Monday, August 26, 2019

वैदर्भीय भटकंती – किल्ले नरनाळा

नरनाळा किल्ला हा सुद्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येतो. त्याच्या चालू असण्याच्या वेळाही ठरलेल्या आहेत, तसेच त्यावर आपली SUV असेल तरच घेऊन जाता येते, नाहीतर फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी असलेली खाजगी जिप्सी गाडी भाड्याने उपलब्धतेनुसार घेऊन जाता येते. त्यासाठी वेगवेगळे शुल्कही आहे.

Own Vehicle Fee: 400, Guide Fee: 300
Gypsy Fee: 1500 to 3000
वेळ: साधारण सकाळी ६ ते १० आणि दुपारी २ ते ६
अधिक माहितीसाठी: http://www.magicalmelghat.com/AccomodationDynamic.aspx

थोडक्यात कधी उठले आणि तोंड घेऊन गेले तर किल्ला पुरता बघायला मिळेल असे नाही. त्यातून बहुसंख्य लोक येथे जंगल सफारीसाठी येतात. आम्ही या सगळ्याची माहिती मिळवून गेलेलो असल्याने दुपारच्या सेशनला किल्ला पाहायचा दृष्टीने नियोजन ठरलेले होते. जिल्पी आमनेर किल्ल्यावरून धारणी गावातून परत मेळघाट प्रकल्पात शिरलो. हा रस्ता धाकणा, कोहा, बेलकुंड, झीरा, खटकाली अशा अगदी पूर्णतः व्याघ्रप्रकल्पात असणाऱ्या गावांमधून जातो. यात फॉरेस्ट डिपार्टमेंट चेकपोस्ट आहेत. आम्ही बहुतेक बाराच्या दरम्यानेच नरनाळा किल्ल्याच्या प्रवेशाजवळ पोचलो. हा किल्ला मेळघाट प्रकल्पाच्या शहानुर भागात येतो. ठरलेली वेळच मुळी २ होती, म्हणजे अजून २ तास होते. मग त्यांच्याशी गप्पा मारत आमच्या येण्याचा उद्देश त्यांना सांगितला. आम्ही जंगल सफारीसाठी आलेलो नसून किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे आणि हाच मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. त्यावर आम्हाला त्या दृष्टीने चांगला गाईड देऊन, किल्ल्याचे सगळे अवशेष दाखवण्याचे त्यालाही सांगितले. अर्थात हे सर्व तोंडदेखले की मनापासून ते अधिकारी जाणोत. पण आमच्या परीने आम्ही प्रयत्न केला नक्कीच. निवांत गप्पा मारून आजूबाजूचे माहिती फलकांचे फोटो काढून झाले. मग सरळ जेवण उरकून घेतले.
दोन वाजता हळूहळू हालचाली चालू झाल्या. गाईडला ४-४ वेळा ताकीद देऊन झाली "की बाबा, आपल्याला सरकारी नियम मोडायचे नाहीयेत, ते न मोडता ज्या ठिकाणी नेता येईल, ती जागा मात्र सोडू नको. किल्ल्याचे अवशेष म्हणून असलेली पडकी भिंत, दगड-गोटे काहीही असले तरी बघायचे आहेत आम्हाला. सफारी आणि वाघ बघायला नंतर सावकाश येऊ परत." आम्ही सज्ज होतोच. कॅमेर्‍याने सुद्धा दहा मिनिटातच क्लिक-क्लिकाट करायला सुरुवात केलीन.

शहानुर दरवाजा

मेहंदी किंवा मेंढा दरवाजा
किल्ल्याचे अवशेष लगेच दिसायला लागतात. तसेही आपण गाडीतूनच फिरत असतो. सगळ्यात पहिल्यांदी लागतो तो शाहनुर दरवाजा. याच्या कमानीवर सिंह असल्याने याला शेर दरवाजा म्हणून ओळखले जाते. तर हा दरवाजा म्हणजे शाहनुर गावातून गडावर येण्याची वाट म्हणून शाहनूर दरवाजा. याला दोन कमानी आहेत आणि डाव्या बाजूला एक छोटेखानी दरवाजा ही दिसतो. मुख्य दरवाजाच्या छतावर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे,  तर दरवाजाच्या आतील भिंतीत एक वर जाणारी पायर्‍यांची वाटही आहे. दरवाजाच्या पलीकडे गेल्यावर काही अंतरावर एक बुरुजही दिसतो. या बुरुजाला “खूनी” बुरुज असे भयावह नाव आहे. नंतर परतताना मेंढा किंवा मेहंदी असा दरवाजा असून याच्या जवळच्या तटबंदी ढासळलेल्या तर काही ठिकाणी बुजलेल्याही आहेत.

महाकाली दरवाजाचे प्रवेशद्वार
आमचे लक्ष होते पुढे असणारा “महाकाली दरवाजा”. नुकताच गाविलगडाचा अप्रतिम दागिना असा शार्दुल दरवाजा पाहिला होता, त्यामुळे “महाकाली” अशा नावावरूनच भव्यतेची प्रतिमा उभ्या होत असलेल्या त्या दरवाजाला पाहण्यासाठी सगळेच लक्ष तिकडे लागले होते. उजव्या हाताने पाखाडी सारखी असलेली पायर्‍यांची वाट आपल्याला महाकाली अधिकाऱ्याचा PA असावा अशा एका दरवाजात घेऊन जाते. वास्तविकरित्या हा अनामिक दरवाजाही लहान वगैरे नाहीये. तिहेरी कमानींची नक्षी धारण केलेला व अगदी सुस्थितीत असलेल्या देवड्या असलेला हा दरवाजा आहे. यावर फार नक्षीकाम नाही. शरभ - व्याल तर सोडाच, साधी कमळंही कोरलेली नाहीत कमानींवर. पण पुराणकाळातील एखाद्या तपस्व्याने “महाकाली दरवाजा पाहण्यासाठी येणाऱ्यांना माझे दर्शन घेतल्याशिवाय जाता येणार नाही” असा वर प्रदीर्घ तप:श्चर्येनंतर मागून घेतलान असावा. त्यामुळे आपल्यालाही आधी इतर दरवाजांच्या तुलनेत साधा वाटणारा हा दरवाजा पार करूनच पुढे जावे लागते. ह्या दरवाजाच्या डावीकडे असलेल्या पराकोटासंबंधी एक घटना इंग्लिश गॅझेटीअर मध्ये नमूद करून ठेवलेली आहे. नरनाळा किल्ल्याचा स्वामी, नरनाळसिंह याला मुस्लीम शासकांनी फितुरीने ठार मारून लोकांना दहशत बसावी म्हणून त्याचा मृतदेह त्यात भुसा भरून इथेच लटकावून ठेवला होता.
ह्या PAचे दार ओलांडल्यावर एखाद्या वाड्यात आल्यासारखेच वाटते. देवड्या म्हणाव्यात तरी किती असाव्यात? जमिनीलगत आपल्याला मांडी घालून बसता येईल इतपत उंचीच्या जागा, वर कमानी, त्यावर चहूबाजूने चौथरा, त्याखाली तळघर आणि कमानीच कमानी. हे बांधकाम हेमाडपंथी आहे. इथे डावीकडे वळल्यावर दिसतो तोच महाकाली दरवाजा. हा दरवाजा आणि भोवतालची रचना यांचे वर्णन नक्की कुठून सुरु करावे ते कळत नाही इतकी अप्रतिम रचना येथे आहे.

महाकाली दरवाजा
या भव्य दरवाजावर नक्षीच नक्षी आहे. दरवाजाला लागून असलेल्या कमानीवर फारसी भाषेत अत्यंत सुबक आणि सुंदर कॅलिग्राफीत मजकूर कोरलेला आहे. आजूबाजूला कमळे आहेत. त्यावरती एक कमळांची माळ असून सर्वात वरती आधीच्याहून अप्रतिम असा आणि लांबच लांब शिलालेख कोरलेला आहे. कमानीच्या खांबांवर कमळं आहेत. कमळं खूप दरवाजांवर असतात पण ह्या दरवाज्यावरची ही कमळं नुसतीच कोरलेली म्हणणं म्हणजे हा त्या कलाकृतीचा आणि घडवणाऱ्या कलाकारांचा अपमानच होता. ही कमळं अक्षरश: घडवलेली आहेत. १३ कमळं आणि तीही सर्व वेगळ्या पद्धतीने कोरलेली. इतरही नक्षीकाम आहेच या दरवाजावर. हा दरवाजा त्यावरच्या नक्षी आणि कमानींपुरता मर्यादित नसून दोन्ही बाजूला अप्रतिम नक्षीकाम कोरलेले झरोकेही आहेत. ह्या गवाक्षांना सौंध म्हटले जाते. या दरवाजाची कमानच १५ फूट (कि १९ फुट?) असून संपूर्ण प्रवेशद्वार भव्य असे तब्बल ३७ फूट आहे. रूंदीच तब्बल ४० फुट आहे. पण हे झाले नुसते आकडे. प्रत्यक्षात ह्या कलाकृतीला “महाकाली” हे नांव चपखल वाटते नाही?
या कलाकृती समूहाला नुसता दरवाजा म्हणणे योग्य ठरणार नाही. कल्पना केली हा कलाकृती-समूह म्हणजे एक दरबार आहे, दरवाजा म्हणजे श्रीमंत छत्रपतींचे स्थान, तिथे समोर सिंहासन आहे, बाजूच्या झरोक्यातून खासे मंडळी इतर दरबारी मंडळींवर लक्ष ठेवून आहेत, आजूबाजूला असलेल्या देवड्या ही तर मंत्रिमंडळाची मानाची स्थाने आहेत. अहाहा... काय दृश्य असू शकेल ते. वा!

महाकाली दरवाजा कलाकृती समूह
पण तो दरबार नव्हता. या वास्तू समूहाला छप्परही नाहीये. का बनवलानी असेल तो अप्रतिम दरवाजा इतर लवाजम्यासह? आणि कोणी बांधलान आहे हा “महाकाली” दरवाजा माहित्ये? फत्तेउल्ल इमाद उलमुल्क! हाच तो ज्याने गाविलगडाचा अप्रतिम असा शार्दुल दरवाजा बांधलाय. हा इमादशाही घराण्याच्या मूळपुरूष, विजयनगर साम्राज्यातील ब्राह्मणाचा मुलगा. पण त्या अप्रतिम कलाकृतीवर दळभद्री लोकांनी आपली नावे रंगाने लिहून आपले संस्कार दाखवले आहेत. त्यातून त्या मजकुरावर चुना लावून दरवाजावरच “GR यहाँ की कोई भी चीज इधर-उधर ना करे वरना कारवानी की जायेगी GR” असा महत्त्वाचा पण पांढऱ्या रंगाने सरकारी मजकूर तितक्याच घाणेरडेपणाने लिहिलेला आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करू, आणि कॅलीग्रफित लिहिलेल्या नक्षीदार शिलालेखाचा अनुवाद पाहू:
विजयदिनी सर्वांच्यावर आणि सर्वात श्रेष्ठ असलेल्या परमेश्वराच्या म्हणण्यानुसार जो कोणी या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करेल, तो सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त राहील.
त्याखालचा शिलालेख हा मोहम्मद अब्दुल्लाह याने लिहिलेला असून, त्याचा अर्थ:
ईश्वराशिवाय जीवन उणे आहे. अल्लाहशिवाय दुसरा कोणताही ईश्वर नाही. आणि मोहम्मद हा त्याचा प्रेषित आहे. या जगावर राज्य करणारा ईश्वर, त्याची कृपादृष्टी, त्याचेवर आणि सर्व प्रेषित तसेच धर्माच्या हितचिंतकांवर ठेवो, खऱ्या धर्मोपदेशकावर जे मुस्लीम आहे, ज्यांचा इस्लाम व खुदावर विश्वास आहे असा अबूबकर, ओमर, उस्मान, देवांचा विश्वासू अली, हसन, उल, रजा, उसेन आणि करबला इथे शहीद झालेले सर्व आणि आमच्या अब्बास आणि ते सर्व जे प्रेषिताच्या मदिना प्रवासात प्रेषिताच्या सोबत होती, ते सर्व ज्यांनी त्यास मदत केली अश्या सर्वांवर ईश्वराची मेहेरनजर आहे व ईश्वर या सर्वांचा स्वीकार करो.
या खालील शिलालेख कमालजंग यांने लिहिलेला असून, त्याचा अर्थ:
सर्वात श्रेष्ठ असलेल्या बहामनी सुलतान, गाझी शहाबुद्दीनिया, महमूदशहा, मोहमदशहा, हुमाहूनशहा, अहमदशहा, मोहमदशहाच्या कारकिर्दीला, साम्राज्याला, न्यायदानाला, चिरस्थायी करो.
(भाषांतर संदर्भ: माधव देशमुख)
दरवाजातून पलिकडे गेल्यावर उजव्या बाजूला काही इमारती, वर जाण्यासाठी जिने, एक भग्न दगडी रांजण, असे अवशेष दिसतात. डाव्या हाताने पुढे गेल्यावर दोन घुमटाकृती कबरी दिसतात. ज्या आम्ही फक्त आमच्याकडच्या नकाशात आणि भगवान चीलेंनी लिहिलेल्या वर्णनात बघितल्या. प्रत्यक्षात त्या गाइडने आम्हाला गंडवलेन आणि त्या बघायला मिळाल्या नाहीत.

खुनी बुरुज
परत फिरून महाकाली दरवाजाने गाडी जवळ आलो. थोड्याच अंतरावर एक पायवाट डावीकडे एका बुरुजाकडे होऊन जाते. हा बुरुजही मोठा असून त्याला किमान आठ कमानी आहेत. दोन्ही बाजूने बुरुजावर जायला जिने आहेत तर वरचा भाग ढासळला आहे. त्या वर घेऊन जाणाऱ्या पायर्‍यांच्या वरतीच दोन्ही बाजूला शरभ व चांद-तारा कोरलेला आहे. बुरुजाच्या कमानीतही एक चोरदरवाजा, एका कमानीत तीन-तीन झरोके, असा अवशेषांच्या खजिनाच आहे. हाच तो भयावह “खुनी बुरुज”, येथूनच गुन्हेगारांना शिक्षा म्हणून कडेलोट करून खून केला जात असे.

तोफा

अकोट दरवाजा
गवत बाजूला करत थोडं पुढे गेल्यावर नव्याने चौथरे बांधून ठेवलेल्या दोन तोफा दिसतात. अजस्त्रच आहेत. अजूनही पुढे एकाकी पडलेल्या अवस्थेत एक दरवाजा दिसतो. हा अकोट दरवाजा. याची बरीच पडझड झालेली असून भेगाही पडलेल्या आहेत. पुढे झाडे वाढलेली असून वाट कुठेतरी खाली जाताना दिसते. याच्या छपराला गेलेल्या मोठ्या भेगा तो कधीही पडेल असे अजून ओरडून सांगतात.
आपण पाहिलेला भाग हा गडाचा एक दशांश भाग आहे असे म्हणता येईल. नकाशा पाहिल्यास या गडावर प्रचंड अवशेष असून आपण फक्त चार महत्त्वाचे दरवाजे आणि तटबंदी राहिल्याचे लक्षात येते. या गडाचे सर्व पर्यटक भेट देणारे अवशेष म्हणजे महाकाली दरवाजा, शक्कर तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे अवशेष.

इतर अवशेष
आम्हाला आमच्याकडच्या नकाशाच असलेले सगळे अवशेष बघायचे होते. आम्ही इतर अवशेष बघायला निघालो. गाईड म्हणत होता तिकडे आम्ही जात होतो. पुढे एक तलाव बघितला, कदाचित तो “चंद्रावती तलाव” असावा. पुढे एक वास्तूही पाहिली, पण ती नक्की कोणती वस्तू हे सांगणे कठीण आहे. कदाचित तोफेचा कारखाना असावा किंवा शिरपूर (कि दिल्ली?) दरवाजाचा काही भाग तर नसावा? वनखात्याने खूप अवशेष गाडीतून उतरण्यास मनाई असे ठेवलेले आहेत. आम्ही गाईड सांगेल तिथेच उतरून पाहत होतो. नियम न तोडता येथे जाणे शक्य आहे ते सगळे भाग मात्र दाखव हे वारंवार त्याला सांगत होतो.

पाणवठा आणि चाटण
एक तर ते जंगलच, त्यात खूप अवशेष झाडीत लुप्त झालेले असल्याने आम्ही नक्की काय काय बघितले ते नावानिशी सांगणे कठीण आहे. पण अनेक चौथरे, पडक्या वास्तू, बुरुज जमेल तसे पाहत होतो. कधी उतरून तर कधी चालत्या गाडीतून फोटो काढत होतो. जागोजागी वन्यप्राण्यांसाठी ठेवलेले पाणवठे होते, खास त्यांना येण्यासाठी केलेले चाटण बघितले. इथूनच पुढे असणारा जाफराबाद किल्ला Core भागात असल्याने तिथे जायला पूर्णतः बंदी आहे. लांबूनच त्याची दिसणारी तटबंदी आम्ही बघितली. पण आमचीच घाई आणि गाईडची अनास्था याच्यामुळे त्याचा फोटोही आम्हाला घेता आला नाही. ती चुटपुट मात्र लागून राहिली.

नौगज तोफ

शक्कर तलाव
जे नशिबात होते तेवढेच अवशेष बघून पॉप्युलर अशा शक्कर तलावापाशी आलो. वाटेत नौगज तोफ बघायला मिळते. ही तोफ अप्रतिम असून नतद्रष्ट लोकांनी त्यात दगड भरून ठेवले आहेत. तोफेच्या तोंडातून मी आंत जाऊ शकेन एवढे तिचे तोंड आहे. नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गेस्ट हाऊसही लागते. त्यापुढे शक्कर तलाव. तिथे आजूबाजूला खूप अवशेष पाहण्यासारखे आहेत. घोड्यांच्या पागा, गजशाळा, मशीद, भुयार, राणीमहाल असे बरेच काही या तलावाच्या जवळ असून हा भाग धार्मिक स्थान असल्याने इथे गाडीतून उतरून फिरण्यास परवानगी आहे. हा तलाव खूप मोठा आहे. आजूबाजूच्या कातळात चर खोदून पावसाचे सर्व पाणी तलावात येण्याची सोय केलेली आहे. हे जवळपास रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखेच आहे

अंबर महाल
आम्ही प्रथम आजूबाजूचे अवशेष पाहिले त्यात अंबरमहाल ही वास्तू शक्कर तलावाच्या उजव्या बाजूस आहे. यास राणीमहाल म्हणूनही ओळखतात. झरोके असलेल्या तीन कमानी याला असून, समोरील पटांगणात एक पाण्याचे कुंड देखील आहे. ते कारंजे असावे. वास्तूच्या आतील बाजूने वरती सुंदर घुमट असून सर्वत्र नक्षीकाम आहे. पूर्वीच्या काळी त्यावर असलेल्या निळ्या रंगाचा लेप आता काहीच ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे.

मशीद
       याच्या उजवीकडे एक मशीद असून ती अष्टकोनी खांबांवर तोललेली आहे. याला ३ कमानी आणि एक घुमट आहे. मशिदीचा आतील भाग अत्यंत कलाकुसरीने कोरलेला आहे. समोर एक पाण्याचं टाकंही आहे.

तेल-तुपाचे टाके
पुढे तेल-तूपाचे टाके आहे. तीन भाग असलेलं ते मोठं टाकं असून त्यावर तीन कमानी आहेत. त्यामुळे ही वस्तू लांबूनच ओळखता येते. सध्या त्या टाक्यावर लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. याची रचना ही तेल-तूप साठवण्यासाठी नसून धान्य साठवण्यासाठी केल्यासारखी दिसते. इथल्याच एका वाड्याचे अवशेष पाहताना आमची चाहूल लागून त्यात असलेली हरणं आमच्या समोरच पळाली. तिथेच अस्वलाची विष्ठाही दिसली. तरी या भागात वावरताना काळजी घ्यावी.

कुत्तरदेवाचे ठिकाण
मागे फिरून शक्कर तलाव पाहिला. इथे “कुत्तरदेवाचे” ठिकाण आहे. विचित्र नांव असलेलं हे ठिकाण खरंतर बुर्‍हानुद्दीन पीराचे थडगे आहे. त्यावर शिलालेखही कोरलेला आहे. पिसाळलेला कुत्रा, कोल्हा किंवा उंदीर चावल्यास स्थानिक लोक डॉक्टरांकडे न नेता त्याला इथे घेऊन येतात. शक्कर तलावाचे पवित्र पाणी पिऊन या पिराच्या ठाण्याशी काही विधी केल्यावर तो बरा होतो अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळेच त्याला “कुत्तरदेव” असे म्हणतात.

घोड्यांची पागा

गजशाळा
       शक्कर तलावाच्या एका बाजूला घोड्यांची पागा आहे तर येथे जवळच पैलवान बाबा शाह दर्गा आहे. या पागेच्या साधारण मागील बाजूस गजशाळा आहे. ह्यातील बराचसा भाग बुजून गेला आहे.
हा शक्कर तलाव, त्याच्या जवळची पाणी जाण्याची व्यवस्था, दरवाजे सगळे अभ्यासपूर्ण आहे. काही अवशेष जवळून तर काही लांबूनच बघून झाले.

तटबंदी
तटबंदी

जशी जमेल तशी गडफेरी झाली होती. नक्की कुठून आणि कसे वर्णन करावे असे समजू नयेत इतके आणि असे अनेक अवशेष आम्ही लांबून पाहिले. खूपशी तटबंदी, लपलेले काही दरवाजे, बुरुज पाहिले. गडफेरी पूर्ण झाली असं नक्कीच म्हणणार नाही, कारण एक तर हा किल्ला तब्बल ३९२ एकर मध्ये पसरलेला अजस्त्र किल्ला आहे याची तटबंदी साधारण २४ किलोमीटर आहे. संपूर्ण जाफराबाद किल्ला, तेलीया बुरुज आणि तेलीयागड Core area declare करून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. खूप अवशेष फिरण्यास बंदी आहे, काही अवशेष गाईड दाखवत नाही. खुपसे अवशेष झाडीत लपल्याने दिसत नाहीत. त्यातून वेळेचे बंधन. अशा परिस्थितीत हा किल्ला धावत-पळत बघावा लागतो. त्यामुळे जमेल तसा आणि नशिबात असेल तेवढाच हा किल्ला पाहून होतो.

तेलीया बुरुज आणि तेलीया गड
पाच वाजून गेले होते. गाईडने हात कधीच वर केले होतेन. किल्ला तसा थोडा घाईतच बघितल्याने वेळ शिल्लक होता. आता मात्र उरलेला वेळ वसूल करायचाच असं ठरवून टाकलं. एक watch tower बांधलेला होता, तिथून तेलिया बुरुज आणि तेलीयागड व्यवस्थित दिसत होता. आम्ही निवांत बसून तेलीयाच्या बाजूला मावळतीचा सूर्य बघत थांबलो. अगदी पावणे सहा होऊन गेले. मुळात आम्ही जंगलात होतो, त्यात त्याच्या उजव्या बाजूला अतिशय दाट जंगल, तिकडून काही आवाज यायला लागले होते. आमच्या जवळच्या watch tower जवळच तयार केलेल्या एक पाणवठा होता, जो वन्य प्राण्यांना बोलावतही असावा. वेळ संध्याकाळची असल्याने तिथे थांबायचा कितीही मोह होत असला तरी तो आवरता घेतला. आम्ही प्राण्यांच्या गल्लीत होतो, त्यांचा वेळ त्यांना द्यायला पाहिजे होता. नाहीतर धोका होता.... आम्हाला!
गाडीत बसलो. योग्य ती बिदागी देऊन त्या गाईडसह नरनाळ्याचा निरोप घेतला. निरोप घेतला तो मेळघाटचा... पाहिलेल्या अवशेषांचे फोटो, जमलेल्या आठवणी, तेलीयामागचा तो निवांत सूर्यास्त आणि जाफराबादची चुटपूट घेऊनच... परत निवांत येण्याचे मनात ठरवूनच!
अरे हो... अजून दुसऱ्या दिवशी शिल्लक होता की, वारीचा भैरवगड आणि मैलगड!


सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

4 comments:

  1. गडाचे फोटो व वर्णन छान केले आहे.ब्लॉग लेखन करण्यात ओंकार केळकर यशस्वी झाला आहे.अभिनंदन!

    ReplyDelete
  2. ओंकार मस्त झालाय ब्लॉग! झकास वर्णन!

    ReplyDelete
  3. अप्रतिम वर्णन केले आहे
    अप्रतिम फोटो

    ReplyDelete
  4. सुंदर लेख. मला नेहमीच आश्चर्य वाटते तुम्हा ट्रेकींगवाल्यांच. कुठून कुठून नवे नवे गड शोधून काढता? :)

    ReplyDelete