Sunday, March 22, 2015

माझी भ्रमंती - अलंग-मदन-कुलंग (AMK) Part I

                                                 तसा गेल्या वर्षभरात ट्रेक झाला नव्हता काही कौटुंबिक कारणामुळे. नाही म्हणायला दिवाळीत निर्लज्जपणे हरिहर-भास्करगड केले होते. बाकी ऑफिसच्या जिन्याच्या पायऱ्या सुद्धा चढत नव्हतो. ट्रेक किडा झोपला होता किंवा झोपवला होता. ऑफिस चे काम, deadlines, interview  drives, घरात वेळ द्यायचाय, रत्नागिरीला जायचंय, आणि कोणाकडे जायचंय अश्या जळमटांत अडकवून ठेवलेला किडा अचानक एका फोनने जागा झाला, सुबोध विचारत होता "AMK" ला येणार का? हे म्हणजे "आधीच हौस ..." त्यातली गत झाली. WTA group बरोबर जायचे होते 14-15 ला. सगळी जळमटं व्यवस्थित घडी करून बाजूला ठेवली. घरातून २ दिवसांची सुट्टी घेतली.
                                                 शिवाजीनगर वरून रात्री ११ ला निघालो. नाशिक फाट्याला २-३ जण join झाले. वाटेत एकदा चहा मारला आणि तडक AMK च्या पायथ्याचे आंबेवाडी हे गांव. साडेचार-पावणेपाच झाले होते. मुंबईकर आधीच येऊन पहुडले होते. आम्हीही तासभर तरी झोपू म्हणून एका घराच्या अंगणात पथाऱ्या पसरल्या. पण वातावरणाचा रंग काही वेगळाच होता. "शिंच्यांनो 'ब्राह्म' मुहूर्तावर जागं होण्याच्या वेळी झोपताय कसले?" असे अस्सल कोंकणी स्वरात सांगण्यासाठी काळे ढग जामा झाले आणि जोरदार वाऱ्याने त्यात होकार भरला. स्लीपिंग बॅग भिजणे परवडणारे नव्हते. त्याही कशाबश्या गुंडाळल्या. शाळेला तयार करताना जशी मुलाच्या डोळ्यावरची पूर्ण झोप गेल्यावरच आई शांत होते तसं आता वातावरण शांत झालं होतं. गांव केव्हाच जागं झालं होतं. गरम पोहे आहे, त्यावर चहा. तरतरीत झालो. दुपार आणि रात्रीचे जेवण गडावरच असल्याने त्याचे समान सगळ्यांना वाटण्यात आले. rappelling/climbing चे समान (sling, carabiners etc) प्रत्येकाचे प्रत्येकाजवळ देण्यात आले. सगळे मावळे तयार झाले आणि गडांकडे कूच केली. वातावरणाने परत रंग बदलून स्वागताची तयारी केली आणि आमचा रस्ता धुण्यासाठी पावसाचा शिडकावा चालू झाला. WTA च्या कार्यकर्त्यांनी कळसूबाई रांगेची माहिती दिली, आजोबा (आजागड), कळसूबाई, किरडा, श्रीकिरडा, नवरा-नवरी सुळके, अलंग, मदन, कुलंग यांचे दर्शन घेऊन चढायला सुरुवात केली. आत्तापर्यंत रणरणत्या उन्हात कच्ची करवंद खाल्ली होती, पण आत्ता पावसांत भिजत खात होतो. पाऊस थांबायचे नांव घेत नव्हता. तसे मी "हिवासाळा/उन्ह्साळा" चालू असल्याने पूर्ण रेनकोट बरोबर घेतला होता तो काढला. अर्थात तोपर्यंत बॅग जड होण्याएवढे पाणी त्यात गोळा झाले होतेच. समीर आणि प्रणव पुढे होते. एका वळणावर ते पुढे गेले आणि शेजारच्या जालावरून एक फुरसे शांतपणे येणाऱ्या आम्हा पाहुण्यांकडे निरखून बघत असलेले दिसले. इमानीत सगळ्यांना थांबवले. पावसामुळे बॅगेत ठेवलेला कॅमेरा बाहेर काढेपर्यंत डोळ्यातच त्याचे रूप साठवले. ते कॅमेरा conscious होते, पण एक फोटो मारलाच!


                                                 पावलं पटापट पडू लागली. वाट नक्कीच सोप्पी म्हणवी अशी नव्हती. पण येताना किमान ह्या वाटेवरून यायचे नव्हते हे माहित होते. गुहेत पोचलो, इथून अलंग-मदन च्या वाटा वेगळ्या होतात. लगेच चुलीची तयारी चालू झाली. ९ वाजले होते. चिवडा, बिस्किटे, पाणी बाहेर पडले. देवाण-घेवाण झाली.  rappelling/climbing चे साहित्य चढवून झाले. आयुष्यात प्रथमच अशी साधने वापरणार होतो. पण ते कसे वापरायचे ते वेळीच कळणार होते. पुणेवाले मदन आणि मुंबईवाले अलंगकडे निघाले. सगळ्या वाटा डोंगराच्या कापरीतूनच एका बाजूला दरी ठेऊन जायच्या होत्या. रात्रीच्या मुक्कामाकडे जायच्या वाटेत आमच्या बॅगा ठेवल्या. मदनच्या Rock patch कडे जायच्या पायऱ्या अप्रतिम होत्या.


                                                
                                                Rock Patch जवळ पोचलो. पावसाने Patch निसरडा झाला होता. प्रसादला रोप लावण्यासाठी चढायचे होते. २-३ प्रयत्न झाले. मग सरळ शूज काढून तो चढला. एका बाजूला पूर्ण दरी! पण त्याच्या प्रशिक्षण, सराव आणि आत्मविश्वासामुळे तो चढला. माझ्याआधी प्रणव आणि सम्या होते, पण वरून "हलक्या माणसाला" आधी पाठवा असा हुकुम आला, सर्वानुमते मलाच पुढे करण्यात आले. माझ्यासकट बहुतेक जणांचे पहिलेच climbing असल्याने भीती होतीच. जरा तोल गेला तर खाली दरी आ वासून होतीच. अर्थात, दोरी बांधलेली होती, पण कोणी ओढून घेणार नव्हते, patch आपल्या आपणच दगडातल्या खाचा शोधत चढायचा होता. climbing ला सुरुवात केली. खडक ओला होता. पाय सरत होता. माझी उंची कमी असल्याने होल्ड पर्यंत हात पोहोचवायला ताण पडत होता. पण जमले. 


प्रसाद पर्यंत पोचलो. मग समीरचा नंबर. प्रसाद बरोबर मीही दोरी धरली. तोही वर आला, एक-एक करून सगळे आले. ह्यात तास गेला. आता मदनवर निघालो. त्यावरून अलंगचे पठार सुंदर दिसत होते.
                                                ३ वाजून गेले होते. सुरुवातीचा patch दोरी फारशी न धरताच चढला. पुढे ६०-६५ फुटाचा उभा कातळ वाट बघतच होता. त्यावर आंबेवाडीतल्या कैलासने आधीच रोप लावलेला होता. तो सरसर चढला आणि दोरी धरून थांबला. ह्यावेळी फोटोसाठी मला खाली थांबायचे होते. पण वरून परत हुकुम आला, "हलका माणूस"! मग काय, हा हलका माणूस मान डोलवत कातळाला चिकटला. एकदा दोरी धरली की कैलास ओढूनच वर घेतो, मग rock patch चढल्याचे thrill मिळतच नाही, म्हणून खालून-वरून मिळणाऱ्या होल्डसाठीच्या सूचनांकडे लक्ष ठेवत दोरी न धरताच चढत होतो. मदनच्या तुलनेत हा चांगलाच वाळलेला होता. होल्डही बरे होते. अर्थात अर्ध्यापर्यंतच. नंतरचा कठीण होताच. पण चढलो. मग कैलास बरोबर दोरी धरून, चढणाऱ्याना सूचना, फोटो आणि प्रोत्साहन. सुबोध, सम्या, प्रशांत आणि प्रणव सगळे आले. ४ वाजले होते. ५ चे परतीचे target होते. fast निघालो. कोरीव गुहा बघितल्या, फोटो झाले. पाणी होते, पण अधिक चांगल्या पाण्याच्या शोधार्थ निघालो. ह्यावर एकच टाके दिसले. वेळेत परत यायचे होते, ते पाणी भरले, पिऊन घेतले आणि परतीचा मार्ग धरला. त्यावेळी काही जण वर येत होते. वर येताना जास्त कठीण न वाटणाऱ्या पायऱ्या आता भीतीदायक वाटत होत्या. समोर दरी दिसत होतीच. पण उतरलो. एकदा rappelling झाले होतेच. तुलनेने वाढलेल्या आत्मविश्वासाने पटपट उतरलो. नंतरचा छोटासा patch एकटाच rappelling karat उतरलो. अंधार होण्याच्या आत झोपायच्या गुहेकडे पोचायचे होते. बॅगा उचलल्या, झपझप चालत गुहेत पोचलो. WTA मधल्या पल्लवी आदि मुलींनी चुलीची तयारी चालू केलीच होती. जागा मात्र फारच congested होती. उंची फारच कमी होती, मलाही उभे राहता येणार नव्हते. पण पाऊस आला तरी काही problem होणार नव्हता. ७ वाजत आले होते. गप्पा सुरु झाल्या, झोपायच्या जागा पकडून ठेवल्या. रात्री गरमागरम सूप तयार झाले, त्यानंतर बिर्याणी! अति हाव न करता जेवण केले. सकाळी वाघ मारायला जागा सापडणे कठीण होणार होते.

1 comment: