दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली ती समस्त भटक्या लोकांचे दैवत गो. नि. दांडेकर यांच्या जन्मस्थानी, अमरावतीतील परतवाडा या गावी. नेहमीप्रमाणे आजचेही नियोजन अगदी tight schedule मध्ये, म्हणजे विनीत दाते styleमध्येच होते. म्हणजे ना कमी ना जास्त वेळ. त्यातून त्याला यावेळी चिले सरांच्या पुस्तकाबरोबरच, डॉ. जयंत वडतकर सर यांचेही पुस्तक आणि फोनवरून मार्गदर्शन मिळाले होते.
आजच्या भटकंतीत सुरुवात होती अचलपूर इथल्या नगरकोट पासून. पण त्या आधी बघायचं होतं हौजकटौरा, सुलतानाची गढी आणि कबरस्तान!
सकाळी साडेसहा वाजता चक्क आंघोळीसकट सगळं आटपून सहाही जण तयार होतो. आम्हाला आजच्या भटकंतीचा साथीदार म्हणून ते सगळं दाखवण्यासाठी लाभला होता डॉक्टर वडतकर यांच्याबरोबर ज्याने काम केलं आहे, तो मनिष ढाकुलकर. हा माणूस आमच्यासाठी चक्क साडेसहाला त्या थंडीतही हजर झाला होता. पहिला टप्पा होता सुलतानाची गढी. परतवाडा वरून अमरावतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हरम-टलवार व अचलपुर फाटा लागतो इथून उजवीकडे अचलपूरच्या बाजूला वळायचे आणि "सापन" नदी ओलांडण्यासाठी बांधलेल्या पुलावर पोहोचायचे. इथे डावीकडे थोड्या अंतरावर दोन बुरुज असलेली ही गढी दिसते. सुलतानपुराकडे जाणाऱ्या वाटेजवळच्या पायवाटेने गढीजवळ पोचायचे. बरीच पडझड झालेली असली, तरी मोठा पश्चिमाभिमुख दरवाजा चांगला शाबूत आहे. हा दरवाजा पूर्णतः लाकडी असून त्यावर अणकुचीदार खिळेही आहेत. आतमध्ये उजवीकडे एक बुरूज आहे आणि त्यापलीकडे डावीकडे प्रचंड मोठे गोलाकार मैदान आहे. आता झाडी वाढल्याने त्यावर फिरता येत नाही. समोर आणि डावीकडे मिळून "L" आकारात तटबंदी असून त्यावर जाता येते. त्याच्या पलीकडे नदी असून, पाणी वाहत असताना तिथून दिसणारे दृष्य नक्कीच मनमोहक असेल. तटबंदीवर बाहेरच्या बाजूने डावीकडे असलेल्या बुरुजावर जाता येते आणि तिथून उजवीकडचा बुरुज सुद्धा व्यवस्थितपणे बघता येऊ शकतो. या गडाचे संपूर्ण बांधकाम भाजीव विटांचे असून अत्यंत मजबूत आहे.
पुढचा टप्पा होता "हौजकटोरा". सुलतानाची गढी बघून त्याच रस्त्याने पुढे जावे आणि रस्ता संपल्यावर उजवीकडे वळून साळेबाद किंवा खानापूर/भिनखेडा कडे जायला डावीकडे फाटा आहे तिथे वळावे. साधारण दोन-तीन किलोमीटरवर आजूबाजूला केळीच्या बागातून जाणाऱ्या रस्त्याने गेल्यावर डावीकडे रस्त्याला लागूनच एका तळ्यात ही अष्टकोनी इमारत उभी आहे. तळे साधारणपणे कोरडे असते. इमारत तीन मजली असून तळ्यात पूर्ण पाणी भरल्यास तळमजला पूर्णपणे पाण्यातच राहील असा आहे. कदाचित त्यामुळेच तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी पायर्या नाहीयेत. ही इमारत म्हणजे इमादशाहीत बांधण्यात आलेली एक सुंदर कलाकृती आहे. बहुतेक ही इमारत जलक्रीडा करण्यासाठी बांधलेली असावी आणि त्यावरूनच त्यांची श्रीमंती लक्षात येते. तळमजला व पहिला मजला हे पुर्णपणे दगडी बांधकाम असून असून दुसरा मजला मात्र विटांनी बांधण्यात आलेला आहे. प्रत्येक मजल्याला प्रत्येक कोनात एक, असे आठ दरवाजे असून इमारतीतील नक्षीकाम बघण्यासारखे आहे. पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला मात्र पायर्या आहेत.
ह्या वास्तूंच्या मार्गावर आपण एक रेल्वेचा मार्ग ओलांडून जातो तो आहे भारतातील एकमेव खाजगी रेल्वेचा. शकुंतला रेल्वे.
अचलपूरच्या नगरकोटाचाच एक भाग असलेले समरसपुऱ्यातील नवाबांचे कबरस्तान (बेबहा बाग) हा पुढचा टप्पा होता. खरं तर कबरस्तान काही बघण्यासारखी जागा थोडीच असते? पण हे नवाब, शाही लोकांचे होते त्यामुळे कबरस्तान सुद्धा शाही असेच आहे. त्याच्या प्रवेशस्थानी सुंदर नक्षीकाम असलेला मजबूत दरवाजा असून त्यात लाकडी दार आहे. वरती मध्यभागी फारसीमध्ये लेख लिहिलेला असून दरवाजावरती मोर आणि इतर काही प्राणी कोरलेले आहेत. दरवाजा शेजारी घुमट असलेली एक इमारत असून त्याच्या आतमध्येही एक लेख कोरलेला आहे. आतमध्ये एक विहिरही आहे.
अचलपूरचे भव्य आणि मजबूत दरवाजे |
आता मात्र बघायचा होता मुख्य किल्ला, एलीचपुर अर्थात अचलपूरचा. अचलपूर हे जवळ जवळ 100 वर्ष वऱ्हाड प्रांताची राजधानी होते, त्यावरूनच ह्या किल्ल्याचे महत्व लक्षात येईल. हे नगर वसवले ते जैन धर्मीय "ईल" नावाच्या राजाने, म्हणून "एलीचपुर" आणि पुढे अचलपूर. कित्येक सत्ता ह्या नगराने अनुभवल्या. हा किल्ला म्हणजे पूर्ण नगर असल्याने त्यात 50 च्या वर वस्त्या होत्या. आजही इथे 35 एक "पुरे" आहेत. परकोट हा तब्बल 5 किमी लांबीचा असून किल्ला फिरणे म्हणजे गाव फिरणेच आहे. ह्याला 6 मोठे, महत्वाचे दरवाजे असून त्यातून रस्ते काढून रोजची वाहतूक सुरु आहे.
वेगेवगळ्या बांधणीचे अप्रतिम बुरुज |
प्रत्येक दरवाजाचे बांधकाम अप्रतिम असून बुरुज तर खास वेळ काढून बघावेत असेच आहेत. एक दरवाजा तर जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रवेशद्वार आहे. 4 दरवाजांना तर दोन्ही बाजूला सुंदर मजबूत बुरुज असून लाल किल्ल्याची आठवण नक्कीच होते. दूल्हा, बुंदेलपुरा, जीवनपुरा, खिडकी, माळीपुरा (तोंडगाव?) व हिरापुर दरवाजा अशी ह्या दरवाजाची नांवे आहेत. काही ठिकाणी पर्शियन भाषेत सुंदर लेख कोरलेले आहेत. तब्बल 30-35 शिलालेख इथे आहेत, परंतु सगळे दरवाजे, बुरुज, लेख, अवशेष बघणे हे माहितगार आणि स्वतःचे वाहन किंवा रिक्षा असल्याशिवाय शक्य नाही. आमच्या बरोबर असलेल्या मनीषमुळे आम्हाला हे पाहणे सोपे झाले. बुरुज आणि दरवाजा बरोबरच अनेक थडगी, मशिदी, लेख, पाण्याची व्यवस्था, दर्गे आणि बालाजी व श्रीरामाचे मंदिर अश्या अनेक गोष्टींनी हा किल्ला समृद्ध आहे. बुरुज तर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्या आणि पाकळ्यांमुळे खास असेच आहेत.
दुर्दैव एकच, कि अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या ह्या किल्ल्याबरोबरच इतरही कलाकृतींची जपणूक मात्र नीट झालेली नाही. काही स्थानिक लोकांना त्याची किंमत आणि काळजी असल्याचे जाणवले तरीही बहुतांशी लोकांना अनास्था असल्याने ह्या कलाकृतींचा ऱ्हास होत आहे.
No comments:
Post a Comment