Wednesday, April 1, 2020

पुण्याजवळचा, पण काहीसा दुर्लक्षित – मोरगिरी


मोरगिरी
तसं बघायला गेलं तर दोन आठवड्यांपूर्वीच जावळीतला चंद्रगड पाहिला होता. पण होता डिसेंबर महिना. पावसाळा संपल्यावर हिवाळ्यातला एक-एक विकांत हा महत्त्वाचा असतो, तो वाया गेला तर भटका माणूस हळहळतो.
विनीतला फोन केला. जवळपासचा आणि पूर्ण दिवस न घालवणारा एखादा किल्ला पटकन पाहून घेऊ असा विचार होता. विनीतने “मोरगिरी”चा ऑप्शन ठेवलान. पुण्याला हा मोरगिरी जवळचाच. तुंगला बऱ्यापैकी भटके जातात, तिकोणा-विसापूर-लोहगड तर जवळजवळ पर्यटन स्थळ झालेले आहेत. पण यांच्या जवळ असणारा मोरगिरी तसा दुर्लक्षितच. अर्थातच माझी काही हरकत नव्हती. एकतर ट्रेकचा सराव म्हणून कुठेही भटकंती चालली असती, त्यातून मोरगिरी मी पाहिलाही नव्हता. असा दुर्लक्षित किल्ला बघायचा म्हणजे दुधात साखरच. फार इकडे तिकडे न करता टू व्हीलर वरूनच पटकन जायचं ठरलं.
मी आणि विनीत आपापल्या दुचाकीवरून पिरंगुटला भेटलो. त्याच्याबरोबर अजून एक मित्र होता. सकाळीच मस्त वडापाव-चहा वगैरे करुन “मोरवे”कडे निघालो. तसं मोरगिरीला जायला दोन रस्ते आहेत. एक धोपटमार्ग आहे, लोणावळामार्गे तुंगवाडीला जाताना, वाटेत जांभुळवाडी गाव लागते. तिथून सह्याद्री प्रतिष्ठानने मार्ग केलेला आहे. दुसरा मार्ग पौड वरून कोळवण, हडशी वरून जवण-तुंग रस्त्यावरच्या मोरवे गावाजवळून. आता विनीत ह्या मार्गाने आधी जाऊन आलेला असल्याने आम्ही इकडूनच जायचे ठरवले होते. त्याप्रमाणेच दुचाकी हाणल्या.
रस्ता तसा खराबच आहे. दुचाकीवर तर जास्तच जाणवतो. त्यातून माझी गाडी फक्त 13 वर्षांची, त्यामुळे मी जरा जपूनच असतो. त्यातून ती सुझुकी, म्हणजे त्याचे पार्ट मिळण्याच्या दृष्टीने शिमगाच. पण अजून गाडीने कधी धोका नाही दिलेला मला त्रास होईल असा. तर विनीत पुढे आणि मागून गाडी हाकत होतो. म्हणजे विनीत गाडी दामटवत होता आणि मी चालवत होतो. एका ठिकाणी शंका आली. स्पीड कमी करून बाजूला थांबवली, तर ती शंका खरी ठरली. पंक्चर... पण ह्या वेळीही धोका नाही दिलान गाडीने. पौड सोडल्यानंतर या संपूर्ण रस्त्यावर एकच पेट्रोल पंप, तो सुद्धा अगदी फक्त शंभर पावलं पुढे होता आणि त्यातच पंक्चरचे दुकान. विनीतला फोन करून सांगितलं. तो पुढे गेला होता, पण मागे आला. चांगला अर्धा-पाऊण तास खर्च झाला आणि मग परत रस्त्याला लागलो.
कोळवण नंतर हडशी सोडल्यावर तिकोणा किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर, तिकोणाच्या जराशा अलीकडेच डावीकडे रस्ता जवण नंतर चवसार वरून मोरवेकडे जातो. हा डावीकडे जाणारा रस्ता धरला की उजवीकडे पावना जलाशयाचं पाणी लांबवर दिसायला लागतं. तसंच त्याच्या पलीकडे तुंग किल्ला दिसायला लागतो. तसा मुळातच तुंग किल्ला दिसायला सुंदर, त्यातून ह्या बाजूने त्याचा View आधी पाहिलेला नव्हता. तुंगला भेट देऊन साधारण नऊ वर्ष झाली असतील, त्यामुळे तो लक्षातही येत नव्हता. ह्या बाजूने काय सुंदर दिसत होता तो.
मोरवे गाव ओलांडल्यावर एके ठिकाणी डावीकडे फाटा आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी, तो पटकन लक्षात येत नाही. दाते साहेब डावीकडे वळले आणि त्याच्यामागून मीही वळलो. आता रस्ता संपला आणि गाडी जंगलाकडे जायला लागली. चार चाकीचा रस्ता एका फार्म हाऊस पर्यंतच जातो, पण आमच्याकडे दुचाक्या होत्या त्यामुळे अजून पुढे दामटल्या. रस्ता म्हणजे जंगलातली पायवाटच होती.

