दुर्ग गोजरा
दुर्ग साजरा वर लेख लिहिल्यावर दुर्ग गोजरा बद्दल लिहिणे म्हणजे जणू शास्त्र असतं ते. तसंही काही मित्रांनी आधीच सांगून टाकलंनी होतंच आधी. त्यामुळे पर्यायही नव्हता. तसं हल्ली २० सेकंदाच्या इन्स्टा व्हिडिओच्या काळात वाचणारेही लोक आहेत पण म्हणजे. मग, "नेक काम मे देरी किस बात की?" पण काय आहे, कामाच्या रगड्यातून वेळ शोधून काढून लिहीणे को वेळ तो लगताहीच है ना...
असो, तर साजऱ्यावरून खाली आल्यावर बहुतेक चेपून इडल्या हाणल्या असतीलच. तसं आठवत नाही म्हणा, पण तेही शास्त्रच असंत की!
गोजरा हा गडही पेस्तन काकांच्या भाषेत "साला हंड्रेड परसेंट मराठी"! म्हणजे हाही किल्ला महाराजांनीच बांधून घेतला होता, साजऱ्या बरोबरच. पण साजऱ्याच्या तुलनेत हा दुर्ग लहान. आणि याचा जोडीदार दुर्ग मूर्तजा, म्हणजे प्रवीण पाटील यांनी मराठीत "धर्मांतर" केलेला लाजरा, म्हणजे हा लाजून बसलेला आहे गोजऱ्याच्या बाजूला ना.. आणि हाही लहानच.
अर्थात, हे दुर्ग बांधण्याचा उद्देश, हा वेल्लोरचा कोट घेण्यासाठी रचलेल्या व्यूहाचा एक भाग होता. त्यामुळे उद्देशाला पुरेसा असा हा दुर्ग बांधलेला असणार. मोठा राबता असावा किंवा वस्ती वसवावी हा मूळ उद्देशच नसल्याने, दुर्ग बांधणी ही उद्देशाला साजेशीच लहान धाटणीची आहे.
![]() |
दुर्ग गोजरा दर्शन |
पोटपूजेनंतर वाटेला लागलो, तेव्हा अकरा वाजून गेले होते. गावातून दिसणारी टेकडी आणि त्यावर मोठ्या-मोठ्या दगडी शिळ्या दिसल्या. त्यावरून काही बांधकाम डोकावत होतं. सापडेल तशा वाटेने वर पोचायचे होते. तसं या किल्ल्यांवर बऱ्यापैकी लोक येतात, साजऱ्याच्या तुलनेत. त्यातून इथे जंगलही नाही, त्यामुळे फार प्रश्न येणार नव्हताच.
टेकडी चढायला सुरुवात केल्यावर कार्तिक स्वामी मंदिर लागतं, इथून डावीकडे वाट वरती जाते. आम्हाला दगडांवर काही ठिकाणी बाण दिसले. योग्य वाटेवर आहोत याची खात्री करत निवांत चढाई चालू होती. टेकडी तशी उघडी-बोडकी आहे, झाडी फार नाही. तुरळक काटेरी झुडुपं आणि लहानशी झाडं. वर बघितलं तर गडाची उंची फार दिसत नव्हतीच.
मोठे-मोठे खडक आणि त्याच्या शेजारून वाढलेली, परंतु खडकांच्या उंचीपेक्षा कमी उंचीची झाडं दिसत होती. त्यातूनच तटबंदीही डोकावताना दिसली. गंमत म्हणजे नुसती टेकडी, आजूबाजूला फोटो काढण्यासारखं काही नव्हतं.
![]() |
बाण, शिळा आणि तटबंदी |
बराच वेळ झाला होता तसा, तरी किल्ला काही येईना. उगाच वाकडेतिकडे वाटेने वर जात होतो बहुतेक असं वाटावं, इतका वेळ लागला. नाही, पण वाट चुकत नव्हतो. एक तर या गडांवर लोक बऱ्यापैकी फिरायला येत राहतात. तशातच एका दगडावर एक बाण दिसला, म्हणजे योग्य वाटेची खात्री! तसा गड जवळपास आलाच होता. वर दगडी शिळाही जवळच आल्या. त्यातून तटबंदी अगदी जवळ डोकवायला लागली.
![]() |
प्रवेशद्वार |
ती झाडाझुडपांनी वेढलेली तटबंदी जवळ येत होती आणि दरवाजाही दिसला. ताशीव दगडांनी बांधलेला दरवाजा. गोमुखी वगैरे नाही. वरती विटांची आता भग्न झालेली जुनी बांधणी.
जुन्या काळातल्या खुणा, म्हणजे नेहमी दरवाजांवर आढळणारे गणेश शिल्प, कमळ.. ह्यातलं काहीच दिसत नव्हतं. पण आधुनिक काळातले शिलालेख मात्र जिथे जाता येईल तिथे जाऊन लिहून ठेवलेले दिसले.
![]() |
बालेकिल्लाच्या दरवाजाकडे आणि वाट |
तसा हा गड छोटाच, आणि त्यातही उतारावर, उपलब्ध नैसर्गिक खडकांचा आधार घेऊन, तसा विचार करून बांधलेला. आतमध्ये गेल्यावर डावीकडे वरचा दरवाजा दिसला. याला बालेकिल्ला म्हणता येईल का? दरवाजासमोरच बाहेरच्या बाजूला प्रचंड खडक होते. हे तेव्हापासून आहेत आणि त्याचाच संरक्षणासाठी म्हणून उपयोग केला असावा, असं वाटलं. कारण हे इथे सहजगत्या कसे येऊन पडणार म्हणा!
पण दरवाज्याची वाट जशी दिसत होती, तशी पूर्वी नसावी. की गडबांधणीचा जो उद्देश होता, त्यात अशा वाटेने हेतूला आडकाठी येत नसेल म्हणून जशी सोपी पडली तशीच बांधली की काय... कोणास ठाऊक! पण खडकांवर तयार झालेल्या (की केलेल्या?), कोरलेल्या पायऱ्यांवरून सावधपणे चालत दरवाजा गाठला.
![]() |
बालेकिल्ला दरवाजा |
दरवाज्याची कमान अगदी तंतोतंत आधीच्या दरवाज्यासारखीच, ताशीव दगडांची, आयताकार रचना. इथेही बहुतेक शिल्पं नसावीतच. मात्र वर्तमानकालीन शिलालेखांबरोबर इथे दूरध्वनी संपर्क क्रमांकही लिहून ठेवलेले दिसले. आपला ऐतिहासिक ठेवा विद्रूप करण्याचा अभिमान असावा तर असा!!
डावीकडचा मोठा खडक प्राचीन काळापासून तसाच आहे, हे तिथली रचना बघता स्पष्ट झालं. कारण दरवाज्याची भिंत त्याच्याच आधाराने बांधलेली दिसली. आणि खडकावरतीच विटांचे बांधकाम. प्रश्नच मिटला ना.. अजून काय हवं त्याचं मूळ स्थान स्पष्ट करायला? दरवाज्यावरील विटांचं बांधकाम किती छान होतं! त्यातल्या कमानी ढासळत चाललेल्या असल्या तरी मूळ सौंदर्य लपत नव्हतं. मात्र उजवीकडच्या कोपऱ्यात जोमाने वाढलेलं झाड हळूहळू त्याच्या नाशास पुढे कारणीभूत ठरणार आहे.
![]() |
भग्न वास्तू आणि पुढे तटबंदी |
आतमध्ये समोरच एक भग्न वास्तू आहे. त्याचा ढाचा इतका ढासळलेला आहे की ती वास्तू कशाची आहे, दरवाजा-खिडकी किंवा प्रवेश कुठून वगैरे काहीच लक्षात आलं नाही. भिंतीला मधोमध भगदाड पडलं असलं तरी उरलेल्या भिंतींनी वरचं छत अजून तोलून धरलेलं आहे. वास्तूच्या मागच्या बाजूला जमिनीचा भाग संपलेला दिसत होता, कारण इथे तटबंदीच्या चर्या दिसत होत्या. हाच भाग खालून वर बघितल्यावर दिसतो तोच असावा. जिथे आम्ही उभे होतो तिथे बऱ्यापैकी भाग अजून खाली शिल्लक असावा, जो आता माती पडून बुजलेला आहे.
![]() |
गोजऱ्यावरून साजरा |
![]() |
जलकंठेश्वर मंदिर आणि वेल्लोर कोट |
कडेला जाऊन साजऱ्याकडे बघितलं. जो डोंगर दिसला, तो साजरा दुर्ग आहे असं कोणी सांगितलंनी असतं ना, तरी त्यावर विश्वास बसला नसता! नुसती झाडी, दुर्ग असल्याच्या काहीही खुणा इथून दिसेनात. नुसताच झाडाझुडपांनी भरलेला डोंगर. पण आम्ही काही वेळापूर्वी तिथेच होतो त्यामुळे तोच गड होता हे नक्की.
खाली पाहिलं तर "जलकंठेश्वर" मंदिर आणि वेल्लोरचा कोट व्यवस्थित दिसत होता. पण वातावरण साफ नव्हतं, प्रचंड धुकं होतं. त्यात लांबचे फोटो काढले तर त्यात काहीच दिसेना. बाकी खालचं, जवळचं वेल्लोर मात्र स्पष्ट दिसलं, फोटोत पण.
![]() |
गोजरा - आतली बाजू |
गडमाथा लहानसा आहे. थोडी सपाट जमीन, त्यातच मधेच मोठा खडक. कडेच्या बाजूला तर खडकच, आणि त्यावर जमेल तसं तटबंदी बांधून भाग सुरक्षित केलेला. सह्याद्रीत जसे नैसर्गिक कातळकड्यांचा आधार घेऊन तटबंदी बांधलेली असते, तसलाच प्रकार, फक्त इथे कातळांच्या ऐवजी तेच ठराविक पांढरे, मोठाले खडक.
चहुबाजूने असलेली तटबंदी ही खालीपासून थोडी उंची दगडांनी, तर वरती विटांची, ह्याच स्वरूपाची होती. चर्या-जंग्या स्पष्ट होत्या. त्यावर वाढलेल्या झाडांमुळे मात्र हळूहळू ती सुंदर तटबंदी ढासळून जाईल.
गडावर जे काही बांधकाम होतं ते बऱ्यापैकी ढासळून गेल्याने, कशाचाही फारसा बोध होत नव्हता.
![]() |
सर्वोच्च स्थानाकडे जाणारी वाट |
पुन्हा मागे फिरलो आणि ह्यातल्या थोड्या वरच्या भागाकडे, म्हणजे गडाच्या सर्वोच्च स्थानाकडे निघालो. इथे जाण्यासाठी दरवाज्याच्या कडेनेच वाट वर जाते. ह्या बाजूच्या चर्या इतक्या सुंदर आहेत आणि अजून शिल्लक आहेत! वर जाणारच होतो, पण वास्तविक वेळ टळटळीत बाराची होती. ऊन तापत होतं, त्यात वर पोहोचेपर्यंत कुठेच थांबलो नव्हतो आणि तशी जागाही मिळालेली नव्हती. समोर मात्र सावली दिसली. जरा बुड टेकवलं, तहान लाडू, भूक लाडू बाहेर काढले.
![]() |
वरून गडाच्या आतला भाग |
या बाजूच्या चर्या सुंदर आहेत. त्या खडकांवरूनच तटबंदीच्या कडेने वरच्या बाजूला गेलो. गडाचा आतला संपूर्ण भाग इथून दिसला. प्रमोद, अभिषेक अजूनही सावलीतच बसले होते. गडावरील वास्तूंचं बांधकाम पाहता, त्या वेगवेगळ्या कालखंडात बांधलेल्या असाव्यात, असं मला तरी वाटलं.
![]() |
खिडकीत अस्मादिक |
इथे एका बाजूला एक झरोका आहे, जो तटबंदीतच आहे. आणि नेमका झरोख्याच्या खाली प्रचंड मोठा खडक आहे, जो तटबंदीच्या बाहेरच्या बाजूलासुद्धा शिल्लक आहे. हा एक मस्त कोपरा आहे तटबंदीचा. इथे छान फोटो काढून घेतला. इथून खालचं वेल्लोर छान दिसतं.
![]() |
लाजरा दर्शन - गोजऱ्यावरून |
आता गोजरा बऱ्यापैकी पाहून झाला होता. यानंतर पुढचा जोडदुर्ग - दुर्ग मूर्तजा उर्फ लाजरा (प्रवीण भोसलेंनी दिलेलं नांव) उर्फ राणी (स्थानिकांच्या मते) हा 'राणी'. राणी का? तर हा गड गोजऱ्याच्या शेजारीच आहे आणि गोजरा राजा, म्हणून हा राणी... तर त्याच्याकडे जाणारी वाट बघायची होती. गोजऱ्यावरच्या सर्वोच्च ठिकाणाच्या ह्या कोपऱ्यावरूनच, समोरच एका टेकडीच्या पलीकडे तो मूर्तजाही डोकावत होता. कॅमेराची कमाल, काय सुरेख फोटो मिळाला! वरून साधारण वाटही बघून घेतली.
उन्हामुळे जरा थकवा जाणवत होता, पण जायचं तर होतंच ना तिकडे.
![]() |
विहीर - प्रवेश भाग |
त्या नादात पटकन खाली उतरलो. बालेकिल्ल्याचा दरवाजा, मग मुख्य दरवाजा उतरून बाहेरही आलो. जरा बाकीच्यांची वाट बघत थांबलो, तर "अरे, इथली विहीर बघितली का?" विनीत! बोंबला.... लाजऱ्याच्या नादात ती विहीर राहिलीच की! नशीब त्याने हाक मारलीन. मग काय, परत वर गेलो ना चढून.
आता मुख्य दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे वरती बालेकिल्ल्याकडे गेलो होतो आणि तसंच खाली आलो होतो. पण बालेकिल्ल्याकडे न जाता उजवीकडे, दाट झाडीत घुसलो तर इकडे विहीर आहे. तीच बघायची राहिली होती.
![]() |
विहीर |
विनीत वरती होता. मी पटकन खाली गेलो तर तिथे मकरंद सरळ त्या कोरड्या विहिरीत उतरून रील काढत होता. त्याचा फायदा घेऊन तिथे एक फोटो काढून घेतला. ☺️ मग निवांत विहीर बघितली. अप्रतिम बांधकाम! या गडावरील सुस्थितीतली आणि रेखीव अशी ही कलाकृती. दगडांची बांधणीच अशी की जणू पूर्ण विहीरच नक्षीकाम वाटावी.
![]() |
विहीर - विविधं शिल्पं |
या विहिरीत उतरायला पायऱ्या आहेत. शेवटच्या पायरीच्या बाजूला भिंतीवर एक बापा विराजमान होतेच, परंतु आतल्या बाजूला, विहिरीच्या भिंतींवर एक सुंदर कासव, एक मासा व एक शिवपिंडी आणि काही नक्षी अशी शिल्पंही होती. साफसफाईची इथे खूप गरज आहे, पण त्या नंतर मात्र ही बावडी खुलून दिसेल यात संशय नाही. गंमत म्हणजे विहीरही खालून काही फूट दगडांची आणि वरती भाजलेल्या विटांची. गाळ उपसला तर अजूनही काहीतरी कलाकृती नक्कीच दडलेल्या असतील, त्या बाहेर येतील.
शेवटी गोजरा सोडला. वाट धरली मूर्तजाची.
साजरा, गोजरा ह्या गडांची नांवं. तामिळनाडूमधली सरकारी दरबारी, सच्चाराव, कुठल्या राव — अगदी "साला हंड्रेड परसेंट मराठी, खरे मराठी गडबी असे नाय"! मात्र 'मूर्तजा' हे नाव तसंच आहे. त्यामुळे प्रवीण भोसलेंनी दिलेलं नांव इथे सार्थ वाटतं.
दुर्ग मूर्तजा उर्फ लाजरा उर्फ राणी
![]() |
लाजऱ्याची वाट |
एक वाजून गेला होता. गडावर जायची वाट गोजऱ्यावरूनच बघून ठेवलेली होती. लक्ष समोरच होतं. या गडाची वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार तटबंदी लक्ष वेधून घेते. खडकांचा आधार घेऊन बांधलेला गोलाकार बुरुज मस्त दिसला.
![]() |
दुर्ग लाजरा - प्रवेशद्वार |
त्याला वळसा मारल्यावर लगेच गडाचा दरवाजा दिसला. गोजऱ्यासारखाच कमानीपर्यंत दगडी बांधकाम आणि वर भाजलेल्या विटा. मकरंद दादांनी इथे जो भन्नाट फोटो मारलानी आहे ना.... बेफाटच!
![]() |
गडाचा आतील भाग |
गडाचा माथा तर गोजऱ्यापेक्षाही छोटा आहे. गडावर एकच वास्तू दिसली. त्याचेही छत गायब, भिंती मात्र शाबूत होत्या. तटबंदी सगळीकडे सारख्या उंचीची नाही. काही ठिकाणी दोन पुरुष इतकी उंच, तर काही ठिकाणी दोन-चार फूटच. अर्थात, ही बाहेरच्या बाजूने दिसणारी उंची. आतील बाजूने मात्र ती समपातळीत आहे. बाहेरच्या खडकांच्या उतारामुळे तशी बांधावी लागलेली आहे, जेणेकरून आतमध्ये समपातळीत राहील.
![]() |
गोजरा दर्शन - लाजऱ्यावरून |
गोजऱ्यावरून जसा हा गड सुंदर दिसला होता, तसाच इकडच्या बुरुजावरूनही गोजराचाही फोटो कॅमेराच्या कृपेमुळे मस्त मिळाला.
पण हे नंतर. येथे पोहोचल्यावर मात्र राहवलं नाही. "साजरा-गोजरा" नांवं ऐकल्यापासून 'लाजरा न् साजरा मुखडा' हे गाणं डोक्यात घुमत होतं. इथे त्यात शब्द बदलून दुसरं गाणं आपोआप तयार झालं, आणि मी नी प्रसाद तर चक्क नाचलो!
स्वाभाविक होतं, नाही का? पुण्यापासून हजार किलोमीटर लांबवरचे हे गड पाहायचे, हे स्वप्न होतं जणू. कारण जवळपासची ठिकाणं सुद्धा बरेच वेळा काही ना काही कारणाने राहून जातात, तर हजार किलोमीटरवरच्या गोष्टींचा योग कधी येणार? पण योग आला, संधी मिळाली, ती सोडली नाही. कसं चालेल म्हणा सोडून? कारण नंतर कितीही पश्चाताप केला तरी मनातून खंत जात नाही, आणि ती गोष्ट मन खातच राहते. ती वेळ येऊ न देता नियोजन तडीस गेलं होतं. नियोजनात साथीदार हे कायम सगळ्यात महत्त्वाचे असतात, याची जाणीव होत राहते. आनंद होणं आणि तो वाटायला मिळणं, यासारखं सुख नाही...
वेल्लोरमध्ये येऊनही वेल्लोर कोटापेक्षा या मराठमोळ्या त्रिकुटाचं जास्त कौतुक होतं. मनातली इच्छा पूर्ण झाली. समाधानाने "टेकडीवरील हे गड" पाहून झाले. संध्याकाळी जलकंठेश्वर मंदिर, वेल्लोरचा कोट पाहिला. दिवस सार्थकी लागला!!
![]() |
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |