Saturday, February 22, 2020

जलदुर्ग सिंधुदुर्गातले - राजकोट, सर्जेकोट आणि पद्मगड

राजकोट
राजकोट
गेले काही ब्लॉग्स विदर्भ, नाशिक या पट्ट्यातील होते. आता वळूया थोडसं माझ्या कोकणात. बघूया जलदुर्ग-राजकोट.
मी रत्नागिरीचा असून पण सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग वगळता इतर किल्ले पाहिलेच नव्हते. नुसते इतर किल्ले नाही, तर मालवण वगैरेची भटकंतीही केली नव्हती. नवीन गाडी घेतल्यावर मुद्दाम मालवणची भटकंती करून रत्नागिरीला घरी जायचं नियोजन केलं होतं. सहकुटुंब भटकंतीत सिंधुदुर्ग बरोबरच फिरण्यासाठी मालवण आणि जवळचे काही किल्ले निवडले, त्यातलाच एक राजकोट.
खरं तर “राजकोट सिंधुदुर्ग” गुगल मॅप वर टाकले तर रिझल्ट मध्ये तो येतो, पण त्यात फोटोतही किल्ला दिसत नाही. ब्लॉग सोडाच, या किल्ल्यावरच्या अवशेषांवर चार वाक्य लिहायची म्हटली तरी त्यासाठी लागतील तेवढेही अवशेष शिल्लक राहिले नाहीयेत इथे. मुळात हा किल्ला सापडत नाही सहज. गाडी घेऊन तिथे गेलो तर समोर समुद्रच आला सरळ. गाडी लावून अवशेष शोधायला लागलो. ह्या किल्ल्याशेजारी उभ्या असणाऱ्या लोकांना सुद्धा किल्ला कुठे आहे ते सांगता आले नाही, ही आहे किल्ल्याची उरलेली शोकांतिका.
तरी चिकाटीने शोधल्यावर चक्क एका घराशेजारी काही तटबंदी किंवा एखाद्या वाड्याचे अवशेष दिसले. तिथून माग काढत गेलो तर एक झाडाचा पार, खाली देवांचे फोटो आणि मूर्ती दिसल्या. शेजारून आत डोकावले तर बुरुजाचा आतला भाग दिसला. खालचा भाग दगडात तर वरचा जांभ्या दगडांनी म्हणजेच चिऱ्यांनी बांधलेला आहे.
हा बुरुज वगळता अजुन एक बुरुज समुद्राला खेटून आहे, त्यावरुन पद्मगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नक्कीच तजवीज केलेली असावी. किनाऱ्यावर जवळच एक जुनी इमारत दिसली जी नक्की कोणत्या काळातील आहे सांगणं कठीण आहे.
या किल्ल्याचे स्थान मात्र अतिशय मोक्याचे आहे. सध्या एवढेच नाममात्र अवशेष येथे शिल्लक आहेत. त्या दिवशी रॉक गार्डन वगैरे पर्यटन स्थळे पाहून दिवसांची भटकंती संपवली. पुढचा जलदुर्ग पाहायचा होता तो सर्जेकोट.
सर्जेकोट
सर्जेकोट प्रवेशद्वार
या किल्ल्याचं एकच प्रवेशद्वार शिल्लक आहे. किल्ल्याच्या आत मधल्या परिसरात घरं आहेत आणि त्यात अजूनही लोक राहतात त्यामुळे घराच्या आसपासचा परिसर त्यांनी साफ ठेवलेला आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर घरांकडे जाणारा रस्ता तेवढाच साफ दिसतो. घरांमध्ये विचारपूस केल्यावर त्यांच्या-त्यांच्या हद्दीत येणारी तटबंदी, अवशेष ते पाहू देतात. पण तटबंदी आणि घरांचे सगळेच बांधकाम Compund Wall सहित चिऱ्यांचे असल्याने काही ठिकाणी तो किल्ल्याचा भाग आहे कि घरांच्या बांधकामाचा, असा संभ्रम निर्माण होतो.