Trek: Starting Point
थोडं पुढे जाऊन जंगलातच गाड्या लावल्या आणि पायवाटेने चढाई सुरू केली. ह्या बाजूने आधी बुलडोजर आणून वाट करण्याचा प्रयत्न केलेला होता पण तो निसर्गाने हाणून पाडलान होता. म्हणजे दरड कोसळून-कोसळून तो रस्ता शेवटी पूर्ण झालाच नाही म्हणे. तसं बघायला गेलं तर रस्ता असा दिसत नव्हताच, एक वाट होती पण तीही फार मोडलेली दिसत नव्हती. जांभूळवाडीतून रस्ता झाल्याने ह्या बाजूने किल्ल्यावर कदाचित कोणीच येत नाही. पाण्याची वाट आणि त्यातून वाहत कोसळत आलेली वरची दरड. जणू नळीची वाट तयार झाल्यासारखी.
किल्ला तसा इथून दिसतच नाही. त्याआधीचे पठार आहे, तिथे पोचायचे लक्ष ठेवून त्याप्रमाणे ह्या वाटेने वर जात होतो. बऱ्यापैकी मोठाले दगड चढून गेल्यावर समोर थोडं मोकळं-मोकळं दिसायला लागलं आणि दिसला तो मानवनिर्मित कातळात खोदलेला रस्ता.
कातळात खोदलेला हा रस्ता जुन्या काळातला नाही तर अलीकडेच तो बुलडोजरने खोदलेला आहे. एक-दोन वळणं घेतली तर चक्क रुंद खोदाई केलेला रस्ता. इथून अगदी पाचच मिनिटात आलो त्या पठारावर. उजवीकडे होता मोकळा परिसर तर डावीकडे हिरवीगार टेकडीवजा डोंगर आणि त्याच्यामागून डोकावणारा मोरगिरी किल्ला. म्हणजे आम्ही एक टप्पा पार केला होता. पण अजून मोरगिरीचा प्रसिद्ध चढ, जो एकदम निसरडा, घसरगुंडी सारखा आहे तो बाकी होता. म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचं सुद्धा होतं अजून आम्हाला.

पठारावरून झाडीतली वाट शोधताना
उंच इथली कारवी
दातेंच्या म्हणण्यानुसार ह्याच डावीकडच्या झाडीतून कुठेतरी डावीकडे जात-जात गडावर जाणाऱ्या पायवाटेला लागता येतं. पण यावर्षी पाऊस लांबल्याने झाडी दाट आणि उंच होती. नेमकी अशी वाट लक्षात येत नव्हती. जरा इकडे जाऊन बघ, तिकडे जाऊन बघ असं झाल्यावर ती वाट सापडली. हि वाट मात्र मळलेली होती. इकडे गुराखी आणि त्याच्या गुरांचा चांगलाच वावर असावा. चांगली उंच कारवी, त्यातून जाणारी पायवाट. त्यामुळे मस्त सावली. मगाशी अगदी ऊन-ऊन लागत होतं, पण आता दाट झाडीतून ते जाणवतच नव्हतं. सावली आणि गारवा सुद्धा. दहा मिनिटातच ती दाट झाडी संपून पुढे विस्तीर्ण पठार लागले, अगदी झाड विरहित! पण आम्हाला तिकडे न जाता झाडीला धरूनच जायचं होतं. मग तसंच कडेकडेने अजून चालल्यावर अवघ्या पाच मिनिटात एका झाडावर सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेला बोर्ड दिसला. मात्र तो बोर्ड आमच्या जाणाऱ्या वाटेवर नव्हता, तर आमच्याकडे येणार्‍या वाटेवर होता, म्हणजे उलटा. कारण आम्ही धोपट मार्गाने आलो नव्हतो. धोपटमार्गाने आल्यावर गडाकडे जाणारी वाट डावीकडे होती त्यामुळे आमच्यासाठी ती उजवीकडे.

दाट जंगल आणि घसाऱ्याच्या वाटेची सुरुवात
मोकळे आकाश सोडून आम्ही परत जंगलात शिरलो. उंच उंच वृक्ष, त्यातून चढाव. पण दाट सावली. ऊन खालपर्यंत पोचतच नव्हतं. मोठी झाडं संपल्यावर कारवी. तशी इथे कारवी कमीच असते, पण ह्यावर्षी पावसाच्या कृपेने तशी बर्‍यापैकी आधार म्हणून कारवी तिथे होती तरी, नाहीतर प्रचंड घसरगुंडीच आहे इथे.

