धोडपकडे आता कूच
करायचे होते. पण आता सगळा संसार वर घेऊन जाणे भाग होते, तंबू सकट. वेळ न घालवता गडाकडे
सुरुवात केली. इथेही एक तळं लागलं. धोडप आडवा शंकराच्या पिंडी सारखा छान दिसत
होता. पिंपळाची जसं “नेढं” ही खासियत, तशी धोडपची “डाईक”. डाईक म्हणजे लाव्हारसाने
तयार झालेली बेसॉल्ट खडकापासुनाची भिंत. त्यात तयार झालेली नैसर्गिक खाच ही तर
ह्या डाईकचे सौंदर्य अजूनच वाढवते. तळ्याच्या डावीकडून निघालो. धोडपची वाट पूर्ण
मळलेली आहे आणि त्यातून हर्षल, निलेश आणि सुनील या आधी येऊन गेलेले होते. तसंही
आम्हाला वर राहायचे होते, पोचायला अंधार होणार होता. वाटाड्या घेण्यात काहीच अर्थ
नव्हता. पिंपळाने अर्धा-अधिक जीव शोषून घेतला होता त्यामुळे धोडप दमछाक करत होता.
तरी जवळ जवळ पूर्ण सावलीतूनच चढत होतो. वेग चांगला होता तरी पाठीवरचं ओझं दमवत होतं.
आज फक्त वर पोचायचं होतं, किल्ला उद्याच बघायचा होता. झपझप पावलं पडत होती.
हर्षलचा खुणेचा दगड आला. इथून डावीकडचा रस्ता थोडा चढा आणि जवळचा आहे, तर उजवीकडे
जाणारा रस्ता तुलनेने सोपा पण वळसा घालून जाणारा आहे. आम्ही डावीकडून जाणार होतो.
दोन्ही रस्ते सोनारमाचीकडेच जातात.
हट्टी गावातून दिसणारा धोडप |
५ वाजले होते.
मागे हट्टी, धोडांबे गांव आणि परिसर सुंदर दिसत होता. वरती देवीचे दर्शन घ्यायला
गेलेले गावकरी परतत होते. धोडप तसा offbeat किल्ला आहे, फक्त ट्रेकर आणि गावकरीच
येतात. गावकरी आमची चौकशी करत होते, पुण्याहून खास इथे आलो ह्याचे आश्चर्य ते लपवत
नव्हते. आता तशी सवयही झाली आहे, असे आश्चर्य बघायची. थोडा चढ, मग rock patch, परत
जरा चढ, परत छोटा rock patch असं करत सोनारमाची वरच्या पहिल्या तळ्याजवळ आलो. इथे
गणपतीची शेंदूर लावलेली मूर्तीही आहे. पाणी खळखळत होते. बाटलीत पाणी भरून घेतले.
ते थंड पाणी प्यायले. सगळे मागेच होते. थोडं चढून गेल्यावर शासकीय विश्रामगृह आहे,
लेबर शेड. हा किल्ला कळवण वनक्षेत्राच्या अखत्यारीत येतो. तिथेच सॅक टाकून उजवीकडे
वाट न्याहाळायला गेलो तर चक्क २-४ लोक म्हशी घेऊन होते, धार काढायला तो बसतच होता.
चक्क धारोष्ण दूध मिळणार होते, कोजागिरी मसाला दुधाने साजरी होणार होती. फुकट
मागतोय की काय असे वाटून तो दुधाला नाही म्हणत होता, पण आम्ही विकत घेणार
म्हटल्यावर तयार झाला. परत सॅकजवळ आलो तर पराग पोचतच होता. सगळे आले मग. कॅशियर
हर्षल दूध आणायला गेला आणि आम्ही गडाकडे वर निघालो. डावीकडच्या सुदर अश्या दुमजली
विहिरीत फोटोही काढले. सूर्य पलीकडे हळू हळू गायब होताना दिसत होता. त्याचा फोटो
घ्यायचा मोह आवरला नाही. तर मागच्या बाजूला इखारा सुळक्यामागून कोजागिरीचा चंद्र
डोकावू लागला होता. Rock Patch जवळ आलो तेव्हा ६ वाजून गेले होते. आता हा patch
सुसह्य करण्यासाठी शिड्या बांधल्या आहेत. सूर्य बऱ्यापैकी गायब झाला होता तर चंद्र
लालबुंद होत होता. कोजागिरीच्या चाहुलीने लाजलाही असावा ;)
इखारा सुळक्यामागून कोजागिरीचा चंद्र डोकावू लागला |
शिडीकडून उजवीकडे
पहिला दरवाजा गाठला. विराग आणि सुनील शिडीजवळ होते, तर हर्षल आणि निलेश दूध आणायला
थांबल्याने अजून यायचे होते. मी आणि पराग पुढे चालत राहिलो, रस्ता साफ आणि स्पष्ट
होता. पायऱ्या लागल्या, त्या सुंदर कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर फारसी भाषेतला एक
शिलालेख बघायला मिळाला (भाषा काही फारशी कळली नाही! :P) लगेचच “L” आकाराचा दरवाजा
लागला, सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्तम रचना असलेला हा दरवाजा आहे. वर जाऊन
बाकीच्यांची वाट बघू लागलो. अंधार झाला, