Monday, May 25, 2020

जलदुर्ग: किल्ले निवती, किल्ले देवगड आणि किल्ले आंबोळगड

किल्ले निवती

सिंधुदुर्गची भटकंती करताना मालवण आणि नंतर देवबागला जाणं जणू अपरिहार्य आहे. या देवबागवरून निवती तसा समुद्रमार्गे (किंवा Air distance) जवळ आहे. पण गाडीचा मार्ग मात्र पुन्हा मालवण जवळून फिरून ४० किलोमीटरच्या आसपास आहे. वाटेत चिपी एअरपोर्ट लागतं. गुगल मॅपवर दाखवणाऱ्या निवती किल्ल्याच्या जागी येऊन गाडी लावली. तृप्ती आणि श्रावणी गाडीतच थांबल्या तर मी कॅमेरा घेऊन निघालो. किल्ला बाहेरून तसा दिसतच नाही, दिसते फक्त झाडी.

प्रवेशद्वार आणि खंदक
प्रवेशद्वार आणि खंदक

साधारण अंदाज घेऊन एक पायवाट शोधली. इथून जरा सावधगिरीने गेलो. काही पायऱ्या दिसल्या आणि बाजूला खंदक. एक तर झाडी प्रचंड, त्यातून मोठा खंदक. एक खूप मोठा मोकळा भाग लागला. उजवीकडच्या टोकाला चालत गेलो, तर भोगवे समुद्रकिनारा खाली दिसला.

भोगवे समुद्र किनारा
भोगवे समुद्र किनारा

मुळातच मी समुद्र वेडा. त्यात आमच्या रत्नागिरीपेक्षा खालच्या पट्ट्यातली वाळू पांढरी. त्यातून मी उंचावर आणि संध्याकाळचे पाच वाजलेले. एवढे सगळे जोडून आल्यावर समोरचे दृश्य का नाही मोहवणार तिथे थांबायला? या किल्ल्याचे लोकेशनच मस्त आहे. या किल्ल्याचा भागच थोडा समुद्राच्या दिशेने पुढे आलेला आहे. उजवीकडे भोगवे तर डावीकडे निवती किनारा. समोर अथांग समुद्र! या निवृत्ती किल्ल्याजवळच “गोल्डन रॉक” म्हटला जाणारा जुना खडक आहे. विहंगम दृश्य!

बुरुज
बुरुज

किल्ल्याचे अवशेष म्हणजे काही बुरुज आहेत काही बुरुज पूर्णपणे जमिनीच्या वर, तर एक-दोन बुरुज असे समुद्राच्या बाजूला जमीन लगत. बुरुज उत्कृष्ट बांधणीचे आणि मजबूत आहेत. अर्थातच हे सगळे बांधकाम चिऱ्यांचे आहे.

बालेकिल्ला
बालेकिल्ला

किल्ल्याच्या मध्यभागी असलेला बालेकिल्ला मजबूत आहे आणि त्याची तटबंदीही शाबूत आहे. बांधकाम चिऱ्यांचेच असून भिंतीची बांधणी दोन हात रुंद अशी मजबूत आहे. बालेकिल्ल्याचा मधला भाग मोकळा असून तटबंदीत खिडक्या दिसतात. दरवाजा असा राहिलेला नसून फुटलेल्या तटबंदीतून आतमध्ये येता येते. ह्या बालेकिल्ल्यावर एक रेड्याचे राज्य असावे. तो शांतपणे चरत होता. मी आत शिरल्यावर आणि तोसुद्धा एकटाच म्हणून तो माझ्याकडे रोखून बघू लागला. त्याचा अवतार आणि आकार बघून मी घाबरत घाबरत थोडासाच भाग बघितला आणि माघार घेतली.

झाडीत लपलेले बुरुज
झाडीत लपलेले बुरुज
झाडीत लपलेले बुरुज

बाहेरचे काही बुरुज पूर्णपणे झाडीत झाकले गेले आहेत. वड, रान-पिंपळ, रान-केळी, कुडा अशा झाडांनी या अवशेषांना गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. हे सगळे बघून गाडीजवळ परत आलो. तृप्ती आणि श्रावणीला घेऊन किल्ल्याच्या उजवीकडच्या टोकाला गेलो, तिथून भोगवे किनारा दिसतो. मन भरेपर्यंत ते दृश्य पाहिले.

