Thursday, January 22, 2026

जिंजी - दुर्ग कृष्णागिरी (तामिळनाडू)

जिंजी

"जिंजी" नाम तो सुना ही होगा.... पण फक्त सुना ही था. म्हणजे इथे भेट देणे हे फक्त मनात होतं, प्रत्यक्षात नियोजन काही झालं नव्हतं.

त्यामुळे मुळात जेव्हा भटकंतीचा विचार झाला, तेव्हा "जिंजी बघायचं" एवढंच डोक्यात होतं. अर्थात, जिंजीबरोबर साजरा-गोजरा बघायचं हेही डोक्यात होतं. पण मूळ गाभा जो होता, तो फक्त एकच शब्द होता... जिंजी!! बाकीच्या भेटी याच्या बरोबर म्हणून नियोजनात ठरवल्या गेल्या.

जिंजी ही मराठ्यांची दक्षिणेतील राजधानी. मराठे दक्षिणेत कधी, का, कशासाठी घुसले आणि मुळात कसे? हे सर्व जाणून घेणं हा एक अभ्यास आहे. "दक्षिण दिग्विजय मोहीम" ही महाराजांची दोन वर्षे चाललेली मोहीम सर्वात आधी अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी घेऊ शकतो. परंतु अधिक अभ्यास करताना या मोहिमेच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ हाही अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच.

आणि तसाही, या मोहिमेपासूनच मराठ्यांचा जिंजीशी संबंध आला असेल असं कोणाला वाटत असेल, तर ते चूक आहे. कारण महाराजांनी जिंजी घेतला तो १६७७ ला, दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये. परंतु १६४८ ला शहाजीराजांनीसुद्धा आदिलशहाच्या वतीने जिंजी काबीज केला होता.

लेखात गडभटकंती करण्याआधी जिंजीचा अतिशय थोडक्यात इतिहास पाहूया. सत्तेच्या दृष्टीने विचार केला, तर मंदिरे आणि शिलालेखांचा आधार घेऊन सर्वप्रथम राज्यकर्ते म्हणून "पल्लव" राजे यांच्याकडे या परिसराची सत्ता होती, असं म्हणता येईल. त्याआधीच्या काळात जैन लोकांचा वावर या परिसरात होता, हे इथल्या लेणी, शिल्प आणि जैन मंदिरांवरून समजतं. परंतु राज्यकर्ते म्हणून पल्लव राजेच प्रथम मानू शकतो.

पल्लवानंतर "चोल" राजांनी राज्य केलं. नंतर "होयसाळ", विजयनगरचे "नायक" यांनीही जिंजी परिसरात राज्य केलं. यानंतर मात्र मुसलमानी शासकांचा अंमल वाढायला लागला आणि शेवटी जिंजीचा ताबा "आदिलशाहीकडे" आला.

यापुढच्या घडामोडी मात्र रंजक आहेत. म्हणजे, जिंजी आदिलशाहीत असला, तरी तिथे दोन गट होते - दक्षिणी मुसलमान आणि पठाणी मुसलमान. पठाणी गटाचं प्राबल्य वाढू नये, म्हणून "जिंजी त्यांच्या हातात जाण्यापेक्षा कुतुबशाहीकडे बरी", असे मतप्रवाह दक्षिणी मुसलमानांमध्ये होते. त्यामुळे या गटाचा नासिर मोहम्मद, याने त्यानुसार आपला दूत कुतुबशहाकडे पाठवलान.

अर्थातच कुतुबशहाला हा प्रस्ताव पसंत पडला. का आवडू नये? उत्तम बांधणीचा, राजकीयदृष्टया महत्वाचा आणि अभेद्य असा गड पदरात पडत असेल, तर का अमान्य करावा प्रस्ताव? परंतु राजकीय स्थिती पाहता, जिंजी ताब्यात घेणं, तेही सरळ, सर्वांसमक्ष परवडणार नव्हतं. म्हणून यासाठी त्याने शिवाजी महाराजांचा वापर करायचं ठरवलंन. म्हणजे त्यांना पुढे करायचं आणि ताबा आपलाच ठेवायचा. चाल उत्तम खेळली होती, मात्र माणूस चुकीचा निवडलान त्याने. कारण या परिस्थितीचा फायदा महाराजांनी करून घेतला नसता, तरच नवल.

शिवाजी महाराजांनी पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून नासिर मोहम्मदबरोबर व्यवहार ठरवला. व्यवहारानुसार महाराज जिंजीला पोचले आणि त्यांनी याला वेढा घातला. व्यवहारात ठरल्याप्रमाणे तोंडदेखली लढाई पण खेळली गेली. अवघ्या दहा हजार सैन्याशी जिंजी मराठ्यांच्या पदरात पडला. अर्थात, यासाठी ५० हजार होन आणि १ लाख होन उत्पन्नाचा मुलुख एवढी किंमत मोजावी लागली. परंतु भविष्यातली उपयुक्तता आणि जिंजीचं महत्त्व लक्षात घेता हा व्यवहार फायद्यातच झाला, असं म्हणता येईल. किंबहुना, याची मोजदाद केल्यामुळेच महाराजांनी हा व्यवहार केला हे उघड आहे.

जिंजीसारखा महत्त्वाचा प्रदेश आणि गड मराठ्यांच्या ताब्यात इतक्या सहजपणे आला, हे सगळ्यांसाठीच अत्यंत आश्चर्यकारक होतं. मराठ्यांना आता ठरल्याप्रमाणे हे सर्व कुतुबशहाकडे सुपूर्त करावं लागणार होतं. परंतु कुतुबशहाचे हात दगडाखाली असलेले बघून महाराजांनी कुतुबशहाला सरळ नकार दिला. स्पष्ट शब्दांत म्हणायचं फसवलं म्हणा किंवा राजकीय कुरघोडी! पण हेच राजकारण असतं... अर्थात, याची किंमत मोजावी लागली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कुतुबशहाकडून मिळणारी सर्व प्रकारची, म्हणजे आर्थिक आणि सैन्यबळाची मदत बंद झाली. महाराजांना हे अपेक्षितच होतं आणि त्याची तयारीही होती.

या इतिहासानंतर अजून काही रंजक गोष्टी बघूया.

पहिली म्हणजे, “जिंजी” हा इंग्रजी उच्चार आहे. मूळ नाव आहे “सेंजी”. या नावाचा इतिहासही गमतीशीर आहे. “संजिवनी” या आयुर्वेदात असलेल्या, रामायणात उल्लेख असलेल्या औषधी वनस्पतीवरून हे नाव आलं असं मानलं जातं. तर एका कथेनुसार, एके काळी ७ बहिणी होत्या त्यातील "सेंजी अम्मन" नावाच्या एका बहिणीच्या नांवावरून हे नाव पडलं. काहींचं म्हणणं आहे की “सिंगावरम” वरून “सेंजी” हे नाव पडलं. तर संस्कृत शब्द “श्रृंगी” याचा अपभ्रंश “सेंजी” आहे, असं "Madras Manual of Administration" नमूद करतं.

सेंजी–जिंजी व्यतिरिक्त अजूनही नावं सापडतात. मुसलमान काळात “नुसरतगड्डा” किंवा “नुसरतगड” अशी नावं वापरात होती. विजापूरच्या अधिकाऱ्यांनी “बादशहाबाद” हे नाव ठेवलंनी होतं. खुद्द महाराजांनी "चंदी" हे नामकरण केलं होतं. त्यामुळे मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये जिंजी घेतल्यानंतर “सेंजी”, “चंजी”, “चंद्री” असे उल्लेख आढळतात.

नावात काय आहे? तर हे सगळंच आहे.

आता पुढची गंमत. जिंजी हा एका डोंगरावर असा गड नाही. मग "जिंजीला जायचं" म्हणजे नेमकं कोणत्या गडावर/डोंगरावर जायचं? जिंजी किल्ल्यावर ब्लॉग लिहायचा किंवा माहिती द्यायची, तर कशावर लिहायची?

तर जिंजी म्हणजे मूळ “सेंजी” हे त्या गावाचं नांव. त्या गावात असलेल्या आठ गडांचा किंवा टेकड्यांचा जो समूह आहे, त्यालाच जिंजी म्हणतात.

