Tuesday, October 22, 2019

वैदर्भीय भटकंती – किल्ले वारीचा भैरवगड आणि मैलगड

गाविलगड-नरनाळा सारखे रथी-महारथी पाहून झाल्याने मनातून परतीचा प्रवास तसा म्हटला तरी चालू झालेलाच होता. तरी आम्ही अजून मध्यप्रदेश सीमेलगतच होतो. शाहनूर पासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर वारीला जायचे होते.
“वारी” म्हटले की डोळ्यासमोर येतात ते वारकरी. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माऊली, हातात झांज घेतलेले माऊली, कटेवरी हात असा चंद्रभागेच्या तिरी विटेवरी उभा विठू माऊली. पण हे वारी प्रकरण वेगळे होते. इथे कटेवरी हात नाही तर चक्क गदाधारी हनुमान. एक वारी म्हणजे शांत सुंदर विठ्ठल तर दुसरीकडे वारी म्हणजे भीमरूपी महारुद्रा आणि बुद्धीमतां वरिष्ठं असा मारुती.

वारी हनुमान मंदिर: फोटो internet वरून साभार
सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी येथे हनुमानाची स्थापना केली. हे मंदिर “वान” नदी आणि एका नदीसदृश ओढ्याच्या संगमावर नितांत सुंदर ठिकाणी आहे. नदी कोरडी पडली तरी बारा महिने वाहणारे गरम पाण्याचे कुंड किनारी आहे. हेच मंदिर होते आमचे मुक्कामाचे नियोजन ठिकाण. शहानुर सोडल्यावर अकोट-हिवरखेड करत वारी गावापर्यंत पोचलो तेव्हा अंधार झाला होता. मुक्कामाचे ठिकाण जरी मनात होते तरी पर्यायी व्यवस्था म्हणून लक्ष इतरत्र ठेवून होतो. वाटेत ज्ञानेश आश्रम लागला. अंधारात मंदिर नीट कुठेसे ते दिसेना. त्यात रस्ता संपलेला दिसला. समोर एक बंद गेट दिसलं. उतरून जागा पाहिली तर कोणी नव्हतं. मग मागे फिरलो आणि थोड्याच अंतरावर मंदिराचं ठिकाण दिसलं. दोघेजण उतरून मंदिरापर्यंत गेलो तर समोर मंदिराचे बंद दार आणि कुलूप. पण आजूबाजूला तंबू टाकता येईल अशी जागा दिसली. शेजारी ओढा होताच. मग सगळा संसार घेऊन तिथे गेलो. थोडा प्रयत्न केल्यावर मंदिरातल्या लोकांना जाग आली. तसे ते जागे होतेच कामं करत. दुसर्‍या दिवशी काही कार्यक्रम होता. अपरात्री किंवा पहाटे अनेक लोक येणार होते. त्यांची व्यवस्था चालली होती. पाणी, राहण्यासाठी जागा, संडास वगैरे चौकशी झाल्यावर चर्चेअंतर्गत केतनने तिथल्या मोठ्या हॉलमध्ये झोपायचे ठरवले जिथे बाकीचे लोक येऊन झोपणार होते, तर आम्ही तंबूत. म्हणजे आम्हाला जवळच्या झाडांवरच्या माकडांचा, बाजूला असलेल्या वटवाघळांचा त्रास होण्याचा धोका, तर हॉलमध्ये झोपायला येणाऱ्या लोकांना केतनच्या कंठसंगीताचा.
असं कुठे बाहेर गेलं तंबूत वगैरे झोपायला, की जागे लवकर येतेच. त्यातून पहाटेस आलेल्या लोकांची लगबग चालू व्हायच्या आधीच आपापली कामे व्हावीत असा सुज्ञ विचार ब्राह्ममुहूर्तावर सुचल्याने पहाटे-पहाटे उठून मंदिराचे दरवाजे उघडायला लावून दंतमार्जन आणि महत्त्वाचे प्रात:र्विधी उरकून घेतले. बिना-अंघोळीचे का होईना, पण त्या प्रातःसमयी हनुमानाचे दर्शन घेतले. समर्थांना आणि हनुमंतालाही आम्ही अशा दर्शन घेण्याने संतोष जाहला असेल.
तर साडेसहाला त्या हनुमंताला टाटा करून गडाकडे जाण्यासाठी सगळा संसार गुंडाळून निघालो. गुगल मॅपवर “वारी भैरवगड” हा वान नदीवरच्या धरणाच्या बॅक वॉटर मध्ये दाखवलेला आहे, तिकडे पाण्यात उडी मारायला जायचं नाही. प्रत्यक्षात तो किल्ला जलदुर्ग नसून वारी गावात आहे. मंदिरात मुक्कामासाठी म्हणून वारी गाव ओलांडून काल रात्री आम्ही पुढे आलो होतो, तसंच आता मागे येऊन उजवीकडे गावात जाणाऱ्या वाटेने पायथ्याशी जाता येणार होते. मंदिरापासून अवघ्या पंधरा वीस मिनिटांवर हा किल्ला आहे. माझा संकष्टीचा उपास असल्यामुळे फक्त चहा पिऊन झाला आणि सकाळी सव्वा सातला गडाचे पायथ्यावरून दर्शन झाले.

भैरवगड दरवाजा
गाडी इथे लावून गडाच्या मागुन दर्शन देणाऱ्या उगवत्या सूर्याचे दृश्य कॅमेरात घेतले. दरवाजा दोन मिनिटात गाठून भाजीव विटांत बांधलेल्या सुबक बांधणीच्या दरवाजेही फोटो घेतले.
गडाचे तसे फारसे काहीच अवशेष शिल्लक नसले, तरी आश्चर्यकारकरित्या आणि सुदैवाने हा उत्तम दरवाजा मात्र अजून उभा आहे. दरवाजाला अनेक लहान-मोठी भगदाडं दिसतात. कदाचित तोफेच्या माऱ्याच्या त्या खुणा असाव्यात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे फक्त प्रवेशद्वार भाजीव विटांत आहे, तर इतर संपूर्ण किल्ला पांढऱ्या मातीत बांधलेला आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या मातीचेच बुरुज थोडे शिल्लक आहेत. साधारण वीसेक वर्षापूर्वी या कमानीला लाकडी दरवाजाही होता, पण आता तो शिल्लक राहिलेला नाही. याच कमानीतून आतमध्ये गेल्यावर समोरच क्षेत्रपाल भैरवनाथाचे नाविन्याने बांधून काढलेले मंदिर दिसले. दरवाजातून आत शिरल्या शिरल्या उजवीकडच्या बुरूजाजवळून दरवाजावरील नगारखान्याकडे जाता येते. नगारखान्यावरून संपूर्ण किल्ल्याचा भाग पाहता येतो. नगारखान्याच्या जंग्या व तोफांचा मारा करण्यासाठीचे असलेले दोन झरोके दिसतात. इथे विशेष काही शिल्लक राहिलेले नाही.

विहीर
 पायवाटेने जाताना मंदिराच्याआधी डावीकडे नदीलगतच्या बाजूला विहीर दिसते. या विहिरीला संरक्षक कठडा नाही आणि गवत-झुडपेही वाढलेली आहेत, तरी सांभाळूनच ती बघण्यास जावे.
 
भैरवनाथ मंदिर आणि मागचा बुरुज
नव्याने बांधलेल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या जागी पूर्वी फक्त एक ओटा होता आणि त्यावर भैरवनाथाचा तांदळा होता, नंतर या भैरवनाथाला मंदिर नव्याने बांधून त्यात विराजमान करण्यात आले. मंदिराच्या डावीकडे एक ओटा असून त्यावर देवीचा तांदळा आहे. ओट्यालगत एका लोखंडी पोलवर बांगड्या दिसतात, गावकरी नवस म्हणून त्या वाहतात. या मंदिराच्या मागे एक बुरूज आहे. सगळीकडे पांढरी मातीच आहे. प्रदक्षिणा मार्गाने दरवाजापर्यंत येताना अजुन एक बुरुज दिसला.
 
