वैदर्भीय भटकंती होऊन जरा ऑफिसात तोंड दाखवतो आहेत तोच परत शनिवार-रविवार जोडून ट्रेक-योग कॅलेंडर दाखवत होता. असे सलग ट्रेक-योग क्वचितच असतात, त्यामुळे
अगोदरपासूनच हेरून ठेवलेला हा योग सत्कारणी लागलाच पाहिजे ह्याचं नियोजन विदर्भातून
परत येतानाच करून ठेवलेलं होतं. भिडु तर आधीपासूनच तयार होते. यावेळी विदर्भाइतकं
लांब जायचं नसलं, तरी मनमाड जवळपास म्हणजे पुण्यापासून तीनशे किलोमीटरच्या आसपास
जायचं होतं. त्यामुळे रात्रीचा प्रवास करून कुठेतरी डेरा टाकायचा आणि सकाळच
गडाच्यावर पोचून त्याला सरप्राईज द्यायचं असं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे
ब्राह्ममुहूर्तावर राजधेर वाडीतल्या मंदिरात देवाला दर्शन दिलं. डिसेंबरच्या
शेवटच्या आठवड्यात असलं काहीतरी करायची आमच्या अंगात जणू मस्ती होती. अर्थातच
थंडीने आपला तडाखा आम्हाला दाखवायला सुरुवात वाडीत शिरता शिरताच केली होतीन.
बहुतेक सगळी हाडं आतल्या-आत थंडीने खुळखुळ्यासारखी वाजत असावीत. मंदिराच्या आतमध्ये
झोपायचं असूनसुद्धा आम्ही तंबू टाकला आणि त्यातही स्लीपिंग बॅग घेऊन त्याच्या आतमध्ये
शिरलो. पण थंडीला हे सगळे अडथळे अगदीच साधे होते त्यामुळे अगदी अंगा-प्रत्यांगात
ती शिरली होती. सकाळी सहाला उठताना प्रत्येकालाच घरी मस्त पांघरुणात गुरगुटुन
झोपायचं सोडून इथे काकडत झोपणे आणि डोंगरावर उंडगत फिरणे असले डोहाळे लागण्यामागे
आपल्या अंगातली मस्तीच कारणीभूत आहे याची सारखी जाणीव होत होती. पण मस्तीला पर्याय नव्हता,
ध्येय तर समोर होतंच.
वेळेवर उठून, आटपून थोडं हलकं होऊन तरंगत जाधव मामांच्या घरी पोचलो. आज आणि
उद्यासाठी ते आमचे म्होरक्या म्हणून धुरा वाहणार होते. आता राजधेरवाडीतून सरळ
राजधेर बघायचा आणि निघायचं हे साधं सोपं गणित आम्ही सोडलं. कारण? मस्ती! ती कुठं
कमी होती अंगात? आम्ही कोळधेर पण करायचं ठरवलं होतं. इथे येऊन राजधेर करून जाणारे
खूप जण आहेत पण कोळधेरच्या वाटेला फार कमी जण जातात. पण कोळधेरला आमचे पाय लागायचे
हे विधिलिखित होतं. कोळधेरला जायच्या दोन वाटा आहेत - एक तांगडी गावातून, तर दुसरी
आम्ही जात होतो ती, म्हणजे राजधेरवाडीतून.
राजधेरवाडीतून उजव्या हाताला आपल्याला
राजधेर कायम दिसत असतो तर डाव्या हाताला बघितल्यावर इंद्राई दिसतो. जिथे जायचं तो कोळधेर
मात्र कुठूनच दिसत नाही. तो एका डोंगराच्या मागे लपलेला आहे. वाडीतून राजधेर
किल्ला उजव्या हाताला ठेवत गावाच्या कडेकडेने बकऱ्या चारायला लोक नेतात त्या
वाटेने समोरच्या पठाराकडे जात राहायचे. या पठारावरून जाताना वाटेत एक हनुमानाचे
मंदिर दिसते, तिथे एक झेंडा पण रोवलेला आहे. त्याच्या मागे आपल्याला एका डोंगराचं
टोक दिसायला लागतं. पण हाही कोळधेर नाही. हा डोंगर म्हणजे कोल्ह्याचा डोंगर. मात्र
त्याला समोर ठेवूनच जात राहिल्यावर, पठार संपल्यावर, उजवीकडे आपल्याला कोळधेर डोकावताना
दिसतो. जसं पठार संपत जातं तसतसा त्याचा अजस्त्र अवतार आपल्याला दिसायला लागतो. पण
ह्या कोळधेरकडे जाताना वाट सरळ नाहीये. एका दरीला पूर्ण वळसा मारून आपल्याला
त्याच्या पायथ्यापर्यंत पोचावं लागतं. इथपर्यंत
यायला वाडीतून आपल्याला साधारण दीड तास लागतो.
कोळधेरच्या खिंडीतला मारुती - मागे राजधेर आणि इंद्राई |
इथे खिंडीत आल्यानंतर गडाचा खरा पायथा लागतो.
इथे एक मारुतीची मूर्ती उघड्यावरच ठेवलेली आहे आणि शेजारी भगवा लावलेला आहे. इथपर्यंत आपण पहिला टप्पा पार
केलेला असतो. पुढे गडाकडे वर जाणाऱ्या मार्गावर पंधरा मिनिटानंतर डावीकडे आडव्या
जाणाऱ्या पायऱ्या दिसायला लागतात. तिथेच पुढे वर जाणाऱ्या दोन-चार पायऱ्या
ओलांडल्यावर एक पाण्याचं टाकं लागतं. हे कोरडंच होतं. इथे येण्यासाठी ठराविक अशी
मळलेली पायवाट नाहीये. अंदाज काढत काढतच इथपर्यंत पोहोचला लागतं. इथून मागे
बघितल्यावर आपल्याला राजधेर आणि पसरलेला इंद्राई दिसतो. पुढे आपल्याला पायऱ्या लागतात,
त्या चढून गेल्यावर एक कातळकडा आहे. जो गडाचा शेवटचा टप्पा आहे. यावर
आपल्याला प्रस्तरारोहणाच्या साहित्याशिवाय जाता येणं शक्यच नाही. पण गडाचे जवळ जवळ
सगळेच अवशेष ह्या कड्याला लागुनच आहेत. त्यामुळे हे अवशेष बघायला
सुरुवात करायची.
पहिली गुहा - मागे इंद्राईचा विस्तार |
गुहेच्या छताला असलेले पोपयाच्या बियांसारखे दिसणारे किडे/अंडी |
दुसरी गुहा - दुभागणारी भिंत आणि त्यात देवळी |
आम्ही अवशेष पाहण्यासाठी त्या कड्याला प्रदक्षिणा
मार्गाने सुरुवात केली. इथे पहिली गुहा लागली. गुहेच्या छताच्या भागाला बघितलं
तर पपईच्या बिया दिसतात तशी कुठल्यातरी किड्यांची अंडी किंवा तसंच काहीतरी पूर्ण
छताला आत मधून दिसलं. प्रदक्षिणा चालू ठेवली आणि इथे वाटेत एक-दोन छोट्या-मोठ्या
गुहा आणि कोरडी टाकी दिसली. एका गुहेत मात्र ती गुहा दुभागाणारी एक भिंत शाबूत आहे.
त्या भिंतीत एक देवळीही आहे, हि गुहा ओलांडून तसंच पुढे आल्यानंतर कोळधेर
आमच्या बरोबर मागे राहिला आणि त्याच्या पलीकडे राजधेर. या टोकावरून जे दृश्य दिसतं
ते म्हणजे अहाहा...
समोरच पहिला कोल्ह्याचा डोंगर, त्याच्या
धारेवरून पलीकडे उतरणारा एक मार्ग. तो दुभागून त्याच्या जणू पोटातून उजव्या बाजूला आलेला
गाड्यांचा महामार्ग. पलीकडे कांचन-मंचन, इखारा सुळका, हंड्या-बंड्या, धोडप असं
अप्रतिम दृश्य ह्या टोकावरुन दिसलं. इथे आम्ही मनसोक्त फोटो काढले.
कोळधेर वरून अद्भुत नजारा |
एवढा प्रचंड नजारा इथून दिसतो याचाच अर्थ
टेहळणीच्या दृष्टीने कोळधेर हे खूप महत्त्वाचे ठिकाण असावे, किंबहुना हा
टेहाळणीसाठीच बांधलेला किल्ला असावा.
शंकराची पिंड, त्यावर नैसर्गिक अभिषेक |
प्रदक्षिणा पुढे चालू ठेवली. एक शंकराची
पिंड लागली. या पिंडीवर कातळामध्ये एक कपार आहे तिथून कायम जलाभिषेक होत
असतो. गावकर्यांनी इथे एक ध्वज आणि घंटा लावून ठेवलेली आहे. इथेच आजुबाजूला
किल्ल्यावरच्या वाड्यांचे किंवा इतर असे घडवलेले दगड पडलेले आहेत. प्रदक्षिणा पुढे
चालू ठेवताना असाच एक शेंदूर फासलेला अनगड देव लागतो. असे फिरत फिरत आपण परत राजधेरच्या
बाजूला येऊन पोचतो. इथून राजधेरचे किती फोटो काढू आणि किती नको असं होतं. आता आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करून आलो
होतो. इथून खाली उतरायला सुरुवात केली आणि वाट वाकडी करून थोडं उजव्या बाजूला गेलो
ते एक टाकं बघण्यासाठी. याच्यात मात्र पाणी शिल्लक होतं. इथून कोळधेरचा कातळ कडा
फारच चांगला दिसतो. आमचा कोळधेर बघून झाला होता. आता राजधेर बघायचा होता.
पायथ्याचंं टाकं आणि गडाचा कातळकडा |
राजधेरवर जाण्यासाठी परत दोन पर्याय
शिल्लक होते, एक म्हणजे सरळ राजधेरवाडीत परत जायचं आणि तिथून सोप्या मार्गाने राजधेर
गाठायचा. नाहीतर कोळधेरवरून पूर्ण ट्रॅव्हर्स मारून राजधेरच्या पायथ्याशी जायचं.
आम्ही दोन्ही वाटा बघायला मिळाव्यात म्हणून सरळ राजधेरवाडीत न जाता ट्रॅव्हर्स मारून राजधेरच्या पायथ्यापर्यंत निघालो. इथे जाण्यासाठी परत आपण कोळधेरला येताना
जो वळसा मारून आलो तो जसाच्या तसा परत मारून पठारावर जावं लागतं. इथून वाट वेगळी
फुटते जी राजधेरकडे जाते. सकाळची थंडी केव्हाच मागे पडली होती आणि उन भयंकर लागत
होतं. आता राजधेरच्या खिंडीत आलो तेव्हाच पावणेबारा झाले झाले होते, वाटेत जराशी
विश्रांती घेत तब्बल तासाभराने आम्हाला राजधेरच्या पायथ्याशी एक पत्रा दिसायला लागला, इथे एका दगडाला शेंदूर फासलेला आहे आणि
शेजारी त्रिशूळ व घंटा असं लावून पद्धतशीर मंदिर तयार केलेले आहे. हा झाला राजधेरचा
पायथा. आता खडी चढण चढून आम्हाला राजधेरच्या शिडीपर्यंत पोचायचं होतं, साधारण
अर्ध्या तासाने एक मोठ्ठ्या पठारावर आम्ही आलो. समोर राजधेर दिसत होताच, पण आता
डावीकडे नजारा होता तो म्हणजे मगाशी पाहिलेले सगळे डोंगर-सुळके आणि कोळधेर.
आम्ही गेलो ती डुगडुगणारी शिडी आणि सध्या असलेला नवीन जिना |
इथे फार वेळ न घालवता राजधेरकडे जायला
लागलो आणि काही वेळातच आम्हाला लांबवर ती प्रसिद्ध शिडी दिसायला लागली. झप-झप
पावले उचलली आणि लगेच शिडीजवळ पोहोचलो, इथे शिडी
नसती तर दोर आणि प्रस्तरारोहण याशिवाय काही पर्याय नव्हता. पण शिडी लावून
इथलं महत्त्वाचं काम लोकांनी केलेलं आहे. शिडीची अवस्था थोडी वाईट झालेली होती.
आधीच ती डगमगत होती, त्यात काही पायऱ्या लोखंडाच्या पडून तिथे लाकूड बांधलेलं होतं,
तर काही पायऱ्या शिल्लक राहिल्याच नव्हत्या. अशा डगमगत्या शिडीवरून एकेक करत सगळे
जण गडाच्या पहिल्या दरवाजात दाखल झालो. इथे मात्र सरळ पायऱ्या वर जाताना दिसतात, भिंतीवर एक
फारसी भाषेतला लेख लिहिलेला आहे, ह्या लेखामध्ये
अलवर्दी खानाने इंद्राई व चांदवड सोबत राजधेरचा हा किल्ला देखील जिंकला असं लिहिलेलं
आहे. पूर्वी गावकऱ्यांमध्ये अशी समजूत होती कि ह्या किल्ल्यावर प्रचंड धन दडवलेले असून
ह्या गूढ अक्षरातील लेखात त्याची माहिती दिलेली आहे.
फारसी भाषेतील शिलालेख |
आम्ही गेलो तेव्हा आणि आत्ता ब्लॉग लिहित असलेला ह्यात गेलेला वेळ, ह्या काळात येथे ती डगमगती शिडी बाजूला करून
चांगला पक्का अगदी एखाद्या घराच्या गच्चीवर जायला असतो तसल्या प्रकारचा जिना
लावलेला आहे आणि राजधेरवाडीतून चांगला रस्ताही केलेला आहे.
गडावरच्या पायऱ्या |
उजव्या बाजूला दिसणाऱ्या पायऱ्यांवरून
आपण गड बघायला सुरुवात करायची. तिथे पुढे आम्हाला एक गुहा दिसली, या गुहेत
भिंतीत चक्क बसायला आणि टेकायला बाकडं असावं असं काहीतरी स्ट्रक्चर बनवलेलं आहे.
या गुहेतून बरोबर समोर इंद्राईचा प्रचंड पसरलेला नजारा आपल्याला दिसतो.
भग्न दरवाजाचे कसेबसे तग धरून असलेले अवशेष |
पायर्यांनी वर चालू लागल्यावर जिथे
पायर्या संपतात, म्हणजे स्पष्ट आणि व्यवस्थित असलेल्या पायऱ्या संपतात, तिथे आपण
एका दरवाजात शिरतो. त्या भग्न दरवाजाचे अवशेष आणि शेजारची तटबंदी शिल्लक आहे, उरल्यासुरल्या
दगडांवर निवडुंगाचे फड वाढलेले आहेत. डाव्या बाजूने अवशेष बघायला सुरुवात करत एका
मोठ्या कातळभागावर आम्ही येऊन पोचलो. त्या कातळावर चढल्यावर डाव्या बाजूला खालच्या
बाजूला एक थडगं दिसलं. या थडग्याला पांढरा रंग लावून ठेवलेला आहे. मागे वळून
बघितलं तर आम्ही ज्या बाजूला आलो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला एक काहीतरी वास्तू
दिसत होती, पण हे आम्हाला नंतर बघायचे होते. सध्या आमची फेरी डावीकडून तिथे येणार
होती. आम्ही ज्या कातळावर होतो त्या कातळावर वरतीच एक गोलाकार घुमट असलेली वास्तू
आहे, ते नेमकं काय आहे हे मात्र लक्षात आलं नाही.
कोठारसदृष गुहा |
या वास्तूच्या आधीच उजव्या हाताला दगडात
खालच्या बाजूला कोरलेल्या दोन कोठ्या आहेत. ह्या कोठ्या दुभागणारी एक दगडी भिंत
मध्ये आहे आणि याच्या आत उतरण्यासाठी एक लाकडाची शिडी ठेवण्यात आलेली आहे.
तिथे सध्या तरी कोणी दिसत नव्हतं, पण आधी एक कोणीतरी योगीपुरुष तिथे राहत होते
किंवा अजूनही राहतात. ह्यांनीच गावकऱ्यांच्या मदतीने हि लाकडी आणि खालची 40 फुटाची
लोखंडी शिडी केलेली आहे, अशी आम्हाला माहिती मिळाली. आत त्यांना
झोपण्यासाठी म्हणून व्यवस्थित बाज वगैरे आणून ठेवलेला आहे.
या कातळ टप्प्यावरच काही पायऱ्या खोदलेल्या दिसतात. इथून
पुढे एक आम्हाला टाकं दिसलं ज्याच्यात अतिशय स्वच्छ पाणी होतं, ह्या खांबटाक्याला
लागुनच एक छोटं टाकंही आहे. ते मात्र कोरड होतं. पुढे जाताना डाव्या बाजूला एक प्रचंड मोठा तलाव लागला ज्यात भरपूर पाणी होतं.
तलावाजवळचे शंकराचे मंदिर |
जवळच चार-पाच कातळ्यातल्या पायऱ्या
दिसल्या, जिथुन गेल्यावर पुढे एक शंकराचं मंदिर लागलं. या मंदिराचे बांधकाम
विटांनी केलेलं आहे. इथून मागे तलाव आणि पलीकडे इंद्राईचा विस्तार असं दृश्य फार मोहक दिसतं.
पाण्याची टाकी |
पुढे फिरताना वाटेत काही चौथरे दिसतात,
तर अजून एक दोन कोरडी टाकी दिसतात. त्या पुढचं टाकं दिसलं त्यात मात्र अतिशय
स्वच्छ पाणी होतं. आधी कितीही पाणी प्यायलेलं असलं तरी असं नितळ, स्वच्छ टाकं
दिसल्यानंतर त्यातलं पाणी प्यायचा मोह आवरत नाही.
T-Shaped टाकं - ज्याचा पूर्ण फोटोही घेता येत नाही |
हे टाकं पाहून झाल्यानंतर जे आम्हाला टाकं
दिसलं ते म्हणजे या राजधेर किल्ल्याची ओळख म्हणता येईल. सगळ्याच किल्ल्यांवर बरीच
टाकी असतात, अतिशय सुंदर-सुंदर खांबटाकीही असतात. या किल्ल्यावरही टाकी आहेत, पण ह्या
टाक्याची बात काही औरच. इंग्रजी T अक्षराच्या आकारातील हे टाकं नेमकं कशासाठी
अशाप्रकारे बनवलं असावं ते काही कळत नाही पण त्याचं सौंदर्य मात्र जबरदस्त. T मधली
उभी रेषा म्हणजे इतकी लांब आणि उंच कि त्याच्यातनं आपण सहज चालत जाऊ शकतो आणि वरून
कोणाला दिसणारही नाही. त्याच्यानंतर T ची वरची आडवी रेषा म्हणजे टाकं. त्याच्यात
खांब आणि पाणी आपल्याला दिसतं.
पुढे फिरताना आम्हाला अजून एक टाकं लागलं
जे खूप सुंदर होतं. एकदम परफेक्ट आयताकृती टाक पाण्याने ओतप्रोत भरलेलं होतं. त्यापुढे वाड्याचे अवशेष असणारी एक भिंत
दिसली. ज्याच्या डावीकडे अजून एक टाकं होतं ते पाण्याने भरलेलं होतं आणि आतमध्ये
एक खांब होता.
आम्ही परत त्या घुमटाकार वास्तूच्या इथे
आलो होतो. किल्ल्यावरचे सगळ्यात वरच्या टप्प्यातले सगळे अवशेष बघून झाले होते. पण गडाच्या
माचीवरची एक वास्तू बघायची आम्ही ठेवलेली होती, ती म्हणजे या राजदरबारातील सदर. जी
आम्हाला आधीपासूनच वरून दिसत होती. हि सदर म्हणजे एक मोगल स्थापत्यकलेचा सुंदर
नमुनाच आहे.
गडाची अप्रतिम कलाकुसरयुक्त सदर |
गडाच्या माचीवर हा एकमेव अवशेष शिल्लक
आहे. गावातले लोक याला किल्लेदाराचा वाडा असे म्हणतात. या वास्तूच्या दर्शनी बाजूस
तीन कमानी आहेत ज्या कमानी उत्तम प्रकारच्या नक्षीदारीसह घडवलेल्या आहेत.
कमानीच्या मधले दोन्ही आणि बाजूच्या भिंतीतले दोन असे खांब उत्तम प्रकारे घडवलेले
आहेत, तर मधल्या कमानीच्या वरती एक कमळ कोरलेलं आहे. मधल्या कमानीच्या बरोबर मागे
आत मध्ये भिंतीत अजून एक कमान कोरलेली आहे, ही कमानही
नक्षीदार आहे तर बाजूस असलेल्या कमानी मात्र सुबक असल्या तरी नक्षीदार नाहीत.
पाच वाजून गेले होते. परतीच्या प्रवासाला
सुरुवात झालेली होती. आल्यावाटेने पायऱ्यांनी परत शिडीजवळच्या दरवाजावर पोहोचलो.
आता मात्र शिडी उतरताना निवांतपणा असल्याने त्यात डगमगत्या शिडीचा थरार अनुभवत
फोटोही काढून घेतले. गावकर्यांनी त्या शिडीच्या पायथ्याशी काही गुरं चारायला
आणलेली होती. काहीच दिवसांपूर्वी बिबट्याने इथे बैल किंवा तत्सम जनावर मारल्याचे
त्यांनी आम्हाला सांगितलं. इथेच गडाच्या कातळकड्यात डाव्या हाताला एक पाण्याचे टाकं
किंवा गुहा आहे. यात तीन कमानी आहेत आणि टाक्यात पाणी आहे. याच्यापुढे आणखीन एक कोरडं
जोडटाकं दिसलं. आता मात्र गडाचे सगळे अवशेष व्यवस्थित पाहून झाले होते.
राजधेर आणि मावळतीचा सूर्य |
राजधेर किल्ला पाठीमागे ठेवून राजधेरवाडीकडे
उतरताना समोरच इंद्राईच्या पायथ्याशी तलाव आणि मावळतीच्या सुर्याचे किरण
अप्रतिम दिसत होते. मागे वळून पाहिलं तर राजधेरची लांबवर पसरलेली भिंत दिसत होती. डाव्या
बाजूला हळूहळू डोंगराच्या खाली जात सूर्याने आमचा निरोप घेतला.
गावात खाली पोहोचलो. तिथे ठेवलेल्या काही
स्मृतीशिळा बघितल्या. रात्रीचे जेवण जाधव मामांकडेच होतं. आज मात्र झोपायची सोय
गावकऱ्यांनीच आमच्यासारख्या पाहुण्यांसाठी केलेल्या एका खोलीत झाली होती. त्यासाठी
भाडं लाऊन उत्पन्नाची सोयही ग्रामपंचायतीने केलेली आहे. अर्थात ती सत्कारणी
लागल्याचे आम्हाला लगेच दिसले. उरलेल्या वेळात इतरत्र फिरलो तर गाव कमालीचं स्वच्छ
ठेवलेलं आम्हाला दिसलं. अंधार पडल्यावर फार वेळ न काढता जाधव मामांकडच्या जेवणावर
आडवा हात मारून आमचीच वाट बघत असलेल्या त्या खोलीत थंडीची काळजी न करता पांघरुणात
गुडूप झालो.
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!! |
खुप सुंदर लेखन!
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteApratim
ReplyDeleteवाऽऽ मजा आली वाचताना...मागच्या वर्षी आमच्या सातमाळा डोंगरयात्रेच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा कोळधेरचा भलामोठा राॅकफाॅल ओलंडताना केलेली कसरत आठवली...जवळ जाऊनही तो पाहता आला नव्हता...तिथुन जुनानित उतरताना डोंगरांची काही अपरिचित नावे कानी पडली होती...
ReplyDeleteतुम्ही कोळधेर वरून राजदेरला गेलात त्याचा गुगल नकाशा देता येईल का...हा टप्पा पुन्हा करायचा विचार आहे 👍🏽
छान महिती दिलीत....
ReplyDeleteसुंदर फोटो आणि वर्णन देखील. नेहमीप्रमाणे हा भाग पण आवडला.
ReplyDelete