दुर्ग कृष्णगिरी
तामिळनाडूमध्ये कृष्णगिरी नावाचे मुख्यत्वे दोन दुर्ग आहेत. एक जिंजीच्या दुर्गसमूहात आहे, तर दुसरा कृष्णगिरी नावाच्या जिल्ह्यात. रायाकोत्ताई-वेल्लोर प्रवासात कृष्णगिरी हे जिल्ह्याचे ठिकाण लागतं. मुळात रायाकोत्ताई हा दुर्गही याच जिल्ह्यात येतो. कृष्णगिरी धरण आणि कृष्णगिरी दुर्ग, दोन्हीही ह्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या जवळच आहेत.
तसं म्हटलं, तर या प्रदेशात डोंगराळ भाग खूप असल्याने लहानमोठे गड तसे अजूनही आहेत. अगदी रायाकोत्ताई वरून कृष्णगिरीला येताना सुद्धा रस्त्याजवळ मध्येच "अरुलगिरी" नावाचा गड आहे. पण या सर्व गडांना भेट देणं वेळेअभावी शक्य नसलं, तरी महत्त्वाच्या दुर्गांना भेट देण्याचं मात्र टाळून चालणार नव्हतं.
रायाकोत्ताई आणि कृष्णगिरी हे ज्या प्रदेशात येतात त्याला "बारामहाल" म्हणून ओळखलं जात होतं. ह्या प्रदेशाला जुना सालेम म्हणूनही ओळखलं जातं. सध्या तो मुख्यत्वे तीन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे - कृष्णगिरी, धर्मापुरी आणि सालेम.
या भागात बारा गड होते, म्हणून बारामहाल. अर्थात, ह्या बारा गडांची संपूर्ण यादी तशी नक्की सांगता येत नाही, परंतु यातील महत्त्वाच्या दुर्गांमध्ये रायाकोत्ताई आणि कृष्णगिरीचा समावेश होतो. त्यातही कृष्णगिरी हा सर्वात महत्त्वाचा दुर्ग.
![]() |
मनसोक्त ताक |
दुपारी तीनच्या आसपासची वेळ असेल. झकास ऊन होतं. वाटेत सुंदर वटवृक्षाखाली ताकाची भरलेली पिंप दिसल्यावर गाडी आपोआपच थांबली. त्या तळपत्या उन्हात ताक हे अमृतासमानच की! त्यातून त्या काकूंनी लहान भांडी, छोटे ग्लास वगैरे न घेता सरळ ताकाने भरलेले तांबेच पुढे केले. वास्तविक आम्ही तामिळनाडू राज्यात होतो, जिथली भाषा आम्हाला जराही येत नव्हती आणि तिथल्या लोकांना आम्हाला समजणारी कोणतीही भाषा. पण ती अडचण मात्र इथे आली नाही. आम्ही मागत गेलो ते देत गेले. आता मनसोक्त ताक प्यायल्यावर "जरा अंमळ पडावं" असं कोणाला वाटणार नाही? पण अजून कृष्णागिरी बघायचा होता आणि रात्र व्हायच्या आधी वेल्लोरसुद्धा गाठायचं होतं. पूर्ण मोहीम शिल्लक होती, आज पहिलाच दिवस आणि मोहिमेची सुरुवातच अश्या दिवसाने कशी करून चालेल...
![]() |
दुर्ग कृष्णगिरी दर्शन |
साडेतीन वाजता गडाने पहिल्यांदा दर्शन दिलंन. ड्रायव्हर सीटवर नसल्याचा फायदा म्हणजे गाडीतून प्रवास चालू असतानाही बाहेर निरखता येतं. गड दिसला, तसं गडावरील ठळक वास्तू लक्षात घेतल्या. साधारण चढायचा मार्ग, स्वरूप, उंची, असा एकंदर भाग पाहून घेतला. फोटोही काढता आला.
![]() |
पायरी मार्ग - सुरुवात, वारूळ पूजा |
हे सगळं केवळ दोन मिनिटांत झालं असेल, कारण कृष्णगिरी गड दिसल्यानंतर पाचव्या मिनिटाला आम्ही गडाच्या पायऱ्यांजवळ, भारतीय पुरातत्त्व खात्याच्या निळ्या फलकाजवळ होतो. चढायला सुरुवात केली आणि जवळच एका उंच वारुळाला शेला वगैरे काहीसं बांधून त्याची पूजा केलेली दिसली.
![]() |
जागोजागी कोरलेले देव - शंकराची पिंडी, गणपती, मारुती |
पुढे दगडावरच शंकराची पिंडी, नंदी वगैरेही कोरलेले होते. त्याच्याच बाजूला चक्क गणपतीची मूर्ती, तीही आखीव, रेखीव आणि सुंदर. खाली उंदीरही कोरलेला होता. पायऱ्या संपल्यावर दगडामधूनच वाट वर जाते.
वाटेत दगडी शिळांना मध्ये मध्ये शेंदूर लावून पूजा केलेली दिसली. काही ठिकाणी शेजारी ‘ॐ’ लिहिलेलंही दिसलं. एका ठिकाणी हनुमान कोरलेला होता, त्याचीही शेंदूर लावून पूजा केलेली होती. अजून पुढे गेल्यावर आणखी एक हनुमानाची मूर्ती दगडावर कोरलेली दिसली.
![]() |
हनुमान मूर्ती |
ही मूर्ती मात्र अभ्यासण्यासारखी आहे. मूर्तीशेजारी मोठा शंख कोरलेला आहे. हनुमानाची शेपटी लांब, डोक्यावर आलेली असून त्यात घंटा धरलेली आहे. तो शेपटीनेच घंटा नाद करतोय असं भासतं, कारण घंटा वाजवताना जशी तिरकी होते, तशीच ती इथे शेपटीत कोरलेली आहे.
![]() |
कोरलेल्या पायऱ्या |
वरती दिसणाऱ्या दगडांवर तटबंदी, बुरुजाचे अवशेष दिसत राहतात. मार्ग काढत एका चढावरून वर चढल्यावर तटबंदी शेजारच्या वाटेला लागलो. चढ तीव्र असल्याने चढण्यासाठी त्यात पायऱ्या कोरलेल्या आहेत.
![]() |
दरवाजाचा मार्ग आणि दरवाजा |
मूळ जुन्या पायऱ्या आता व्यवस्थित शिल्लक राहिलेल्या नाहीत, तरी अवशेषांवरून पूर्वीच्या काळी हा मार्ग किती मजबूत, आखीव-रेखीव आणि सुंदर असेल हे सहज लक्षात येतं.
या पायऱ्यांवरून एका दगडी शिळेजवळ सुरक्षित स्थान निवडून दरवाज्याची जागा आहे, तिथे पोचलो. आता ‘दरवाजा होता’ असंच म्हणायचं, कारण दरवाजा तर सोडाच, त्याची कमानही शिल्लक नाहीये. वाट पुढे एका बुरुजाला वळसा घालून जाते.
तिकडे गेल्यावर वरती मोबाईलचा किंवा कसलातरी टॉवर दिसला. शेजारी जुन्या वाड्याचे अवशेषही दिसले. खाली पाहिल्यावर कृष्णगिरी शहर दिसलं.
![]() |
टाक्याकडे जाण्याचा त्रिकोणी मार्ग |
इथे पोचायला तासभर लागला होता. वरती दिसलेला टॉवर आणि वाड्याचे अवशेष याकडे आधी न जाता आम्हाला दुसरीकडेच जायचं होतं. गडावर अजूनही इतर अवशेष होतेच, पण ते नंतर पहायचं ठरवलेलं होतं, कारण आधी शोध घ्यायचा होता एका पाण्याच्या टाक्याचा.
साधारण बाण काढलेले होते काही ठिकाणी, पण सहज सापडावं असं त्या टाक्याचं स्थान नव्हतंच मुळी. एका ठराविक ठिकाणापर्यंत बाण सहज नेतात, त्यापुढे मात्र ‘जाओ अब आपही ढुंडो’ असं म्हणून सोडून देतात. इथे असलेल्या दगडी शिळांवर मध्येच कुठेतरी सूचना देण्यासाठी बाण काढलेले आहेत, पण ते एखाद्या कोड्यासारखे सोडवत-सोडवत जावं लागतं.
सुदैवानं कोडं पटकन सुटलं आणि समोर दोन शिळांनी डोकं जुळवून केलेला त्रिकोण दिसला.
![]() |
टाकं |
त्या त्रिकोणातून आत गेलो आणि टाकं सापडलं! इथे बाकीचेही बांधकाम दिसलं. म्हणजे पिण्याच्या पाण्याबरोबर कदाचित राहण्याची सोयही इथे केलेली असावी. तसे आता त्या बांधकामाचे फक्त अवशेष शिल्लक आहेत, पण त्या भिंतीवरून अंदाज येतोच.
![]() |
टाक्यातून बाहेर प्रकाशरंग |
पाणी छान होतंच, अपेक्षेप्रमाणे. दुपार असल्यामुळे आतमधून बाहेर बघितल्यावर जो प्रकाश पडत होता, तो विशेष सुंदर दिसत होता. त्याचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही.
तिथून बाहेर पडून वरच्या बुरुजाकडे गेलो. त्यापलीकडे अतिशय सुंदर बांधकाम दिसलं. दुर्गस्थापत्यात भौगोलिक स्थितीचा आणि उपलब्ध साधनांचा वापर कसा करावा याचं उत्तम उदाहरण आमच्यासमोर होतं.
![]() |
दगडी छत घेऊन बांधकाम |
एक मोठी दगडी शिळा जणू छत म्हणून वापरली आहे, असं ते बांधकाम होतं. साधारणपणे शिळेखाली नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मोकळ्या बांधकाम केलेलं दिसतं, पण इथे तर आधी बांधकाम करून वर छतासारखी शिळा बसवलेली आहे, असं वाटत होतं.
अर्थात तसं प्रत्यक्षात अशक्यच, पण बघताना अगदी तसंच भासावं असं ते बांधकाम आहे. आजूबाजूचं असलेलं गवत जाळलेलं होतं, त्यामुळे बांधकाम तर स्पष्ट दिसत होतं, पण आगीत बांधकामावरचंही गवत जळून काळे डाग पडलेले दिसत होते. त्या सुंदरतेला दृष्ट लागू नये म्हणून जणू काजळाची तीट जणू!
हे बांधकाम नक्की कशाचं असावं हे सांगता येत नाही, पण सैनिकांची लपण्याची जागा किंवा निवासाचं ठिकाण अशा प्रकारचं काहीतरी असावं. किंवा व्युहही असेल! कारण मध्ये भिंत असून, चहुबाजूने प्रदक्षिणा मारता येईल अशी जागा, आणि ती सुद्धा वाकूनच, काही ठिकाणी बसून तर काही ठिकाणी सरपटावं लागेल अशी उंची. ह्या बांधकामाला तीन दरवाजे. म्हणजेच एकूण वेगळीच रचना.
![]() |
बांधकामाचे अवशेष आणि वक्राकार पायऱ्या |
गडाची रचना तशी विशिष्ट नाही. तसा ठराविक मार्ग सांगता येत नाही, कारण बऱ्याच पायवाटा आहेत. आपल्याला जसं जमेल, जिथून आवडेल, आणि जी सापडेल त्या वाटेने फिरायचं. जे समोर ते अवशेष पहायचे.
आम्हीही तसेच फिरलो; वाटेत पडकी बांधकामं, वाडे बघत गेलो. मध्ये जर दगडी शिळा आली, तर काही ठिकाणी त्यावर पायऱ्या कोरलेल्या दिसल्या.
![]() |
बांधकाम आणि मागे सूर्यास्त |
![]() |
सुंदर बुरुज |
बरीच पडकी बांधकामं दिसली. काही खूप जुनी असतील, तर काही इंग्रजांच्या काळातील. एक बांधकाम तर अगदी अलीकडचंच (कदाचित बांधकाम जुनंच असेल फक्त वापरासाठी डागडुजी केलेली असू शकते), त्यावर तामिळमध्ये बरंच काही लिहिलं आहे, आणि इंग्रजीत "Microwave Repeater Station" असं लिहिलं होतं. म्हणजे काय ते देव जाणे!
![]() |
तटबंदी |
![]() |
तटबंदीच्या आत तलाव |
गडाच्या कडेकडेने बरीच तटबंदी आहे. त्यात बुरुजही आहेत, तलावही आहेत. काही बुरुजांच्या कडेकडेने खाली जायला जागा आहे. तिथून खाली गेल्यावर भुयारही आहे. तटबंदीच्या आतील बाजूस तलाव आहेत.
काही बुरुजांवर ध्वज आहेत. अश्याच एका बुरुजावर ध्वज आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला एक थडगंही आहे. त्यावर चादर वगैरे व्यवस्थित घातलेली आहे. काही वर्षांत तिथे नवीन बांधकाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
![]() |
दर्गा |
या गडावर येणारे पर्यटक फार कमी असतील. जरी हा गड ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असला, तरी पर्यटनासाठी तितकासा प्रसिद्ध नाही. इथे येणाऱ्यात मुस्लिम भाविकांची संख्या मात्र जास्त असावी, कारण गडावर दर्गा आहे. हे बांधकाम जुनं असून, मुस्लिम भाविक इथे येत असतात.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा पूर्ण बारामहाल भाग शहाजीराजेंच्या जहागिरीत होता. तिसऱ्या अँग्लो-मैसूर युद्धात रायाकोत्ताई इंग्रजांच्या हाती गेला तसे इतर दुर्गही त्यांच्या ताब्यात गेले.
कृष्णगिरी हा एकमेव गड ते जिंकू शकले नाहीत, असे काहीजण मानतात. त्या गडाबरोबर "बकरखान" या सेनापतीचाही उल्लेख येतो. पण पुरावे मिळेपर्यंत दंतकथाच. तथापि, तसे अधिकृत उल्लेख कुठेही नाहीत.
परंतु या युद्धानंतर संपूर्ण बारामहाल प्रदेश आणि गड इंग्रजांच्या ताब्यात गेले हे मात्र निश्चित.
संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. वेळेत खाली उतरलो. पुढचा प्रवास वेल्लोरकडे चालू झाला. वेल्लोरमध्ये दुसऱ्या दिवशी साजरा आणि गोजरा हे गड पाहिले. त्यानंतर कूच केली ती जिंजीकडे.
![]() |
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |