गाविलगड |
विदर्भाची तब्बल शंभर वर्षाची राजधानी
असा मान बाळगून असलेल्या अचलपूरच्या नगरकोटानंतर आता बघायचा होता गाविलगड.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नावाच्या
अत्यंत प्रसिद्ध अशा थंड हवेच्या ठिकाणी गाविलगड हा किल्ला आहे. चिखलदरा आणि
गाविलगड या दोन्ही नावांची व्युत्पत्ती तशी गंमतीशीर आहे. पांडव अज्ञातवासात
असतांना भिमाने किचकाचा वध या ठिकाणी करून त्याला दरीत फेकून दिले त्यामुळे याच
नाव किचकदरा नाव असे पडले. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन ते चिखलदरा असे झाले.
तर मूळ मातीचा हा किल्ला बाराव्या शतकात यादवांनी म्हणजेच गवळी राजांनी बांधला
म्हणून त्याचे नाव गाविलगड असे असे पडले.
बाराव्या शतकातील याच्या जन्मानंतरचा
इतिहास अगदी इंग्रजांपर्यंत येऊन थांबतो. मातीचा किल्ला दगडी करण्याचं काम बहामनी
राजा (नववा) अहमद अली याने ई.स. १४२५ ला केले. पुढे इमादशाहीचा मूळ पुरूष
फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने किल्ल्याची दुरुस्ती आणि विस्तार करून ह्यावर
इमादशाहीची स्थापना केली. कालांतराने हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर मुगल
साम्राज्य-निजामशाही आणि परत मुघल साम्राज्य, असा त्याचा प्रवास झाला. रघुजी
भोसल्यांनी जिंकून घेतलेला किल्ला निजामांनी काही काळासाठी परत ताब्यात घेतला
परंतु भोसल्यांनी तो पुन्हा जिंकून आपल्याकडेच राखला. भोसल्यांनीच या किल्ल्याला
भव्य असा परकोट बांधला. परत इंग्रज-भोसले असा प्रवास करून हा किल्ला इंग्रजांकडे स्थिरावला.
गड जिंकलेल्या प्रत्येकाने त्याची डागडुजी आणि वाढ केली.
या गाविलगडाचे गारुड बहामनी सत्ता, इमादशाही,
निजामशाही, भोसले आणि इंग्रज या सगळ्यांना पडले यावरूनच त्याचे महत्त्व लक्षात
येते. हेच गारुड पुढे दुर्ग भटक्यांना न पडले तरच नवल. असा हा किल्ला पर्यटकांच्या
दृष्टीने दुर्लक्षित नसला तरी उपेक्षित म्हणायला हरकत नाही. कारण प्रचंड मोठा
असलेला हा किल्ला संपूर्ण बघण्यासाठी लागणारी तंगडतोड करण्याची ईच्छा/तयारी अनेकांची
नसावी किंवा कदाचित कमी असलेला वेळ हेही कारण असू शकेल. आम्हाला मात्र हा किल्ला संपूर्ण
बघायचा होता आणि तोही खूप कमी वेळात म्हणजे साधारण पाच तासात, कारण पुढच्या
मुक्कामाला आम्हाला जायचे होते जिल्पी-अमनेर या किल्ल्याजवळच्या कोणत्याही ठिकाणी.
या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या “सिमाडोह”
पर्यंतचा जवळचा रस्ता मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जात असल्याने संध्याकाळी बरोबर
सहा वाजता त्याचे फाटक बंद केले जाते. तसाही जवळपास सगळाच रस्ता या मेळघाट
प्रकल्पातून जात असल्याने उशीर करणे चालले नसते. या सगळ्यामुळेच आम्ही एक
स्ट्रॅटेजी बनवली होती. किल्ल्याची माहिती आणि नकाशा आम्ही बाळगून होतोच. विनीत
माहिती वाचून काय बघायचे ते सांगणार आणि मी नकाशा बघून ते ठिकाण कुठे असेल ते. मग
सगळे मिळून ते ठिकाण शोधायचे. गड विस्ताराने प्रचंड मोठा असल्याने आणि
पाहण्यासारखी खूप ठिकाणे असल्याने असे करावेच लागणार होते.
गाडी पार्किंगला लावून या मोहिमेला
सुरुवात साधारण साडेबारा वाजता झाली. लांबूनच गडाची तटबंदी, दरवाजा दिसतात आणि
त्याचे सौंदर्य मोहून टाकते. लांबूनच मछली दरवाजा हे गडाचे प्रवेशद्वार दिसते. या दरवाजाच्या
इथे पोचायच्या आधीच उजवीकडे मछली तलाव दिसतो, तर त्याच्याच वरती दिसतो चांदणी बुरुज.
मछली दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे भक्कम तटबंदी असलेल्या प्रशस्त रस्त्यावरून
आपण वीरभान किंवा बुरुज-बंद नावाच्या दरवाजाकडे पोचतो. हा दरवाजा दोन्ही बाजूंनी भक्कम बुरुजांनी
संरक्षित केलेला आहे. तिथे आतमध्ये आल्यावर दिसणारी एक मोठी वाट डावीकडे पुढल्या
दरवाजाकडे जाते. परंतु उजवीकडील भाग राहून न जावा यासाठी आधी उजवीकडे जायचं. इकडे
पर्यटक फारसे फिरकत नाहीत, परंतु किमान चार-पाच तरी बुरुज ह्या वाटेवर असून ही वाट
पुढे मोझरी दरवाज्याकडे जाते. मछली आणि चांदणी बुरुज ओलांडल्यावर मोझरी दरवाजा
लागतो. या बाजूला पाहण्यासारखे खूप अवशेष आहेत. नीट लक्ष देऊन पाहिल्यास या
वाटेत एक शिवलिंग आणि एक नाथपंथीय समाधीही दिसते. हे सर्व अवशेष परकोटाचे असून
भक्कम दुहेरी तटबंदी भोसल्यांनी बांधलेली आहे. मछली बुरुजावरुन समोर खालच्या
बाजूला मछली तलाव, तर समोर चिखलदरा असे अप्रतिम दृश्य दिसते.
वाटेवर ठेवलेले हत्ती आणि शरभ शिल्प |
इथून पुढे जायला वाट नाही. परत मागे
फिरून सरळ वीरभान दरवाजाकडे यावे लागते. आता डावीकडे जाणार्या रस्त्यावरून पुढे निघाल्यास
जवळ शरभ व हत्तीचे शिल्प असणारे दगड आणून ठेवलेले दिसतात. या वाटेने पुढे जाताना
डावीकडे तेलिया बुरुज, दर्या तलाव, तर एक बांधीव चौकीही दिसते. साधारण पंधरा ते
वीस मिनिटात अप्रतिम कलाकृती असलेल्या शार्दुल नावाच्या दरवाजाजवळ आपण पोचतो.
शार्दुल दरवाजा |
हा दरवाजा या गडाचा एक उत्कृष्ट दागिना
आहे. आपल्या सौंदर्याने तो प्रत्येकाला तिथे नक्कीच खिळवून ठेवतो. फत्तेउल्ला इमाद
उलमुल्क याने या दरवाजाची बांधणी केली. त्यासाठी त्याच्या सौंदर्यदृष्टीचे कौतुक
करावे तेवढे थोडेच. अत्यंत मजबूत बांधणीचा हा दरवाजा प्रशस्त असून कमानीच्या
उजव्या व डाव्या बाजूला दोन कमळे कोरलेली आहेत. मध्यभागी इस्लामिक चिन्ह असलेले
मोठ्या आकाराचे खजुराचे झाड आहे. हे चित्र सुबक असून कुंडी सारख्या भांड्यातून वर
निमुळते होत गेलेले खोड, दोन्ही बाजूला पाने व खजुरांचे घड उत्तम चितारले आहेत. हे
चित्र तंतोतंत सममितीय म्हणजेच Exactly symmetrical आहे. याच्या दोन्ही बाजूला
मोठाले शरभ आहेत. इस्लामिक राज्यात असलेल्या बहुतांशी किल्ल्याच्या दरवाजावर शरभ न
चुकता असतोच, परंतु या दरवाज्यावरचे शरभ-शिल्प खास असंच आहे. शरभांच्या प्रत्येक
पायात प्रत्येकी एक हत्ती धरलेला असून, तोंड व शेपटीतही एक-एक हत्ती पकडलेला आहे. प्रत्येकी
एक हत्ती डोक्यावरून पडतानाही दिसतो. दोन्ही शरभ-शिल्पांच्या वरच्या बाजूला “गंडभेरूंड”
कोरलेले आहेत. “गंडभेरूंड” म्हणजे दोन डोके असलेला काल्पनिक गरुड पक्षी. इतरही
काही किल्ल्यांवर हे चित्र आढळते, परंतु या दरवाजावर असलेले गंडभेरुंड असामान्यच
आहेत. मानवी देह धारण करून असलेले हे गरुड, पंख पसरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांनी
दोन्ही तोंडात एकेक शरभ उचललेले आहेत.
शार्दुल दरवाजावरील शिल्पे |
शरभ हे इस्लामिक राजवटीचे चिन्ह असून प्रत्येकी
७-७ हत्ती उडवून लावणारे दोन शरभ इस्लामिक शक्ती दर्शवणारे म्हणून कोरलेले असणे
स्वाभाविक होते, परंतु हिंदू राजवटीचे चिन्ह असणारे गंडभेरुंड आपापल्या दोन्ही तोंडातून
शरभालाच पकडलेले दाखवणे हे आश्चर्यकारक आहे. परस्परविरोधी ही शिल्पे, या दरवाजाची
निर्मिती करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते त्या फत्तेउल्ला इमाद उलमुल्क, यांनीच
चितारलेली आहेत. त्याने दरवाजाची बांधणी करताना मुस्लिमांची चिन्हे कोरलीन, परंतु
तो मूळचा हिंदू होता आणि विजयनगरच्या राज्यात चाकरीही केलेली असल्याने इस्लामिक चिन्हांबरोबरच
विजयनगरच्या साम्राज्याचे चिन्हही त्याने कोरून ठेवलेन.
गडावरचे दरवाजे |
हे सगळे पाहून झाल्यावर आत मध्ये जाताना
दरवाजाच्या आतील बाजूस असलेला सुंदर नक्षीदार घुमट न चुकता बघायचा. आमच्याकडे वेळ
मर्यादित असला तरी घाईघाईत हा दरवाजा पाहून पुढे जाण्याचा प्रमाद आमच्याकडून घडणे शक्यच
नव्हते. असे करणे म्हणजे फत्तेउल्लाचा अपमान ठरला असता आणि आम्ही त्या कलाकृतीच्या सौंदर्यालाही मुकलो असतो. निवांतपणे हा
चौथा दरवाजा न्याहाळून मनोसोक्त फोटो घेऊन पुढचा पाचवा दरवाजा ओलांडून सहाव्या भक्कम
दरवाजाकडे जायचे. हा “दिल्ली दरवाजा”. या दरवाजाच्या कमानीवरही दोन मोठे शरभ
कोरलेले आहेत. दोन्ही बाजूला बुरुज सदृश मनोरे, प्रशस्त देवडया असा दिल्ली दरवाजा
आहे.
२२ फुटी तोफ |
गडाच्या ६ दरवाजांपैकी मछली-वीरभान आणि
शार्दुल-दिल्ली हे दरवाजे एकमेकांना काटकोनात बांधले आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने
ही एक उत्कृष्ट रचना आहे. दरवाजापलीकडे समोरच डाव्या हाताला खाम तलाव आहे, परंतु
तो टप्पा परतीच्या वेळचा शेवटचा टप्पा म्हणून ठरवलेला होता. आधी तुटकी तोफ शोधायची
असे दाते सरांनी सांगितल्यामुळे उजवीकडच्या वाटेने त्या तोफेच्या शोधमोहिमेत
निघालो. वाटलं होतं त्यापेक्षा जास्त अंतरावर आणि चटकन दिसणारही नाही अशा ठिकाणी
ही तोफ पडलेली आहे. रस्ता चुकत तर नाहीये ना असा विचार होत असतानाच की तोफ दिसल्याने
मी आणि भूषणने सगळ्यांना ओरडून ती सापडल्याचे सांगितले. या गडावरची आम्ही बघितलेली
ही पहिलीच तोफ. मग जवळच नगारखाना/सदर अशी एक वास्तू ही लगेच सापडली. तिथेच वरच्या
बाजूला टेकडीवजा उंचवट्यावर भरभक्कम अशी साधारण २२ फुटी (कि १७.५?) तोफ आहे.
कुत्र्याच्या आकाराचा नसर्गिक बांधणीचा दगड |
पुढचा टप्पा होता कुत्र्याच्या आकाराचा
दगड. ऐकायला विचित्र वाटलं तरी सगळीकडे, अगदी नकाशातही याचा उल्लेख आहे. याच्याकडे
जाणाऱ्या वाटेत छोटे-छोटे आणखी बुरुज आहेत. ते पाहत, नकाशा बघत हा दगड शोधत असतानाच
आणखी एक तोफ दिसली. आमच्याकडे असलेल्या माहितीत या तोफेचा उल्लेख नव्हता, त्यामुळे
नविनच खजिना जणू आम्ही शोधून काढला असा हुरूप आला. तसंही दुपारचे अडीच वाजले होते,
भर दुपारी साडेबाराला सुरुवात करून क्षणाचीही उसंत न घेता वेड्यासारखे आम्ही
किल्ला उंडगत त्यावरचे सगळे अवशेष बघायचेच म्हणून पायपीट करत होतो. त्यामुळे
आमच्या यादीत आणि नकाशात आधी उल्लेख नसलेली एखादी वस्तू बघायला मिळणे हे नक्कीच
सुखावह होते. काही मिनिटातच बसलेल्या कुत्र्याच्या आकाराचा नैसर्गिक बांधणीचा दगड
दिसला. त्याच्या खालच्या बाजुला लांबवर असलेल्या मोझरी बुरुजाचेही दर्शन झाले.
गडाचे काही बुरुज |
बेहराम बुरुजाच्या बांधणी संबंधीचा शिलालेख |
पुढचे आकर्षण होते बेहराम बुरुज. याची
बांधणी बेहराम नावाच्या निजामशाहीच्या एका अधिकाऱ्याने केली त्यावरूनच याचे नाव तसे
पडले. कुत्र्याच्या दगडापासून डावीकडे वळून कमानींच्या तटबंदी उजव्या बाजूला धरून
पुढे गेल्यावर या बुरुजाचे दर्शन होते आणि या बुरुजाला गडाची शान का म्हणतात ते
वेगळे सांगायची गरज पडत नाही. वाटेत एक चोर दरवाजा ओलांडल्यावर पुढे या बुरुजाच्या
बांधणी बाबतचा एक शिलालेखही दिसतो. या बुरुजाला तब्बल बारा कमानी सदृश झरोके असून
प्रशस्त अशा अर्ध-गोलाकार आकारात हा बांधलेला आहे. या झरोक्यांमध्ये बसून फोटो
काढून घ्यायचा मोह न झाला तरच नवल. त्यातून सुरुवात केल्यापासून इथपर्यंतच्या न
थांबलेल्या पायपिटीला खंड म्हणून सगळ्यांकडचे तहानलाडू-भूकलाडू बाहेर पडले.
गडावरच्या तोफा |
पण अवघ्या पाच मिनिटातच विश्रांती आटोपती
घेऊन पुढच्या दोन तोफा शोधायला निघालो. बुरुजासमोरच्या टेकाडावर चढून आल्यावर लगेच
या दोन अजस्त्र तोफा दिसतात, पहिली बिजली तर दुसरी साडेतेरा फुटांची कालभैरव अशी
या तोफांची नावे त्यांना शोभून दिसतात. पाठीमागे झाडाझुडपात लपून गेलेले एका
वाड्याचे अवशेष आजही आहेत.
तटबंदी व काही अवशेष |
शेंदूर फसलेली हनुमानाची मूर्ती |
एवढे सुंदर आणि मनामध्ये भरणारे अवशेष
पाहून झाल्यावर सुद्धा अजून आगामी आकर्षणे संपली नव्हती. या पुढचे आकर्षण होते
जामा मशीद. तटबंदीला उजवीकडे ठेवत कडेकडेने या वास्तूकडे जायचे. ही वास्तू एका
टेकडीवर असल्याने आपल्याला आधीपासूनच दिसत असते, त्यामुळे ते लक्ष्य समोर ठेवून
मिळेल त्या वाटेने तिकडे जायचे. वाटेत एक शेंदूर फासलेली हनुमानाची मूर्ती दिसते.
या मूर्तीच्या मागेच ही लांबूनच खुणावत असलेली मशिदीची वास्तू दिसते.
जामा मशीद |
आम्ही धावतच तिकडे गेलो. मुळातच उंचावर
बांधलेली ही वास्तू भव्य असून याला तब्बल २१ घुमट आहेत. प्रत्येकी सात सात
घुमटांच्या तीन रांगा पैकी दोन रांगा शाबूत असून एक मात्र पूर्णपणे ढासळून गेली
आहे. १८ चौकोनी भक्कम अशा खांबांवर हे घुमट
तोललेले आहेत. त्यामध्ये सुंदर कमानी आहेत. वास्तूच्या चारही कोपऱ्यात मनोरे असून
दोनच सुस्थितीत आहेत. घुमटाच्या आतील भागात मात्र वटवाघळांनी बस्तान मांडलंनी आहे.
वास्तूसमोर विस्तीर्ण प्रांगण असून तिथून संपूर्ण वास्तू फोटोत घ्यायचा मोह आवरत
नाही. परंतु या वास्तूची भव्यता येथून एका फोटो साठवणे कठीणच आहे. या प्रांगणाच्या
पलीकडे इमारतीत शार्दुल दरवाजाचा निर्माता फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याचे थडगे आहे.
३२ फुटी नौगज तोफ किंवा पीरफत्ते तोफ |
नकाशानुसार थडग्यापलीकडे गेल्यावर
गडावरचा महत्त्वाचा दागिना सापडणार होता. त्यामुळे मधूनच पलीकडे जाण्याचा विचार केला.
पण या वास्तूत प्रचंड प्रमाणात वटवाघळे आहेत आणि त्यांनी या थडग्यावर घाणीचे
अक्षरशः साम्राज्य जमवलंनी आहे. समाजकंटकांनी याचीही तोडफोड केलेली आहे. पलीकडे जाण्याचा
मार्ग त्याच्या शेजारूनही आहे पण केवळ आळस आणि अंगात मस्ती म्हणून त्या घाणी मधूनच
वर वटवाघळे घोंगावत असताना चटकन पलीकडे गेलो. तिथे मात्र वाट नक्की कोणती ते समजणं
कठीण जात होते. बरसाती तलाव जवळच लागला परंतु राणी झरोका आणि पीरफत्ते दरवाजा काही सापडेना. त्याच्याजवळच मोठा दागिना
सापडणार होता. बर्याच वेळाने गर्द झाडीत दिसेनाशा होणाऱ्या वाटा बघून आम्ही सोनकिल्ला
बुरुज आणि धामाजी तलावाच्या जवळपास पोहोचू अशी शक्यता निर्माण झाली. आम्हाला तिकडे
जायचेच नव्हते कारण एक तर हे अवशेष फार लांबवर घेऊन जाणारे होते आणि त्या बाजूने
परतायला वळसा पडणार होता. तिकडे गर्द झाडीत काही जनावरे नक्कीच सापडली असती (किंवा
आम्ही त्यांना सापडलो असतो) कारण की या किल्ल्यावर अस्वले-सांबर इत्यादीचा वावर असल्याचे उल्लेख आहेत. भूषणला सांबर सदृष्य काहितरी असल्यासारखे
वाटले आणि आम्ही मागे फिरलो. थोडा नैराश्यानेच परतीचा प्रवास सुरु करावा याची
तयारी करत असतानाच तो दागिना अचानक समोर आला. तब्बल २५ पेक्षा जास्त लांबीची तोफ समोर
आली. (भगवान चिले हिची लांबी ३६ फूट लिहितात). तिथे मात्र चक्क तिच्या
शेजारी झोपून फोटो काढला. हा भरभक्कम असा दागिना शोभून दिसायला गाविलगडासारखा
अजस्त्र किल्लाच हवा. या तोफेला नौगज तोफ किंवा पीरफत्ते तोफ म्हणूनही ओळखले जाते.
इतर अवशेष |
मन भरेपर्यंत या तोफेचे निरीक्षण
केल्यावर या तोफेच्या तोंडाच्या दिशेकडे खालीच पीरफत्ते दरवाजा बघायचा. ही वाट
खाली बागलिंगा गावात उतरते म्हणून हा दरवाजा बागलिंगा दरवाजा म्हणूनही ओळखला जातो.
या दरवाजाची बांधणी मजबूत असून एका बाजूचा बुरुज भक्कम स्थितीत आहे तर दुसर्या
बाजूला ढासळलेला आहे. याची बांधणी एकसारखी दिसत नाही, म्हणजेच याची वेगवेगळ्या काळात
दुरुस्ती करण्यात आल्याचे स्पष्ट होते. यावर झाडी वाढली असून यामुळे बांधकामाला
धोका पोहोचतो. या बुरुजातही एक लहानसा दरवाजा आहे. हा दरवाजा बुरुजावरच्या दोन
मजली इमारतीत घेऊन जातो. यालाच राणीचा झरोका म्हणतात. पीरफत्ते दरवाजा कलाकुसरीने
बांधलेला असून कमान अतिशय सुंदर नक्षीकामाने कोरलेली आहे. कमानीवरती दोन्ही बाजूला
पक्षी (हंस?) कोरलेले असून
त्यांनी चोचीत बहुतेक साप पकडलेले दाखवले आहेत. प्रत्येक पक्षाच्या समोर एक एक कमळही
कोरलेले आहे, तर कमानीवरती पर्शियन भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. या दरवाजातच आतील
बाजूला एक पीराचे थडगे आहे.
गडावरचे तलाव |
ह्या बाजूचे सर्व बघून झाले होते. आता
मात्र सरळ मार्गाने दिल्ली दरवाज्याकडे जायचे होते. वाटेत अजुन एक कोठार लागते,
त्यानंतर वाटेवरच सती तलाव, धोबी तलाव, लेंडी व देव तलाव लागतात. यावेळी काही तलाव कोरडे असले तरी इतिहासात या भव्य किल्ल्यावरच्या शिबंदीला पाणीपुरवठा करण्यात
यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली असणार नक्कीच. अजूनही लहान-मोठ्या काही वास्तू/वाडे
जवळपास दिसतात. काही समाध्या व वीरगळीही दिसतात. धोबीतलावाच्या पुढे देव-तलावाजवळून सोनकिल्ला
बुरुजाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर महादेवाचे मंदिरही लागते. दुर्दैवाने यात
कोणतीही मूर्ती शिल्लक नाही. मंदिराच्या समोरच्या बाजूला सोनकिल्ला बुरुजाच्या
दिशेने लांबवर पाहिल्यावर वीस फुटी लांबीची बिजली तोफ दिसते. या मंदिराकडे येणार्या
पायऱ्यांचा मार्ग सुस्थितीत असून सुंदर आहे. तिथे काही तुळशीवृंदावनेही दिसतात.
परत मागे फिरून देव-तलावाजवळून कडेकडेने जाणार्या वाटेने परतताना डावीकडे एक
इमारत दिसते. ही इमारतही बर्यापैकी मोठी असून याची बांधणी आणि छताच्या आतील बाजूस
असलेले उच्छवास लक्षात घेता हे धान्याचे कोठार पाहिजे असले पाहिजे हे स्पष्ट होते.
या इमारतीच्या बरोबर समोरच घुमट असलेली छोटी मशीद आहे. या वास्तूचे सौंदर्य
त्याच्या पूर्वाभिमुख अशा तलावाकाठच्या बाजूकडील तोंडासमोर गेल्याशिवाय लक्षात येत
नाही. तीन कमानी असलेली ही समोरची बाजू असून छताकडचा भाग ढासळला असला, तरी शिल्लक
अवशेषांच्या कलाकुसरी वरून ही वास्तू अप्रतिम असणार याची खात्री होते. दरवाजांच्या
खांबावर तसेच कमानीवर कमळे कोरलेली आहेत. खांबही नक्षीदार चौकटीने सजलेले आहेत.
मध्यभागी चार खांबांवर तोललेल्या या इमारतीत एक फारसी भाषेतला शिलालेखही आहे.
गडावरच्या वास्तू |
येथे आपली गडफेरी पूर्ण होते. दिल्ली
दरवाजा-शार्दुल-वीरभान दरवाजाने मछली दरवाजाकडे परत येताना शार्दुलपाशी पाय परत रेंगाळले.
मछली दरवाजापर्यंत परत आलो तर सव्वा पाच वाजून गेले होते. आमच्या वेळापत्रकानुसार
आम्ही काठोकाठ बरोबर होतो पण बाहेर जाण्याचा दरवाजा बंद करण्यात आलेला दिसत होता. चक्क
कुलूप! मग दरवाजाशेजारी बाहेरून बुरुजाला टेकून ठेवलेल्या शिडीने उतरावे असा
विचारही केला, पण कोणीतरी बाहेरून किल्ली म्हणून दरवाजा उघडलानी वेळेत.
बाहेर पडलो. जंगलात घुसणारे सहाला बंद
होणारे ते गेट आम्ही ०५:५५ ला ओलांडले. प्रवास सुरू झाला तो दाट गर्द
जंगलातून, भीती वाटावी अशा मिट्ट काळोख असलेल्या त्या गर्द झाडीने वेढलेल्या
रस्त्यावरून. ठरलेल्या वेळातच सुरक्षित पलीकडे पोहोचून त्या रात्री मुक्काम केला
तो जिल्पी-अमनेर किल्ल्यापासून बारा-तेरा किलोमीटर अंतरावर अलीकडे असणाऱ्या धरणी
गावात. सकाळी उठून बघायचा होता तो जिल्पी-अमनेर हा महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या
सीमेवर असणारा किल्ला.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!! |
व झक्कास. सुंदर स्थळ. २२ फूट आणि ३२ फूट तोफ म्हणजे आश्चर्यच!
ReplyDeleteधन्यवाद विशाल 😊
ReplyDelete