१. दुर्ग आनंदगिरी उर्फ राजागिरी उर्फ राजगड

२. दुर्ग कृष्णागिरी

३. दुर्ग त्रिचंडी

४. दुर्ग कुत्थरसीदुर्ग उर्फ चेलगड

५.दुर्ग चंद्रयानदुर्ग उर्फ चेन्नागिरी उर्फ सारंगगड

६.दुर्ग चक्कीलादुर्ग उर्फ लालगड

७.दुर्ग कोरांगदुर्ग उर्फ मुत्तयलूनायक दुर्ग उर्फ गर्वगड

८. दुर्ग कुसुमलाई उर्फ मदोनमत्तगड

मग गेल्या वर्षी युनेस्कोमध्ये जे स्थान मिळालं, ते यापैकी नेमकं कोणाला मिळालं? की सगळ्यांना? तर राजागिरी, कृष्णागिरी आणि चेन्नागिरी — या तीन टेकड्यांचा मिळून जो समूह आहे, तो “जिंजी दुर्ग” म्हणून युनेस्कोमध्ये समाविष्ट झाला.

या लेखात बघूया - .

दुर्ग कृष्णागिरी

याआधीहि आपण "कृष्णगिरी" नावाच्या दुर्गाची भटकंती केली, तो वेगळा. तो गड "कृष्णगिरी" नावाच्या जिल्ह्यातच आहे. तर जिंजी दुर्ग-समूह "विल्लूपूरम" जिल्ह्यात आहे. आता बघणार आहोत तो "कृष्णागिरी", ह्याच "जिंजी" दुर्ग-समूहातील दुर्ग. आणि हा जिंजी दुर्गसमूहातील सर्वात छोटा गड आहे. मुळात ह्या दुर्गभेटीची वेळ आमची दुपारची होती. साधारण सव्वा दोनच्या सुमारास या गडाकडे जाणाऱ्या वाटेला लागलो.

दुर्ग कृष्णागिरी (जिंजी)

कृष्णागिरी हा जणू विवाहसोहळ्यातल्या रुखवंतासारखा वाटतो. म्हणजे जे काही प्रेक्षणीय आहे, ते समोर उलगडून दाखवत जणू "जिंजी या सोहळ्यात" भाग घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने आधी हेच येऊन बघावं! हा डोंगर तो दगडांचा ढीग ओतून ठेवल्यासारखा दिसतो. पण त्यातून एक एक वास्तू वर डोकावताना खालूनच दिसतात. दोन्ही भुजा पसरून आपल्याला जणू आमंत्रण देत असतो - “बघा माझा साजशृंगार! दरवाजे, तटबंदी, पायऱ्या, महाल..." सगळे दागिने ठसठशीत मांडून आणि झाडी–झुडपांचं भरजरी हिरवं वस्त्र लेवून आपल्यासारख्या दर्दी मंडळींची वाट पाहणारी ही टेकडी भासते.

तिकडे वर जाणारी, पायघड्या पसरल्यासारखी वाट आपल्याला त्या झाडीत नेऊन सोडते. वर देखण्या रचनेकडे पाहत जात असल्याने, आपण ज्या पायघडीवरून चालत आहोत, ती मुळात अत्यंत सुंदर आणि बलदंड तटबंदीची फांदी आहे, हे लक्षातही येत नाही.

वाटेत गडाची माहिती असणारे फलक लावलेले आहेत. झाडीत लुप्त होणाऱ्या या पायघडीनंतर चढणारी वाट सुरू होते. आम्ही इथे येण्याआधी सकाळी राजागिरी दुर्गाला भेट दिलेली असल्याने, नकळत लक्ष मागे जातच होतं. “इथून राजागिरी हा गड कसा दिसतो?” हे पाहण्यासाठी! आणि त्या भेटीमुळे या दुर्गसमूहासाठी लागणारे शुल्क आधीच भरलेलं असल्याने, पुढे झाडीनंतर येणाऱ्या चौकीवर पुन्हा थांबण्याची आम्हाला गरज नव्हती.

