Sunday, February 19, 2023

रसलपुर सराई, वरखेड गढी, मलकापूर नगरकोट

रसलपुर सराई

याआधीच्या भटकंतीत काही गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि स्थळदुर्ग बघायला मिळाले होते, पण त्यात “सराई” हा प्रकार माहिती नव्हता. “सराई” म्हणजे एक प्रकारचा स्थळदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला. फरक असा कि, या प्रकारच्या किल्ल्याचा मुख्य उद्देश नेहमीच्या किल्ल्यांसारखा लढाईच्या दृष्टीने सुरक्षित जागा किंवा शेजारच्या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी, टेहळणीसाठी असलेले ठिकाण/चौकी वगैरे नसून दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि लष्कराच्या विसाव्यासाठीची सुरक्षिततेची जागा असं म्हणता येईल. नगरकोट आणि सराई ह्या मधला हा महत्त्वाचा फरक म्हणता येईल.

यावल किंवा भुसावळवरून रस्ता साव्हडा, रावेर, खानापूरवरून पुढे बुऱ्हाणपूर कडे जातो. पालवरून रावेरकडे जाताना अलीकडेच हे रसलपूर आहे.

ही सराई बघणे, म्हणजे खरं तर दिव्य काम आहे. ही सराई पूर्णपणे कॅप्चर्ड आहे. सामान्यतः नगरकोटांच्या आत-बाहेर वस्ती वाढतेच, पण ही सराई पद्धतशीरपणे ताबा मिळवलेली आहे. स्थानिकांच्या वागण्या-बोलण्यातून आणि नजरेतून ते सहज कळून येते.

अतिक्रमण: खंदकांवर आणि तटबंदीशेजारी

माझ्या गळ्यात अडकवलेल्या कॅमेरावरून पत्रकार किंवा सरकारी माणसं असल्यासारखे वाटून अगदीच हाकलून लावता येत नसल्याने, “हमारा इलाका” दाखवायला आलेल्या मुलाने “अब ये हमारा है” असं स्पष्ट म्हणून शंकेला जागा सुद्धा ठेवलीन नाही.

तसे म्हटले तर खूप अवशेष शिल्लक आहेत. परंतु तटबंदी-बुरुज जे काही आहे त्याला नुसते लागून नव्हे, तर त्यावर आणि आतमध्ये सुद्धा घरं बनवून ताबा मिळवलेला आहे. म्हणजे पूर्वापार नगरकोटाच्या आत-बाहेर लागून जागा दिलेल्या असत, पण बुरुजाच्या आत कोणाला कोणत्याच राज्यकर्त्याने जागा दिलेली असणे शक्य तरी आहे का? तटबंदीच्या बाजूने असलेल्या खंदकांवर काही ठिकाणी सरळ सरळ तो बुजवून त्यावर घरे बांधण्याचे काम चालू आहे. म्हणजे चुकून सुद्धा ज्याला वडिलोपार्जित आहे म्हणून तरी अधिकृत वगैरे म्हणावे असं सुद्धा नाही. आणि त्यातून साधारण पंधरा फुटाच्या आसपास असलेल्या ह्या खंदकावर घाण आणि कचऱ्याला तर सुमार नाहीच. तसं एकूणच इकडच्या सगळ्या भागात हीच परिस्थिती आहे.

असो, तर हे अवशेष शोधून-शोधून बघताना कधी एखादा बुरुज लपलेला दिसायचा, तर कधी दरवाजा. तटबंदीत घरं तर दोरीवर कपडे वाळत घातलेले दिसतात तशी सजलेली दिसली.

अतिक्रमण: दरवाजा कमानीत, तटबंदीत

शिल्लक असलेल्या दरवाजांपैकी एक उत्तरेला तर एक पूर्वेला आहे. फोटोत दिसत असलेल्या दरवाजाला लागून, वरती आणि चक्क आतमध्येसुद्धा घर सहज दिसतात. हे अवशेष शिल्लक राहण्यामागचे कारण सुद्धा १०-१२ फूट उंचीची दगडी बांधीव मजबूत भिंत फुकट, कष्ट न करता बांधून मिळते तर कशाला सोडा? हेच असेल.