उघडा आणि घसाऱ्याचे पॅच
दहा मिनिटात ना जंगल, ना कारवी असा उघडा पॅच. मागे दरी आणि खाली घसरला तर कष्टाने चढून आलेलं अंतर घसरत जाऊन सरळ कारवीत, नाहीतर जंगलातच परत जायचं. म्हणजे सापशिडी खेळताना अगदी ८० पर्यंत पोचून सापाच्या तोंडातून परत दहावर जाण्यासारखं. इथे एक पॅच अगदी सांभाळून, म्हणजे अगदी तंगड्या फाकून चढायचा असा. एक होल्ड एकदम डावीकडे, तर पुढचा एकदम उजवीकडे. बरं मातीवर पाय ठेवायची सोय नाही, नाहीतर पुन्हा सापाच्या तोंडातून खालीच.

विस्तीर्ण पठार आणि पलीकडे तर डोंगरच डोंगर
तर असं अजून पंधरा मिनिटं गेल्यावर समोर कातळकडा आणि पुन्हा उजवीकडे दरी. पण इथून ते जंगलाच्या आधीचे पठार काय सुंदर दिसतं. विस्तीर्ण! पलीकडे तर डोंगरच डोंगर.
अतिशय सांभाळूनच दरी आणि कातळकड्याकडे लक्ष ठेवूनच अरुंद वाटेने पुढे गेल्यावर परत एक ढासळलेला भाग आहे. दरीचा धोका ध्यानात ठेवून तो टप्पा सावधपणे पार केला की मात्र निवांत.
पिण्यायोग्य पाण्याचे टाके
जाखमातेचे देवस्थान
इंद्रव्रज
इथे कातळात कोरलेले पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. तशी पुढे दिसणारी कातळाला लावलेली एक शिडी लांबूनच आपल्याला दिसलेली असते. तिथे पोचताना डावीकडे कातळात एक गुहा आहे. हे जाखमातेचे देवस्थान. येथे देवीची अनगड मूर्ती, तांदळा आहे. देव कुठेही असो, भाविक रस्ता काढतातच. इथे उदबत्ती, घंटा, एक निरांजन, शेजारी तेल ठेवलेले होते. एवढेच काय तर त्या देवीच्या तांदळाला साडीही नेसवलेली आहे. आजूबाजूला बर्‍याच ठिकणी शेंदूर फासलेला आहे. या गुहेतच एक पाण्याचं टाकं आहे, त्याच्यावरती कातळावर पांढऱ्या रंगात “जाखमाता” असे लिहिलेलं आहे. एक पडलेला लोखंडी बोर्ड आणि पोल गुहेतच आडवा करून ठेवलेला आहे. त्या टाक्यात वाकून बघताना सूर्यदेवाच्या कृपेने नेमकं आपल्याच डोक्याभोवती इंद्रव्रज दिसतं.

शिडी, पलीकडे तुंगकिल्ला आणि देवघर डोंगर
गुहेच्या पलीकडे लागूनच एक मस्त मजबूत शिडी उभी केलेली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी शिडी आहे कारण उजवीकडे दरी आहे. शिडीमुळे इथे आता रोपची गरज लागत नाही. इथून पलीकडे तुंग किल्ला डोकं वर काढून आपल्याकडे बघत असलेला दिसतो. त्याच्या आधी एक पसरलेला डोंगर दिसतो त्याचं नाव देवघर डोंगर.

पाण्याने ओतप्रोत भरलेलं, एकदम कातळकोरीव आणि निटंस टाकं
शिडी चढून गेल्यावर कातळकोरीव पायऱ्या दिसायला लागल्या म्हणजे आता जवळजवळ शेवटचा टप्पा. पायऱ्या चढून डावीकडे वळण घेत गडाच्या सर्वोच्च टोकावर आम्ही पोचलो. इथे पोचल्यावर काय नजारा दिसला... जरासं खालच्या बाजूला एक पाण्याचं टाकं. तेही पाण्याने ओतप्रोत भरलेलं, एकदम कातळकोरीव आणि निटंस. आणि पलीकडे एकदम मोठी डोंगररांग. काय सुंदर दृश्य होते ते.

नजारा
इथे डावीकडे एक ध्वजही आहे आणि त्याच्या बरोबर मागे दिसत होता आता देवघर डोंगर आणि तुंग किल्ला. देवघर डोंगर थोडा खाली गेल्यामुळे त्याच्यावरच सपाट पठार एकदम छान वाटत होतं तर त्याच्या मागून तुंग मात्र त्याची उंची दाखवत ढगाला भिडवून उभा होता. त्या पाण्याच्या टाक्याजवळ गेलो. त्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. त्याच्या खालच्या बाजुला अजुन एक टाकं होतं, ते मात्र कोरड होतं.
इथून चहूबाजूला फारच सुंदर दृश्य दिसतं. त्या ध्वजाच्या पलीकडे दिसणारे तुंग किल्ल्याच्या डावीकडे पवना जलाशय, पुढे बऱ्यापैकी अंतरावर लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात तर आपल्या मागच्या बाजूला अजून भरपूर डोंगररांगा. त्यांची नावं मला तरी माहिती नाहीत.

दगडांची घळ
गडावर अजून पाहण्यासारखे अवशेष नाहीत. पण हे जसं लक्षात आलं तसं मग भुकेची जाणीव झाली. त्यात बारा वाजत आले होते. पण वर उन्हात बसून खाण्यापेक्षा खाली उतरून खायचं ठरलं. त्यातही जाखमातेच्या गुहेजवळ न बसता थोडं पुढे जाऊन एक दगडांची घळ, जी आम्ही आधीच हेरून ठेवली होती, तिथे बसायचं ठरलं. वरती माकडांची चाहूल लागली पण या ठिकाणी येणं त्यांना शक्य दिसत नव्हतं. तरी जराशी जपूनच पोटपुजा केली, लगेच फोटोसेशन केलं.
सगळं मनासारखं झाल्यावर परतीच्या प्रवासाला लागलो. पुन्हा त्या घसाऱ्याच्या मार्गाला भिडलो. एखादा रस्ता वर चढताना जर घाबरवत असेल, तर उतरताना अजूनच कठीण वाटतो. चढताना लागलेले दोन कठीण टप्पे पार कडून कारवी सापडेपर्यंत धास्ती होती. पण एकदा कारवी आणि ती सुद्धा आमच्यापेक्षा उंच अशी. ती लागल्यावर काळजी मिटली. पुढचं जंगल ओलांडून आल्या वाटेने परत सुरुवातीच्या विस्तीर्ण पठारावर आलो.
इथून मागे पाहिल्यावर किल्ला पूर्ण दिसत होता. तिथून आत्ताच आल्यामुळे सगळी वाट, शिडीची जागा (हो जागाच फक्त, कारण शिडी कातळामागे दडली होती), अगदी वर पर्यंतचा रस्ता आणि ध्वजही व्यवस्थित दिसत होता.

सुरुवात केली धडाधड उतरायला ते मोठमोठाले दगड
आता वेळ हातात असल्यामुळे ते पठार उगाचच तुडवलं आणि मगच उतरायला लागलो. आता काय? पाण्याच्या वाटेने कसंही उतरायचं होतं, एक-दोन जागा लक्षात ठेवल्या की झालं! मग काय, सुरुवात केली धडाधड उतरायला ते मोठमोठाले दगड.
आणि झाली की गंमत त्यात... चुकलो ना एका ठिकाणी. उजवीकडे जायचं सोडून गेलो पाण्याच्या वाटेने डावीकडून खाली. पण फार वेळ जायच्या आधीच ते लक्षात आलं. चढताना न लागलेलं झाड, आमच्या उंची पेक्षा जास्त उंच दाट झाडी. त्यामुळे लगेच कळलं. इथे अर्थातच मोबाईलला रेंज नाही. पण एक होतं, आम्ही तिघंही एकत्र होतो. बुद्धीला चालना देऊन, मागच्या डोंगराचा अंदाज घेत मोकळा भाग शोधून काढला. थोडं हायसं वाटलं. झाडीच्या उंचीमुळे चालताना तोंडावर येणारी जळमट मात्र उगाचच भीती निर्माण करत होती. थोडी धडधड वाढली पण तोपर्यंतच एकाकी ठिकाणी आमच्या दुचाकी आमची वाट बघत असलेल्या दिसल्या.
फार नाही एक पंधरा-वीस मिनिटं जास्त गेली असतील. पण रस्ता सापडत नसेल तर त्या वेळी दोन-दोन मिनिटंसुद्धा जास्तच वाटतात. गाडी जंगलातून बाहेर काढत मार्गाला लागलो आणि यावेळी आल्या मार्गाने येता तिकोणा-पेठ जवळून पवनानगर-कामशेत रस्त्याने हायवेला लागलो. रावेतजवळच मिसळ हाणली आणि संध्याकाळच्या चहाला घरी पोहोलो.


सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

8 comments:

  1. मस्तच, सोबत फिरून आल्याचा आनंद!!

    ReplyDelete
  2. Mrunal Jadhav-salunkhe.April 1, 2020 at 5:05 PM

    खूप छान वर्णन केले आहे, वाचताना आपण पण ट्रेक मध्ये होतो असे वाटते. Keep it up good work ��.

    ReplyDelete
  3. खूप सुंदर आणि माहितीपूर्ण!

    ReplyDelete