Wednesday, August 31, 2016

किल्ले सोनगिरी आणि सोंडाई - I

गेले बरेच दिवस भटकंती बंदच ठेवली होती. २७ ऑगस्ट, शनिवार हा दिवस मोकळा मिळण्याची चाहूल लागताच तो सत्कारणी लावायच्या प्रयत्नात होतो. पूर्वी ट्रेक म्हटलं की ठराविक, मर्यादित मंडळी डोळ्यासमोर यायची. पण आता खूप गृप झालेत. २ गृप तर नोंदणीकृत झालेत आणि मित्रमंडळी आहेतच... २७ ला नंबर लागता तो आशिष, संजुभाई, केतकी, रव्या ह्या ग्रुपचा. ह्यावेळी आणखी २ नवीन मित्रही होते, मृण्मयी आणि अनुप.
१-२ लोकांचे रद्द होणे वगैरे नेहमीच्या गोष्टी झाल्यावर आशिष साहेब आजारी पडले. ट्रेकला जायचं असलं की अश्यावेळी घरचे जेवढी काळजी करत नाहीत तेवढी गृप मधली इतर मंडळी करतात. पण सगळ्यांवर मात करत शुक्रवारी रात्री ११ नंतर प्लान नक्की झाला आणि ठरल्याप्रमाणे आशिषकडे सकाळी सव्वापाचला पोचलो. रव्या, अनुप, केतकी ६ पर्यंत पोचले आणि वाटेत मृण्मयीला घेऊन संजुभाईकडे आकुर्डीला पोचलो. सफारी आमची वाटच बघत होती. समान रचले आणि जुन्या पुणे-मुंबई हायवेला लागलो. गाडीलाही आता सवय झाली आहे, परंपरा असल्याप्रमाणे उडुपी हॉटेल शेजारी गाडी मंदावते. पोटातून आवाज यायला सुरुवात होते. भूका भागवण्याबरोबर लोकांना फोटोही काढल्याशिवाय चैन पडत नाही किंबहुना फोटोशिवाय खाणे किमान शनिवार-रविवारचे तरी होत नाही ह्याची आता तिथल्या वाढप्यांना सवय लागून गेली असेल कारण चहा घेऊन ट्रे तसाच हातात धरून तोंडावर छद्मी हास्य घेऊन तो वाढपी तसाच फोटो काढून व्हायची वाट बघत थांबला होता. आमच्या विचित्र मागण्या त्याने बरोबर लक्षात ठेऊन ईडली, मेदुवडा बरोबर पुढ्यात आणून ठेवलेन. कपमधून ते अमृत पोटात गेल्यावर सफारी पुन्हा खोपोली रस्त्याला लागली. पुण्यातून निघायला उशीर झाल्याची चुटपुट मनात होतीच. पावसाळा असल्याने उन्हाची काळजी तरी नव्हती. खोपोली-कर्जत आणि मग दहिवली रस्त्याने श्रीराम पुलावरून उल्हास नदी ओलांडून अवळस, नेवाली गावात आलो. खरं तर पुढे मोहिली गावात येऊन पोचलो होतो, तिथे मोहिली मिडो रेसोर्ट जवळूनही एक वाट सोनगिरी किल्ल्यावर जाते. ह्या किल्ल्यावर तसे पळसधरी रेल्वे स्टेशन वर उतरून बोगद्याच्या बाजूने केबिन जवळूनही जाता येते. पण गडाच्या पायथ्याचे गाव “नेवाली” आहे. रस्त्यांची माहिती गावकऱ्यांना विचारावी म्हणून थांबलो. एका गोठ्यातून शेण-गोठा करून गावकरी डोकावत होता त्याला माहिती विचारल्यावर “तुम्ही जाणार? किल्ल्यावर? इतक्या लांब? जमेल का जायला?” असे ४-५ प्रश्न तोंडावर फेकून त्याने रेसोर्टजवळून जाणाऱ्या रस्त्यपेक्षा नेवाली गावातून जवळ पडेल असे सांगितलेन. आम्ही वरपर्यंत जाणार हे त्याच्या पचनी पडतच नव्हते हे त्याने ज्या रीतीने हातातला शेणाचा पो गोठ्यात आपटलान त्यावरून लक्षात आले. “करतो प्रयत्न जायचा” असे त्याला सांगून हिय्या करून आम्ही नेवाली गावातून गडाकडे जायला निघालो.
संततधार पाऊस, वाढलेले गवत अश्यातून गावकऱ्यांनी ४ वेळा वाट दाखवलनी. “नक्की कोणती वाट” असे विचारत जरी होतो तरी मुळात एकही वाट दिसत नसल्याने “कोणती वाट धरायची” हा प्रश्नच चुकीचा ठरत होता. ९:३० वाजले होते तरी पूर्ण धुकं, त्यात २० फुटावरचंही काही दिसेना. वर गडाकडे लक्ष ठेऊन चालत रहायचं म्हटलं तरी किल्लाच काय, वर काहीच दिसत नव्हतं. पायवाटे सदृश काही दिसत होतं त्यावरून चढाईला सुरुवात केली तर दर १० फुटांवर कबरीसाठी खणतात तेवढ्या आकाराचा खड्डा लागत होता. तरीही तीच वाट धरून निघालो. वाटेत खेकडेच खेकडे होते. पाण्याच्या बाटल्या फक्त बरोबर घेतल्या होत्या पण पाण्याची गरजच भासत नव्हती जास्त. पाऊस चालूच होता, आम्ही भिजत होतो, तहान लागतच नव्हती. मातीचा रंग लालसर दिसत होता, तो रंगच मला सुखावत होता. कोकणातली लाल माती! रत्नागिरी एवढी लाल आणि तशी नसली तरी ही चिकणमाती नक्कीच नव्हती. त्यामुळे चिखलाने पाय भरायची भीती नव्हती, पण बुटात केव्हाच पाणी शिरले होते आणि वजन पाव-पाव किलोने वाढले होते. जागोजागी सायाची (सागवान) झाडं दिसत होती, पायाशी टाकळा, आघाडा आणि पावसाळी फुलझाडं घुटमळत होती. काढलेल्या माहितीवरून २ टेकड्या पार करून एक पठार आणि मग तास-सव्वा तासात कातळकडा लागणे अपेक्षित होते. पण पठार लागायलाच तास होऊन गेला होता.

