आमचा ग्रुप सोडला तर
आसपास कोणी मनुष्यप्राणी असण्याची शक्यताच नव्हती. सह्याद्रीच्या त्या कुशीत आम्ही
शिरलो. गजबजाटापासून कोसो दूर सुरेख चांदण्यात विसावलो. उद्या कुलंग वाट बघत होता. पहाटे चार-सव्वाचार च्या सुमारास जाग आली. torch लावली तर बाकीच्यांना
त्रास म्हणून तसाच पडून होतो. महत्वाची कामं उरकायची होती. पण कोणीच उठले नव्हते.
ही जागाही अडनिडी होती. एक तर उठताना कोणाच्यातरी तोंडावर पाय पडायचा म्हणून रिस्क
घेत नव्हतो. स्लीपिंग बॅग मधेच घुसून होतो. अचानक ग्रुप मधला कोणीतरी
torch लावून हातात पाण्याची
बाटली घेऊन वाट काढत रांगताना दिसला. मीही, बाटली काढून शिकारीसाठी तयार झालो. torch च्या प्रकाशात
"निवांत" जागा शोधली. तेवढ्यात torch च्या पट्ट्यांनी दगा दिला. ती पडली, नशिबाने विचार सोडून देण्याइतकी खाली नव्हती गेली, मग सरकत-सरकत जाऊन ती आणायचा कार्यक्रम झाला. शिकार
उरकल्यावर परत येऊन स्लीपिंग बॅग मधे घुसलो. एक चुटका काढून ६ च्या दरम्याने
बाकींना उठवले. WTA अजिबात आळस करत नव्हते, चुलीवर आधण ठेवले गेले. गरम मॅगी आणि वाफाळता कप मला
बोलावत होते, पण एका दगडावर ठिय्या
मांडून विको पावडर घेतली. तोंड धुवून मॅगी, चहा झाला. सगळे कुलंगसाठी तयार होतेच, ८ वाजत आले होते. आज वातावरण साफ होते. एका बाजूला
चंद्र आणि दुसरीकडे नुकताच कामाला लागलेला सूर्य होता. कुलंगला climbing वगैरे नसले तर वाट सोपी
नक्कीच नव्हती. अक्षरशः बसून बसून घसरावे सुद्धा लागत होते. बॅग मुळे आणखी कठीण
होत होते.
Risky
असा patch लगेचच आला. WTA वाल्यांनी निवडलेली ही
वाट आडवळणाची होती,
short-cut होता, ३ दिवसांचा ट्रेक दीड दिवसात करण्यासाठी अशाच वाटेने
जाणे भाग होते. झाड कसले, मिळेल
त्या काठीचा आधार घेत हा patch पार
पडला. सोपे काहीच नव्हते, पण
आधीच्यापेक्षा कमी रिस्की असा प्रवास चालू झाला. मदन केव्हाच मागे पडला होता.
नवरा-नवरीच्या सुळक्यालाही मागे टाकले. आता पायऱ्या चालू होणार होत्या. तिथूनच
उतरायचाही मार्ग होता म्हणून बॅग तिथेच ठेवल्या, सव्वा ९ झाले होते. पायऱ्या गाठल्या. कालचा पावसाळी
ट्रेक संपला होता. आता श्रावणानंतर एकदम वैशाख चालू झाला होता. पाणी संपत आले
होते. ते कुलंगवर मिळणार होते. पोहण्यासाठी वर 5 star swiming pool आमची वाट बघतोय हे माहित असल्याने कपड्याची पिशवी बरोबर
घेतली होती. खूप दम लागत होता. उंच-उंच पायऱ्या अजूनच दमछाक करत होत्या. मधे मधे
मागे वळून खालचे आपण किती उंचीवर आलो हे सुखावणारे दृश्य बघत होतो. लहान दरवाजा
लागला. एक गुहा, परत पायऱ्या. वरच्या
दरवाज्यात पोचलो. ४-५ पाण्याच्या टाक्यांनी आम्हाला बोलावून घेतले. मनसोक्त पाणी
प्यालो, बाटली भरून घेतली. तडक swimming tank कडे निघालो. मुली तिकडे
फिरकणार नसल्याने swimming
constume वर
पाण्यात उतरलो. वर भाजून निघत असलेलो पाण्यात मात्र चांगलेच कुडकुडलो. पाणी
कुत्र्यासारखं गार होतं.
वेळ जास्त नव्हता, तरीही थोडा सनबाथ घेऊन नवीन कपडे चढवले आणि गड
फिरायला निघालो. आता जाम फ्रेश वाटत होते. शीण निघून गेला होता. एक कोरडं टाकं आणि
त्यावर बांधलेलं धरणही दिसत होतं. एक मेलेलं गिधाडही पाहायला मिळालं. सगळ्यात उंच point वर पोचलो आणि परत आजोबा, सीतेचा पाळणा, मदन, अलंग, सांधण दरी, रतनगड, आदि सगळ्याचे दर्शन घेतले. मदन वरून ज्या वाटेने आलो
ती वाटही दिसत होती.
अजून बॅग ठेवल्या
तिथपर्यंत उतरायचे होते, तिथून
पुढे अडीच तास उतरायचे होते. वेळ न काढता निघालो, टाक्यावरच्या गणपतीचा निरोप घेऊन. माझा उजवा गुडघा
आता ओरडू लागला होता. वेग जास्ती नसला तरी न थांबता मी उतरत होतो. प्रसाद, प्रणव आणि एक जण पुढे होता, खूप जण मागे होते. धोकादायक आणि सुंदर अश्या वाटेवरून
खाली उतरत होतो. बॅग मात्र त्रास देत होती. कमी उंचीच्या माणसाला पायऱ्या उतरताना
नेहमीच त्रास होतो. त्यात त्या मातीवर पाय टिकत नव्हता. नशीब पाऊस नव्हता. मागचे
येण्यासाठी २ वेळा halt घेतला. आम्ही
कुलंगवाडीलही जाणार नव्हतो आणि भगतवाडीकडेही. भगतवाडी आणि आंबेवाडीच्या मधे एका
ठिकाणी आमची बस आम्हाला घेणार होती. शेवटच्या १० मिनिटाच्या अंतरावर एक हमखास
चुकण्याचे ठिकाण होते. ४ रस्ते तिथे एकत्र येतात. तिथे चुकले तर २ किमी डांबरी
रस्त्यावरून चालत यावे लागते. त्यासाठी तिथे व्यवस्थित खुण करून आम्ही नियोजित
स्थळी पोचलो. सावलीत अक्षरशः पसरलो. एक-एक करून सगळे येत होते. नीट खुणा करूनही २
जण चुकले. तरीही आम्ही वेळेत होतो. आंबेवाडीत गरम जेवण वाट बघतच होते. पोटात
आहुत्या दिल्या, अग्नी शांत झाला. पुणे आणि मुंबईच्या लोकांनी आपापल्या गाड्या धरल्या
आणि AMK, आंबेवाडीला टाटा करून
निघालो. रात्री उशिरा घरी पोचलो.
सोमवार फिदी फिदी हसत
माझ्याकडे बघत होता. कोणीच आमच्यासाठी थांबणार नव्हते, जगाच्या दृष्टीने आम्ही काहीच विशेष केले नव्हते. पण
एक समाधान मनावर होते. घडी करून ठेवलेली ती सगळी जळमटं आता मात्र उलगडली. तीच
पांघरून तो ट्रेककिडा शांत झोपी गेला, परत कधीतरी त्या कोषातून तात्पुरता का होईना, बाहेर येण्यासाठी!!!
मस्तच लिहिले आहेस
ReplyDelete