ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर बहुतांशी Netherlands ला असल्याने ट्रेक चुकले होते. युरोपात नवीन देश आणि शहरं पहात असलो तरी एक कान आणि डोळा सह्याद्रीकडे होता. त्यातून WhatsApp आणि फेसबुक इतर ट्रेकर्सनी केलेले ट्रेक दाखवून त्यावर मीठ शिंपडत होतं. आधीचे ट्रेक मित्र एक तर संसारात व्यस्त आहेत आणि काही जण आपापले Trek groups काढून त्यात गुंतलेले आहेत. पण ट्रेकप्रेमी मात्र कमी नाहीत आणि हक्काने फोन करावा असे नंबरपण शाबूत आहेत. तसंही भारतात आल्यावर मालवणची एक कौटुंबिक मोहीम काढून झाली होती आणि 2 तारीख मोकळीच होती, ट्रेकसाठी खडा टाकून ठेवलेलाच होता. न राहवून विनीतला फोन केला. अगदी त्याच्याही मनात 2 तारखेचा काहीतरी प्लॅन शिजतच होता.
|
किल्ले मोहनदर उर्फ शिडका |
आता माझ्यासारख्या नवख्या ट्रेकवेड्याला ह्या मातब्बर ट्रेकर्स बरोबर जायला मिळते तेव्हा "ट्रेकसाठीची जागा" हा मुद्दा फारसा महत्वाचा ठरत नाही, कारण त्यांच्याबरोबर कुठेही जाणार असलो तर माझ्यासाठी सगळे नवीनच असते. ह्यावेळीही नाशिकमधल्या वणी जवळच्या किल्ले मोहनदर (शिडका) आणि कण्हेरगडचे नियोजन त्याच्या डोक्यात होते. सुदैवाने त्याने अजून प्लॅन जाहीर न केल्याने मला जागा नक्की मिळणार होती. शनिवारी रात्री निघून रविवारी परत. असा साधा प्लॅन होता. हापिसात शुक्रवार पर्यंतचा वेळ कसाबसा काढला. शनिवारी घरातली काही कामं पण आटपून घेतली. संध्याकाळी नेहमीचीच तयारी केली आणि सव्वा आठ ला घराबाहेर पडलो. गिरीश कुलकर्णी ह्यांची भेट घेऊन आम्ही बरोब्बर 9:25 ला विनीतच्या घरी पोचलो. 2-4 मिनिटातच सचिन जगताप आला आणि ठरल्याप्रमाणे साडेनऊला तिथून निघालो. वाटेत भूषणला घेतले आणि मध्यरात्री मसाला दूध न विसरता घेऊन पहाटे पावणे 3 ला मोहनदर गावात अगदी ग्रामपंचायतीसमोर पोचलो. मस्तपैकी जाळीच्या compound मध्ये ग्रामपंचायतीच्या आवारात तंबू टाकला आणि 3 ला झोपलो सुद्धा. 5 ला तशीही जाग यायला लागली पण सध्या उशिरापर्यंत अंधार असल्याने थोडा वेळ पडून राहिलो आणि साडेपाच नंतर उठलो. गांव तसं जागं झालेलंच असतं ह्यावेळी. त्यातून आमच्यासारखे असे अचानक उगवलेले नवीन प्राणी म्हणजे गावातल्या लोकांसाठी जरासे कुतूहल असते. त्यामुळे बादलीभर पाणी मिळणे काही अवघड गेले नाही. दंत-मार्जन आणि वाघ-ससे मारण्याचे कार्यक्रम लगेचच सगळ्यांनी उरकून घेतलंनी. रात्री लक्षात न आलेला मोहनदर किल्ला त्याचा प्रचंड भिंतीरूपी फणा काढून आमच्या डोक्यावरच होता. त्यातून ह्या किल्ल्याला प्रचंड असं नेढं आहे. जणूकाही त्याचा डोळाच.
|
नेढं |
ह्याची आख्यायिका आहे. जेव्हा सप्तशृंगी माता आणि महिषासुर यांचं युध्द झालं, तेव्हा महिषासुर रेडयाच्या शरीरात लपून बसला होता. जेव्हा देवीला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने रेडयाचा शिरच्छेद केला. त्यातून महिषासुर अतिशय जोराने बाहेर पडला आणि त्याने डोंगराला धडक दिली. त्यामुळे देवीच्या मंदिरासमोरच्या डोंगरात हे खिंडार पडलं. ह्याबाबत अजून एक वेगळी आख्यायिकाही ऐकायला मिळते. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. त्यावेळी महिषासुर मात्र रेड्याच्या रुपात पळाला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला आणि या डोंगराच्या मागे लपून बसला. तेव्हा त्याच्या पाठलाग करत आलेल्या देवीने या डोंगराला जोरात लाथ मारली आणि हे नेढ तयार झालं. हे नेढं ह्याच आख्यायिकेमुळे "देवीचा पाय" म्हणून प्रसिद्ध आहे. वणीला येणाऱ्या असंख्य भक्तांपैकी बहुतेकांना देवीचा पाय असलेला हा डोंगर, हा किल्ला आहे ह्याची कल्पनाही नाही. पिंपळा उर्फ कंडाळा किल्ल्याला तर सह्याद्रीतलं सगळ्यात मोठं नेढं मिरावायचा मान मिळालेला आहे त्यामागेही एक आख्यायिका आहे.
पिंपळा आणि धोडपच्या मोहिमेत त्याचा उल्लेख केलेला होता. ह्या मोहनदर उर्फ शिडका किल्ल्याचे नेढे त्याच्यापेक्षा लहान असले तरी ह्याचे सौंदर्य काही कमी नाही.
ह्या किल्ल्याची माहिती आमच्याकडे अश्याच ट्रेकवेड्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवल्याने मोबाईलमध्ये हजर होती, तरीही ग्रामपंचायतीसमोरच्या घरात चौकशी केली. गडाकडे तोंड केल्यास उजवीकडून डावीकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे गडाची भिंत थोडीशी निमुळती होताना दिसते. इथे पश्चिम टोकाजवळ हे नेढे स्पष्ट दिसते. ह्या गडाच्या आधी समोरच कमी उंचीचे एक टेकाड आहे. गडाच्या भिंतीतून निखळून घरंगळत खाली आलेले काही मोठे दगड इथे वाटेत अडलेले दिसतात. गडावर जायची एक वाट इथून सरळ वर नेढ्याकडे जाते तर दुसरी वाट गड डावीकडे ठेवत समोरच्या टेकडाला उजवीकडून वळसा मारत एका खिंडीत जाते. समोरची वाट खडी, जवळची आहे परंतु नेढ्याजवळ भिंतीला धरून असलेला कातळ-टप्पा तितकासा सोपा नाही. आम्ही वळसा मारून जायचे ठरवले. गडाकडे चालायला सुरुवात केल्यावर घरं ओलांडल्यावर जवळच समोर असाच एक घरंगळत आलेला खडक आहे. तिथून उजवीकडे वाट अगदी स्पष्ट आहे. ह्याच वाटेने गावातले गुराखी आपापली गुरे घेऊन गडावर जातात. गड आणि टेकाड डावीकडे ठेवत वळसा मारला कि झुडुपातून वाट टेकाडाच्या मागे जाते. वाटेतून मागे वळून बघितल्यास समोरच उजवीकडच्या बाजूला सप्तशृंगीगड अगदी उठून दिसतो तर जरासे डावीकडे मार्कंड्या त्याच्या ठराविक अश्या आकारात उभा दिसतो. त्याच्याही डावीकडे पाहत गेल्यास धोडप किल्ला त्याच्या शेंडीमुळे अतिशय उठून दिसतो. वातावरण धुरकट असले तरी सुदैवाने त्या शेंडीमागून येणारा सूर्य मात्र धोडपचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. मागे आल्यावर डावीकडे ज्याला आपण वळसा मारून आलो तो किल्ला आणि उजवीकडे त्याच्या शेजारचा डोंगर दिसतो. दोघांच्या मध्ये असलेली खिंड हा आपला पुढचा टप्पा डोळ्यासमोर ठेवायचा. ह्या खिंडीकडे रस्ता मात्र सरळ वर न जाता किल्ला डावीकडे ठेवत उजवीकडच्या बाजूला जात वरती जातो. वाट निसरडी आहे पण वाढलेल्या गवताच्या काडीचा आधार पुरतो. खिंडीत गेल्यावर समोर दरी दिसते, उजवीकडे डोंगर तर डावीकडे गडाचे अवशेष दिसायला लागतात. तुटक्या अवशेषात असू शकेल असा बुरुज, तुटकी तटबंदी दिसते. 2 वाटा फुटलेल्या दिसल्या तरी ह्या दोन्ही वाटा वर गडावरच घेऊन जातात.
|
सप्तशृंगी देवीचा गड, मार्कंड्या, डावीकडे मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे गडप झालेलाधोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण. |
आपण डावीकडून वरती गेलो तर तटबंदीचे अवशेष ओलांडत एका सपाटीवर येऊन पोचतो. इथे उजवीकडे 2 टाकी दिसतात. पाणी भरपूर असले तरी पिण्यायोग्य राहिलेले नाही. डावीकडे चालत गेल्यास गडाच्या पूर्व टोकाला येतो. इथे काहीही अवशेष नसले तरी अप्रतिम दृष्य बघायला मिळते. खाली मोहनदर गाव, उजवीकडे आश्रमशाळा तर समोर वरती प्रचंड डोंगर. त्याच्या मागे उजवीकडे सप्तशृंगी देवीचा गड, डावीकडे मार्कंड्या, मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे धोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण. हे मोहून टाकणारे दृष्य डोळ्यात, कॅमेरात साठवले कि मागे बघताच विस्तीर्ण असा मोहनदर उर्फ शिडका पश्चिम टोकाकडून आपल्या नेढेरुपी डोळ्याने आपल्याकडे पाहतोय असेच वाटते. आता मागे फिरून पश्चिम टोकाकडे जात जात उरलेले अवशेष पाहून घ्यावे. ह्यात अजून पाणी असलेली आणि कोरडी अशी टाकी बघायला मिळतात. पश्चिम टोकाकडून परत येत असताना डाव्या हाताला खाली दरीच्या बाजूला गड आणि बाजूचा डोंगर ह्यांना जोडणारी अर्धवट अशी तटबंदी दिसते, त्यात एक बुरुजही दिसतो. अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण होते. गडावर साधारण 8-10 कोरडी/पाण्याने भरलेली तर काही बुजत आलेली टाकी आहेत. परत आल्या वाटेने खिंडीत पोहचायचे. आता डावीकडे गड आणि उजवीकडे डोंगर असे उभे राहिल्यास समोर दरीकडे तोंड करून समोर झाडीतून खाली उतरायचे. वाट तशी बऱ्यापैकी आहे. वरून पाहिलेली अर्धवट तटबंदी आणि बुरुज उजवीकडे दिसतात. इथे अजूनही एक बुरुज असावा आणि गडाचे दार असावे असे वाटते. इथून त्याच वाटेने डावीकडे जात राहिल्यास आपण साधारण 15 मिनिटात नेढ्याच्या खाली येऊन पोचतो. दगडातल्या खाचा नीट बघत ह्या नेढ्यात येऊन अंगावर वारे घेत बसायचे. इथून पलीकडे उतरून गावात जायला वाट आहे. पण त्यासाठी साधारण 10 फुटाचा कातळटप्पा उतरावा लागतो. ह्यासाठी चांगल्या प्रतीचे (म्हणजे महागातले नव्हे) बूट आणि आत्मविश्वास असायला हवा. रोप असल्यास उत्तम.
गावात परत आलो तेव्हा 11 वाजत आले होते, त्यातून गावकऱ्यांचा चहाचा आग्रह मोडवेना. मग त्यांच्याशी गप्पा मारत अजून वेळ गेला. पण त्यांच्या त्या आपुलकीने मूड अजून फ्रेश होतो. आम्ही अपरात्री अचानक प्रकटतो काय, कोणाच्याही दारावर टकटक न करता तंबू टाकून झोपतो काय, सकाळीही कोणाला त्रास नाही, आवाज, आरडा-ओरडा नाही, रात्री राहिलो तरी कुठे कचरा नाही ह्याचे त्यांना अप्रूप होते.
ओंकार तुझे ट्रेकतर भारीच असतात, पण तुझे लेख खूपच छान आहेत.तुझी लेखनशैली चांगली आहे.साप्ताहीक सकाळला प्रत्यक्ष जाऊन तुझे फोटोज व लेख दाखव.नक्की तुझे लेख छापतील.तुझ्यातल्या चांगल्या लेखकाला प्रकट होऊ दे.अभिनंदन!
ReplyDeleteधन्यवाद काका !!
Delete