Friday, March 23, 2012

विलेक्शन 'राज'कारण...

अंक  १:
स्थळ: दरबार (वि.सू.: हे हॉटेल चे नांव नाही)

पात्रे:
मुख्य-मंत्री: सर्व मंत्र्यांमधले मुख्य असे जे ते. मुख्यमंत्री पदाचा येथे काही संबंध नाही.
मत्री: इतर किडूक-मिडूक साथीदार.

मुख्य-मंत्री: काय खबर आहे राज्यात?

मंत्री: सगळे लोक "विलेक्शन, विलेक्शन" म्हणून ओरडत आहेत. कदाचित सगळ्यांना कसलातरी विलेक्शन आनंद झालेला असावा.

मु.म.: आनंद कसला? अरे तो पलीकडच्या "सेने"तला "आनंद कि काय? तो म्हणे आपल्या मित्र राष्ट्रात येतोय, त्याबद्दल काही ऐकले का? आणि मंत्र्यांनो, विलेक्शन आनंद वगैरे काही नाही, ते "इलेक्शन" आहे...
आज रात्रीच "बसू", बैठकीत काय ते ठरवू आणि पुढील डावपेच आखू.

मंत्री: "बैठकीत" काय झाले हे काही आठवत नाही, तरी आता मात्र आपल्याला चांगला चान्स आहे, गेल्यावेळी शेजारच्या बागेतले "साहेब" म्हणत होते कि त्यांच्याकडच्या बागेतील काही कमळांची "रेल्वे इंजिनाने" घुसून नासधूस केली आणि त्यात संरक्षण मंडळातल्या लोकांचे "धनुष्य-बाण" ही मोडले. यावेळी पण तसेच काही झाले तर उत्तम!

मु.म.: पण यावेळी दुसरे प्रॉब्लेम आहेत, खेळ-खेळ म्हणताना त्यात घोळ झालाय, आणि त्यामुळे लोक नाखुश आहेत. अर्थात त्यांना आपण दंड सुनावला आहे, पण तरीही योग्य वेळी बाहेर काढावेच लागेल त्यांना. राज्यातील महागाई वाढत असून तेलाचेही भाव चांगलेच वधारले आहेत. लोक नाराज आहेत आणि त्यातून आपल्याला  आपल्या मनाप्रमाणे थोडेच वागता येते? एका बाजूने परदेशी मॅडम ओरडतात. जनतेच्या बाजूने पांढ-या टोपी वाल्यांची एक टीम मध्ये फार गोंधळ घालून गेली. त्यांना आवरता आवरता नाकी-नऊ आले. त्यात योग-साधना वगैरे करणा-यांनी मध्ये अलोम-विलोम करायला सुरुवात केली. अर्थात त्यांच्या नाकी दम आणायला फार कष्ट पडले नाहीत. पण लक्ष ठेऊन असायला हवे.
बरे, मित्र-राष्ट्रातील काकासाहेब आणि दादांकडून काय बातमी आहे?

मंत्री: काकासाहेब बरेच पेशन्स ठेऊन असतात. पण दादांचे वागणे काही ठीक दिसत नाही, काकासाहेब त्यांना वेळोवेळी सांभाळून घेत असतात. त्यामुळे तिकडून अपेक्षित यश येईल असे वाटते. "नाशिक" तीर्थक्षेत्री परिस्तिथी फारशी अनुकूल नाही. काकासाहेब त्यांच्या मुख्य प्रधानाकडून अपेक्षा बाळगून आहेत, त्यांच्या "भूजां"मध्ये फार "बळ" आहे असे म्हणतात. परंतु सध्या रेल्वे चा जमाना आहे. इंजिन एकच असले तरी मोजक्या डब्यांनीशी बरेच रस्ते काबीज केले होते त्यांनी. डबेही वाढत आहेत, परंतु सगळा भार इंजिनावर आहे.

मु.म.: हम्म.. एक तर आम्ही राज्यात नवीन आहोत, "आदर्श" लोकांची गच्छंती झाल्यावर राजधानीतून अचानक आमची बोळवण झाली.
बरं, पुण्य-नगरीतून काय खबर?

मंत्री: तिकडून परिस्तिथी चांगली असल्याची बातमी आहे. तो परिसर आणि शेजारील प्रदेशावर काका आणि दादा चांगलाच वाचक बाळगून आहेत. जागोजागी रेल्वे घुसत आहे, तसेच धनुष्य-बाण धारी संरक्षक फार नसले
तरी साहेब कमळं लावून बाग फुलवायचा प्रयत्न करत आहेत. त्यातून पुण्य-नगरीत देव-धर्म करणारी बरीच मंडळी असल्याने कमळांना चांगली मागणी आहे. इंजिनाला आपल्यात काहीच स्वारस्य नाही, नाहीतर रेल्वे घुसवून कमळे चिरडून इंजिन हाताच्या इशा-यावर नाचवले असते. पण इंजिनाच्या ड्रायवर चे मनसुबे वेगळेच दिसतात. तरी धनुष्य-बाणांचा मारा इंजिनावर होत राहिला तर आपल्याला फायदा आहे.

मु.म.: आपल्या "उत्तर" दिशेला असलेल्या "प्रदेशा"तील हत्तीवाल्या सरदारणीनीने देव-धर्म करणा-या मंडळींपैकी एकाला हाताशी धरून वेगळाच गेम खेळला होता, तसा काही धोका वगैरे?

मंत्री: नाही, परंतु दुसरा एक धोका जाणवतो... दादांच्या राज्यातील पगडीवाल्या माणसाच्या मदतीने काही भुरट्या चोरांनी पुण्य-नगरीतील एका "महाला"त रात्री गोंधळ घातला. कसलातरी पुतळा चोराला म्हणे, त्यानेही दादांनी रोष ओढवून घेतलाय. दादांची हि दादागिरी आवाक्या बाहेर जातेय हे लक्षात घेऊन काकासाहेबांनी योग्य हालचाली केल्याने वातावरण निवळलं आहे.

मु.म.: मुंबा-नगरीत चांगलं चाललंय, मॅडमनी चांगलं सांभाळलंय!

मंत्री: नाही! आपल्या कुंडलीत म्हणे धनुष्यापासून धोका आहे. त्यांच्याकडे बाण बरेच आहेत. तसंच इथे रेल्वे पण जोरात चालते, त्यामुळे इंजिन पण कुठून-कसे घुसेल काही नेम नाही. त्यातच धनुष्य-बाण धारी सेनेतल्या साहेबांना अचानक काहीतरी "आठवले" आणि त्यांनी एक "निळा" दाढीवाला शिपाई बरोबर घेतलाय, तो काय बडबडतो ते कळत नाही पण म्हणे बागेतली कमळं पुरी पडत नसल्याने हा शिपाई "आठवाल्याची" बातमी आहे.
परंतु त्यात फारसा धोका दिसत नाही.

मु.म.: ते बघून घेऊ हो, पण माझ्या मॅडमना सगळीकडे लक्ष द्यावं लागतं त्याचेही टेन्शन आहे मला. उत्तरेकडील प्रदेशात हत्तीदल जोरात आहे. गेले अनेक वर्ष हत्ती-दलाला धोका नाही.हत्ती-दलाच्या सरदारणीनीने तर तश्या प्रतीकृतीपण जागोजागी उभ्या केल्या आहेत.

मंत्री: आपलं राजधानी वरचं प्रेम जगजाहीर आहे. तसं काकासाहेबांनीही घड्याळाबरोबर राजधानीकडे लक्ष ठेवलं होतं, पण त्यांची डाळ न शिजल्यानं लगेच स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केलं, आपल्यालाही मुंबपुरीसकट
पुण्यनगरी, विदर्भ  आणि नाशिक तीर्थक्षेत्री लक्ष ठेवावे लागणार आहे.

मु.म.: हो, त्यासंबंधीही योग्य पावले उचलली गेली आहेत, तन-मन-धनाने प्रयत्न चालू आहेत. तशी आपला धनाने भरलेला राजधानीतून पाठवलेला एक पेटारा लुटला गेल्याची बातमी विदर्भातून आल्ये, पण आपापल्या
परीने प्रयत्न चालू आहेत. "उच्च" म्हणजे "हाय" स्तरावरच्या कमांड कडून आदेश आलाय....

मंत्री: ह्या, असल्या "आदेश" चा काही उपयोग होत नसतो, मध्ये नाही का असाच "पैठणी" वाला आदेश एका सेनेकडून लढला होता. काय उपयोग झाला?

मु.म.: तसला नाही हो, हा आदेश म्हणजे ऑर्डर. त्याप्रमाणे गल्ल्या-गल्ल्यातून कामं चालू झाली आहेत, कंत्राटदारांना ऑर्डरी गेल्या आहेत. माझे एक तर मराठी चांगले नाही त्यामुळे तुम्ही पण प्रत्येक घर, बिल्डिंगा,
सोसायट्या यातून चौकशी चालू करा. मागणी प्रमाणे कोणाला दिवे, फरश्या, बाकडी, पाण्याचे पाईप वगैरे पाठवून द्या, बुजुर्ग मंडळींना देव-दर्शन घडवून आणा. प्रत्येक कामामागे आपलाच "हात" आहे याची लोकांना कल्पना येऊ द्या. लोकांना वाटलं पाहिजे कि हा "हात" धरल्याशिवाय तरणोपाय नाही...
चला लागा तयारीला..

अंक २:
स्थळ: दरबार (यावेळी मात्र हॉटेल कम बियर बार)

मंत्री: यावेळी गणितं चुकल्येत सर. स्थानिक पातळीवर चांगलेच दुर्लक्ष झालेले दिसतेय. पुण्य-नगरीतही काही ठिकाणी घात झालाय. सोसायट्या, बिल्डिंगा मध्ये आपण पाईप, फारश्या पोचवल्या ख-या, पण त्या पाईप पाई
चांगलाच पैसा गेला, आणि परतावा पण फारसा नाही. ठराविक ठिकाणी अजूनही लोकांना कमळंच पाहिजेत. मुंबापुरी आणि नाशिक तीर्थक्षेत्री बोंबाबोंब झाल्ये. इकडे तर आपला "हात" धरून जायच्या ऐवजी लोकांनी सेनेच्या सरदाराचे धनुष्य धरणे पसंत केल्ये. रेल्वे तर फारच जोरात चालल्ये. आपल्याला कुठेच ठाण मांडून बसता आले नाहीये, उलट रेल्वेने कमळांवर न जाता त्यांना ठाण मांडू दिलेय. बागेतल्या निळ्या फुलांकडून खूप अपेक्षा असताना मात्र कमळेचा जास्त फुलून आल्याचं दिसतंय. धनुष्य-बाण घेऊन मुख्य सरदार खूप फोटो काढत आहेत.

मु.म.: आपण योग्य निर्णय घेतले होते, मॅडमनी योग्य वेळी "खेळात" गेम करणा-या माणसाला बाहेर काढले होते. पांढरी-टोपी गँगला पण गप्प केले होते, प्राणायाम करणा-या योगींना श्वास घेणे कठीण केले होते. तरी
असे का झाले याचे आश्चर्य वाटते.

मत्री: त्यात आश्चर्य काय? तिकडे उत्तरेकडील प्रदेशात नाही का, हत्ती दलावर केवढा विश्वास होता त्यांच्या सरदारणीनीचा, पण काय झाले? लोकांना ओबड-धोबड हत्ती पेक्षा "सायकल" ची सीट जास्त "मुलायम" वाटली
ना... अचानक सायकली अंगावर आल्याने हत्तींनाही पळावे लागले...

मु.म.: पुण्य-नगरीत मात्र अजूनही आपण आब राखून आहोत. मित्र-राष्ट्राच्या मदतीने का होईना! तसे तुमचे म्हणणेही बरोबर आहे, अजूनही काही सोसायट्यातले समान तसेच पडून आहे. पण ते चालायचेच, प्रयत्नांना
यश मिळाले. विकास कामांमागे आपलाच "हात" आहे असे वाटल्याने म्हणा किंवा काकासाहेब आणि दादांच्या प्रभावाने म्हणा, आपली स्तिथी चांगली आहे.

मंत्री: हो, हे बरोबर पण तरीही पगडीवाल्यांना आपल्या कर्तुत्वाची फळं भोगावी लागलीच. "महालात" आपले कर्तुत्व दाखवून आपली "लाल" करण्याचा प्रयत्न अंगाशी आला. आणि इथेही रेल्वेने जेरीस आणले, पण वाचलो.

मु.म.: तीर्थक्षेत्री मात्र पार वाट लागली. काकासाहेबांच्या प्रधानाच्या भुजांमधलं बळ कमी पडलं, तिथे रेल्वे चांगलीच घुसली. आत्ताच आलेल्या बातमीनुसार गणितं काही नीट जुळली नाही म्हणा किंवा कमळांनी तोंडं वळवली म्हणा, पण रेल्वेला कमळांची माळ पडली. निळी फुलं तर पार कोमेजून गेली. धनुष्यातले बाण म्यान झाले. "भुजां" मधलं "बळ" गेलं, लोकांना "हात" धरावासा वाटला नाही. आणि प्रथमच नवीन "राज"सत्ता स्थापन झाली!!!

मु.म.-मंत्री: अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार!!!!

2 comments:

  1. आमच्या संकेतस्थळाला ( इतिहासातील सत्याच्या मागावर ...) भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
    आपले लिखाणही चोख आहे. अलबत ! लेखणी अशीच कार्यरत ठेवा.
    अनेक शुभेच्छा !

    ReplyDelete