Monday, May 14, 2012

माझी भ्रमंती - किल्ले वासोटा ( भाग 2 )


        जोशात चढत होतो. घनदाट जंगल सूर्यकिरणांना जमिनीपर्यंत पोचू देत नव्हते. ते आमच्या फायद्याचेच होते. पण मधे मधे विरळ झाडीतून ऊन, मग सावली असे करत करत, झाडं, प्रकार, आकार बघत बघत एखादा तरी प्राणी दिसण्याच्या अपेक्षेने वेगात चाललो होतो. हळू हळू ग्रुप्स विरळ होत गेले, लोका-लोकांमधलं अंतर कमी-जास्त व्हायला लागलं.
        पायात शूज घालून आलेला हा माझा दुसराच ट्रेक. पहिला अनुभव फारसा चांगला नव्हता. त्यातून ऊन वाढत होतं. आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्याने आर्द्रता होतीच, आता पाठीवरची मोठी sack, त्यातले 3.5-4 लिटर पाणी, अन्न, extra चे कपडे, चादर, बुटांच्या धास्तीने "बरोबर असाव्यात" म्हणून घेतलेल्या चप्पल, सवयीनुसार घेतलेल्या ३-४ पिशव्या असा लवाजमा याने त्याच्या वजनाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली. त्यातच सपाटी संपली आणि उभ्या चढाला सुरुवात झाली. एखाद्याला मागे टाकत होतो तर एखादा पुढे जात होता. "जरा थांबू" असा विचार पुढे ढकलत-ढकलत एकदा थांबलोच. बसलो नाही पण जरा विश्रांती झाली. मिनिटभरात पुढे सरकलो. पण सगळ्यांचाच वेग मंदावला होता. काही जण मात्र नजरेच्या टप्प्यात नव्हते. प्रणव त्यांच्यातच होता. मधून मधून त्यांना गाठत परत मागे पडत होतो. Experience trekkers आणि माझ्यातले अंतर मीटर-मीटर मधे समजू लागले होते. मग मात्र एकदा एका ठिकाणी बसलोच. ट्रेक ला सुरुवात केल्यापासून पहिल्यांदा पाणी प्यायले. ५ मिनिटं हललोच नाही, मग परत निघालो. आमच्या ४ जणांच्या ग्रुप पैकी प्रणव पुढे गेलेलाच होता. मी मध्येच होतो आणि विशाल मागे होता. आर्चिस बहुधा पुढेच असावा. १२-१५ वयाच्या पोरी पटपट जात होत्या, त्यांचे आई-बाबा थोड्या फार अंतराने होतेच. आपण अगदीच "हे" आहोत असे वाटून जात होते. अजून २-२ मिनिटांचे २ Halt घेतले आणि प्रणव वगैरे पुढे थांबलेले वीर आमची वाट बघत असलेले दिसले.. थोड्याच वेळात मागचे सगळे आले. आम्ही १५-२० मिनिट थांबलो असू, परत सुरुवात केली. नागेश्वराच्या देवळाकडे जाणा-या रस्त्याच्या इथे आल्यावर परत थांबलो. ग्रुप मधल्या एक काकूंना शक्य न झाल्याने युवाशक्ती वाला एक जण Forest Office पर्यंत परत सोडायला गेल्याचे समजले. आता मात्र झाडी संपली आणि ऊन भाजून काढू लागले. टोक दिसत होते. डोळ्यांनीच अंतराचा अंदाज घेत होतो. जवळ आल्याचे सगळेच जण स्वतःच्या मनाला समजावत होते. सगळ्यांनी एकमेकांना सांगायला सुरुवात केली. कडा टप्प्यात आला आणि जोर परत वाढला. फोटो मात्र मधे मधे मी काढताच होतो. दूरवर आम्ही जे backwater पार करून आलो ते दिसले आणि बरं वाटलं. शेवटच्या टप्प्यात पाय-या लागल्या आणि २ मिनिटांत वरच्या हनुमान मंदिराजवळ पोचलो. बाहेरूनच नमस्कार केला. बसलो. आमच्याकडचं पाणी बरंच शिल्लक होतं. बाकीच्यांनी त्यांचं जवळ-जवळ संपवलं होतं. जवळच्या टाक्यातल्या पाण्याने टोपी भिजवली, डोकं आणि तोंड धुवून घेतले. परत गेल्यावर बामणोलीतल्या हॉटेल मधल्या कोल्ड्रिंक च्या सगळ्या बाटल्या सगळे मिळून संपवून टाकतील अशी चर्चा करत सावली शोधू लागलो. आता जेवायचे होते. ब-याच सावल्या occupy झाल्याने आम्ही थोड्या अंतरावरच्या शंकराच्या देवळात बसकण मारली. शूज काढल्यावर पायांनी मला Thank you म्हटल्यासारखे वाटले. एकमेकांचे डबे हादडले आणि refresh झालो. गडावरचे २-३ point बघितले. आम्ही वेळेत होतो. त्यामुळे युवाशक्ती वाल्यांनी जरा माहिती वगैरे सांगितली.
        आता उतरायला सुरुवात करायची. प्रणव आणि मी मिळून ठरवलेला आता झपाझप उतरायचे असा बेत तडीस जाणार नाही असा इशारा झाला, "चला, सगळ्या मुली पुढे"! मग परत मागून चाललो. हळूच १-२ मुलींना overtake केले. १०-१५ मुली मागे पडल्यावर मात्र "थांबा" अशी आज्ञा झाली. मुकाट्याने रस्ता देऊन थांबलो. परत मुली पुढे. मग प्रमाणिकपणे त्यांच्या मागून जात असतानाच पाऊस आला. पायात ट्रेक चे नसलेले WoodLand, यामुळे साष्टांग नमस्काराची धास्ती होतीच. त्यातून ओले आणि सुट्टे झालेले दगड-गोटे, सुटी माती आणि जोडीला WoodLand, मला धास्ती वाटत असलेला त्यांचा प्रयत्न मी मोठ्या प्रयासाने हाणून पाडला. मग मात्र ऊन पाऊस याचा आनंद घेत मारुती-गणपती च्या मंदिराजवळ आलो. थांबायची आज्ञा झाली. तेवढ्यात नुकतंच मेलेलं एक फुलपाखरू सापडलं. सकाळीही तिथेच अजून एक सापडलं होतं म्हणून त्या दोघांची समाधी बांधून टोप्या काढून मी आणि प्रणव ने श्रद्धांजली वाहिली. परत सुरुवात केली आणि प्रणवला करवंद आणि तोरणं देत, मी खात backwater जवळ येऊन पोचलो.

        पाऊस सुंदरच दिसत होता. त्यातून लांब दिसत असलेला वासोटा किल्ला आम्ही किती चाललो याची जाणीव करून देत होता. बोटी आमची वाट बघत असूनही "सगळे येईपर्यंत Stop" मुळे आम्ही भिजतच थांबलो होतो. अखेर सगळे पोचले आणि बोटी सुटल्या. पहिली बोट पुढे निघून गेली. मागची मागे राहिली. मधे आमच्या २ बोटी तू पुढे कि मी, करत चालल्या होत्या. आमचा बोटवाला पुढच्याला overtake करायला बघत होता, पण पुढचा दाद देत नव्हता. मग "overtake करू देत नाहीस काय?" म्हणून आमच्या बोटवाल्याने पुढच्याला आपली बोट टेकवलीन.
        मग मात्र आमच्या बोटीतले काका घाबरले नी नको नको करायला लागले. "तुमच्याकडे life-jacket पण नसेल" वगैरे वाक्य मारून बोटीवाल्याच्या तोंडावर "हे काय आता नवीन" असे भाव आणले. तो बिचारा Accelerator च्या screw ला पायाचा अंगठा लाऊन बोट हाकत  होता. काकांच्या प्रश्नांनी बोटीचा वेग कमी केला. ६ च्या सुमारास बामणोली किना-यावर सगळे उतरलो.तिथे बामणोली  Premiere League चालू होती. आम्ही ४ जण हॉटेलात जाऊन मिसळीची Order देऊन बसलो, बाकीचे कपडे बदलत राहिले.
        १-१ मिसळ हाणली आणि सकाळची चर्चा आठवली. कोल्ड्रिंक कोणीही घेत नव्हते, पावसांत भिजून वा-याने थंडी लागलेली होती. आम्ही अजून एक मिसळ मागवली आणि चहा घशाखाली ओतून घसा गरम करून घेतला. नव्याने घेतलेल्या मिसळीत वरतीच एक खराब बटाटा निघाला. आम्ही ओरडून हॉटेलवाल्या मामांना ते सांगितले. पण उपयोग शून्य!! (हॉटेलवाला सरपंच आहे हे २ वर्षापूर्वी मी गेलो होतो त्यामुळे मला माहित होते. आणि तिथला आर आर आबांबरोबरचा त्यांचा फोटो त्याची खात्री देत होता.) पहिल्या मिसळीतून असे २-३ बटाटे गेलेसुद्धा असतील पण तेव्हा लक्ष नव्हते, आत्ता दिसला. मग चमच्यात तो बटाटा घेऊन मी तडक counter गाठलं. तिथे अंधार. मामांना ओरडूनच विचारलं "काय आहे हे?".. "खराब आहे का बटाटा" किंवा "Sorry हां, ए... बदलून दे रे मिसळ" अशी काहीतरी अपेक्षा असताना त्यांनी प्रश्नातला जीवच घालवला. ते म्हणाले "कांदा आहे तो, काय झालं त्याला?" आता बटाट्याची अख्खी फोड समोर असताना त्याला ते "कांदा" काय म्हणाले म्हणून त्यांच्या शेजारी असलेल्या त्यांच्या मुलीकडे मी आशेने बघून चमच्यातला बटाटा पुढे केला. तिने तर तीर्थरूपांची लाज काढली... "कांदा कसला, कढीपत्ता आहे तो!" आता मात्र हद्द झाली होती, चांगला सुपारीपेक्षा मोठ्ठ्या बटाट्याच्या फोडिला "कढीपत्ता"??? मी सांगितले तिला तसे चोख. आणि विजयी मुद्रेने ग्रुप कडे पहिले तर तिने मागून माझी विकेटच उडवली, "हो कढीपत्ताच तर आहे, सकाळी केल्ये न मिसळ"!!!!!!! --इति कन्यका. मी गार. मुकाट्याने मिसळ घेऊन मी टेबलावर. पण अंगातरी रग गेली नव्हती. तो बटाटा ताटलीत काढून ठेवला. मिसळ खाल्ली आणि ताटली न्यायला आलेल्या मामांना विचारले "बघा, हा कांदा आहे का?" तर मामा आम्हालाच "हा काय कांदा आहे, ए, कुजका बटाटा कोणी आणला रे?" म्हणून तो बटाटा टाकून न देता हातात घेऊन परत गेले.... हरे राम!!!!!! मिसळ खाऊन आमचा वडा झाला कि त्यांचा तेच कळले नाही... 
        नंतर पावणे आठ - आठ ला जेवायला परत त्यांच्याकडेच. आपल्याकडच्या जेवणाची मामांना कल्पना असावी. त्यांनी हातांनी काहीच वाढले नाही. बफे ठेवला होता. आम्ही लायनीत ताट घेऊन... पापड घेतला, न भाजलेली पोळी घेतली, भाजीही घेतली (अंधार होता म्हणून बरे होते), पुढच्या पातेल्याला मात्र थांबलो, ती कढी आहे कि वरण तेच कळेना, समोर बघीतले तर सरपंच मालकांची मुलगी, "Veg Mix आहे ते!". पुन्हा विकेट, वरण/कढी सदृश पदार्थ "Veg Mix"?? मुकाट्याने घेऊन टेबलावर आलो, त्यांना त्रास नको म्हणून पाण्याचे ग्लासही घेऊन आलो. मागून मामा प्लास्टिक चे ग्लास घेऊन हजार! आम्ही पाणी ओतून तोंडाला लावणार ते स्टील चं ग्लास, तर मामानी चपळाईने त्यात बोटं घालून ती ग्लासं उचलली आणि प्लास्टिकची ठेवली. त्यात पाणी ओतलं. माझ्या पायांवर काय पडायला लागलं म्हणून बघतो तर तेवढ्यात विशाल ने त्याचं ग्लास उचललं तर उत्पन्न झालेल्या गंगेचा उगम कळला. आता त्या ग्लास ला भोक होते आणि टेबलचा उतार माझ्या दिशेला, नशिबाचा गुण!!!
        जेवण झाले आणि थोड्या वेळाने Campfire करायचे ठरले. पाऊस पडल्याने लाकडं सुकी नव्हती त्यामुळे Fire चं बारगळलंच होतं. राठोड साहेब केहाच झोपले होते. मग सगळ्यांना बळंच धरून Introduction साठी बसवले. त्यानंतर दमशरास नावाचा खेळ चालू झाला. "हुकुमत कि जंग", "हावडा ब्रीज पण लटकी हुई लाश", "मेरी बीबी ट्रक ड्रायव्हर के साथ भाग गयी" असले पिक्चर त्यांनी सांगितले आणि ओळखलेही. मी, प्रणव आणि आर्चिस ने एकमेकांकडे पहिले, आम्ही एकाच जातीचे असल्याचे लक्षात आले आणि हळूच अंधाराचा फायदा घेऊन काढता पाय घेतला. गप्पा मारून आम्ही झोपलो.
        सकाळी ५:३० ला उठून मी आणि प्रणव तयार. सगळे उठले आणि ७:३० ला चहा मारून १२:३० ला नारायण पेठेत परत...
        खूप जण ग्रुप मधे होते, एकमेकांच्या ओळखीचे होते, आम्हीच तसे वेगळे होतो, कोणाला लक्षात येण्यासारखे नव्हतो, पण "युवाशक्ती" मधल्या एकाच्या नक्की लक्षात राहू, कारण आम्ही त्यांना एक बोर्ड दाखवला होता आणि चर्चेत आणला होता...
"बाबांची शान....
   दादांचा मान...
    करून दाखवल..."
(दाखव'ल' वर अनुस्वार नाहीये हे हेरलं असेलच!)

No comments:

Post a Comment