Sunday, September 21, 2025

दुर्ग रायाकोत्ताई (तामिळनाडू)

दुर्ग रायाकोत्ताई

आमच्या तामिळनाडू मोहिमेतला भेट दिलेला हा पहिला दुर्ग. साजरा–गोजरामुळे लिहिण्यासाठी म्हणून हा थोडा बाजूला ठेवला गेला. कारण, या गडाचे कर्ते मराठा साम्राज्यपैकी कोणीही नाहीत.

झुकझुक गाडीने सकाळी बंगलोरला पोचलो आणि आमची प्रवासाची साथीदार बदलली. इथून आमचा पूर्ण प्रवास इनोव्हाने होणार होता. बंगलोरवरून तामिळनाडूमध्ये शिरल्यावर आमच्या नियोजनात "रायाकोत्ताई" हा पाहिला दुर्ग होता.

गडदर्शन

साधारण पाऊणच्या सुमारास या गडाचं दर्शन झालं. बंगलोरपासून अवघ्या ७० किलोमीटरच्या आसपास असेल हा, पण तो तामिळनाडूच्या हद्दीत येतो.

सुरुवात - पायरी मार्ग

गाडी गडाच्या पायथ्याला जाते. रस्त्यावरून गाडीतूनच ह्याचा पहिला फोटो घेतला आणि बरोबर आठव्या मिनिटाला गडाच्या अक्षरशः पायरीवर होतो आम्ही. सह्याद्रीतून कर्नाटकच्या खालच्या भागात आलो की भौगोलिक स्थितीत आणि निसर्गात जो बदल होतो, तो अपेक्षित होता. तसेच मोठमोठाले पांढरे खडक, भल्या मोठ्या शिळा, खुरटी झुडपं.

पहिला दरवाजा

पांढऱ्या दगडांच्या पायऱ्यांवरूनच आणि त्या संपल्यावरसुद्धा अशाच प्रकारच्या दगडांवरून अवघ्या पाच मिनिटांत पहिल्या दरवाज्यात पोचलो सुद्धा.

हे बांधकाम अति पुरातन नसणार हे उघड होतं. बहुतांशी इंग्रजांच्या काळातलीच असण्याची शक्यता जास्त होती. कदाचित त्यानंतरही डागडुजी केली गेली असेल, पण आता तेही भग्न झालेलं होतं. दरवाजा जरी लागला असला तरी गडाचे महत्वाचे अवशेष सगळे वरतीच आहेत आणि तिथे पोचायला अजून वेळ लागणार होताच.

गुहा मंदिर

डावीकडे एके ठिकाणी खडकांना पांढरा रंग लावलेला दिसला. विजेचा खांबही त्याला खेटून होता. खडकांवरच्या चिन्हांवरून तिथे मंदिर असणार हे स्पष्ट होतं. खडकाची नैसर्गिक रचना, त्याचा आधार घेऊन केलेले बांधकाम – अश्या मिश्र बांधणीत हे शिवमंदिर आहे. शिवपिंडी आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन मूर्ती, समोर नंदी, बाजूलाच एक पिण्याच्या पाण्याचं सुंदर टाकं, थोडं जवळ एक तुळशीवृंदावन – असं सुंदर स्वरूप या मंदिराचं आहे.

मुख्य दरवाजा मार्ग

वाट स्पष्ट होती. मोठाल्या खडकांजवळून, नैसर्गिक गुहांजवळून वरवर जाताना थोड्याच वेळात गडाचा मुख्य दरवाजा दिसला. म्हणजे प्रत्यक्षात दरवाजा जरी दिसला नसला, तरी वाटेवरचं दिसणारं सर्व बांधकाम आणि समोर दिसणारी रचना, हे पुढे दरवाजाच असणार आणि तोही मुख्य, हे स्पष्ट करत होतं.

उजवीकडे असलेली सिमेंटची भिंत सांगत होती की, ह्या भागाचा जिर्णोद्धार अगदी नवथर पण करण्यात आलेला आहे. अर्थात, तीही एका ठराविक लांबी नंतर पूर्णपणे तुटून गेलेली आहे (किंवा तेवढीच बांधली असावी). डाव्या बाजूला असलेल्या मोठ्या खडकाखाली मिळालेल्या नैसर्गिक जागेत मस्त खोली बांधून त्याचा वापर केलेला होता.

सह्याद्री आणि इथला असलेला फरक दरवाज्याच्या बांधणीतपण दिसला. सुरक्षिततेच्या दृष्टीने गोमुखी दरवाजा बांधायला जागा नसली, तरी उपलब्ध भागावर वेगळ्याच पद्धतीची रचना इथे केलेली आहे. खडकांचा उपयोग करून मस्त निमुळता दिसणारा बुरुज आहे.

दरवाजा

दरवाजा अनेक वेळा पुनर्बांधणीतून गेला असेल, आणि त्यात सध्याच्या कमानीवर बरोबर मध्ये "1797" असे स्पष्ट दिसतं. म्हणजे ही कमान १७९७ ह्या वर्षी बांधण्यात आलेली आहे. अर्थातच मूळ नव्हे, तर ही पुनर्बांधणी असणार आणि म्हणजे इंग्रजांकडून याची डागडुजी झालेली आहे.

थोडं इतिहासात डोकावायला गेलं की हे कळतं की, टिपू सुलतानकडून इंग्रजांनी हा गड जिंकून घेतला, त्यानंतर हा दरवाजा पुन्हा बांधलेला आहे. आता शेजारचं बांधकाम जुनं, मग मूळ दरवाजा कुठे गेला? गंमत म्हणजे, १७९१ मध्ये तिसरं अँग्लो–म्हैसूर युद्ध जेव्हा झालं, तेव्हा ह्या बारामहाल प्रदेशात इंग्रजांनी जनरल मिडोजच्या नेतृत्वाखाली या गडावर हल्ला केला. त्यावेळी बहुतेक कोलोनेल मॅक्सवेल हा तुकडी प्रमुख होता. त्यानेच तोफेने हा दरवाजा उडवला होता गड जिंकण्यासाठी आणि मग नंतर गड ताब्यात आल्यानंतर निवांत १७९७ मध्ये त्याची पुनर्बांधणी सुद्धा केलीन.

दगडाखाली खोली

दरवाजामागे गेल्यावर दगडांमध्ये खोल्या दिसल्या. भिंती शाबूत असल्या तरी छत गायब झालेलं आहे. सगळं बांधकाम विटांचं आहे. स्पष्ट असलेल्या वाटेवरून पुढे जाताना परत एका प्रचंड शिळेखाली बांधलेली खोली दिसली. अशाच काही इमारती बघत थोड्या उंचवट्यावर पोचलो. इथेही काही वास्तू होत्या.

टेहळणीसाठी ह्या जागेचा उपयोग केला जात असावा आणि त्यावेळी पहारेकऱ्यांच्या विसाव्याची किंवा राहण्याची ही जागा असावी. जवळच, छत गोलाकार असलेली इमारत आहे, हे दारूगोळा कोठार असावं. हे सर्व बांधकाम इंग्रजांची बांधकामशैली दर्शवत होतं.

दारुगोळा कोठार आणि मागे सर्वोच्च स्थान

ह्या इमारतीपलीकडे, खरंतर अलीकडे, कारण ह्याच बाजूने इथे पोचलो होतो, गडाचं सर्वोच्च ठिकाण दिसलं. जवळच्या इमारती पाहून तिकडे निघालो.

खडकात पायऱ्या

सगळीकडे बांधकाम केलंच पाहिजे असं नाही. नैसर्गिक घटकांचा उपयोग करून अनावश्यक बांधकाम टाळता येतं आणि वेळही वाचवता येतो, हे गडबांधणीत कायमच दिसून येतं. इथेही या सर्वोच्च ठिकाणाकडे जाताना खडकातल्या कोरलेल्या ह्या सुंदर पायऱ्या दिसल्या.

सर्वोच्च स्थान आणि देवस्थान

वरून गडावरील वास्तू - दारूगोळा कोठार वगैरे

सर्वोच्च ठिकाणी हे देवस्थान आहे. बाकी कोणत्याही वास्तू इथे सध्या नाहीत. इथून गडाचा बराच भाग दिसला. मगाशी जिथून आलो ते दारूगोळा कोठारही मागे दिसलं. फोटोत अंतर वेगळं भासतं का? गंमत म्हणजे, त्या ठिकाणाहून इथे वरती यायला फक्त सात ते आठ मिनिटे लागली होती – ती सुद्धा फोटो काढत! अंतरच कमी होतं की अंतर बऱ्यापैकी असूनही फक्त सर्वोच्च ठिकाणावर यायच्या ओढीने आम्ही वेगाने पावलं टाकली होती? काय माहिती!

हनुमान

आता आल्या वाटेने झपझप खाली निघालो. कारण सगळ्या वास्तू पाहतच वर आलो होतो, त्यामुळे बघण्यासाठी आता तसं काही शिल्लक राहिलं नव्हतं. पण तरीही खाली येताना एका बाजूला राहून गेलेल्या मारुतीरायांनी उतरताना अगदी बोलावूनच दर्शन दिलंनी.

मारुती"राया"वरून एक गोष्ट आठवली, जी खरंतर सुरुवातीलाच यायला पाहिजे होती, ती म्हणजे या गडाचं नांव आणि अर्थ. त्यासाठी अतिशय थोडक्यात या गडाचा इतिहास नजरेखालून घालू.

या गडाचा सगळ्यात पहिला उल्लेख असलेला कालखंड म्हणजेच १४वे ते १६वे शतक. विजयनगर साम्राज्यात याची बांधणी कृष्णदेवराय किंवा अच्युतदेवराय यांच्याकडून झाली. नंतर १७व्या शतकात स्थानिक नायकांकडे हा गड होता. नंतर मराठा साम्राज्यातही हा गड व्यंकोजी राजे/एकोजी राजे यांच्याकडे होता. त्यानंतर हैदर अली, मग टिपू सुलतान, आणि नंतर इंग्रजांकडे पोचला.

इतिहासात डोकावायचं कारण म्हणजे ह्या गडाचं तग धरून राहिलेलं नांव. "राया" म्हणजे राजा आणि "कोत्ताई" म्हणजे दुर्ग. रायाकोत्ताई – म्हणजेच राजांचा दुर्ग. सगळ्या राजवटींतून इंग्रजांपर्यंत पोचूनही तो रायाकोत्ताईच राहिला.

तामिळ प्रदेशातल्या या भटकंतीची सुरुवात ह्या विजयनगर साम्राज्याच्या राजांच्या दुर्गाने झाली. पुढे प्रवास वेल्लोरकडे होणार होता. पण वाटेत अजून एक गड बघणार होतो.. कृष्णगिरी!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!