे, "जिंजी कुठाई थोलियम कालगम" या संशोधक समूहाने, अरुण देवकुमार, एकमलाई आणि वडीवेल यांच्या मदतीने, या शिलालेखाचं वाचन व अभ्यास केला.

या शिलालेखात "गोविंदन" नावाच्या व्यक्तीचा उल्लेख असून, त्याने देवाची अविरत पूजा केली असल्याचे नमूद आहे. यावरून त्या काळातील धार्मिक परंपरा आणि भक्तीभाव यांची माहिती मिळते.

संशोधकांच्या मते, जिंजी किल्ला परिसरात अजूनही अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या असण्याची शक्यता आहे.

झेंड्याचा बुरुज किंवा टेहळणी बुरुज

मंदिराच्या समोरच अतिशय सुंदर इमारत आहे. ही म्हणजे झेंड्याचा बुरुज, किंवा टेहळणी बुरुज. ही वास्तू दुमजली, किंवा म्हणाल तर तिमजली आहे. सर्वात वर एक गोल बुरुज आहे. आतून वर जायला जिना आहे. या वास्तूवरून मंदिराचा फोटो, मंदिराजवळून वास्तूचा असेल फोटो काढण्यासाठी ४ वेळा तरी चढ-उतार केला असेल.

मंदिर

या गडमाथ्यावर बरेच अवशेष आहेत. हे एक मंदिरही असंच झाडीत लपलेलं दिसतं. आणि अशा बऱ्याच गोष्टी इथे दडलेल्या आहेत. पाहिजे तो फक्त वेळ, जेणेकरून सगळं शोधता येईल आणि व्यवस्थित पाहता येईल.

आमची गडफेरी इथे पूर्ण झाली होती. म्हणजे, किमान दिसेल ते तरी सगळं पाहून झालं होतं. खाली उतरायला आम्ही सुरुवात केली.

तटबंदी

बाळरंगनाथ मंदिर

येता येताना एक गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवली होती, ती म्हणजे हे बाळरंगनाथ मंदिर. चौथ्या दरवाज्यातून वर आलो की, डावीकडची वाट धरून बालेकिल्ल्याकडे येता येतं. वर येताना हीच वाट पकडली होती, कारण त्यावेळी लक्ष होतं बालेकिल्ल्यावर. पण उजवीकडे थोड्याच अंतरावर हे मंदिर आहे.

हे मंदिर उतरताना बघितलं. हेही पूर्वाभिमुख आहे. पूर्ण वास्तू दगडी आहे, परंतु कळस मात्र दगडी नाही, आणि तो विजयनगर शैलीतील आहे. या मंदिरात तामिळ भाषेतील एक शिलालेख आहे. पण या सुंदर मंदिराच्या गर्भगृहात मात्र कोणतीही मूर्ती नाही. स्थानिक लोक याला शिवमंदिर मानतात.

राहिलेले अवशेष पाहून उतरून पायथ्याशी आलो. लेखमालेत आधी कृष्णगिरी, त्रिचंदी कोट आणि आत्ता राजागिरी म्हणजे राजगड, हे पाहिलं, परंतु प्रत्यक्षात या क्रमाने पाहिलं नव्हतं. तसेच अजूनही काही अवशेष पाहिले, जे लेखमालेत सविस्तर आलेले नाहीत. तसंच काही गोष्टी राहून गेल्या असतील, तर काही बघता आल्या नाहीत. जसं चेन्नागिरी म्हणजे चंद्रयानदुर्ग (सारंगगड), कारण यावर जायला परवानगी नाही.

अर्थातच मन पूर्ण भरलं नाही, रुखरुख लागून राहिलीच. पण "जिंजी" हे नाव जे मनात रुंजी घालत होतं, त्यात काही प्रमाणात समाधान नक्की लाभलं.

जिंजी, किंवा सेंजी, याला स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहाजीराजांपासून आपला जिंजीशी संबंध येतो. पुढे दक्षिण दिग्विजयात महाराजांनी हा गड ताब्यात घेतला. रघुनाथ पंत हनुमंते यांची या भागावर त्यांनी नेमणूक केली. यानंतर पुढे राजाराम महाराजांनी, येसूबाईंच्या आज्ञेवरून, हे दक्षिणेतील राजधानीच बनवलं.

यानंतर एक-दोन नाही, तर तब्बल नऊ वर्ष औरंगजेबाचा संपूर्ण जोर इथे आपण रोखून धरला! हे सगळं मी इथे अत्यंत थोडक्यात लिहिलं आहे, पण प्रत्यक्षात या गडाचं स्थान खूप मोठं आहे. स्वराज्यासाठी महाराजांनी याची पुनर्बांधणी केली, ह्याला अधिक सुरक्षित केलं, आणि एवढ्यावर न थांबता या दुर्गसमूहातील दुर्गांना नवीन ओळखही दिली.

याच जिंजीने राजाराम महाराजांचा मुत्सद्दीपणा पाहिला. ह्याच जिंजीने त्यांना कैद झालेलंही पाहिलं आणि त्यांची सुटकाही पाहण्याचं भाग्य जिंजीला लाभलं. तर त्यांच्या एका पत्नीने इथेच इहलोकीचा निरोप घेतलेला पाहण्याचं दुर्दैवही याच जिंजीच्या नशिबी आलं.

इतिहासात अम्मन बहिणींपासूनच्या काळापासून असंख्य घडलेल्या घटना जिंजीने पाहिल्या. जैन वस्ती, पल्लव, नायक, पांडियन, होयसळ, कुरुंब, आदिलशाही, कुतुबशाही, मराठी, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, या सगळ्यांना अंगावर खेळावलेला हा दुर्गसमूह. नंतर शेवटी हैदर अलीने जिंकून घेतलान आणि पुढे कहर म्हणजे टिपूने तर जिंकून तो सरळ जाळून टाकलान.

सुदैवानं सध्या पुरातत्त्व खात्याकडे हा दुर्गसमूह असल्याने, किमान इतिहास जपण्याचं कार्य सुरू आहे. युनेस्कोमध्ये नोंद झाल्याने हे कार्य अधिक उत्तम रीतीने चालेल, असं आपण मानूया.

आपल्या दृष्टीने पाहिल्यास, आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा दुर्गसमूह, जमेल तसा पाहावा, न्याहाळावा, अभ्यासावा, अनुभवावा आणि जपावा सुद्धा. वर्षानुवर्षं, शतकानुशतकं असा हा इतिहास गाजवलेला दुर्गसमूह भविष्यातही तेवढ्याच दिमाखात राहो, इतिहास उलगडून दाखवत राहो हीच सदिच्छा.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Sunday, April 19, 2026

जिंजी - दुर्ग राजागिरी म्हणजे राजगड (तामिळनाडू) भाग १

सिंहासनाच्या पार्श्वभूमीवर दुर्ग राजगड

आधीच्या त्रिचंदी कोटावरच्या लेखात आपण बघितलंच की, हा कोट जिंजीच्या मुख्य राजागिरी गडाची मुख्य संरक्षण व्यवस्था आहे. आता एखाद्या गडाची संरक्षण व्यवस्थाच दुसरा गड आहे, याचाच अर्थ किती दुर्गम असेल तो गड-जिंकण्यासाठी!! कदाचित म्हणूनच हा गड या समूहाचा "राजा" गड आहे.

तसं बघायला गेलं, तर ह्या गडाला "राजा" आणि कृष्णगिरी गडाला "राणी" गड म्हणतात; पण तेही काही यांचं खरं नांव नाही. हल्लीच्या काळात तशी ओळख झालेली आहे असं म्हणता येईल, पण याचं मूळ नांव "कमलगिरी". आपण कृष्णगिरीच्या लेखात सात बहिणींचा उल्लेख केला होता. त्यातील एका बहिणीचं नांव "सेंजी अम्मन" आणि त्या नांवाचा गावाच्या नांवाशी संबंध पाहिला. तसंच त्यातल्याच एका बहिणीचं नांव "कमलकन्नी अम्मन". या बहिणीचं मंदिरच इथे आहे. यावरूनच या गडाचं नांव पडलं, "कमलगिरी".

तसंच "आनंदगिरी" हे या गडाचं दुसरं नांव. नंतरचं नांव "राजागिरी". हे नांव "तुबाकी कृष्णप्पा" याने ठेवलंन, असं कागदपत्रात नमूद आहे. त्याने हे नांव "नारायण कोण" यांच्या नांवावरून ठेवलंन, असं लिहिलेलं आहे. पण "नारायण कोण" आणि "राजागिरी" या नांवांचा संबंध काय ते कळत नाही. त्यानंतर स्वराज्यात आल्यावर महाराजांनी याचं नांव "राजगड" केलं.

हा गड "जिंजी" समूहातला सर्वात उंच गड आहे, सुमारे ८०० फूट. यामुळेच याला "ग्रेट माउंटन" असंही म्हटलं जातं. "फादर पिमेंटा" हा याचा उल्लेख "Troy Of East" असा करतो.

त्रिचंदी कोटाचे दरवाजे पार करत आम्ही या गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. पण ज्या गडाची भव्यता सांगायची, तर इथून बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी तब्बल ९ दरवाजे पार करावे लागतात.

पहिला दरवाजा

गडाचा पहिला दरवाजा हा भव्य तटबंदीत आहे. पण पहिलाच दरवाजा?? जरी इथे येईपर्यंत आपण चार दरवाजे पार करत आलो तरीही हा "पहिला" कसा? तर मागच्या लेखात आपण बघितलं आहे ना, की इथे येईपर्यंतचा भाग हा त्रिचंदी कोटाचा भाग आहे. म्हणजे अजून सुरुवात करायची आहे राजागिरीला. त्यामुळे आता बघायच्या असलेल्या राजागिरी किल्ल्याचा हा पहिलाच दरवाजा ना... तर हा दरवाजा पण तुबाकी कृष्णप्पा नायक या नायक राजाने बांधलान.

दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेली तटबंदी ही लांबपर्यंत गेलेली आहे. या तटबंदीने त्रिचंदी कोट आणि राजागिरी यांची सीमा आखली गेली आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना चौकोनी बुरुज आहेत.

या गडावर माकडं खूप असल्याने पुरातत्त्व खात्याने या दरवाजाच्या पायऱ्यांजवळच "Beware Of Monkeys" अशी पाटी लावलेली आहे. तसंच या दरवाजातून वर जाण्यासाठी दुपारी तीनच्या नंतर प्रतिबंध आहे. तशी पाटीही इथे लावलेली आहे. बरोबरच आहे, कारण दुपारी तीननंतर वर गेल्यास गडाचे दरवाजे बंद होईपर्यंत खाली परत येणं कठीणच आहे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, आम्ही सकाळी आधी वर जाऊन यायचं हेच ठरवलं होतं. त्यामुळे आमच्यासमोर तो प्रश्न नव्हता.

दरवाज्यावर विटांचं सुंदर बांधकाम आहे. आत शिरल्यावर समोर भिंत आहे. म्हणजे दरवाजा तश्याच पद्धतीने पूर्वाभिमुख बांधलेला आहे - समोर भिंत आणि वाट उजवीकडून वर.

दुसरा दरवाजा

तटबंदीच्या बाजूने सरळ वाटेने जात राहिल्यावर हा दरवाजा दिसतो. हा या गडाचा दुसरा दरवाजा. हाही दरवाजा पूर्वाभिमुख आहे. हा दरवाजा तर पहिल्या दरवाजापेक्षाही सुंदर आहे. याही दरवाजावर विटांचं बांधकाम आहे. दरवाजाचा उजवीकडचा बुरुज तर फारच सुंदर आहे. तसं बघायला गेलं, तर नक्षीदार पाकळ्या वगैरे काही नाहीत, परंतु चौकोनी म्हणावा, तर पायऱ्यांच्या बाजूचा कोन हा ९० अंश न ठेवता वक्राकार आहे. त्यामुळे तो मला आवडला. त्यामानाने डावीकडचा बुरुज हा मात्र थोडा "बिचारा" आहे, थोडा बुजलेला, अंग चोरून तटबंदीत सामावलेला.

दरवाजाच्या आतील बाजूने - त्रिचंदी कोट आणि इतर दुर्ग

दरवाज्याला आतमध्ये देवड्या आहेत. दरवाज्याचं छत मात्र वरच्या बाजूने मस्त दिसतं. एक तर सकाळचं वातावरण हे मस्त कुंद-धुंद होतं. ऊन नाही, पाऊस पडून गेलेला. गावावर धुक्याची चादर ओढलेली. त्या धुक्यातून वर डोकं काढत सगळे डोंगर. समोर डावीकडे कृष्णगिरी, उजवीकडे चेन्नागिरी म्हणजे चंद्रयानदुर्ग, तर खाली त्रिचंदी कोटाचे सुंदर अवशेष, कल्याण महालासह. आणि त्यात भर म्हणजे गडाला लागून असलेली हिरवीगार वृक्षसंपदा. अफाट वातावरण होतं ते!

तिसरा दरवाजा

इथून वाट डावीकडे वळते. सुंदर बांधिव पायऱ्यांनी वर जाता जाता मागे वळून पाहत राहावंसं वाटत होतं. मोठ्या शिळांच्या मधून वाट वर जात राहते. नक्की कशा प्रकारची रचना आहे, हे न उमगू देणारी तटबंदी या शिळांच्या मागे दिसते. यातच तिसरा दरवाजा आहे.

चौथा दरवाजा

वर गेल्यावर चौथा दरवाजा लागतो, परंतु आधीच्या दोन दरवाजांप्रमाणे यावर जाणाऱ्या पायऱ्या सरळ समोरून नाहीत. तर पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडे दरवाजा आहे. याला कमान वगैरे काहीही नाही, तटबंदीमध्ये बरोब्बर चौकोनी भोक पाडावं, तसा हा दरवाजा आहे. परंतु तटबंदीची रुंदी जास्त असल्याने यात शिरताना गुहेत शिरत असल्यासारखं वाटत राहतं.

तोफ

खालून येणाऱ्या पायऱ्या

ही तोफ दरवाजाच्या आधी आहे की पलीकडे गेल्यावर, हे आता नीटसं आठवत नाही. परंतु एका चौथऱ्यावर, गडाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने तोंड करून ही तोफ ठेवलेली आहे. इथूनच पलीकडे खालून वर येणाऱ्या पायऱ्याही छान दिसतात.

हिरवागार तलाव

वाटेत काही वास्तू, पायऱ्या आणि तलाव लागतो. ह्या तलावावर पूर्णपणे हिरवा थर पसरलेला होता.

कमलकन्नी अम्मन मंदिर

वाटेच्या उजवीकडे एक मंदिर लागतं. तिथे मंदिराच्या आधी एक कातळ आणि तीन त्रिशूळ दिसले. अर्थातच हे शिवमंदिर असावं, असं सहजपणे वाटतं. पण हे आहे "कमलकन्नी अम्मन" मंदिर. वाचलेल्या माहितीनुसार, ही या गडावरील सर्वात जुनी वास्तू आहे. गड जेव्हा अस्तित्वात नव्हता, तेव्हापासून हे मंदिर आहे. त्रिशुळासमोर एक कातळ आहे, साधारणपणे मंदिरात समोर कासव असतं तसा वाटतो, पण बघायला गेलं की लक्षात येतं की तो साधा नाही. किंबहुना मी तरी असा कातळ पाहिलाच नव्हता कधी.

बळीपीठ - एक भीतीदायक कातळ

या कातळावर एका बाजूला धनुष्य, तर दुसऱ्या बाजूला पाच बाण आहेत. बारकाईने पाहिल्यास, यातील मधले तीन बाण नेहमीसारखे, म्हणजे भाल्याला जसं टोक असतं त्या टोकाचे आहेत. बाजूच्या बाणांपैकी एका बाणाचं टोक चंद्रकोरीसारखं आणि दुसऱ्या बाणाचं तर तसं टोकच म्हणता येणार नाही खरं तर, कारण ते वळ्यासारखं आहे. या बाणांवरून लहानपणी दूरदर्शनवर बघितलेलं महाभारत आणि त्यातल्या युद्धात वापरत बाणांची आठवण नक्कीच होते.

कातळाच्या मध्ये तर चार मानवी मुखं आहेत. यांच्यामध्ये असलेलं एक मुख कशाचं आहे, ते कळलं नाही. त्याच्या एका बाजूला जीभ बाहेर काढलेल्या रेड्याचं तोंड, तर दुसऱ्या बाजूला मेंढ्याचं. जीभ बाहेर असलेला रेडा-मेंढा यावरून इथे ह्या प्रकारचे बळी दिले जात असावेत, हे स्पष्ट होतं, पण मधल्या मानवी मुखांवरून येथे नरबळी सुद्धा दिला जात असेल की काय, असं वाटतं. असा हा भीतीदायक कातळ आहे.

दुर्मिळ ठेवा - भित्तिचित्र

या मंदिराच्या पाठीमागे कातळ आहे. त्यावर काही चित्रं आहेत. सुरुवातीला कोणीतरी कागदी चित्रं इथे चिकटवलेली आहेत, असं मला वाटलं; परंतु ही चित्रं चक्क सतराव्या शतकातील आहेत. अतिशय दुर्मिळ ठेवा! मध्यभागी असलेला विष्णू स्पष्ट आहे, तर बाजूला दोन देवी आहेत. ही चित्रं थोडी खराब झालेली आहेत. परंतु एकूणच चित्र अतिशय सुंदर असून हे चित्र तब्बल पाच फूट उंच आहे. शेजारी नृसिंहाचं चित्र आहे, पण ते आता बऱ्यापैकी नष्ट झालेलं आहे. अजून एक छोटं चित्र आहे, ते नृत्यशिल्प आहे.

या मंदिराच्या बाजूस एक शिवलिंग आहे. कमलकन्नी मंदिराच्या दरवाजाबाहेर दोन गणेशमूर्ती आहेत.