किल्ले देवगड

हापूस आंब्यासाठी देवगड प्रसिद्ध आहेच पण ह्या नावातच किल्ला आहे आणि तोही कधी मी पाहिला नव्हता. याही किल्ल्यावर जाण्यासाठी चढाई वगैरे काही करावी लागत नाही. त्यातून या किल्ल्यातच दीपगृह आहे आणि त्यामुळे सरकारी लोकांनी तो मेंटेन ठेवलेला आहे. त्यामुळे दरवाजापर्यंत रस्ता आहे.

किल्ल्याच्या वाटेवरचे बुरुज
किल्ल्याच्या वाटेवरचे बुरुज

डांबरी रस्त्यावरून गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचायच्या आधीच वाटेत २-३ बुरुज आपल्याला दिसतात. हे म्हटले तर गडाचा भाग, कारण हे गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने बांधलेले टेहळणी बुरुज म्हणजे Watch Towerच आहेत.

किल्ल्याचे गोमुखी प्रवेशद्वार
किल्ल्याचे गोमुखी प्रवेशद्वार

गडाच्या मुख्य द्वाराजवळ दोन बाजूला दोन बुरुज आहेत. प्रवेशद्वारात असलेल्या लाईटच्या खांबांवर “पार्किंग”, “खाजगी वाहनांना प्रवेश बंद” वगैरे पाट्या आहेत. पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे आणि काही स्टॉल्स पण आहेत. “येता जाता दार बंद करावे” असा बोर्ड आणि शेजारीच मोडलेले गेटही आहे. हे प्रवेशद्वार गोमुखी आहे. प्रवेशद्वारातून आत शिरायच्या आधीच द्वारापासून डावीकडे समुद्रापर्यंत गडाची मजबूत पूर्ण शाबूत असलेली तटबंदी दिसते, ही अत्यंत सुंदर दिसते त्यामुळे अर्थातच दरवाजातून आत शिरल्यावर लगेचच तटबंदीवरुन चालत समुद्राच्या बाजूला असलेल्या बुरुजावर पोहोचलो.

हनुमान घुमटी
हनुमान घुमटी

वाटेत प्रवेशद्वाराच्या आत मध्ये डाव्या बाजूला तटालगत हनुमानाचे मंदिर आहे. हे खरे जुनेच मंदिर असले तरी घुमटीला पूर्ण शेंदरी रंग, हनुमानाची मूर्तीलाही शेंदरी-लाल रंग आणि दागिने चंदेरी रंग असे भाग रंगवलेले आहेत. चौथरा सिमेंटने बांधून काढलेला आहे.

तटबंदीला लागून बाहेरील बाजूस पूर्ण खंदक खोदलेला आहे
तटबंदीला लागून बाहेरील बाजूस पूर्ण खंदक खोदलेला आहे

तटबंदीच्या मध्यभागात अजुन एक बुरुज आहे त्याच्या आतील बाजूस बाकडी केलेली आहेत. अर्थात ही सरकारने पर्यटकांना बसण्याची व्यवस्था म्हणून केलेली आहे. प्रवेशद्वारापासून तर समुद्रालगतच्या बुरुजापर्यंत पूर्ण अभेद्य तटबंदीला लागून बाहेरील बाजूस पूर्ण खंदक खोदलेला आहे. झाडे-झुडपे नसल्याने ही तटबंदी सुंदरच दिसते.

तटबंदीतले बुरुज, मजबूत पायऱ्या, ध्वज
तटबंदीतले बुरुज, मजबूत पायऱ्या, ध्वज

पलीकडे सूर्य, अथांग समुद्र आणि मावळतीचा सूर्य अश्या विहंगम दृष्याने मन प्रसन्न झाले. सूर्यास्त तर अगदी मोहक दिसला असता, पण सूर्यास्त पाहत बसलो असतो, तर किल्ल्याचे अवशेष बघायला मिळाले नसते म्हणून तटबंदीवरुन खाली उतरलो.

विहीर
विहीर

इथल्या पायऱ्या शाबूत आहेत. तसं तटबंदीवरुन चालत येतानाच मोकळ्या भागातले अवशेष बघितले होते. उतरून आधी विहीर बघितली. ही वापरातली आहे. पाण्याचा पंप आणि काढण्याने पाणी काढायला कप्पी बसवलेली आहे. (हि कप्पी म्हणजे खरंतर लाईटच्या पोलवर तारा गुंडाळायला चिनीमातीची असते ती) विहिरीला नव्याने चिऱ्यांचे कंपाऊंड केलेले आहे. तटबंदीच्या मध्यभागी असलेल्या बुरुजाजवळ आतील बाजूस एक बांधकामाचे अवशेष आहेत. जवळच मोकळ्या भागात चिरे काढायला छोटीशी चिऱ्याची खाणच दिसते. ही जुनी वाटत नाही.

गणपती मंदिर आणि श्री चाळ देवस्थान
गणपती मंदिर आणि श्री चाळ देवस्थान

यानंतर गणपती मंदिरात गेलो. हे मंदिरही खूप पुरातन असले तरी बाहेरून चुकूनही तसे वाटत नाही. आता ते पूर्णपणे सिमेंटने बांधून काढलेले आहे. रंग दिलेला आहे. जवळच मागच्या बाजूला एक खोलीही बांधलेली आहे. कदाचित इथे कर्मचारी राहत असतील. त्याच्याही मागच्या बाजूला एक घुमटी आहे. गणेश मंदिराचा आतील भाग ही पूर्णपणे नवीन करण्यात आला असून कडप्पा, ग्रॅनाईट, टाईल्स, त्याही वेगवेगळ्या देवतांचे चित्र असलेल्या आणि लाईटच्या माळा असे सुशोभित केलेले असले तरी त्यामुळे त्याच्या पुरातनपणाचा मागमूस लागत नाही. गणेशाची मूर्ती, त्याचा मूळ दगड सगळे “अब नये पॅक मे” असे झालेले आहे. मंदिराच्या विरुद्ध बाजूस एक देवस्थान आहे. रुईचे झाड, खाली तीन-चार तांदळा असे थोडेसे बांधून काढलेले आहे. लोखंडी पाईप आणि वर चार घंटा आहेत. भगवे ध्वज आहेत तर “श्री चाळ देवस्थान प्रसन्न” असा “रामेश्वर देवस्थानाच्या हुकुमावरून” लावलेला सिमेंटचा बोर्ड देखील आहे. गणेश मंदिराच्या डाव्या बाजूला कसलेतरी सिमेंटचे आरसीसी बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. कदाचित इथे खोल्या बांधल्या जात असाव्यात. भक्त निवास किंवा सरकारी लोकांची राहायची व्यवस्था करण्याचा प्लॅन असावा. पुढे मात्र दीपगृह आणि बाजूच्या सरकारी इमारती आहेत आणि त्यांना कंपाऊंड केलेले आहे. तिकडे आम्ही गेलो नाही कारण “जायला बंदी आहे” असा अपमान करून घ्यायची इच्छा नव्हती. आम्ही आमची गडफेरी संपल्याचे स्वतःशी जाहीर केले.

दीपगृहाच्या मागेही एक बुरुज असून त्यापासून उजव्या बाजूला समुद्राकडे उतरणारी तटबंदी आहे. ही तटबंदी अजून शाबूत असून त्यात दोन बुरुज आहेत. देवगड बंदराच्या रस्त्याने चालत गेल्यास या भागात जाऊ शकतो. परंतु तिकडेही जायला परवानगी आहे की नाही याची खात्री नसल्यामुळे तोही सरकारी अपमान होण्यापूर्वीच टाळला.

मालवण वरून परतीच्या प्रवासात दुपारी कुणकेश्वर मंदिर बघून संध्याकाळी देवगड बघितला होता. पुढे रत्नागिरीला परतताना एक मुक्काम ठरला होता विजयदुर्ग. विजयदुर्ग किल्ला याआधी पाहिला होता पण सपत्नीक नाही आणि तोही रत्नागिरीच्या घरातून निघून वन डे रिटर्न दुचाकीवर. पण ह्यावेळी मुक्काम केला. सकाळी साडेसहालाच किल्ल्यात पाऊल टाकले. ४-५ तास निवांत, संपूर्ण किल्ला तटबंदी वरील प्रदक्षिणेसह बघितला. 

किल्ले आंबोळगड

काही वर्षांपूर्वी नाटे जवळ असलेला यशवंतगड बघितला होता पण तेव्हा आंबोळगडने काही कारणाने हुलकावणी दिली होतीन. म्हणून यावेळी मुद्दाम वाकडी वाट करून इथे भेट द्यायचीच ठरवलं होतं. राजकोटच्या वर्णनात जे म्हटले होते की, यावर चार वाक्ये लिहिणेही कठीण ईतकेच अवशेष शिल्लक आहेत, तशीच काहीशी गत आंबोळगडचीही आहे.

गुगल मॅप वर किल्ल्याचे ठिकाण दाखवलेले आहे खरे गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत. पण तो किल्लाच लपवून ठेवल्यासारखा चटकन दिसत नाही. जवळपास पोचल्यावर आजूबाजूच्या घरात विचारल्यावर तो नक्की कुठे आहे ते कळले. चिऱ्यांनी बांधून पायर्‍यांची वाट केल्यामुळे नक्की कुठून प्रवेश करायचा ते कळते. अर्थात ते प्रवेशद्वार वगैरे नाहीये. तटबंदी, दरवाजा असं काही नाही त्यामुळे नक्की असा प्रवेशमार्ग कळत नाही. इथे डाव्या बाजूला एक फाटलेला आणि “ळगड” एवढे अक्षरे त्यावर बाळगून असलेला फ्लेक्स कोणीतरी गडाचे नाव छापायचे कष्ट घेतल्याचे दाखवत एका झाडाखाली पडलेला होता. आजूबाजूचा परिसर नुकताच आग लावून साफ केलेला दिसत होता, त्यामुळे किमान फिरता तरी येत होते.

वडाचे विस्तीर्ण झाड आणि खाली भग्न तोफ
वडाचे विस्तीर्ण झाड आणि खाली भग्न तोफ

प्रवेशाच्या ठिकाणातून आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच वडाचे विस्तीर्ण झाड स्वागताला जणू आपले असंख्य हात पसरून बोलवत असल्यासारखे वाटले. Ah wait... त्याआधी माझे स्वागत दुसर्‍याच एका गोष्टीने झालेले होतेच. काही गोष्टींनी मी त्यांच्या “टेरिटोरी”त जातोय हे दाखवून दिलंनी होते. माझ्या पायाजवळ होत्या सापांच्या २-३ काती. असो पण ती इथे सोडून त्यातले जनावर कुठेतरी निघून गेले होते.

आत मध्ये जमीनदोस्त झालेले असले तरी ते अवशेष पूर्वी खूप बांधकाम होते हे दर्शवत होते. सुदैवाने भग्न का होईना पण एक तोफ इथे एका दगडावर ठेवलेली आहे. सध्या वटपौर्णिमेला का होईना, लोकांचे पाय ईथे लागत असतात हे दर्शवणारे सूत त्या वडाला गुंडाळलेले दिसत होते.

दगडी रांजण
दगडी रांजण

विहीर
विहीर

जवळच एक दगडी रांजण त्याने शेकडो पावसाळे बघितले आहेत आणि अजूनही शेकडो बघणार आहे असं सांगत ठाण मांडून बसलेले होते. एक दगडी बांधून काढलेली विहिर आहे. त्यात  आजूबाजूच्या झाडांची पाळंमुळं घुसलेली होती पण संवर्धनाचे काम, किमान साफसफाई दिसली. ज्याने अजूनही अनेक वर्षे हा ठेवा जपला जाणार याची थोडी शाश्वती दिसली.

तुळशी वृंदावन किंवा समाधी

अनेक ठिकाणी वाड्यांचे चौथरे आहेत. एके ठिकाणी एक छोटासाच पण बांधलेला चौकोनी चौथरा आहे. हे तुळशी वृंदावन, समाधी काहीही असू शकते. इतरत्र खूपसे पडके अवशेष आहेत ते वाड्याचे भाग असावेत आणि तटबंदी म्हटली तर जराशी शिल्लक आहे किंवा ती वाड्याचीच पडलेली भिंतही असू शकते. अवघ्या पाच-सहा मिनिटात या किल्ल्याचे उरलेसुरले, तग धरून असणारे, पण किल्लेपण उलगडून सांगणारे अवशेष बघितले. आंबोळगडचे समाधान पदरात पडले.


4 comments:

  1. परत तिथे जाऊन आल्यासारखे वाटले.

    ReplyDelete
  2. छान, प्रत्येक गडाची थोडक्यात आणि सुंदर शब्दांत माहिती.

    ReplyDelete