सर्जेकोट तटबंदी आणि बालेकिल्ला अवशेष
एका घराच्या मागच्या बाजूस बालेकिल्ला आहे. याच्या चारही बाजूचे बुरुज सुरक्षित आहेत. आत मध्ये साफसफाई नसल्याने फारसे निरीक्षण करता आले नाही. बाजूला खंदक असल्याचे वाचल्याने जपूनच फिरत होतो. तसं बघितलं तर झाडी साफ केल्यास राहती घरं असूनही खूप असे अवशेष पाहता येऊ शकतात. तटबंदीही बरीचशी शिल्लक आहे.

सर्जेकोट बुरुज
नीटसे बघितल्यास झाडीत आणि घरांच्या जवळ लपलेले अजूनही काही बुरुज दिसतात. किल्ल्याची एक बाजू अर्थातच समुद्रकिनारी आहे, त्याही बाजूने निरीक्षण केल्यास बुरुजांचे भाग दिसतात. पण एकूणच किल्ल्याचे किल्लेपण हरवत चालले आहे. वेळीच काळजी न घेतली गेल्यास सर्जेकोटचा राजकोट होण्यास फार वर्षे लागणार नाहीत.

पद्मगड
रायगड जिल्ह्यातला “पद्मदुर्ग” सर्वांना परिचित आहेच पण ह्या किल्ल्याशी नाम-साधर्म्य असलेला “पद्मगड” हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. “पद्मदुर्ग” आधी पहिला होता पण याआधी मालवणला आल्यावर सिंधुदुर्ग पाहूनही त्याच्या जवळच, किनारपट्टीपासून अगदी walking distance, शब्दश: walking distance वर असणारा पद्मगड मात्र हुलकावणी देऊन गेला होता. यावेळी मात्र वेळेचं आणि भरती-ओहोटीचं मोजमाप करूनच आलो होतो.
रायगड मधल्या अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही ओहोटी असताना चालत जाऊन पाहता येतो. किनाऱ्यावरून आणि सिंधुदुर्गला बोटीतून जाताना पद्मगड खुणावत असला तरी त्यावर जाण्यासाठी दांडगेश्वर किनाऱ्यावर जावे लागते. सिंधुदुर्गवर जाऊन आल्यावर अंदाज घेत सरळ किनार्‍यावरूनच वाळूत गाडी घातली. वाळूचा अंदाज नसेल तर सरळ डांबरी रस्त्याने फिरून त्या किनार्‍यावर जाता येते.
त्यादिवशी षष्ठी होती आणि आम्हाला जवळजवळ अकरा वाजत आले होते किनाऱ्यावर पोचायला. म्हणजे भरती चालू झाली होती, पण हरकत नव्हती. भरती नुकतीच चालू झाली असल्यामुळे हातात खूप वेळ होता. किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत जाणारी वाळुची पुळण बैलगाडी सुद्धा निवांत जाईल एवढी रुंद होती. वाटेवर आजूबाजूला शंख-शिंपले खुणावत होते पण मी त्याकडे दुर्लक्ष करून अवघ्या पाच मिनिटात प्रवेशद्वारापर्यंत पोचलो. लांबूनच या किल्ल्यावरचे भगवे ध्वज आणि लाईटचे पोल दिसत असतात.

पद्मगड
प्रवेशद्वारापर्यंत मार्ग एकदम साफ केलेला असून दुतर्फा सुरुची झाडे लावलेली आहेत. बाकी इतरत्र जागेत गवत आणि इतर झाडे आहेत. प्रवेशद्वाराच्या कमानीला चुना मारलेला आहे. दरवाजा बाहेरच डावीकडे अनगड देव आहे. त्यावर जास्वंदीची ताजी फुले वाहिलेली दिसत होती. शेजारी निरंजन आणि ते विझू नये म्हणून काचेचा चौकोनी बॉक्स होता. प्रवेशद्वारातून आत मंदिरापर्यंत फरशी वगैरे घालून रस्ता केलेला आहे. इथे असलेले मंदिर “पद्मगड महापुरुष देवस्थान” आहे. कोकणात ठिकठिकाणी महापुरुषांची मंदिरं आहेत. महापुरुष म्हणजे त्या जागेचा रक्षणकर्ता. पद्मगड हा तसाही सिंधुदुर्गाच्या रक्षणासाठीची तजवीज म्हणूनच जागा हेरून बांधला गेला होता, त्यामुळे तसं म्हटलं तर हा किल्लाही महापुरुषच!
महापुरुष देवस्थान किंवा वेताळदेव
किल्ल्याच्या आतला भाग वेगवेगळी झाडे लावून सुशोभित केलेला आहे आणि स्वच्छही ठेवलेला आहे. किल्ल्याचा आकार एकूणच लहान असून सर्व बाजूची तटबंदी बऱ्यापैकी सुरक्षित आहे. मंदिराला लागून एक पाण्याचा हौद बांधलेला आहे किंवा ही कोरडी विहीरही असावी. देवाची नुकतीच पूजा झालेली दिसत होती. ताजी फुलं, हार यांनी देव सजला होता. गाभाऱ्यात दोन्ही बाजूला तेलाने भरलेली निरांजने अखंड तेवत होती. त्यामुळे गड जिवंत वाटत होता, जणूकाही जाणीवच करून देत होता कि इथे कोणी नाही असं समजू नका, भरती येउदे नाहीतर ओहोटी, माझं काम मात्र मी ईमाने-इतबारे अखंडपणे करत आहे.

तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे पण त्यावरून परिसर उत्तम दिसतो. प्रवेशद्वारातून बाहेर येऊन परतताना डावीकडे वाटेत तटबंदीजवळ असलेल्या कातळाला चौकोनी आकाराचे एक भोक दिसले. बसून माणूस जाऊ शकेल एवढे आणि मानवनिर्मित दिसत होते. आजूबाजूचे पाणी एकदम नितळ आणि स्वच्छ. पण ते चहूबाजूने असल्याने त्या पाण्यात शिरलो नाही. शिवरायांनी इथे जहाजे बांधणी आणि दुरुस्तीसाठी गोदी बांधल्याचे वाचले होते. हे दगड कदाचित त्याचेच अवशेष असावेत.
गड पाहिल्याचे समाधान पदरात पडल्यावर पुळणीच्या दोन्ही बाजूला खुणावत असलेल्या शंख-शिपल्यांकडे दुर्लक्ष करणे मात्र शक्य झाले नाही. लहानपणापासून असंख्य शंख-शिंपले जमा केले असले तरी अजूनही निवडक शंख उचलण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे गडाकडे येताना दुर्लक्ष केले शंख परतताना मात्र “आपल्याच मुलीसाठी” या नावाखाली माझ्या साठ्यात जमा केले.
मोरयाचा धोंडा


तसं एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर “मोरयाचा धोंडा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भूमिपूजनाचा दगड”
पण एवढे रुक्ष वर्णन करण्यापलीकडे याचे महत्त्व नक्कीच आहे. मराठा आरमारातला सिंधुदुर्ग हा महत्त्वाचा किल्ला. या किल्ल्याच्या बांधकामासाठी “कुरटे बेट” ही मालवण किनाऱ्यावरची जागा निवडण्यात आली. “चौर्‍यांशी बंदरी ऐसी जागा नाही” असे जिचे वर्णन करण्यात येते ती जागा निवडण्यास मदत करणाऱ्या कोळी लोकांना गावेही इनाम देण्यात आली.
भूमीपूजनाचा मुहूर्त काढण्यासाठी मालवणचे वेदशास्त्रसंपन्न जानभट अभ्यंकर यांना निमंत्रण केले गेले. अशा वास्तूचे भूमिपूजन करण्यासाठी महाराजांनी वायरी-दांडी किनारपट्टीवरची जागा निवडली. असे म्हणतात की हिरोजीला इथलाच एक दगड दाखवून त्यावर गणपतीचे चित्र कोरायला खुद्द महाराजांनी सांगितले. गणपती बरोबरच शिवलिंग व नंदीचीही स्थापना झाली. तसेच चंद्रसूर्यही कोरण्यात आले.
मार्गशीर्ष शके १५८६ द्वितीया म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ ला हे भूमिपूजन होऊन नंतर सिंधुदुर्ग उभारणीस सुरुवात झाली. साक्षात महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या पण पर्यटकांपासून तसा उपेक्षितच असलेल्या या मोरयाच्या धोंड्याची पूजाअर्चा स्थानिक लोक मनोभावे करतात.

No comments:

Post a Comment