पाचवा दरवाजा

आजूबाजूला झाडीत लपलेले अवशेष बघत आपली वाटचाल बालेकिल्ल्याकडे चालू ठेवायची. या अवशेषांपैकी काही जवळून पाहता येतात, तर काही जवळ जाताही येत नाही.

या वाटेवर आम्हाला खूप माकडं दिसली. थोडी धीट असल्याने ती जवळ यायला बघतात, त्यामुळे सांभाळून राहावं लागतं. तसं खाण्याचं कोणतंही साहित्य पाठपिशवीच्या बाहेर दिसेल असं ठेवलेलं नव्हतंच, पण तरीही प्रमोदच्या पिशवीतून डोकावणारी खोबरेल तेलाची बाटली मात्र त्यांना आवडली असावी, कारण झडप घालून त्यांनी ती पळवलंनी!

पुढे दरवाजा लागला, हाही दगडी बांधकामात आहे आणि याच्यावरती आणि बाजूला सुद्धा विटांचं बांधकाम आहे. दरवाजावरती विटांच्या बांधकामात एक कमान आहे.

वीर हनुमान

यापुढे वाटेवरून पुढे जाताना एका दगडी शिळेला वळसा मारून वाट वरती जाते. याच शिळेवर सुंदरसा हनुमान कोरलेला आहे. आता आपण बहुतांशी गडांवर गडदेवता म्हणून हनुमान बघत असतो. त्यातल्या काही ठिकाणची मूर्ती विशेष असते, तशीच, किंबहुना अतिविशेष म्हणावी अशी ही मूर्ती आहे. अभ्यासावी अशी!

डाव्या खांद्यावर गदा, डावा हात मांडीवर तर उजवा हात उंचावलेला आहे. गळ्यात कंठा, कानात कुंडलं, कमरेला लंगोट, पोटावर श्रीवत्स कोरलेलं आहे. या हनुमानाला शेंडी दाखवलेली आहे. दोन पायांच्या मध्ये अतिशय सुंदर वैजयंतीमाळ आहे. हातात कडी तर पायात तोडे आहेत. उजवीकडून वर गेलेली शेपटी, उंचावलेल्या हातावरून, डोक्याच्या वर कोरलेल्या शंख-चक्राच्या वरून, वळून डाव्या बाजूला कमरेपर्यंत वक्राकार खाली आलेली आहे. गंमत म्हणजे या वक्राकार शेपटीत, बरोबर हनुमानाच्या डोक्यावर, शंख-चक्राच्या मध्ये, घंटा लटकवलेली आहे. शेपटीचं टोक सुद्धा सर्पाच्या वेटोळ्यासारखं वळवलेलं आहे.

हा हनुमान वीर मारुती मुद्रेत आहे. हनुमान दोन्ही पायांनी "पनवती" नावाच्या एका राक्षशिणीला तुडवताना दाखवलेला आहे. इथे असलेला एक वेगळेपणा मी कुठे पाहिलेला आठवत नाही. तो म्हणजे सगळ्यात वरती, शेपटीच्याही वरती, मधोमध, कीर्तीमुख कोरलेलं आहे!

मूर्तिकाराने आणि घडवून घेणाऱ्याने अतिशय अभ्यासपूर्ण, आखीव-रेखीव मूर्ती घडवलेली आहे. वेळ काढून, उभं राहून मूर्तीचं निरीक्षण नक्की करावं. "जाता-येता वाटेवर दिसलेला देव" म्हणून नुसतं नमस्कार करून पुढे जावं, असं हे शिल्प खचितच नाही. इथे लिहिलेल्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी माझ्या दृष्टीतून राहून गेल्या असतील. आणि हो, इथे दिवा लावता यावा म्हणून छोटी देवळीही कोरलेली आहे.

एकामागून एक पाच दरवाजे ओलांडत आम्ही इथपर्यंत आलो ते समोर एकच लक्ष्य ठेवून - बालेकिल्ला!

वाटेत लागणाऱ्या प्रत्येक वास्तू, प्रत्येक मंदिर पाहत होतोच, पण खिळवून ठेवणारं ठरलं ते कमलकन्नी अम्मन मंदिर… आणि त्यानंतर साक्षात हनुमंताने वीर रुपात दर्शन देऊन आम्हाला थबकवून ठेवलंन. आता अजून पुढे चार दरवाजे बाकी होते आणि त्या पलीकडे उभा होता बालेकिल्ला. ज्याच्याकडे आता वाटचाल सुरू होणार होती.

या लेखात इथे तात्पुरता विराम घेऊ आणि या पुढची चढाई, आणि उलगडत जाणारे अवशेष बघू, पुढच्या भागात…

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!