पठार लागायलाच तास होऊन गेला होता. (फोटो: आशिष)

धुक्यात गडप झालेला किल्ला/डोंगर/टेकडी काहीतरी दिसत होते, दिशा तरी बरोबर होती.  पायवाट तिकडेच घेऊन जात होती. लहान लहान ओहोळ आमचे पाय धुवून जात होते. बूट पाण्याने भरत होते परत मातीत जात होते. कचऱ्याची फुलं आता खूप दिसायला लागली. हे झाड अगदी हळदी सारखे दिसते, फुल सुद्धा!

कातळ उजवीकडे ठेवून कडेने घळीतून जाणारी वाट
आता एकपेक्षा जास्त वाटा दिसत होत्या आणि कोणती वाट कुठे जाते ह्याचा काहीच अंदाज लागत नव्हता. साधारण वरच्या बाजूला नेणारी वाट पकडून जात होतो आणि अचानक एक कातळ समोर आला. डावीकडे आणि उजवीकडे, दोन्हीकडे वाट दिसत होती. उजवीकडची वाट जास्त ठळक दिसत होती पण वाचून आल्या प्रमाणे कातळकडा उजवीकडे ठेऊन डावीकडची वाट धरली. आता घळीतून वर जायचे होते म्हणजे डोंगर आणि गडाच्या बेचक्यात पोचणार होतो. पावणे २ तास झाले होते. ५ मिनिटातच “Y” वाय आकाराचा रस्ता लागला वाय च्या उजवीकडे एक कडा दिसत होता, चढता येईल असं वाटत असल्यानं मी आणि रव्या तिकडे प्रयत्न करायला गेलो. बाकीच्यांना थांबवून ठेवलं होतं. मी ८०% कडा चढून गेलो आणि डावीकडच्या हाताने धरलेलं गवत उपटलं गेलं, पाय घसरला, अजून वर शक्य नाही हे लक्षात घेऊन खाली उतरू लागलो. वाय च्या डावीकडे मृण्मयीला जाऊन बघायला सांगितले आणि रव्या, आशिष उजवीकडे असलेल्या कड्यावर प्रयत्न करू लागले. ते थोडे चढून गेलेही पण पुढे रस्ताच नसल्याचे पक्के समजले. मृण्मयीही डाव्या बाजूला थोडी वाट आहे पण पुढे दगड पडून रस्ता संपलाय असे सांगत आली. आशिष आणि रव्या यांनी खाली उतरायचे ठरवले आणि  मी डावीकडे परत एकदा बघायला गेलो कारण दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. डावीकडे वाट सापडायलाच हवी होती. पडलेले दगड ओलांडून पलीकडे गेलो. असलीच तर वरच्या बाजूला एक वाट असू शकते असे दिसत होते, पण खात्री नव्हती. वर जाऊनच खात्री करायला पाहिजे होती पण आवाजाच्या अंतरावर बाकीच्यांना बोलावणे गरजेचे होते. कोणी एकाने येऊन ह्या जागी थांबून चालणार होते पण त्यांना वाट सापडली असे पुसटसे ऐकू गेल्याने सगळेच आले. हळू हळू आवाजाच्या अंतरावर सगळ्यांनी रहात वर चढू लागलो. कित्येक दिवसांत कोणी फिरकले नसावे, गवत वाढले होते, बाजुलाही सारलेले दिसत नव्हते त्यामुळे अजूनही वाट आहे की नाही ह्याची खात्री नव्हती. नुसताच अंदाज बांधत पुढे जात होतो. एका क्षणी “सापडली वाट” तर लगेच “संपली, ही वाट नव्हतीच बहुतेक” अशी परिस्तिथी होत होती. एक थर्माकोलची पांढरी डिश दिसली आणि नेहमी ज्या गोष्टीचा राग येतो त्या कोणाच्या तरी कचरा फेकण्याच्या प्रवृत्तीचा थोडासा फायदा झाल्याचा आनंदही झाला. पण तरीही डिश त्या ठिकाणी वरून हवेतून उडूनही आलेली असू शकते म्हणून वाट नक्की होत नव्हती. समोर बेचके असल्याचे वाटत होते पण आता चक्क मला कंटाळा आला होता. एक उंच पायरी असावी असा दगड होता. मला २ ढांगा लागल्या असत्या तो पार करायला, पण सरळ मला कंटाळा आल्याचे सांगून आशिष जरा उंच असल्याने त्याला जायला सांगितले. अंदाज खरा ठरला होता. तो बेचक्यात पोचला होता. वाट सापडली होती, खात्रीची. पण खूप निसरड्या वाटेवरून सावकाश एकेकाला मी थांबलेल्या जागेपर्यंत येऊ दिले. १२ वाजले होते. घड्याळात! आमचे तसे आधीच वाजले होते म्हणायला हरकत नव्हती. पण खरे तीन-तेरा तर नंतर वाजायचे होते ह्याची काही कल्पनाच नव्हती. डावीकडे डोंगराकडे जाणारी वाट आणि उजवीकडे चक्क पायऱ्या (म्हणजे पायऱ्या सदृश वाट) बघून आनंद झाला होता.

