Monday, May 14, 2012

माझी भ्रमंती - किल्ले वासोटा ( भाग १ )

        मंगळवारी संध्याकाळी प्रणव चा मेसेज आला कि शनिवार-रविवारी वासोटा ट्रेक आहे, Organized by "युवाशक्ती". त्यावेळेपर्यंत फिक्स असलेला weekend चा program विनाविचार रद्द झाला आणि आदल्या दिवशी "शनिवारी 'काकस्पर्श' ला कोण येणार?" हा मित्रांना टाकलेला मेसेज सोयीस्कररीत्या बाजूला सारून "शनी-रविवारी वासोट्याला कोण येणार?" असा मेसेज टाकला. २-३ "नाही जमणार, या शनिवारी....." असे मेसेज आल्यावर बुधवारी सकाळी आमचे मित्र विशाल राठोड यांनी होकार भरला.
        २ दिवसांचा ट्रेक असल्याने झोपण्या/जेवण्या-खाण्याची व्यवस्था वगैरेची चौकशी आणि चर्चा करण्यासाठी Cowboy प्रणव मराठे यांना call केला. २ दिवसांत १० calls झाले त्यावर. माझ्याकडे sleeping bag नाही, trek-sack, trek-shoes नाहीत अश्या काही मुद्द्यांना चर्चेत घेतले. प्रणवकडच्या sleeping bag ने एक प्रश्न सुटला. Sack चा प्रश्न सिद्धेश च्या sack ने सोडवला. माझा Camera तितकासा effective नाही म्हणून "त्याहून ब-या" पण SLR नको, अश्या Camera ची व्यवस्था सचिन मुळे झाली.
        शुक्रवारी हापिसातून वेळेवर निघण्यात यश मिळवले, माफक प्रमाणात जेवून घेतले. रात्री ११ ला "युवाशक्ती" च्या कार्यालयात जायचे होते. राठोड साहेबांना १०:२० ला बालगंधर्व वरून घेऊन आलो आणि बरोब्बर ११ ला युवाशक्ती, नारायणपेठ, पुणे येथे पोचलो. दिलेल्या वेळेत पोचायचा गुन्हा याही वेळी घडला. मग थोडावेळ निरीक्षण केले. माझ्या ओळखीचा फक्त प्रणव आणि विशाल. १२:०५ ला युवाशक्ती ची बस आली आणि आम्ही वेळेवर आलो म्हणून पटकन सर्वांच्या आधी रुमाल टाकून चांगली जागा पटकवावी हा मनसुबा "आधी मुली जातील बस मधे" या हुकुमाने उधळला गेला. गाडी सुरु झाली आणि "प्रौढ-प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर राजाधिराज महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कि..... जय!", "हर हर.. महादेव!" अश्या घोषणा देऊन नारायण पेठेतून निघालो. "गोब्राह्मण प्रतिपालक" वगळला जाण्याची आधीच आलेली शंका सत्यात उतरली आणि त्या संबंधी विचारातच bag वगैरे adjust करून बसलो.
        आमच्या मागच्या सीट वर बसलेल्या मुलीचा आवाज माझ्यासारखाच मोठा होता. ती तिच्या मैत्रिणींना "तुम्ही काहीतरी बोला ना" असं मधे मधे सांगून, त्यांना बोलायची संधी न देता बडबड करत होती. आता मला जांभया यायला लागल्या होत्या, पण त्या मुलीच्या आवाजापुढे माझ्या जांभयांनी दिलेले संकेत मेंदू पर्यंत पोचून परत जात होते. मग शेवटी "शेजारच्या घरात ठणाणा करत लावलेला रेडीओ आपल्यासाठीच लावलाय" असं समजून वैताग घालवण्याचा पुलं च्या तत्वाचा वापर करून त्या मुलीच्या बोलण्यात रस घेऊ लागलो.
        ती लहानपणी पुण्यात कुठे रहात होती, तिच्या घरासमोर गाण्याच्या तालावर गणपतीत कारंजे कसे उडायचे, ते ती घरातून कसे बघायची, तिला कुठली गाणी आवडतात, ती  FM किती तास ऐकू शकते, तिला फाष्ट गाणीच आवडत होती तरीही आत्ता-आत्ता ती शांत गाणीही ऐकायला लागली आहे... हि आणि अशी अनेक माहिती मला मिळाली. तेवढ्यात खेड-शिवापूर चा टोल नाका आला आणि गाडी चहा प्यायला थांबली. कानांना आणि पायांना थोडा आराम मिळावा म्हणून खाली उतरलो. झोप लागण्याची शक्यताच मावळल्याने मोठ्या जोमाने माहिती-ग्रहणासाठी चहा मारला.
        आम्ही चहा पीत असताना ड्रायव्हर ने गाडी चालू करण्याचा २-३ वेळा प्रयत्न केला आणि गाडीचा मेंटेनंस नीट ठेवलेला नाही आणि गाडीला starting-problem आहे हे काही थोड्या लोकांच्या लक्षात आले. आम्ही गाडीत बसलो आणि गाडी आणखी बडबड लगेच सुरु झाली.
    आता त्या मुलीला कोणते पिक्चर आवडतात/नावडतात, कोणते नट-नटी आवडतात/नावडतात हे वर्णन आणि कारणासकट मला माहित झाले. ती एकदा तिच्या मैत्रीण आणि आज्जीबरोबर (होय, आज्जीच) हॉरर पिक्चर ला मल्टीप्लेक्स ला गेलेली, तेव्हा काय गम्मत झाली ते सांगू लागली, मीही सरसाहून बसलो.पिक्चर हाउसफुल होता आणि ते ४थ्या रांगेत बसले होते. १-२ वेळा ती आणि तिची मैत्रीण किंचाळली आणि आज्जी शांतच, हे ऐकून आधीच उत्पन्न झालेली चिंता आणखीनच वाढली. पण तिची आज्जी घाबरत नसल्याने ती ओरडली नाही हे update कळले आणि चिंता मिटली.
        भूतकाळातून हळू हळू ती वर्तमानकाळाकडे वळू लागली. तिचा गेल्या २ दिवसांचा कार्यक्रम नीट ऐकला. तिची बहिण, तिची admission, त्याची तयारी आणि त्रास अशी Family Info मिळाली. कसलेतरी बिल भरायचा शेवटचा दिवस उलटून गेलाय हे तिला आणि मला एकदम समजले.
        अश्या तिच्या सवयी आणि shopping विषयी आवडी-निवडी ऐकण्यात दंग असताना तिच्या मैत्रिणीने तिला shopping मधे काय आवडते ते सांगण्याचा प्रयत्न केला, अर्थातच तो फुकट गेला. बहुधा बाकीच्या आधीच झोपल्या असाव्यात.
        काहीही असेल पण जरा शांतता निर्माण झाली आणि जरा डुलकी लागली. मग सात-याच्या नाना चौकात उजवीकडे जायचे असताना ड्रायव्हर ने गाडी चुकून पुढे नेली आणि सगळ्यांना जाग आली. मग मागे घेऊन गाडी सरळ रस्त्याला लागली आणि मग मी सात-याचे वर्णन ऐकू लागलो. घाटात गाडी चढेनाशी झाली आणि नीट मार्गाला लागल्यावर ड्रायव्हर ने handbrake चा कसा वापर केला वगैरे ऐकू लागलो. पण श्रोता कोणीच नसल्याने १-२ वाक्यातच ते समजून घ्यावे लागले. बामणोली येईपर्यंत थोडा-थोडा झोपलो.
    ४:१५ ला बामणोली आले. ६:३० ला परत उठायचे असल्याने मी आणि प्रणव ने न झोपण्याचा निर्णय घेतला आणि गप्पा मारत बसलो. ८ ला न्याहारी वगैरे करून ८:१५ ला होडीत बसलो. कोयना backwater cross करून ९:१५ ला पलीकडे पोचलो. त्या दरम्याने बोटवाल्याने त्याचे नांव, तो रोज किती फे-या मारतो, लागणारे डिझेल, खर्च ई.ई. माहिती मला दिली.
        आम्ही ५० जण होतो त्यामुळे अजून ३ बोटी येत होत्या. त्यांची वाट बघत विश्रांती घेतली. तसंही बोटीच्या मशीनच्या आवाजाने कानाला विश्रांती मिळालेली नव्हतीच. बोटीवाल्या दादांनी आधीच दूरवरून वासोटा किल्ला दाखवला होताच, आता त्याच्याकडे कूच केली.

        आमच्या बोटीतल्या २ काकांकडे SLR होता, त्यांनी प्रत्येकी पन्नास पाऊणशे फोटो काढले होतेच, ते त्यांनी चालू ठेवले. 
सगळ्यांनी आपापले ग्रुप करून चालायला सुरुवात केली. मी, विशाल, प्रणव आणि त्याचा मित्र आर्चिस असा आमचा ग्रुप झाला होता. मी पण थोडे फोटोस घेत चाललो होतो. १-२ गवे पाणी प्यायला आलेले बघितले आणि मैदान सोडून आम्ही actual जंगलात प्रवेश केला. थोड्या वेळात Forest Office आले. तिथे युवाशक्ती वाले नेहमीचेच असल्याने परवानगी वगैरे लगेच मिळाली. आणि प्राणी दिसला तर त्याला घाबरवू नका, काय करा आणि काय नको या सूचना घेत जंगलात शिरू लागलो. लगेचच इथे गणपती आणि मारुती एकाच मंदिरात आपापली जागा शेअर करून राहतात, त्यांना क्यामेरात घेतले. 
तिथल्या प-ह्याचे काहीतरी काम चालू होते. काही जणांनी त्यांच्या रिकाम्या बाटल्या जवळच्या झ-यात भरून घेतल्या आणि चढायला सुरुवात केली.
आता मात्र कुठे थांबायचे नव्हते.
क्रमशः

2 comments:

  1. क्या बात है केळकर इतकं detailed निरीक्षण?, पण मस्त लिहीलय Keep it up!!!

    ReplyDelete