काही ठिकाणी ह्या दगडी भिंतींच्यावर विटांचे बांधकाम दिसते. त्यात जंग्या दिसतात. तटबंदीतल्या खोल्यांत लोकांनी घरं, तर काही ठिकाणी गुरांसाठी चक्क गोठे बांधलेले आहेत.

शिल्लक बुरूज पाहतानाही त्याचे तटबंदीच्या वरच्या उंचीचे बांधकाम विटांत केलेले दिसते. आत मध्ये फिरताना नशीब चांगले असेल आणि स्थानिकांनी दाखवले तर दोन विहिरी बघायला मिळतात. खंदकात उतरण्यासाठी बांधलेल्या पायऱ्याही काही ठिकाणी बघायला मिळतात.

सुदैवाने जे काही शिल्लक आहे ते बघायला मिळाले आणि पहिली-वहिली “सराई भेट” पदरात पडली.

वरखेड गढी

वरखेड/वरखेडे/वरखेडी अशा काहीशा नावाने ओळखली जाणारी गढी शोधणे हे जरासे कठीण काम आहे.

रसलपुर वरून मलकापूर कडे जाताना चिखली-दसरखेड मार्गे न जाता बोदवड मार्गे जावे. बोदवड-मलकापूर रस्त्याजवळ वरखेड बुद्रुक मध्ये ही गढी आहे.

गावात अतिशय जुने वाडे आहेत. त्याचे नक्षीदार दरवाजे, सुंदर कोरीव काम असलेले वासे पाहत या गढीजवळ पोचायचे. गढी बरोबर चौरस आकारात आहे. आतमध्ये उध्वस्त असलेल्या या गढीची तटबंदी मात्र पूर्ण शाबूत आहे.

गढी दरवाजे

मुख्य प्रवेशद्वारावरती विटात सुंदर नक्षीकाम आहे. बांधकामात दगडाचे असून वरचे बांधकाम विटात आहे. आतमध्ये खूप उध्वस्त अवशेष आहेत. तटबंदीवर चढायला तशी जागा नाही. पण शिल्लक अवशेषांवरून वर चढून तटबंदीवर फिरता येते.

पूर्ण तटबंदीला जागोजागी जंग्या आहेत.

अष्टकोनी शिल्लक बुरुज

तटबंदीच्या एका कोपऱ्यात अष्टकोनी, तटबंदीपेक्षा जास्त उंचीचा एक बुरुज आहे.

वेगळी गणेश मूर्ती

तटबंदीच्या आतमध्ये विहिर आहे. तिच्या काठावरच्या भिंतीतल्या कमानीत गणपतीची सुंदर उभी आणि नेहमीपेक्षा वेगळी मूर्ती आहे. गढीच्या आत मध्ये एक चौकोनी विहीर आहे.

भक्कम तटबंदी

गढीच्या बाहेरून फिरताना मात्र ही तटबंदी भव्य वाटते.

मलकापूर नगरकोट

मलकापूर हा नगरकोट असल्याने अवशेष पूर्ण पसरलेले आहेत. सात वेशींचे शहर अशी याची ओळख आहे. म्हणजे हा किल्ला पाहणे हा वेळ देऊन अवशेष शोधणे असे काम आहे. नगरकोट म्हटला की लांबच्या लांब तटबंदी, त्याला धरून वस्ती हे आलेच. त्यामुळे सुरुवातीला मुख्य दरवाजापासून श्री गणेशा करायचा.

आम्ही सरळ गाडी एका ठिकाणी लावून एक रिक्षा केली. स्थानिकांबरोबर फिरण्याचा फायदा म्हणजे आपण वाचून, माहिती काढून आलेले अवशेष तर त्यांच्या मदतीने बघता येतातच आणि अजूनही काही माहिती पदरात पडण्याची शक्यता असते. तसेच नगरकोट म्हणजे खूप अवशेष दडलेले असतात जे त्यांच्या शब्दांवर बघता येतात.

दरवाजा

अवशेषांची सुरुवात अशीच तटबंदीत बांधलेल्या बुरुजावरच्या घरापासून झाली. नगरकोटाचे सात वेशींचे शहर म्हणजे सात दरवाजे असणार. परंतु सध्या तीनच दरवाजे पाहता येतात. चौथा दरवाजा काही काळापूर्वीच रस्ता रुंदीकरणात पाडला गेल्याचे वाचले होते. पहिला मुघल दरवाजा बघितला, त्याला “बडा मुघल दरवाजा” म्हणतात. तिथे जवळच “सूर्यमुखी बडा हनुमान मंदिर” सुद्धा आहे. ह्या मुघल दरवाजाचे संवर्धन झालेले दिसते. वरचा अर्धा बुरुज आता सिमेंटने बांधलेला असून त्यावर ध्वज उभारण्यासाठी जागा ठेवलेली आहे. आतील बाजूने घराचे वेढलेली तटबंदी असली, तरी एके ठिकाणी बुरुजांवर जायला जागा ठेवून आपल्यावर कृपा केलेली दिसते.

दरवाजा

दरवाजा

जीभीची भिंत

सरळ पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो त्याच्या समोर जिभीची भिंत आहे. दोन्ही बाजूला छोटे बुरुज आहेत. तिथे एक जुने मारुतीचे मंदिर आहे. तिसऱ्या दरवाजाच्या वर मात्र जाता येत नाही.

दुरावास्थेतले शिल्लक अवशेष

बुरुज

एका मागून एक असे दरवाजे बघता येतात. नदीच्या बाजूला सुटे बुरुज आहेत. एका दरवाजाच्या बाहेर घोड्यांच्या पागेसारखी जागा पण आहे.

नेमीवंतांची हवेली आणि राजे नेमिवंत यांचे श्रीराम मंदिर

शोधून शोधून दरवाजे, बुरुज वगैरे बघितल्यावर स्थानिकांच्या मदतीने “नेमीवंतांची हवेली”, “श्री मल्लिकार्जुन मंदिर”, राजे नेमिवंत यांचे श्रीराम मंदिर बघता येते. इथे एक मोठा देवनागरीतला शिलालेखही आहे.

राणी बाव - शिलालेख

गावाबाहेर एका शेतात एक जुनी बाव आहे, याला राणीची बाव म्हणतात किंवा लालबाव. समोरच शेतात एक जुनी वास्तू आहे. वास्तू जवळ हनुमान मंदिरही आहे. या विहिरीत दोन शिलालेख असून एक देवनागरीत दर दुसरा फारसी मध्ये लिहिलेला आहे.

या भटकंतीत गिरीदुर्गांपेक्षा बहुतेककरून जास्ती गढ्या आणि भुईकोट किल्ले किंवा वाडेच पाहण्यात आले. या भागात "सराई" हा एक वेगळा प्रकार बघितला.

भटकंतीत पुढे पिंपळगाव राजा इथली देशमुखांची गढी, रोहिणखेडचा भुईकोट किल्ला, देऊळगाव घाट इथला नगरकोट आणि शिरानी गढी तसेच “करवंड” इथली शेवटच्या घटका मोजत असलेली गढी, जाफ्राराबाद इथला भुईकोट किल्ला, मेहुणा राजा इथली गढी, देऊळगाव राजा इथला नगरकोट किल्ला तसेच उतरांडा इथली गढी पाहिली. “करवंड” इथली गढी इंगळे घराण्याची, म्हणजे शिवरायांची ८ वी पत्नी, “गुणवंताबाई” यांची आहे. ही तर “५२ बुरुजी” होती असं गावकरी सांगतात.

एकूणच यानंतर आमची भटकंती इथे सुफळ संपूर्ण झाली.

देशमुख गढी (पिंपळगांव राजा)

रोहीणखेड - गढी, मशीद

रोहीणखेड - एकलकोंडा बुरूज

देऊळगांव घाट - शिरानी यांचा वाडा

देऊळगांव घाट - नगरकोट दरवाजा

देऊळगांव राजा

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

2 comments:

  1. मराठवाडा विदर्भातील किल्ल्यांची दुरवस्था, राजाश्रयाने अतिक्रमणे यामुळे झालेले विद्रुपीकरण मनाला त्रासदायक आहे। तरीही तू हे बघून जी माहिती गोळा करत आहेस त्या तुझ्या भटकंती छंदा बद्दल तुझे खूप धन्यवाद नि आश्चर्य की तू कसे करत आहेस।खूप छान।
    मंगेश

    ReplyDelete