बेचक्यातून उजवीकडे गड-माथ्यावर जाणारी वाट
समोर एक उतरणारी वाट दिसत होती. उतरताना तिकडून उतरू असे ठरवून उजवीकडे गड-माथ्यावर जाण्यासाठी निघालो. एक टाकं दिसलं, पाणी पिण्यायोग्य दिसत नव्हतं. वाट मात्र चांगली मळलेली दिसत होती. उंच गवतातून जाणारी ती वाट आम्हाला ध्वजाकडे घेऊन गेली. गडावर बघायला एवढेच दिसत होते, अजून जागाच नव्हती आणि वाटही. अडीच तास चढून फक्त एक ध्वज आणि १-२ टाकी दिसली होती. इथे असणारे वाड्यांचे चौथरे गवतात बुडून गेले होते. इथून बोरघाटाचे दृश्य आम्ही फक्त कल्पनेत बघत होतो. राजमाची, ढाक, भिवगड, प्रबळगड दिसतात हे फक्त वाचले होते, दिसत होते ते फक्त धुके. फोटो काढणार तरी कशाचे... परत उतरून बेचक्यात आलो. पलीकडच्या डोंगरावर चढूनही गेलो, पण बरेच अंतर जाऊनही दिसला झाडावर बांधलेला एक ध्वज आणि धुक्यातून हरवणारी एक वाट!!
आता बेचक्यातून नवीन वाटेने उतरायचं ठरवलं. थोडे खाली गेलोही पण वाट गुरांची दिसत होती. आणि असलीच तरी ती दुसऱ्याच गावात उतरणारीही असू शकत होती. किंवा पळसदरी वरून वर येणाऱ्या वाटेलाही मिळण्याची शक्यता होती. परत आल्या वाटेनेच उतरायचे ठरवले. येताना मुद्दामच वाटेतली झाडे बाजूला दाबून ठेवत, गवत मोडत आलो होतो त्याने जाताना वाट सापडायला अडचण आली नाही. कातळकड्यापर्यंत येऊन पोचलोही. माणसांचा आवाज ऐकू यायला लागला म्हणून कानोसा घेतला तर कातळकड्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाटेकडून २ जण आले. ते मुंबईहून पळसदरीवरून आले होते. २ तास चालत येऊन इथे पोचले होते. आम्ही गवत बाजूला सारून साफ केलेल्या वाटेचा त्यांना फायदा होणार होता, तसंच त्यांना वाटही नीट समजावून सांगितली. आल्या वाटेने आम्ही उतरायला चालू केले. खुणा सापडत होत्या. अचानक एके ठिकाणी २ वाटा दिसल्या. एक वाट यु टर्न घेऊन उजवीकडे जात होती आणि एक सरळ. दोन्ही ओळखीच्या वाटत नव्हत्या. सरळ वाटेने जायचे ठरवले. पुढे एक धबधबा लागला जो अजिबातच ओळखीचा वाटत नव्हता. परत फिरलो. यु टर्न जवळ येऊन दुसऱ्या वाटेला लागलो. आता अजून २ वाटा फुटल्या. डावीकडच्या वाटेला लागलो तर एक खड्डा आणि वाट संपली. परत फिरून उजवीकडच्या वाटेला लागलो. ही वाट खालच्या बाजूला जात होती पण गाव काही दिसत नव्हते, खड्डे दिसत होते पण ओळखीचे वाटत नव्हते. रेल्वेचे रूळ दिसायला लागले, बोगदाही दिसला. वाट नक्कीच गावाकडे न जाता गेलीच तर रुळांकडे घेऊन जाणार होती. खाली एक पूल दिसला तिथे २-४ पोरही दिसली पण आवाज ऐकू जाणे शक्य नव्हते, प्रयत्न करून बघितल्यावर तो सोडून दिला. रस्ता चुकल्याचे केव्हाच नक्की झाले होते. उजवीकडे एक गाव दिसत होते, कोणते ते कळायला मार्ग नव्हता. वाट तर अगदी संपलीच होती, ना रुळाकडे घेऊन जात होती ना कोणत्याही गावाकडे. वाटा फक्त खड्डे खणायला तात्पुरत्या केल्या असाव्यात असे दिसत होते. आता कोणत्याही गावात का होईना पण पोचले पाहिजे हे लक्षात आले. सव्वादोन वाजून गेले होते. असंख्य वाटा दिसत होत्या. पण त्या खड्डयापर्यंत नेऊन गायब होत होत्या. चढताना खुण म्हणून चांगले वाटणारे खड्डे आता चांगलेच त्रासदायक ठरायला लागले होते. फक्त वाटा, खड्डे आणि काहीच नाही अशी अवस्था आल्यावर चांगलेच अडकल्याचे कळत होते. परत फिरायचे हे नक्की झाले, पर्यायच नव्हता. सरळ सगळे एके ठिकाणी येऊन दिशांचा अंदाज घ्यायला लागलो. अनुभवी डोकी विचार करायला लागली. उलटे फिरलोच होतो, डावीकडची दिशा पकडायची हे नक्की झाले. पण आता blindly जाऊन चालणार नव्हते. दर १० फुटांवर २ वाटा फुटत होत्या. काहीही ओळखीच्या खुणा दिसत नव्हत्या. पण वाट नक्की होती, कुठे जाणार होती ते पुढे गेल्याशिवाय समजणार नव्हते. वाट खाली उतरू लागली. कोणत्यातरी गावात पोचणार हे नक्की झाले. सव्वा तीन वाजले होते अजून सोंडाई करायचा होता. पोटातली ईडली केव्हाच जिरली होती पण लक्ष पोटापेक्षा घड्याळाकडे होते.
अचानक खाली घरं दिसायला लागली. वाटा ओळखीच्या वाटत नसल्या तरी हायसे वाटले. चक्क जिथून चढायला सुरुवात केली तिकडेच उतरणार असल्याचे नक्की लक्षात आले. मागे वळून बघितल्यावर आम्ही चांगलेच चुकून दुसऱ्याच डोंगरावर गेल्याचे पण वेळेवर परत फिरून जागेवर आल्याचे लक्षात आले. अखेर ओळखीची दारं, खिडक्या, वाट आणि पांढरी सफारी दिसली. आता पाणी प्यायले. इथे आदिवासी, कातकरी समाजाचे लोक राहतात.
ओलेचिंब झालो होतो. जिकडे जाऊन आलो तिकडचा फोटो काढावा तर फक्त पांढरे धुके येणार फोटोत. कॅमेरासकट नखशिखांत भिजलो होतो. बूट काढलेच नाहीत तसंच गाडीत बसून सोंडाईच्या वाटेला लागलो. भूका जाणवत होत्याच पण भरल्या पोटाने सोंडाई कसा पटापट होणार म्हणून जेवायची तयारी नव्हती. खाकरा बाहेर काढला, वास्तविक खाकऱ्याचा सगळ्यांनाच कंटाळा होता, प्रत्येक ट्रेक ला खाकरा घरी परत जातो असा अनुभव होता, पण आज सगळा खाकरा संपला. बाकरवड्या पुरवून खाल्ल्या. सोंडेवाडी १८ किमी होते सोनगिरीपासून गुगल बाबांच्या सांगण्यानुसार.

1 comment: