“धोडप”... हा
शब्द ऐकून समोरच्यांच्या तोंडून “काय?” असा प्रतिप्रश्न आला नाही तरच नवल! सिंहगड,
राजगड ई. ई. प्रसिद्ध आहेत, पण धोडप? मुळात हा शब्दच सुधरत नाही. मग तो किल्ला आहे
का गाव की अजून काही हे माहित असणे दूरच. पण हेच नांव इतिहासकारांना १६ व्या शतकात
निजामशाहीत घेऊन जाते. मराठ्यांना हा किल्ला शिवाजींच्या कालखंडात घेता आला
नव्हता, तो नानासाहेब पेशवे आणि निजाम यांच्या तहात स्वराज्यात मराठ्यांच्या
ताब्यात आला. राघोबादादा यांच्यावर राजकीय आणि गृह-कलहातून माधवराव पेशव्यांनी
हल्ला केला तो ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी. १८१८ साली इंग्रजांनी मराठा साम्राज्य
बुडवलं आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पण हेच नांव ऐकून ट्रेकर एक तर हळहळतो, “अरे
राहिलंय रे अजून तिकडे जायचं, जमलं नाही रे अजून...” किंवा त्यावरच्या जुन्या
मोहिमेच्या आठवणीत सुखावतो. “अहाहा, काय दिसतो रे मस्त!” हे आपणहून बाहेर पडतेच
आणि मग डोळ्यासमोर अवघा धोडप उभा राहतो, ते त्याचं देखणं रूप, “इखारा” सुळक्याच्यामागून
पाहिलेला सूर्योदय किंवा मार्कंड्या (मार्कंडेय), रवळ्या-जावळ्याच्या मागे लुप्त
होणारं लालबुंद सूर्यबिंब त्याला परत धोडप वर घेऊन जातं.
गेल्या महिन्यात
नाशिकचे सुभेदार (निव्वळ मराठ्यांचं राज्य बुडून सध्या लोकशाही आल्याने हा IT
कंपनीत मजुरी करणारा, नाहीतर नाशिकच्या सुभेदारीचा प्रबळ दावेदार), श्री श्री
हर्षल कुलकर्णी ह्याने धोडपचा प्लान करतोय म्हणून सांगितलंन आणि मी तारखा मनात
पक्क्या केल्या. सध्या मोकळा वळू असल्याने October चा एकही शनी-रवी वाया घालवायचा
नाही म्हणून ठरवलंच होतं. १५-१६ October मनात पक्की झाली. असा कोजागिरीचा मुहूर्त
वर्षातून एकदाच येतो आणि तो क्षुल्लक कारणासाठी मी फुकट नक्कीच घालवणार नव्हतो. ७
जण ठरले. अगदी निघेपर्यंत धाकधूक असतेच तसंच ४ दिवस आधी एक मेंबर गळाला. पण लगेच
दुसऱ्या ट्रेकरने ही संधी साधलीन आणि १४ च्या रात्री धोडपसाठी सज्ज झालो.
दसऱ्यापर्यंत पावसाने वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावूनही वेळेवर विश्रांती घेतलेली
होती.
नेहमीप्रमाणे
ठरलेले समान घेऊन मी रात्री ९ ला हर्षलकडे पोचलो. तवेरा हजर झाल्यावर लगेचच “मोsssरया”
चा गजर करून निलेश, विराग, पराग आणि अजय यांना जमवत नाशिककडे मार्गस्थ झालो.
नाशिकला सुनील येऊन मिळाला आणि ७ च्या दरम्याने सावरपाडा गावात दाखल झालो. रमेश
स्वागतासाठी हजर होताच. त्याच्याकडेच पोहे झाले. ह्यावेळी त्याला यायला जमणार
नव्हते पण त्यानेच एका गावकरी मामांची वाटाड्या म्हणून सोय लावून दिली होती. गडावर
पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे बाकीचं समान गाडीतच ठेऊन, पाणी आणि थोडा चकणा
घेऊन गडाकडे निघालो. मामा एकदम उत्साहात माहिती देत होते. अवघ्या १० मिनिटातच
पिंपळाने नेत्रदीपक दर्शन दिले.
पिंपळाचे पाण्यातले अप्रतिम रूप |
तलावाच्या डावीकडून मळलेल्या पायवाटेने लहानसा बंधारा,
मग ओढा पार करून आवश्यक थांबे घेत तासाभरात पठारावर येऊन पोचलो. १०-१५ मिनिटांच्या
रस्त्यात डोक्यावर घोंघावणाऱ्या माशांनी अक्षरशः वेडं केलं होतं. पिंपळा गावातूनही
इथे वाट येते, पण ती मळलेली नाहीये. सावरपाडातून आम्ही आलेली वाट मात्र मळलेली
होती. इथपर्यंत वाट चुकण्याची फारशी शक्यता नाही पण पुढे मात्र मळलेली वाट शोधायला
लागते, कारण अचानक वाट गायबही होते. २ वाटा नेढ्याकडे नेतात, समोरची वाट सरळ वर
नेणारी पण घसरड आहे तर दुसरी थोडासा वळसा घालून मागच्या बाजूने वर नेणारी आहे. आम्ही
दुसऱ्या वाटेने चाललो. वाट मधेच लुप्त होत होती, पण वाटाड्या मामा आम्हाला परत
जागेवर आणत होते. वाढलेल्या गवतातून, झाडांच्या नैसर्गिक बोगद्यातून वाट काढत वर
चढत होतो. वाट घाम काढत होती. Dehydration होऊ नये यासाठी थोडं-थोडं पाणी प्यावं
लागत होतं. मागच्या बाजूला आता टकारा, साल्हेर-सालोटा स्पष्ट दिसत होते. मोठ्या
किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आसपास काही किल्ले बांधले जात असत, त्यांना प्रभावळीतले किल्ले
म्हणत. पिंपळा हा साल्हेरच्या प्रभावळीतला किल्ला आहे. साल्हेर आपला परशुराम
टोकावरून मान ताठ करून आमच्याकडे पाहत होता. आम्ही लक्ष परत पिंपळाकडे वळवलं. ते
प्रसिद्ध नेढं दिसलं. गुहाही दिसली. झपाझप नेढ्यात पोचलो. शंभर-सव्वाशे पान सहज
उठेल एवढ्या प्रचंड आकाराचं ते नेढं होतं. आणि शेजारी तेवढ्याच आकाराची गुहा.
सह्याद्रीतली २ मोठी नेढी नाशिक बाळगून आहे. एक येताना दिसलेलं “मोहनदरीचं” नेढं
आणि ज्यात आम्ही उभं होतो ते सह्याद्रीतलं सगळ्यांत मोठं पिंपळावरचं नेढं!
आम्ही उभं होतो ते सह्याद्रीतलं सगळ्यांत मोठं पिंपळावरचं नेढं! |
साल्हेरवरचं
परशुराम मंदिर अगदी स्पष्ट दिसत होतं. गेल्याच वर्षी साल्हेर वर गेलो होतो तेव्हा
ऐकलेली कथा आठवली. साल्हेरवरून भगवान परशुरामांनी जेव्हा समुद्र मागे हटवून जमीन
निर्माण करण्यासाठी बाण मारला तेव्हा एका डोंगराला मोठं खिंडार करून तो आरपार
गेला. तो डोंगर म्हणजे आम्ही उभे असलेला पिंपळा किल्ला आणि ते खिंडार म्हणजे सह्याद्रीतलं
सगळ्यांत मोठं नेढं, ही भगवान परशुरामांची कृपाच!
नेढ्याच्या
डावीकडून घळीतून वरती लहानसा Rock Patch पार केला की टाकी असलेल्या टोकावर पोचतो.
ह्या टाक्यांना जिवंत झरे नाहीत. बहुतांशी लोकांना कोरडीच बघायला मिळणारी ही टाकी
पूर्णपणे भरलेली होती, यंदा पाऊसच जोरदार झाला होता. सभोवार नजर टाकली तर नाशिक
आपलं सौंदर्य उधळत होता. मागच्या बाजूने टकारा, साल्हेर-सालोटा, मागे हनुमान
डोंगर, आडवाच्या आडवा हरगड, शेजारीच मुल्हेर-मोरा, मांगी-तुंगी ची टोकं, दीर-भावजय
(होय, ही नांवं आहेत डोंगरांची, सुभेदार हर्षलची कृपा!), चौल्हेर, कोथमीऱ्या तर
दुसऱ्या बाजूला कांचना, हंड्या, लेकुरवाळी, इखारा, धोडप, रवळ्या-जावळ्या, मार्कंड्या,
सप्तशृंगी, मोहनदर, अहिवंत, अचला.... हर्षल नुसती नांवं फेकत होता, आम्ही पटापट
समोरचा डोंगर आणि नांव घोळवत होतो. त्याच्या बिल्डींग जवळच्या ४ बिल्डींगची नावंही
तो सांगू शकणार नाही ह्याची खात्री आहे मला पण नाशिकच्या प्रेमात हा पडला होता आणि
आम्हालाही खेचत होता. आम्हीही खेचलो गेलोच होतो. पुण्या-मुंबई जवळचे ४ किल्ले
फिरल्यावर ट्रेकर म्हणवून घेणारा नुसती नावंच ऐकून खाली बसेल नाशिकातली.
तर.. फोटो वगैरे झाले. लवकर खाली उतरणे भाग होते म्हणून पटकन गुहा बघायला
उतरलो.एके ठिकाणी वरच्या बाजूला ४-५ फूट भुयार खोदलेले आहे, त्याचा उद्देश समजत
नाही. ते आरपार नाही. गुहेच्या बाहेरच्या बाजूला एक भुयार आहे, ते मात्र आरपार
आहे.
पठार आणि मागे पिंपळा |
आता झपाझप खाली
उतरू लागलो. वाट चुकण्याची थोडी शक्यता आहेच पठारापर्यंत तरी. वाटेत एक छोटासा
ब्रेक झाला तोंडात टाकण्यासाठी, मग खाली उतरलो. १ वाजला होता. रमेश आमची वाटच बघत
होता. जेवण तयार होते. त्यांची स्वतःचीच कांद्याची शेती, मिरच्या, बाजरी, भात.
सगळं शेतातलं ताजं अन्न आमच्यासमोर होतं. सगळ्यांनीच ताव मारला. रात्रीच्या
स्वयंपाकासाठी त्यांच्याकडूनच थोडे कांदे घेऊन “हट्टी” गावाकडे निघालो.
तरी २ वाजून गेले निघायलाच. वाटेत एक छोटे संगमनेर लागते. हे संगमनेर वेगळे.
हट्टी गावात पोचायलाच सव्वा ४ झाले. इथल्या गावकऱ्यांशी संपर्क होऊ न शकल्याने
दुधाची सोय झाली नव्हती. वाटेतही मिळाले नव्हते, त्यामुळे कोजागिरीला मसाला दूध
नाही म्हणून जरा Mood-off झालाच. अगदीच दूध-पावडर होतीच वेळेला-केळं म्हणून.
No comments:
Post a Comment