Thursday, February 26, 2026

जिंजी - त्रिचंदी कोट (तामिळनाडू)

जिंजीच्या लेखमालेत आपण थोडं उलट दिशेने जात आहोत. म्हणजे वास्तविक, याआधी कृष्णागिरी हा लेखमालेत आला असला, तरी त्याआधी आम्ही राजागिरी, म्हणजे "राजा" गड, सकाळी पाहिला.

"जिंजी" पाहणं हे व्यवस्थित वेळ घेऊन पाहण्याची गोष्ट आहे. या मोहिमेचं नियोजन करण्याआधी व्यवस्थित माहिती घेऊन आखणी केल्यास, कोणत्या ठिकाणी किती वेळ दिला पाहिजे याची मांडणी करावी. कारण मुळातच जिंजी हा दुर्गसमूह आहे. त्यात गिरीदुर्ग, स्थळदुर्ग असे मिश्रण आहे. त्यामुळे दिवसाच्या कोणत्या वेळी कोणता गड पाहायचा हे ठरवता येतं आणि आपल्यासमोर आलेले अवशेष पाहताना हे कोणत्या गडाचे आहेत हे आधीच माहिती असल्यास डोळसपणे दुर्गभ्रमंतीचा आनंद मिळतो.

जसं राजागिरीकडे पाहताना आपण लांबून दिसणारा डोंगर/टेकडी आणि त्यावर दिसत असणारे दुर्गावशेष, म्हणजेच फक्त दुर्ग आहे असं धरल्यास ते चुकीचं ठरतं. म्हणजे तो टेकडीवर असणारा राजागिरी हे बरोबर असलं, तरी जेव्हा आपण "गेंगावरम (की सेंजावरम?) - जिंजी" या मुख्य रस्त्यांवरून, या टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो, की आजूबाजूला पाहत राहिल्यास लक्षात येतं, की तटबंदी, बुरुज असले अवशेष आपल्या बाजूला अजूनही आहेत. किंबहुना, आपण रस्त्यावरून वळल्यानंतर तटबंदी फोडूनच आत आलेलो आहोत, हेही लक्षात येतं. अर्थात, हा राजागिरी गडाचा भाग नाही.

त्रिचंदी कोट - बाह्य भाग

हा आहे इथल्या भुईकोटाचा भाग, तोही बाह्य भाग. हा आहे ह्या दुर्ग-समूहातला भुईकोट - "त्रिचंदी" कोट! आणि अर्थातच, "राजागिरी" बघायची उत्सुकता कितीही असली, तरी या अवशेषांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्हीही सकाळी आधी हे पाहिले नाहीत, तसं नियोजनच नव्हतं. आम्ही गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडला होता आणि या भागात ऊन प्रचंड तापतं. त्यामुळे टेकडीवर असणारे अवशेष हे आधी पाहणं हे आमच्या नियोजनातच होतं. थोडक्यात, फक्त राजागिरी असं ध्येय न ठेवता वेळेच्या नियोजनात त्रिचंदीकोट हाही डोळसपणे पाहण्याचा भाग आहे, हे धरूनच आखणी करावी. राजागिरी पाहताना वाटेत दिसेल तेवढाच पाहणे, असं केल्यास आपण महत्वाचे भाग सोडून देत आहोत हे मनाला नक्की टोचत राहील.

त्रिचंदी कोट हा दोन भागात विभागलेला आहे, बाह्य भाग आणि अंतर्गत भाग. आपण बाह्य भागापासून सुरुवात करू. कोटाच्या बाह्य भागात खूप अवशेष आहेत, ह्यातले आपण काही अवशेष ह्या लेखात पाहू. पण अजूनही खूप अवशेष याचा भाग आहेत, जे ह्यात विस्तृतरित्या घेतले नाहीयेत. जसं वेंकटरमणस्वामी मंदिर, अंजनेयर मंदिर - अशी काही मंदिरं, पाण्याचे मोठे तलाव, टाकी, चौकी, बुरुज. ह्यातील तटबंदी प्रचंड मोठी आहे आणि ह्याच तटबंदीचा भाग, हा एक दरवाजा आहे. हा दरवाजा म्हणजे "पॉंडीचेरी गेट".

"जिंजी" या नांवाचं वलय दुर्गप्रेमींना ह्या जिंजीत घेऊन येतं. परंतु बघायला येणाऱ्यांकडून हा दरवाजा काही प्रमाणात दुर्लक्षित राहतो. कारण राजा–राणीचे गड म्हणून राजागिरी आणि कृष्णागिरीला भेट दिली जाते. परंतु बाकी थोडे बाजूला असलेले भाग दुर्लक्षित राहतात. हा कोटाचा बाह्य भाग म्हणून असणाऱ्या अवशेषातला महत्त्वाचा दरवाजा आहे, आणि अर्थातच तो पाहणं आवश्यक ठरतं. खरंतर, आपण शक्यतो कोणताही दरवाजा पाहायला जात असताना त्याच्या बाह्य भागातून आतमध्ये प्रवेश करतो. परंतु इथे मात्र थोडंसं विरुद्ध दिशेने जावं लागतं. म्हणजेच, राजागिरी गडाच्या तिकीटखिडकी असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पाठ केल्यास, बरोबर समोर चालत गेल्यावर हा पॉंडिचेरी दरवाजा आहे. हा दरवाजाही तटबंदीतच आहे.

पॉंडीचेरी दरवाजा

या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने आपण प्रवेश केलेला नसतो. पण पलीकडच्या बाजूने बाहेर गेल्यावर कदाचित जनावरांसाठी उत्तम चारा असावा, कारण आमचं स्वागत भरपूर बकऱ्यांनी केलंनी. त्या तृप्त होऊन बहुतेक परतत होत्या. हा दरवाजा म्हणजे फक्त चौकट नाहीये, तर उत्तम वास्तुकला आणि बांधकाम आहे. बुरुजाप्रमाणे तटबंदीतून अर्धगोलाकार भाग बाहेर काढून त्यात देवड्या बांधलेल्या आहेत.

पॉंडीचेरी दरवाजावरून चंद्रयानदुर्ग

या दरवाजाला भेट देण्यासाठी एक उत्तम कारण जर सांगायचं झालं, तर ते वास्तुकला आहेच, पण त्याबरोबर इथून दिसणारा चेन्नागिरी, म्हणजे चंद्रयान दुर्ग. वेंकटरमण स्वामी मंदिराच्या पार्श्वभूमीवर या दुर्गाचं मस्त दर्शन होतं.

वेल्लोर/अर्कोट दरवाजा

बऱ्यापैकी दुर्लक्षित असणारा हा दरवाजा खरंतर जिंजीचा मुख्य दरवाजा आहे. वेल्लोर आणि अर्कोटच्या बाजूला तोंड असल्यामुळे याला असं नांव आहे. या गडावर जाण्यासाठीचा हा मूळ राजमार्ग आहे, आता होता म्हणूया, कारण आपण आपल्या वाहनाने राजागिरीच्या तिकीटघरापर्यंत जाता येत असल्याने वेगळा मार्ग हा मुख्य मार्ग झालेला आहे आणि हा दरवाजा मात्र एका बाजूलाच राहतो. किंबहुना, राजागिरीला भेट देणाऱ्यांना कळतच नाही की काहीतरी महत्वाचं राहून जातंय.

हा दरवाजा आता इतक्या आडवाटेला राहिलेला आहे, की इथे जाण्यासाठी गाडीमार्गच नाही. अर्थात दुर्गम वगैरे ठिकाणी नाहीये हा, परंतु मुख्य रस्त्याच्या कडेला गाडी थांबवावी लागते. आणि आम्हीही तिथून मातीच्या वाटेने चालत पोचलो, असं आठवतंय. चारचाकी डांबरी रस्ता सोडून आत घालता येत नाही.

महादरवाजा आणि बाजूच्या दोन मूर्ती

या दरवाज्याला कायमच कुलूप लावलेलं असतं. हा दरवाजा गोमुखी आहे. दोन्ही बाजूला भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूला मूर्ती आहेत. या दरवाजाची रचना थोडीशी वेगळी आहे, हे जाणवतं. आणि लक्षात येतं की ह्याची आपल्यासमोर उभी असलेली बांधणी, ही एका कालखंडात नक्कीच झालेली नाहीये. कारण या दरवाजात प्रवेश करतानाच अगदी जमिनीवर एक पोर्तुगीज पद्धतीचा छोटा बुरुज, म्हणजे बार्टीझन, दिसतं. आणि दरवाज्याच्या बाजूच्या असलेल्या बुरुजावरसुद्धा तटबंदीत एक बार्टीझन बांधलेलं आहे.

दरवाजा आतील बाजूने

ह्याला आपण महादरवाजा म्हणू शकतो. कारण एक तर हा गडाचा मुख्य दरवाजा आहे, गोमुखी आहे म्हणजेच महत्वाचा प्रवेशमार्ग आहे. (तसंही हा राजमार्ग होताच) आतील बाजूने, जिथे शक्यतो दोन्ही बाजूला एक-एक वगैरे अशा वेगवेगळ्या देवड्या असतात, तिथे या दरवाजाला दुमजली बांधकाम आहे. कोरीव खांब आहेत. साधारण दरवाजाच्या तुलनेत हे देवड्यांचं बांधकाम भव्य आहे. आता दरवाज्याला कुलूप असूनही मी आतमध्ये कसा आलो, हा प्रश्न विचारायचा नाही. 😉 परंतु शक्य होईल तेवढा, शक्य होईल तसा सगळा भाग बघणे हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, तोच प्रयत्न इथे घेऊन आला 😄

एकांबरेश्वर मंदिर

राजागिरी गडाकडे जाताना, जेव्हा तटबंदी फोडून केलेल्या रस्त्यावरून आपण तिकीटघराकडे जात असतो, त्याचवेळी डाव्या बाजूला भरपूर दगडी खांब असलेलं मंदिर दिसतं. त्याच्याजवळच बागेसारखा व्यवस्थित ठेवलेला परिसरही दिसतो. हेच एकांबरेश्वर मंदिर. माहिती शोधण्यासाठी गुगलवर बघितल्यास, एकांबरेश्वर मंदिर ह्या बद्दलच्या माहितीत जवळपास सगळी माहिती कांचीपुरम इथल्या प्रसिद्ध एकांबरेश्वर मंदिराचीच येते. ते अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. परंतु हे जिंजीमधील हे एकांबरेश्वर मंदिर त्या तुलनेत लहान आहे. तरीही अत्यंत सुंदर आहे हे मात्र नक्की. हे चोल कालखंडातील मंदिर आहे. संपूर्ण परिसर व्यवस्थितरित्या ठेवलेला असल्यामुळे हा परिसर फिरण्यासाठीसुद्धा छान आहे. भरपूर खांब असलेलं प्रशस्त मंडप, गर्भगृह असं हे मंदिराचे स्वरूप आहे.

गडाच्या वाहनतळाजवळ पोचल्यावर समोरच एक मशीद दिसली. ही सदातुल्लाखान मशीद. अर्थात, आम्ही तिथे पोचलो तेव्हा ही मशीद लक्षातसुद्धा आली नव्हती. किमान, आता तरी आठवत नाही. पण हा गडाच्या बाह्यभागातीलच एक अवशेष आहे.

त्रिचंदी कोट - अंतर्गत भाग

खंदक

पहिला आणि दुसरा दरवाजा

खंदकातून आत शिरलो आणि "मराठा टच" असा गोमुखी दरवाजा समोर आला. हा या भुईकोटाचा पहिला दरवाजा. पहिल्या दरवाजातून आत शिरलो, तर मोकळा भाग. दरवाजाशेजारी देवड्या. आणि लगेच दुसरा दरवाजा. आम्ही हा पाहिला तेव्हा युनेस्कोमध्ये "जिंजी"ची नोंद झालेली नसली, तरी पुरातत्त्व खात्याकडे हा संरक्षित होताच. त्यामुळे ह्या सगळ्या दरवाजांना लोखंडी दारं होती, जी ठराविक वेळेनुसार बंद करून घेतली जातात.

दरवाजातून कल्याण महाल आणि राजागिरी दुर्ग

दरवाजातून पलीकडे दिसणारे हे दृश्य आत जाताना तितकसं छान नव्हतं. कारण काल पडून गेलेला पाऊस आणि वातावरण. पण डोक्यात फ्रेम तयार ठेवलेली होती. येताना निसर्गाची साथ लाभली, आणि ही फ्रेम घेता आली.

मूर्ती

तिसऱ्या दरवाजात जाण्याआधी असलेल्या जागेत, काही मूर्ती ठेवलेल्या होत्या. या सगळ्या मूर्ती इथे आणून ठेवलेल्या दिसत होत्या. विशिष्ट अश्या मूर्ती, म्हणजे यात असलेल्या दोन. त्यातली एक, म्हणजे बरोबर मध्ये ठेवलेली मूर्ती, ही कशाची आहे, कोणाची आहे, हे समजत नाही. हातात शस्त्र नाही. वेगळ्याच पद्धतीने पाय मुडपून बसलेल्या अवस्थेत अश्या व्यक्तीची ही मूर्ती आहे. शस्त्र, चिन्ह असं काहीही नसल्याने कोणत्याही देवाशी या मूर्तीचा संबंध त्यामुळे लावता आला नाही. दुसरी म्हणजे एक विरगळ असावी; पण त्यावर घोड्यावर दोन जण बसलेले आहेत. पहिली व्यक्ती भालाफेक करताना अश्या अवस्थेत कोरलेली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे राजा देसिंग आणि त्याची राणी आहेत, तर अमर साळुंखे यांच्या मतानुसार हे महाराज राजाराम आणि ताराराणी आहेत.

विहीर आणि बुरुज

यापुढे असलेल्या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर खूप काही आपल्यापुढे वाढून ठेवलेलं आहे, हे लक्षात आलं. सगळंच एकदम दिसायला लागलं. समोरच अगदी छोटी विहीर दिसली. ही जरी छोटी असली, तरी बारमाही पाणी असलेली विहीर आहे, जी अजूनही वापरात आहे. पलीकडे दगडांवर सुंदर बुरुज आहे. त्यामुळे इथे फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही. त्यासाठी आपल्याबरोबर तसेच रसिक भिडू असणे ही गरजेचं असतं, हे मात्र नक्की.

या सगळ्याबरोबर अजून पाच कमानी दरवाजा, भुलभुलय्या नावाने ओळखली जाणारी वास्तू, अश्या अनेक वास्तू दिसत राहतात. राजसदर आणि कल्याण महाल ह्या या गडाच्या अजून महत्त्वाच्या असलेल्या वास्तू.

कल्याण महाल

आधीच म्हटल्याप्रमाणे आमचा डोळा टेकडीवरचा राजागिरी दुर्गावर असल्याने ह्या वास्तू आधी पाहिल्या नाहीत. राजागिरी पाहून उतरल्यावर या सर्व वास्तू पाहिल्या. परंतु ह्या त्रिचंदीकोटाचाच भाग असल्याने ह्याच लेखात पाहून घेऊ. कल्याण महाल किंवा राणीवसा, ही अतिशय सुंदर वास्तू आहे.

महालासमोरचा चौकोनी भाग आणि चौथरा

आपल्याकडे "चौसोपी वाडा" असं ज्याला म्हणतात, तश्या वाड्याची आठवण इथे नक्की होते आल्यावर. म्हणजे वाड्याला वरती छत असतं तसं इथे नाहीये, परंतु दरवाजातून आत शिरल्यावर समोरच जमिनीच्या थोड्या खालच्या पातळीला मोकळी चौकोनी जागा आहे. वाड्यात त्याच्या मधोमध तुळशी वृंदावन असतं तसं इथे वृंदावन नाही, पण एक छोटासा चौथरा मात्र आहे. सभोवताली मिळून एकूण ३६ कमानी आहेत. हा सुंदर महाल राजा तुबाकी कृष्णप्पा नायक याने बांधलान. "चक्रकुलम" नावाच्या पाण्याच्या टाक्यातून इथं पाणीपुरवठा केलेला आहे. ही व्यवस्था नक्कीच बघण्यासारखी आणि अभ्यासण्यासारखी आहे. कारण इथे या बहुमजली असलेल्या वाड्यात अगदी वरच्या मजल्यावरसुद्धा पाणीपुरवठा व्हावा, अशा पद्धतीने सर्वत्र दगडी खापरांमधून ही जलव्यवस्था केलेली आहे.

राजसदर

छ. राजाराम महाराज यांनी तब्बल ११ वर्ष जिंजीच्या गडामधून औरंगजेबाशी लढा दिला. इथे असलेल्या एका जागेला राजसदर मानलं जातं. ह्याच सिंहासनावर बसून राजाराम महाराजांनी राज्यकारभार चालवला असंही मानतात. राजसदर ही अतिशय भव्य वास्तू आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला फक्त फोटो काढून घेतला या वास्तूचा. कारण नंतर हा परिसर माणसांनी फुलून गेला असता. भेट मात्र राजागिरी बघून आल्यावर दिली. कल्याण महालाप्रमाणेच राजसदरेलाही बऱ्यापैकी कमानी आहेत. इथल्या वास्तूची भव्यता आपलं लक्ष वेधून मात्र नक्की घेते. पण त्यापेक्षाही माझं तरी जास्त लक्ष वेधून घेतलंन ते इथल्या दगडी लोडाने. ही वास्तू राजसदर आहे की पाण्याचा तलाव, स्नानगृह, याबद्दल मत-मतांतरं आहेत. हे सिंहासन आहे की नाही, मुळात ही राजसदर आहे की नाही, यापेक्षा जे काही आहे ते मात्र अतिशय अप्रतिम आहे, हे नक्की. त्यामुळे त्या प्रश्नात मी शिरलो नाही.

ह्या दगडी लोड असलेल्या चौथऱ्याच्या पलीकडे कमानी दिसतातच, परंतु त्याला लागून अलीकडे एक चौकोनी भाग आहे. तो गोंधळात टाकणारा आहे. हा भाग नक्की काय आहे, हे मात्र लक्षात आलं नाही. नृत्यालय म्हणून कदाचित हा भाग ओळखला जात असेल, पण तेही नीटसं सांगता येत नाही. गोंधळात टाकणारा का? तर ह्याच्या चौथऱ्याच्या आतल्या बाजूने कीर्तीमुख सदृश कोरीव दगड लावलेले आहेत. त्यांचा छातीपासून वरचा भाग गायब आहे. तर दोन पायांच्या मध्ये दोन हात अशा बसलेल्या अवस्थेत हे शिल्प कोरलेलं आहे. ह्या पूर्ण चौकोनी भागाला खांब किंवा छत काहीही शिल्लक नाही.

व्यायामशाळा

हा कोट म्हणजे अलीबाबाची गुहाच आहे. कारण एका मागून एक अत्यंत सुंदर वास्तू येथे दिसत राहतात. व्यायामशाळा हीसुद्धा अशीच एक निरखून पहावी अशी वास्तू. ही वास्तू व्यायामशाळाच कशावरून, वगैरे प्रश्न बाजूला ठेवू. व्यायामशाळा याच नावाने ही वास्तू ओळखली जाते. ह्या वास्तूची रचना एकदम लक्ष वेधून घेणारी आहे. आतून बघितलं, तर ही पूर्णपणे मोकळी वास्तू आहे; परंतु बाहेरून मात्र बघण्यासारखी आहे. वरील फोटोत विशिष्ट कोनातून ही दिसत नसल्यामुळे ते लक्षात येणार नाही, कदाचित. परंतु वर ह्या बाजूने मुद्दाम फोटो देण्याचा उद्देश वेगळा आहे. कारण ह्या बाजूने जे बांधकाम, कोरीव काम बघायला मिळतं, ते दुसऱ्या ठराविक कोनातून मिळत नाही, ते म्हणजे वास्तूच्या छताला कडेने वर असलेले छोटे छोटे मिनार. छोटी छोटी मंदिरं किंवा मूर्ती ठेवण्यासाठी कोनाडे असावेत, अशा नक्षीदार मिनारांनी माझं लक्ष जास्ती वेधून घेतलंनी. फक्त समोरच्या बाजूनेच हे मनोरे शिल्लक आहेत. असेच मनोरे आसपास असलेल्या काही वास्तूंमध्येही थोड्याफार प्रमाणात बघायला मिळतात. ह्या वास्तूच्या दरवाज्याच्या आधी एक दगडी भिंत आहे. दरवाज्याच्या उंचीला धरून विटांच्या बांधकामांमध्ये असलेल्या सुंदर कमानी, असं हे देखणं बांधकाम आहे.

हत्ती तलाव

ह्या कोटातील अजून एक भव्य वास्तू म्हणजे हत्ती तलाव, किंवा "अनयकुलम" टाकं. एखादं टाकं बऱ्यापैकी मोठं असलं, की त्याला हत्ती टाकं म्हटलं जातं. कारण आकार मोठा आहे, म्हणजे इथे हत्ती पाणी पाजण्यासाठी आणले जात असावेत असा तर्क लावला जातो. तसाच टाक्यापेक्षा जर मोठा असेल, म्हणजे तलावसदृश, तर त्याला साधारणपणे हत्ती तलाव म्हटलं जातं. म्हणजे हत्तीला इथे स्नानासाठीसुद्धा नेलं जात असेल, असाही सहज तर्क लावला जातो. या ठिकाणीही तेच आहे. पण या भव्य टाक्याभोवती बहुखांबी बांधकाम आहे. त्याला मध्ये मध्ये भिंती बांधून खोल्या पाडलेल्या नाहीत. परंतु हत्तीच्या स्नानासाठी असा तलाव असेल तर तलावाभोवती या बांधकामाचं काय काम? म्हणून राजे-महाराजांसाठीचा जलतरण तलाव असंही ह्याला काही ठिकाणी मानलं जातं. यावरही शंका घेता येऊ शकते. कारण त्याला सध्या तरी काही खाजगीपणा दिसत नाही. ना छत, ना खांब, ना त्याच्या मागे बांधकामाला व्यवस्थित भिंती. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही तेवढं, म्हणजे जर राजघराण्यातील व्यक्तींसाठी जलतरण तलाव असेल, तर तेवढी सुरक्षित जागा म्हणता येईल, अशी ही वाटत नाही. व्यवस्थित पाहिल्यास पलीकडे एक बुरुजही दिसतो. तसंच एका बाजूला डोंगरही आहे. त्यामुळे ह्या बाजूने शिबंदीची नेमणूक करावी असे ठिकाण असेल, तर तिथे जलतरण तलाव कसा? परंतु ह्या सर्व प्रकारात न पडता ह्या वास्तूचा आनंद घ्यावा, हे उत्तम.

आकड्यात सांगायचं झालं, तर सुमारे दोनशे × सव्वाशे फूट आकाराचा हा तलाव आहे. त्यात उतरायला पायऱ्या आहेत. त्यामुळे इतिहासात काहीही म्हणून वापरला जात असला, तरी मस्त डुबकी मारायची इच्छा इथे मला झाली, हे मात्र नक्की. परंतु वेळ, ठिकाण हे सर्व लक्षात घेता तो मोह आवरला. उडी मारलीच असती, तर पुरातत्त्व खात्याच्या काठ्यांपासून माझा पार्श्वभाग सुरक्षित राहिला नसता, हे नक्की. विनोद बाजूला ठेवला, तरी ह्या सर्व वास्तू विविध प्रकारे मोहात पाडणाऱ्या आहेत, हे नक्की.

विस्तीर्ण वृक्ष

या सर्व अवशेषांशिवाय भव्य असे धान्यकोठार, रंगनाथ मंदिर, कैदखाना, टेहळणी बुरुज, अशा अनेक पुरातन वास्तू हा कोट आपल्या पोतडीत राखून आहे. याशिवाय, फोटोत अगदी वाईट अँगलमध्ये सुद्धा न मावणारा असा विस्तार असलेले हे वृक्ष टिपण्याचा मोह कोणाला होणार नाही? विस्ताराने मोठी, सुंदर आणि हवेशीर असलेली झाडं गार सावली देतात. राजागिरी उन्हातून पाहून परतल्यानंतर विश्रांतीसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. थोडा वेळ ह्या झाडाखाली पाठ टेकली, तर त्या गडावर आपण चढून उतरल्याचा थकवा नक्की पळून जाईल.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Thursday, January 22, 2026

जिंजी - दुर्ग कृष्णागिरी (तामिळनाडू)

जिंजी

"जिंजी" नाम तो सुना ही होगा.... पण फक्त सुना ही था. म्हणजे इथे भेट देणे हे फक्त मनात होतं, प्रत्यक्षात नियोजन काही झालं नव्हतं.

त्यामुळे मुळात जेव्हा भटकंतीचा विचार झाला, तेव्हा "जिंजी बघायचं" एवढंच डोक्यात होतं. अर्थात, जिंजीबरोबर साजरा-गोजरा बघायचं हेही डोक्यात होतं. पण मूळ गाभा जो होता, तो फक्त एकच शब्द होता... जिंजी!! बाकीच्या भेटी याच्या बरोबर म्हणून नियोजनात ठरवल्या गेल्या.

जिंजी ही मराठ्यांची दक्षिणेतील राजधानी. मराठे दक्षिणेत कधी, का, कशासाठी घुसले आणि मुळात कसे? हे सर्व जाणून घेणं हा एक अभ्यास आहे. "दक्षिण दिग्विजय मोहीम" ही महाराजांची दोन वर्षे चाललेली मोहीम सर्वात आधी अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी घेऊ शकतो. परंतु अधिक अभ्यास करताना या मोहिमेच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ हाही अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच.

आणि तसाही, या मोहिमेपासूनच मराठ्यांचा जिंजीशी संबंध आला असेल असं कोणाला वाटत असेल, तर ते चूक आहे. कारण महाराजांनी जिंजी घेतला तो १६७७ ला, दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये. परंतु १६४८ ला शहाजीराजांनीसुद्धा आदिलशहाच्या वतीने जिंजी काबीज केला होता.

लेखात गडभटकंती करण्याआधी जिंजीचा अतिशय थोडक्यात इतिहास पाहूया. सत्तेच्या दृष्टीने विचार केला, तर मंदिरे आणि शिलालेखांचा आधार घेऊन सर्वप्रथम राज्यकर्ते म्हणून "पल्लव" राजे यांच्याकडे या परिसराची सत्ता होती, असं म्हणता येईल. त्याआधीच्या काळात जैन लोकांचा वावर या परिसरात होता, हे इथल्या लेणी, शिल्प आणि जैन मंदिरांवरून समजतं. परंतु राज्यकर्ते म्हणून पल्लव राजेच प्रथम मानू शकतो.

पल्लवानंतर "चोल" राजांनी राज्य केलं. नंतर "होयसाळ", विजयनगरचे "नायक" यांनीही जिंजी परिसरात राज्य केलं. यानंतर मात्र मुसलमानी शासकांचा अंमल वाढायला लागला आणि शेवटी जिंजीचा ताबा "आदिलशाहीकडे" आला.

यापुढच्या घडामोडी मात्र रंजक आहेत. म्हणजे, जिंजी आदिलशाहीत असला, तरी तिथे दोन गट होते - दक्षिणी मुसलमान आणि पठाणी मुसलमान. पठाणी गटाचं प्राबल्य वाढू नये, म्हणून "जिंजी त्यांच्या हातात जाण्यापेक्षा कुतुबशाहीकडे बरी", असे मतप्रवाह दक्षिणी मुसलमानांमध्ये होते. त्यामुळे या गटाचा नासिर मोहम्मद, याने त्यानुसार आपला दूत कुतुबशहाकडे पाठवलान.

अर्थातच कुतुबशहाला हा प्रस्ताव पसंत पडला. का आवडू नये? उत्तम बांधणीचा, राजकीयदृष्टया महत्वाचा आणि अभेद्य असा गड पदरात पडत असेल, तर का अमान्य करावा प्रस्ताव? परंतु राजकीय स्थिती पाहता, जिंजी ताब्यात घेणं, तेही सरळ, सर्वांसमक्ष परवडणार नव्हतं. म्हणून यासाठी त्याने शिवाजी महाराजांचा वापर करायचं ठरवलंन. म्हणजे त्यांना पुढे करायचं आणि ताबा आपलाच ठेवायचा. चाल उत्तम खेळली होती, मात्र माणूस चुकीचा निवडलान त्याने. कारण या परिस्थितीचा फायदा महाराजांनी करून घेतला नसता, तरच नवल.

शिवाजी महाराजांनी पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून नासिर मोहम्मदबरोबर व्यवहार ठरवला. व्यवहारानुसार महाराज जिंजीला पोचले आणि त्यांनी याला वेढा घातला. व्यवहारात ठरल्याप्रमाणे तोंडदेखली लढाई पण खेळली गेली. अवघ्या दहा हजार सैन्याशी जिंजी मराठ्यांच्या पदरात पडला. अर्थात, यासाठी ५० हजार होन आणि १ लाख होन उत्पन्नाचा मुलुख एवढी किंमत मोजावी लागली. परंतु भविष्यातली उपयुक्तता आणि जिंजीचं महत्त्व लक्षात घेता हा व्यवहार फायद्यातच झाला, असं म्हणता येईल. किंबहुना, याची मोजदाद केल्यामुळेच महाराजांनी हा व्यवहार केला हे उघड आहे.

जिंजीसारखा महत्त्वाचा प्रदेश आणि गड मराठ्यांच्या ताब्यात इतक्या सहजपणे आला, हे सगळ्यांसाठीच अत्यंत आश्चर्यकारक होतं. मराठ्यांना आता ठरल्याप्रमाणे हे सर्व कुतुबशहाकडे सुपूर्त करावं लागणार होतं. परंतु कुतुबशहाचे हात दगडाखाली असलेले बघून महाराजांनी कुतुबशहाला सरळ नकार दिला. स्पष्ट शब्दांत म्हणायचं फसवलं म्हणा किंवा राजकीय कुरघोडी! पण हेच राजकारण असतं... अर्थात, याची किंमत मोजावी लागली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कुतुबशहाकडून मिळणारी सर्व प्रकारची, म्हणजे आर्थिक आणि सैन्यबळाची मदत बंद झाली. महाराजांना हे अपेक्षितच होतं आणि त्याची तयारीही होती.

या इतिहासानंतर अजून काही रंजक गोष्टी बघूया.

पहिली म्हणजे, “जिंजी” हा इंग्रजी उच्चार आहे. मूळ नाव आहे “सेंजी”. या नावाचा इतिहासही गमतीशीर आहे. “संजिवनी” या आयुर्वेदात असलेल्या, रामायणात उल्लेख असलेल्या औषधी वनस्पतीवरून हे नाव आलं असं मानलं जातं. तर एका कथेनुसार, एके काळी ७ बहिणी होत्या त्यातील "सेंजी अम्मन" नावाच्या एका बहिणीच्या नांवावरून हे नाव पडलं. काहींचं म्हणणं आहे की “सिंगावरम” वरून “सेंजी” हे नाव पडलं. तर संस्कृत शब्द “श्रृंगी” याचा अपभ्रंश “सेंजी” आहे, असं "Madras Manual of Administration" नमूद करतं.

सेंजी–जिंजी व्यतिरिक्त अजूनही नावं सापडतात. मुसलमान काळात “नुसरतगड्डा” किंवा “नुसरतगड” अशी नावं वापरात होती. विजापूरच्या अधिकाऱ्यांनी “बादशहाबाद” हे नाव ठेवलंनी होतं. खुद्द महाराजांनी "चंदी" हे नामकरण केलं होतं. त्यामुळे मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये जिंजी घेतल्यानंतर “सेंजी”, “चंजी”, “चंद्री” असे उल्लेख आढळतात.

नावात काय आहे? तर हे सगळंच आहे.

आता पुढची गंमत. जिंजी हा एका डोंगरावर असा गड नाही. मग "जिंजीला जायचं" म्हणजे नेमकं कोणत्या गडावर/डोंगरावर जायचं? जिंजी किल्ल्यावर ब्लॉग लिहायचा किंवा माहिती द्यायची, तर कशावर लिहायची?

तर जिंजी म्हणजे मूळ “सेंजी” हे त्या गावाचं नांव. त्या गावात असलेल्या आठ गडांचा किंवा टेकड्यांचा जो समूह आहे, त्यालाच जिंजी म्हणतात.

१. दुर्ग आनंदगिरी उर्फ राजागिरी उर्फ राजगड

२. दुर्ग कृष्णागिरी

३. दुर्ग त्रिचंडी

४. दुर्ग कुत्थरसीदुर्ग उर्फ चेलगड

५.दुर्ग चंद्रयानदुर्ग उर्फ चेन्नागिरी उर्फ सारंगगड

६.दुर्ग चक्कीलादुर्ग उर्फ लालगड

७.दुर्ग कोरांगदुर्ग उर्फ मुत्तयलूनायक दुर्ग उर्फ गर्वगड

८. दुर्ग कुसुमलाई उर्फ मदोनमत्तगड

मग गेल्या वर्षी युनेस्कोमध्ये जे स्थान मिळालं, ते यापैकी नेमकं कोणाला मिळालं? की सगळ्यांना? तर राजागिरी, कृष्णागिरी आणि चेन्नागिरी — या तीन टेकड्यांचा मिळून जो समूह आहे, तो “जिंजी दुर्ग” म्हणून युनेस्कोमध्ये समाविष्ट झाला.

या लेखात बघूया - .

दुर्ग कृष्णागिरी

याआधीहि आपण "कृष्णगिरी" नावाच्या दुर्गाची भटकंती केली, तो वेगळा. तो गड "कृष्णगिरी" नावाच्या जिल्ह्यातच आहे. तर जिंजी दुर्ग-समूह "विल्लूपूरम" जिल्ह्यात आहे. आता बघणार आहोत तो "कृष्णागिरी", ह्याच "जिंजी" दुर्ग-समूहातील दुर्ग. आणि हा जिंजी दुर्गसमूहातील सर्वात छोटा गड आहे. मुळात ह्या दुर्गभेटीची वेळ आमची दुपारची होती. साधारण सव्वा दोनच्या सुमारास या गडाकडे जाणाऱ्या वाटेला लागलो.

दुर्ग कृष्णागिरी (जिंजी)

कृष्णागिरी हा जणू विवाहसोहळ्यातल्या रुखवंतासारखा वाटतो. म्हणजे जे काही प्रेक्षणीय आहे, ते समोर उलगडून दाखवत जणू "जिंजी या सोहळ्यात" भाग घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने आधी हेच येऊन बघावं! हा डोंगर तो दगडांचा ढीग ओतून ठेवल्यासारखा दिसतो. पण त्यातून एक एक वास्तू वर डोकावताना खालूनच दिसतात. दोन्ही भुजा पसरून आपल्याला जणू आमंत्रण देत असतो - “बघा माझा साजशृंगार! दरवाजे, तटबंदी, पायऱ्या, महाल..." सगळे दागिने ठसठशीत मांडून आणि झाडी–झुडपांचं भरजरी हिरवं वस्त्र लेवून आपल्यासारख्या दर्दी मंडळींची वाट पाहणारी ही टेकडी भासते.

तिकडे वर जाणारी, पायघड्या पसरल्यासारखी वाट आपल्याला त्या झाडीत नेऊन सोडते. वर देखण्या रचनेकडे पाहत जात असल्याने, आपण ज्या पायघडीवरून चालत आहोत, ती मुळात अत्यंत सुंदर आणि बलदंड तटबंदीची फांदी आहे, हे लक्षातही येत नाही.

वाटेत गडाची माहिती असणारे फलक लावलेले आहेत. झाडीत लुप्त होणाऱ्या या पायघडीनंतर चढणारी वाट सुरू होते. आम्ही इथे येण्याआधी सकाळी राजागिरी दुर्गाला भेट दिलेली असल्याने, नकळत लक्ष मागे जातच होतं. “इथून राजागिरी हा गड कसा दिसतो?” हे पाहण्यासाठी! आणि त्या भेटीमुळे या दुर्गसमूहासाठी लागणारे शुल्क आधीच भरलेलं असल्याने, पुढे झाडीनंतर येणाऱ्या चौकीवर पुन्हा थांबण्याची आम्हाला गरज नव्हती.

रेलिंग आणि पहिला दरवाजा

पायऱ्या आणि बाजूला इथे रेलिंग लावलेलं आहे. त्यावरून चढून जात पहिल्या दरवाज्यात पोहोचलो. सह्याद्रीत ताशीव कातळकडे असल्यामुळे वाटेल तिथून चढता येत नाही. परंतु या प्रांताची भूरचना वेगळी आहे. कातळ नाही, दगडांची रास ओतल्यासारख्या टेकड्या. त्यामुळे असं वाटू शकतं, की कुठूनही वाट काढता येईल. पण प्रत्यक्षात दगडांच्या राशीत कधीकधी भल्या मोठ्या शिळा असतात. काही ठिकाणी उड्या मारत जाता येईलही, पण सगळीकडे नाही. कृष्णागिरीही तसाच. उंचीने बुटकाच तुलनेत, परंतु हा छोटासा दरवाजाच ही ह्यावर जायची एकमेव वाट आहे. इतरत्र प्रयत्न केला, तर दगडांत ना वर जाऊ शकत, ना खाली उतरता येत, अश्या स्थितीत अडकून पडण्याचीच शक्यता.

या दरवाजाला दोन खांब आहेत. एका खांबावर गणेशशिल्पही आहे. दरवाजा ओलांडल्यावर समोरच पायऱ्यांची वाट आणि उजवीकडे एक बुलंद बुरुज.

बुरुजावर प्रमोद

वर चढल्यावर बुरुज भव्य तर दिसतो, पण उंची फारच कमी असल्यासारखी वाटते. पण हा भास आहे, कारण आपण एका बाजूने तो बघत असतो. प्रत्यक्षात मात्र त्याची खरी उंची मागच्या बाजूने जाणवते. बुरुजाचा घेराही प्रचंड आहे.

बुरुज आणि कुत्थअरसी दुर्गापर्यंत असलेली तटबंदी

या बुरुजाची खरी महती, शेजारून वर जाणाऱ्या पायऱ्यांवर थोडं पुढे गेल्यावर कळते. कारण बुरुजाजवळ उभं राहिलं की, आजूबाजूला काहीच नसताना मध्येच हा चुकार बुरुज असल्यासारखा वाटतो. पण तोच या गडाचा एक प्रमुख रखवालदार आहे. बुरुजाच्या पलीकडे आपण ज्या पायवाटेवरून आलो, ती दिसते. आणि मग स्पष्ट होतं, की आपण चालत आलो ती वाट म्हणजे भव्य तटबंदी आणि त्याची फांजी आहे, जी कृष्णागिरीपासून थेट कुत्थअरसी दुर्गापर्यंत जाते. ही संपूर्ण तटबंदी आणि पर्यायाने प्रचंड भूभाग या बुरुजाच्या टप्प्यात येतो. हा एक बुरुज किती मोठ्या भागाचं रक्षण करू शकतो, हे इथून लक्षात येतं.

बुरुजाची बांधणी दुहेरी घेराची आहे. त्यामुळे इथे मोठी तोफ असणार, हे स्पष्ट समजत होतं. कर्नाटकात कलबुर्गी दुर्गावरील बुरुजावर असलेल्या ३६० अंश फिरणाऱ्या तोफांची इथे आठवण आली.

पायऱ्या - प्रसाद, अभिषेक

पहिल्या दरवाजातून वर आल्यावर आधी ही वाट दिसली होती.खड्या चढणीची, वळणावळणाची ही वाट सुंदरच आहे. दगडा दगडांमधून सुंदरसा साप अंगाचं वेटोळ करत नागमोडी चढत जावा, अशा सुंदर पद्धतीने ही पायरी वाट बांधलेली आहे. पायऱ्या प्रशस्त आणि लांब आहेत.

दुसरा दरवाजा

याच वाटेवरून उड्या मारत मारत दुसऱ्या दरवाजात पोचलो. हा दरवाजा पहिल्यासारखाच, फक्त देवड्यांच्या भिंती शाबूत आहेत.

दरवाजातून पायऱ्या

पायऱ्या इथे थांबत नाहीत, तर जणू पायऱ्यांच्या वाटेवर मध्येच हा दरवाजा बांधल्यासारखं वाटतं. या सुंदर पायऱ्या राजा कृष्ण कोण याचे सुपुत्र कोणेरी आणि गोविंदा यांनी बांधल्या.

तिसरा दरवाजा

हा दरवाजा मात्र एकटा नाहीये. दोन्ही बाजूला बुरुज आणि बुरुजांपर्यंत तटबंदी असे याचे मजबूत स्वरूप आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूचा बुरुज अगदी जवळ आहे. या बुरुजाच्या वरच्या थरावर असलेल्या दगडांमध्ये एका दगडावर, अत्यंत ठळक असं शरभशिल्प शिल्प आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य आणि विचार करायला लावण्यासारखी गोष्ट म्हणजे दरवाजावर असलेली पोर्तुगीज बांधणीची कॅप्सूल. या दुर्गावर पोर्तुगीज सुद्धा होते का किंवा या बांधणी मध्ये पोर्तुगीजांचा प्रभाव होता का असा प्रश्न नक्की पडतो.

आत्तापर्यंतच्या तीनही दरवाजांपैकी हा दरवाजा उत्तम स्थितीत आहे. कदाचित दुर्ग-संवर्धन, पुनर्बांधणी याचा ह्यात वाटा असावा. दरवाजाच्या आतील देवड्यांवरील एका खांबावर हनुमानाचे अत्यंत सुंदर शिल्प आहे.

धान्यकोठार

दरवाजातून आत गेल्यावर समोरच आयताकृती, भव्य धान्यकोठार दिसतं. कोठारच इतकं भव्य असेल, तर त्याची उपयुक्तता तेवढी असणार म्हणजे एकूणच या गडाची भव्यता लक्षात येते.

बालेकिल्ल्याचा भाग

आम्ही इथून गडफेरीला कुठून सुरुवात करायची असं कोणी काही ठरवलेलं नसलं, तरी धान्य कोठार हे येताना बघू हा विचार प्रत्येकाचाच झालेला दिसला. प्रत्येक जण सरळ उजवीकडे बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवरच निघाला. गोष्ट उघड होती, बालेकिल्ल्यावर असलेले महाल, वास्तू सगळ्यांनाच भुरळ घालतील अशा आहेत, त्याच सर्वात आधी बघायच्या.

राजसदर / हवामहाल

पायवाटेवरून गडाकडे यायला सुरुवात केल्यावर ज्या वास्तू खालूनच दिसल्या होत्या, त्यात सर्वात देखणी आणि सर्वात उंचावरची वास्तू म्हणजे हा हवामहाल. "ये नही देखा तो क्या देखा इस किले पे..." अशाच प्रकारची ही वास्तू आहे. या वास्तूचा वरचा भाग अतिशय देखणा आहे. चौकोनी इमारतीला झरोके आणि वरती घुमटाकार कळस म्हणू शकतो अश्या मुस्लिम पद्धतीची ही इमारत वाटत असली, तरी बांधकाम पूर्णपणे हिंदू पद्धतीचं आहे. या महालाचे संवर्धन केलेलं आहे, तरीही अजून व्यवस्थित लक्ष देणं इथं गरजेचं आहे. पहिला मजला हा जवळपास १०० खांबांवर तोललेला आहे, कदाचित जास्तही असतील. कुठे कुठे फोटो काढू, असा मोह इथे नक्की होतो.

रंगनाथ मंदिर

रंगनाथ मंदिर या गडावरची सर्वात मोठी वास्तू आहे. ही वास्तू म्हणजे शिल्पांचा खजिनाच आहे. या मंदिराला मोठे दालन आहे. त्या तुलनेत गर्भगृह हाच या वास्तूचा सर्वात लहान भाग आहे. परंतु दालनाच्या चारही बाजूने चौक्या आहेत. या चौक्या एकपाषाणी कोरीव आहेत. मराठ्यांचा या चौक्यांशी संबंध म्हणजे याच्या भिंती छत्रपती राजाराम महाराजांनी बांधून घेतलेल्या आहेत. मंदिराच्या कळस भाग न विसरता चहूबाजूनी अभ्यासपूर्व न्याहाळावा. व्यवस्थित पाहिल्यास या मंदिराच्या मंडपावर चढण्यासाठी जागा आहे, त्यामुळे तिथून मंडपावर नक्की जावं. तिथून एकतर हा कळस व्यवस्थित पाहता येतो, अभ्यासता येतो आणि दुसरं म्हणजे इथून हवामहाल फार छान दिसतो.

मंडप

हा मंडप म्हणजे “छोटा पॅक, बडा धमाका” आहे. मंडपाला फक्त बारा खांब आहेत. मंडपामध्ये चौथरा आहे. त्याला चार खांब आहेत. असे एकूण फक्त १६ खांब असले, तरी शिल्पांनी ते पूर्ण भरलेले आहेत. यादी करायची म्हटली तर नायक राजाची शिल्पं यावर आहेत. त्या व्यतिरिक्त दशावतारांपैकी नरसिंह, राम, मत्स्य, वामन हे अवतार आहेत. तसंच विष्णू, लक्ष्मी, कृष्ण, हनुमंत, लक्ष्मी-नारायण अशा देवता कोरलेल्या आहेत. काही पौराणिक प्रसंग, जसं हिरण्यकश्यपू वध, कालियामर्दन असे हेही या सर्वांबरोबर कोरलेले आहेत. म्हणजे एकूण मिळून, जर अंदाजे मोजल्यास, किमान दीड - पावणेदोनशे शिल्पं तरी इथे नक्की आहेत.

विष्णू चित्र

परिसरात हे चित्र नक्की कुठे दिसलं ते मला नेमकं आठवत नाही, परंतु याचा फोटो मात्र हवामहाल, रंगनाथ मंदिर याच परिसरात कुठेतरी घेतला. विष्णूचे एक प्रसिद्ध चित्र आहे, तेच इथे चितारलेलं आहे. काही भाग याचा पुसट झाला असला, तरी शेषशाही विष्णू, देवी लक्ष्मी, विष्णूच्या नाभीतून वर आलेले कमळ, त्यात ब्रह्मदेव, डोक्याशी - पायाशी काही देवता ह्या स्पष्ट आहेत. बराचसा भाग पुसलाही गेलेला आहे, परंतु नागाच्या फण्याचा भाग आणि त्याचे वेटोळे उत्तम आहे. हे सर्व एका चौथर्‍यावर आहे असं चितारलेलं आहे.

इतर वास्तू

अस्मादिक

आधी बघितलेल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या वास्तू व्यतिरिक्त अजूनही खूप वास्तू या गडावर आहेत. मुख्य दरवाजातून वर आल्यावर लागलेलं धान्य कोठार सोडून, आणखी एक कोठार येथे बालेकिल्ल्यावरती आहे. इकडच्या बाजूने दिसणाऱ्या तटबंदीत आणखीही काही बुरुज आहेत. यातील एका बुरुजावर पुन्हा पोर्तुगीज पद्धतीची कॅप्सूल आहे. दोन-तीन चौक्या आहेत. त्यातली एक तर बारा-खांबी चौकी आहे. काही जणांच्या मतानुसार ही चौकी जैनांनी बांधलेली आहे.

अजूनही काही वास्तू

या बाजूला कृष्ण मंदिरही आहे. त्याच्याच प्रांगणात दगडी दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. पाण्याची तीन-चार टाकी या परिसरात आहेत. हवा महाल सदरेच्या राजसभेच्या समोर एक पुष्करणी आहे. वाघ दरवाजा ही अत्यंत महत्त्वाची वास्तू, पण ही थोडी लपलेली आहे. हा दरवाजा धोकादायक ठिकाणी असल्याने जपूनच इथे जावे. धान्य कोठाराच्या मागील बाजूस तुपाची विहीर आहे.

मुख्य दरवाजातून आत आल्यावर, आधी उजवीकडची वाट धरून हवा महालाकडे यायचं, आणि अशीच फेरी मारून, डाव्या बाजूने धान्य कोठाराच्या जवळून दरवाज्याकडे परत गेल्यास गडफेरी पूर्ण होते.

मी गडाच्या मुख्य दरवाजावर, पाठीमागे दुर्ग राजागिरी (फोटो: सर विनीत)

हा गड छोटा असला, तरी वर्णन करताना मात्र दमछाक होते. इतके उत्तम बांधकाम, शिल्पकला या गडावर आहे, की आपण सगळं वर्णन करू शकलो नाहीये हे जाणवत राहतं. सर्वार्थाने "मूर्ती लहान पण कीर्ती महान" असा हा जिंजी दुर्गसमूहातला कृष्णागिरी दुर्ग आहे.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!