बुरुजावरून भैरवनाथ मंदिर आणि गडाचे प्रवेशद्वार
निवांत फिरुन फोटो काढत हा किल्ला वीस मिनिटात बघता येतो. या किल्ल्याची उभारणी गौड राजाने केली केली असे मानले जाते. बांधणी पांढऱ्या मातीत करण्याचे कारण म्हणजे दगडांचा अभाव आणि आर्थिक दुर्बलता. पण या मातीचा फायदा असा की शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी त्याच्या भिंतीवरून पाणी सोडल्यास तोफगोळे त्या चिकणमातीत रुतून बसतात आणि सुरुंग निकामी होतात. (संदर्भ: दुर्ग दौलत महाराष्ट्राची, लेखक – भगवान चिले)
पोळ्याच्या दिवशी पोळा सुटला की घरी जाण्याआधी सगळे बैल भैरवनाथांच्या दर्शनासाठी या किल्ल्यात आणले जातात. या किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर तीन समाधी आहेत, त्या अप्पाराजा हा गौड राजा, त्याची पत्नी व मुलगी यांच्या “जायरात” असल्याचे गावकरी सांगतात. (संदर्भ: डॉ. जयंत वडतकर)
गड फिरून खाली आलो तेव्हा जेमतेम पावणेआठ झाले होते.
 
मैलगड
पावणे दहाच्या सुमारास आम्ही मैलगडाच्या पायथ्याच्या गावात पोचलो. गावातूनच लांबवर मैलगडाचे दर्शन होते.
वारीतून जळगाव-जामोद, सुनगाव वरून “गोदळा” धरणाच्या बाजूने रस्ता गारपेठ जवळून हनवतखेड जवळ येतो. हनवतखेडचे प्रायमरी स्कूल लागते जिथे उजवीकडे वळल्यावर रायपूर गावात येतो. वस्तीचे हे शेवटचे ठिकाण आहे. इथेच गाडी लावली. लांबूनच सुंदरसा बुरुज आपल्याला दिसतो. त्याच्या बाजूची तटबंदी आणि त्यावरच्या चर्या दिसतात.
किल्ला समोरच दिसत असला तरी रस्ता नेमका कसा असेल ते गावकऱ्यांना विचारून घेतले. किल्ला नजरेसमोर ठेवत उजवीकडच्या वाटेने २-3 टेकाडं चढावी लागतात. वाट तशी मळलेली आहे, ती आपल्याला साधारण समजत जाते. उजवीकडे जाऊन नाकाडावरून सरळ बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेचा अंदाज काढत रुक्ष भागातून आपण झाडांमधून पायथ्याशी पोहोचतो. ३०-४० मिनिटात किल्ल्याच्या दरवाज्यापाशी आपण येतो. प्रवेशभाग खुपसा ढासळलेला आहे. डावीकडे दरवाजाचे अवशेषही दिसतात. मधून जाणार्‍या पायर्‍यांनी सरळ वर जाता येते तर डावीकडे बुरुजावरही जाता येते. पुढे उजवीकडे भाजीव विटांचे बांधकाम दिसते, हा प्रवेशद्वाराचाच भाग असावा. भग्न अशा दरवाजातून आपण वर पोहोचतो.

प्रवेश भाग आणि भाजीव विटांतील बांधकाम
 आपण लांबून बघत असलेला देखणा बुरुज उजवीकडे ठेवत आपण वर आलेलो असतो. त्या बुरुजावर जायची सगळ्यांनाच ओढ होती, पण संपूर्ण किल्ला बघणे महत्त्वाचे असल्याने प्रदक्षिणा मार्गाने गडफेरीला सुरुवात केली. वाटेत अपेक्षित असे खड्डे लागले जे बऱ्याच किल्ल्यांवर गुप्तधन सापडेल अशा आशेने खणलेले सापडतात. या गडाची विस्तृत अशी माहिती व नकाशा आमच्याकडे नसल्याने जे काही पाहायचे होते ते शोधत शोधतच. गडफेरीला सुरुवात केल्यावर दहा मिनिटातच पाण्याचे जोडटाके दिसले. पुढे अजुन एक टाके दिसले. त्यापुढचे टाके झाडांमध्ये खाली लपलेले होते. त्यापुढे परत दोन खांबी टाके दिसले. साधारण दोन-दोन मिनिटाच्या अंतरावर अशी टाकी दिसली होती गेल्या दहा मिनिटात. त्यापुढचे बांधकाम हे टाके आहे की राहण्यासाठी खोदलेली गुहा हे समजणे कठीण होते. एक तर बर्‍याच गोष्टी या खूपशा प्रमाणात बुजलेल्या आहेत.

गडावरील टाकी
या दोन खांबी टाक्यात मात्र भिंतीवर नावांच्या स्वरूपात इथेही लोक येत असल्याच्या खुणा होत्या. खांबांना तडे गेलेले असले तरी त्यावरची नक्षी मात्र शाबुत होती. हेही टाके कातळकोरीव होते.

अर्धगोलाकार टाके
त्यापुढचे टाके खासच होते होते. अर्धगोलाकार आकारात खोदलेल्या या टाक्यात चार खांब आहेत. बऱ्याच प्रमाणात त्यांची झीज झालेली असून त्यांचे आकारही बदललेले आहेत. हेही टाकं कोरडं होतं. इथे फोटोग्राफी करण्याचा मोह आवरला नाही.
अजून गुप्तधन-खड्डे ओलांडल्यावर तटबंदीचे अवशेषही दिसतात, परंतु ते शोधून काढावे लागतात, गवताखाली ते लपलेले आहेत. पुढे अजून एक लांबच लांब दगडात कोरलेले टाके दिसते परंतु ते गाळाने भरून गेले आहे. आम्ही आधे-इधर आधे-उधर असे अक्षरशः उंडारत एक-एक अवशेष शोधून काढत होतो.

गडावरील अजून टाकी
तीस-चाळीस मिनिटात सात-आठ टाकी तरी दिसली होती, पण सगळी कोरडी आणि गाळाने बुजलेली. अशावेळी एक टाकं सापडलं ते पाण्याने भरलेलं, चार खांबी टाकं, तेही नितळ पाण्याचं, अगदी तळ सहज दिसणारं. त्यानंतर लागला टाक्यांचा समूह, बहुतांशी बुजलेला-कोरडा. पुढे अजून एक खांब टाके बऱ्यापैकी बुजलेले, साधारण 80 टक्के बुजलेल्या टाक्यात खांबाचे अगदी वरचे दिसत असलेले भाग.

तटबंदीचे अवशेष
अजुन टाकी बघत बघत 80 टक्के प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. कडेकपारीला धरून गडाची काही तटबंदी शिल्लक दिसत होती. तिथेही तटबंदीच्या काही दगडांना भगवा रंग दिलेला दिसत होता. परत टाकी. किल्ला टाके-समृद्ध वाटत होता. पंधरा-एक तरी लहान मोठी टाकी दिसली होती आम्हाला. ह्यातच कुठलंतरी टाकं सासू-सुनेचं म्हणून प्रसिद्ध आहे. हे जोडटाकं असून यातल्या एका कपारीतलं पाणी गरम, तर एकातलं थंड असतं असं गावकरी सांगतात. पण सध्या मधली भिंत पडली असून सगळंच पाणी थंड आहे. या गडावरून पाण्याचा एक उपसर्ग आहे, त्याचं outlet पंधरा किलोमीटर अंतरावरच्या मोहिदपुर इथे आहे. गडावरून पाण्यात लिंबू टाकलं तर ते मोहिदपुरला बाहेर निघायचं. सध्याही इथे पाण्यात नीळ टाकली तर मोहिदपुरला नीळं पाणी येतं असं स्थानिक लोक सांगतात. (संदर्भ: “महान्यूज” विवेक चांदरकर)
हे सर्व बघून झाल्यावर गावातून खालूनच खुणावणारा सुंदर बुरुज समोर आला. संपूर्ण प्रदक्षिणा मारून झाल्यावर तो बुरुज आम्ही बघणार, तोच वाटेत एका गोष्टीने सगळ्यांनाच खिळवून ठेवलेन. आम्ही सगळे आधी तिकडे धावलो. फोटोग्राफी सुरू झाली. त्या गोष्टीचे फोटो, “त्या”च्याबरोबर फोटो, Top-View, Side-View, 360° View सगळं झालं.
काय जबरदस्त गम्मत होती ती म्हणजे... पण थांबा. आधी बुरूज बघू.

बुरुज
इतर संपूर्ण किल्ला टाके गुहा सगळे कातळकोरीव आहे, पण हा बुरुज मात्र काळ्या दगडांनी बांधून काढलेला आहे. तसा हा जोड-बुरुज आहे. खूपसा भाग बुजलेला तर खुपसा ढासळलेलाही आहे. तरी बऱ्यापैकी जंग्या सुरक्षित आहेत. खालून भव्य दिसणाऱ्या बुरुजाचे वरून तसे दर्शन होत नाही, त्यासाठी बुरुजाच्या खाली जावे लागते. तास-सव्वातासात किल्ला आम्ही पिंजून काढला होता.

बुरुज: खाली उतरल्यावर
खाली उतरायला सुरुवात केली तर तोच बुरुज एवढा दिसायला लागला. अवघ्या पाच-सहा मिनिटापूर्वी आम्ही त्या बुरुजावर होतो, आता खालून तो बुरुज भव्य आणि अभेद्य वाटत होता.
अरे हो गंमत राहिलीच की! गाविलगडाची ओळख शार्दुल दरवाजा. नरनाळ्याची महाकाली दरवाजा, अशी भव्य दिव्य ओळख. पण त्या दोन्ही किल्ल्यांवर त्यांची ओळख म्हणून असलेली वास्तू भव्य होती, इथली ही गोष्ट म्हणजे एकदम छोटीशी होती. पण ती छोटीशी गोष्ट या गडाची ओळख बनल्ये किंबहुना इतर कुठेही न आढळणारी हि गोष्ट म्हणजे दगडात कोरलेला किल्ल्याचा नकाशा. आता हा नकाशा याच किल्ल्याचा आहे का दुसऱ्या किल्ल्याचा हे काही सांगता येणार नाही.

किल्ला प्रतिकृती
पण या छोट्याशा प्रतिकृतीला काय नाही? सुंदर कातळकोरीव पायऱ्या आहेत, बुरुज आहे, दरवाजा आहे, टाकीही आहेत. बालेकिल्ला आहे, तटबंदी आहे, एवढेच नाही तर परकोटाची भिंतही आहे.. वा!
एखादी भव्य कलाकृती आपल्याला तिच्या भव्यतेने दिपवून टाकते, तिच्यापुढे आपले खुजेपण आपल्याला दिसू लागते, पण भव्य कशाला, एखादी खूपच छोटीशी गोष्ट आपल्याला प्रेमात पाडते, आपल्याला मोहून टाकते. त्यातलीच ही एक कलाकृती आहे. आपल्याकडे दिवाळीत लहान मुलांनी किल्ले बनवायची एक प्रथा आहे तसेच कदाचित यावेळी गडावर राहणाऱ्या मुलांनी तर हा किल्ला केला नसेल? एवढी अप्रतिम कलाकृती कोणाला नाही भावणार? आणि मला त्यातला आवडलेला भाग म्हणजे ती ज्या दगडात कोरलेली आहे त्या दगडाला चिकटून असलेल्या दगडापासून वेगळासुद्धा केलेला नाही. नाहीतर कदाचित आत्तापर्यंत तो किल्ला कोणाच्या तरी घरी रंग देऊन शोकेस मध्ये बसलेला सापडला असता. दिल खुश झाला होता. आमच्या विदर्भाच्या भटकंतीतला डोंगरी म्हणावा असा हा शेवटचा किल्ला होता.
उतरताना वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला. नाही तर सकाळपासून तसं काहीच खाल्लं नव्हतं. अवघ्या अर्ध्या तासात आम्ही परत गावात आलो. आता खरा परतीचा प्रवास चालू झाला, कारण आमच्या लिस्टमध्ये होते ती फक्त आता एक गढी आणि नगरकोटाची उरली पुरली वेस.
आमच्या वैदर्भिय भटकंतीचा हा भटकंतीचा हा चौथा आणि शेवटचा दिवस होता. आम्ही जवळपास दहा किल्ले पाहिले. विदर्भ खूप काही बाळगून आहे, पण आम्हाला या मर्यादित वेळेत एवढंच बघत आलं होतं. विदर्भाची माझी तरी ही पहिलीच खेप होती.
“रोहिलगड” अशा अपरिचित किल्ल्यांपैकी एक अशाने सुरुवात करून आमची सांगता झाली ती अत्यल्प परिचित आणि एक अतिशय युनिक गोष्ट बाळगून असलेला मैलगड किल्ला याने.
येताना खामगावची शिवाजी वेस (दरवाजा) आणि नागपूरकर भोसल्यांनी गोंधणपूर गढी असे 2 छोटेसे स्टॉप घेऊन आम्ही पुण्याकडे रवाना झालो.


12 comments:

  1. Very fascinating description of practically a ruin...although these r the ruins of two forts. The real credit goes to the writer who has made it so interesting. By Shrikant Oak

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Shrikant.
      But beauty lies with its creator. Im just who described.

      Delete
  2. सुंदर लेख ओंकार ...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अजय, आपल्यासारख्या अभ्यासू लोकांच्या प्रतिक्रिया नक्कीच लेखन करण्याची प्रेरणा देतात :)

      Delete
  3. Nice one! As always like photos. They are well captured.

    ReplyDelete
  4. खूप छान वर्णन!!प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद मिळाला!!👌

    ReplyDelete
  5. मी भैरव गड बद्दल माहिती शोधत असताना मला तुमची पोस्ट दिसले त्यावरून मी तुमच्या पोस्टद्वारे त्या किल्ल्याचा इतिहास पाहण्याचा प्रयत्न केला.

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या लेखात इतिहास फारसा लिहिलेला नसतो कारण मी इतिहासावर अभ्यास केलेला नाही. जो काही इतिहास मध्ये मध्ये लिहितो तोही काही reference पुस्तकातून वाचलेला असतो.
      पण भटकंतीसाठी माझे लेख उपयोगी पडतील अशी आशा आहे. आणि कृपया आपले नांव अभिप्रायाखाली लिहायला विसरू नका.
      धन्यवाद :)

      Delete
  6. Me जळगाव जामोद तालुक्या मधीलच आहे पण मला अजून भैरव गड बद्दल माहिती नव्हतं धन्यवाद खूप छान माहिती दिली

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! 😊
      कृपया Gmail ने login करून आपली प्रतिक्रिया द्या, अथवा त्याखाली आपले नांव लिहा. अनामिक म्हणून आपली प्रतिक्रिया दिसते आहे.

      Delete