रेलिंग आणि पहिला दरवाजा

पायऱ्या आणि बाजूला इथे रेलिंग लावलेलं आहे. त्यावरून चढून जात पहिल्या दरवाज्यात पोहोचलो. सह्याद्रीत ताशीव कातळकडे असल्यामुळे वाटेल तिथून चढता येत नाही. परंतु या प्रांताची भूरचना वेगळी आहे. कातळ नाही, दगडांची रास ओतल्यासारख्या टेकड्या. त्यामुळे असं वाटू शकतं, की कुठूनही वाट काढता येईल. पण प्रत्यक्षात दगडांच्या राशीत कधीकधी भल्या मोठ्या शिळा असतात. काही ठिकाणी उड्या मारत जाता येईलही, पण सगळीकडे नाही. कृष्णागिरीही तसाच. उंचीने बुटकाच तुलनेत, परंतु हा छोटासा दरवाजाच ही ह्यावर जायची एकमेव वाट आहे. इतरत्र प्रयत्न केला, तर दगडांत ना वर जाऊ शकत, ना खाली उतरता येत, अश्या स्थितीत अडकून पडण्याचीच शक्यता.

या दरवाजाला दोन खांब आहेत. एका खांबावर गणेशशिल्पही आहे. दरवाजा ओलांडल्यावर समोरच पायऱ्यांची वाट आणि उजवीकडे एक बुलंद बुरुज.

बुरुजावर प्रमोद

वर चढल्यावर बुरुज भव्य तर दिसतो, पण उंची फारच कमी असल्यासारखी वाटते. पण हा भास आहे, कारण आपण एका बाजूने तो बघत असतो. प्रत्यक्षात मात्र त्याची खरी उंची मागच्या बाजूने जाणवते. बुरुजाचा घेराही प्रचंड आहे.

बुरुज आणि कुत्थअरसी दुर्गापर्यंत असलेली तटबंदी

या बुरुजाची खरी महती, शेजारून वर जाणाऱ्या पायऱ्यांवर थोडं पुढे गेल्यावर कळते. कारण बुरुजाजवळ उभं राहिलं की, आजूबाजूला काहीच नसताना मध्येच हा चुकार बुरुज असल्यासारखा वाटतो. पण तोच या गडाचा एक प्रमुख रखवालदार आहे. बुरुजाच्या पलीकडे आपण ज्या पायवाटेवरून आलो, ती दिसते. आणि मग स्पष्ट होतं, की आपण चालत आलो ती वाट म्हणजे भव्य तटबंदी आणि त्याची फांजी आहे, जी कृष्णागिरीपासून थेट कुत्थअरसी दुर्गापर्यंत जाते. ही संपूर्ण तटबंदी आणि पर्यायाने प्रचंड भूभाग या बुरुजाच्या टप्प्यात येतो. हा एक बुरुज किती मोठ्या भागाचं रक्षण करू शकतो, हे इथून लक्षात येतं.

बुरुजाची बांधणी दुहेरी घेराची आहे. त्यामुळे इथे मोठी तोफ असणार, हे स्पष्ट समजत होतं. कर्नाटकात कलबुर्गी दुर्गावरील बुरुजावर असलेल्या ३६० अंश फिरणाऱ्या तोफांची इथे आठवण आली.

पायऱ्या - प्रसाद, अभिषेक

पहिल्या दरवाजातून वर आल्यावर आधी ही वाट दिसली होती.खड्या चढणीची, वळणावळणाची ही वाट सुंदरच आहे. दगडा दगडांमधून सुंदरसा साप अंगाचं वेटोळ करत नागमोडी चढत जावा, अशा सुंदर पद्धतीने ही पायरी वाट बांधलेली आहे. पायऱ्या प्रशस्त आणि लांब आहेत.

दुसरा दरवाजा

याच वाटेवरून उड्या मारत मारत दुसऱ्या दरवाजात पोचलो. हा दरवाजा पहिल्यासारखाच, फक्त देवड्यांच्या भिंती शाबूत आहेत.

दरवाजातून पायऱ्या

पायऱ्या इथे थांबत नाहीत, तर जणू पायऱ्यांच्या वाटेवर मध्येच हा दरवाजा बांधल्यासारखं वाटतं. या सुंदर पायऱ्या राजा कृष्ण कोण याचे सुपुत्र कोणेरी आणि गोविंदा यांनी बांधल्या.

तिसरा दरवाजा

हा दरवाजा मात्र एकटा नाहीये. दोन्ही बाजूला बुरुज आणि बुरुजांपर्यंत तटबंदी असे याचे मजबूत स्वरूप आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूचा बुरुज अगदी जवळ आहे. या बुरुजाच्या वरच्या थरावर असलेल्या दगडांमध्ये एका दगडावर, अत्यंत ठळक असं शरभशिल्प शिल्प आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य आणि विचार करायला लावण्यासारखी गोष्ट म्हणजे दरवाजावर असलेली पोर्तुगीज बांधणीची कॅप्सूल. या दुर्गावर पोर्तुगीज सुद्धा होते का किंवा या बांधणी मध्ये पोर्तुगीजांचा प्रभाव होता का असा प्रश्न नक्की पडतो.

आत्तापर्यंतच्या तीनही दरवाजांपैकी हा दरवाजा उत्तम स्थितीत आहे. कदाचित दुर्ग-संवर्धन, पुनर्बांधणी याचा ह्यात वाटा असावा. दरवाजाच्या आतील देवड्यांवरील एका खांबावर हनुमानाचे अत्यंत सुंदर शिल्प आहे.

धान्यकोठार

दरवाजातून आत गेल्यावर समोरच आयताकृती, भव्य धान्यकोठार दिसतं. कोठारच इतकं भव्य असेल, तर त्याची उपयुक्तता तेवढी असणार म्हणजे एकूणच या गडाची भव्यता लक्षात येते.

बालेकिल्ल्याचा भाग

आम्ही इथून गडफेरीला कुठून सुरुवात करायची असं कोणी काही ठरवलेलं नसलं, तरी धान्य कोठार हे येताना बघू हा विचार प्रत्येकाचाच झालेला दिसला. प्रत्येक जण सरळ उजवीकडे बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवरच निघाला. गोष्ट उघड होती, बालेकिल्ल्यावर असलेले महाल, वास्तू सगळ्यांनाच भुरळ घालतील अशा आहेत, त्याच सर्वात आधी बघायच्या.

राजसदर / हवामहाल

पायवाटेवरून गडाकडे यायला सुरुवात केल्यावर ज्या वास्तू खालूनच दिसल्या होत्या, त्यात सर्वात देखणी आणि सर्वात उंचावरची वास्तू म्हणजे हा हवामहाल. "ये नही देखा तो क्या देखा इस किले पे..." अशाच प्रकारची ही वास्तू आहे. या वास्तूचा वरचा भाग अतिशय देखणा आहे. चौकोनी इमारतीला झरोके आणि वरती घुमटाकार कळस म्हणू शकतो अश्या मुस्लिम पद्धतीची ही इमारत वाटत असली, तरी बांधकाम पूर्णपणे हिंदू पद्धतीचं आहे. या महालाचे संवर्धन केलेलं आहे, तरीही अजून व्यवस्थित लक्ष देणं इथं गरजेचं आहे. पहिला मजला हा जवळपास १०० खांबांवर तोललेला आहे, कदाचित जास्तही असतील. कुठे कुठे फोटो काढू, असा मोह इथे नक्की होतो.

रंगनाथ मंदिर

रंगनाथ मंदिर या गडावरची सर्वात मोठी वास्तू आहे. ही वास्तू म्हणजे शिल्पांचा खजिनाच आहे. या मंदिराला मोठे दालन आहे. त्या तुलनेत गर्भगृह हाच या वास्तूचा सर्वात लहान भाग आहे. परंतु दालनाच्या चारही बाजूने चौक्या आहेत. या चौक्या एकपाषाणी कोरीव आहेत. मराठ्यांचा या चौक्यांशी संबंध म्हणजे याच्या भिंती छत्रपती राजाराम महाराजांनी बांधून घेतलेल्या आहेत. मंदिराच्या कळस भाग न विसरता चहूबाजूनी अभ्यासपूर्व न्याहाळावा. व्यवस्थित पाहिल्यास या मंदिराच्या मंडपावर चढण्यासाठी जागा आहे, त्यामुळे तिथून मंडपावर नक्की जावं. तिथून एकतर हा कळस व्यवस्थित पाहता येतो, अभ्यासता येतो आणि दुसरं म्हणजे इथून हवामहाल फार छान दिसतो.

मंडप

हा मंडप म्हणजे “छोटा पॅक, बडा धमाका” आहे. मंडपाला फक्त बारा खांब आहेत. मंडपामध्ये चौथरा आहे. त्याला चार खांब आहेत. असे एकूण फक्त १६ खांब असले, तरी शिल्पांनी ते पूर्ण भरलेले आहेत. यादी करायची म्हटली तर नायक राजाची शिल्पं यावर आहेत. त्या व्यतिरिक्त दशावतारांपैकी नरसिंह, राम, मत्स्य, वामन हे अवतार आहेत. तसंच विष्णू, लक्ष्मी, कृष्ण, हनुमंत, लक्ष्मी-नारायण अशा देवता कोरलेल्या आहेत. काही पौराणिक प्रसंग, जसं हिरण्यकश्यपू वध, कालियामर्दन असे हेही या सर्वांबरोबर कोरलेले आहेत. म्हणजे एकूण मिळून, जर अंदाजे मोजल्यास, किमान दीड - पावणेदोनशे शिल्पं तरी इथे नक्की आहेत.

विष्णू चित्र

परिसरात हे चित्र नक्की कुठे दिसलं ते मला नेमकं आठवत नाही, परंतु याचा फोटो मात्र हवामहाल, रंगनाथ मंदिर याच परिसरात कुठेतरी घेतला. विष्णूचे एक प्रसिद्ध चित्र आहे, तेच इथे चितारलेलं आहे. काही भाग याचा पुसट झाला असला, तरी शेषशाही विष्णू, देवी लक्ष्मी, विष्णूच्या नाभीतून वर आलेले कमळ, त्यात ब्रह्मदेव, डोक्याशी - पायाशी काही देवता ह्या स्पष्ट आहेत. बराचसा भाग पुसलाही गेलेला आहे, परंतु नागाच्या फण्याचा भाग आणि त्याचे वेटोळे उत्तम आहे. हे सर्व एका चौथर्‍यावर आहे असं चितारलेलं आहे.

इतर वास्तू

अस्मादिक

आधी बघितलेल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या वास्तू व्यतिरिक्त अजूनही खूप वास्तू या गडावर आहेत. मुख्य दरवाजातून वर आल्यावर लागलेलं धान्य कोठार सोडून, आणखी एक कोठार येथे बालेकिल्ल्यावरती आहे. इकडच्या बाजूने दिसणाऱ्या तटबंदीत आणखीही काही बुरुज आहेत. यातील एका बुरुजावर पुन्हा पोर्तुगीज पद्धतीची कॅप्सूल आहे. दोन-तीन चौक्या आहेत. त्यातली एक तर बारा-खांबी चौकी आहे. काही जणांच्या मतानुसार ही चौकी जैनांनी बांधलेली आहे.

अजूनही काही वास्तू

या बाजूला कृष्ण मंदिरही आहे. त्याच्याच प्रांगणात दगडी दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. पाण्याची तीन-चार टाकी या परिसरात आहेत. हवा महाल सदरेच्या राजसभेच्या समोर एक पुष्करणी आहे. वाघ दरवाजा ही अत्यंत महत्त्वाची वास्तू, पण ही थोडी लपलेली आहे. हा दरवाजा धोकादायक ठिकाणी असल्याने जपूनच इथे जावे. धान्य कोठाराच्या मागील बाजूस तुपाची विहीर आहे.

मुख्य दरवाजातून आत आल्यावर, आधी उजवीकडची वाट धरून हवा महालाकडे यायचं, आणि अशीच फेरी मारून, डाव्या बाजूने धान्य कोठाराच्या जवळून दरवाज्याकडे परत गेल्यास गडफेरी पूर्ण होते.

मी गडाच्या मुख्य दरवाजावर, पाठीमागे दुर्ग राजागिरी (फोटो: सर विनीत)

हा गड छोटा असला, तरी वर्णन करताना मात्र दमछाक होते. इतके उत्तम बांधकाम, शिल्पकला या गडावर आहे, की आपण सगळं वर्णन करू शकलो नाहीये हे जाणवत राहतं. सर्वार्थाने "मूर्ती लहान पण कीर्ती महान" असा हा जिंजी दुर्गसमूहातला कृष्णागिरी दुर्ग आहे.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!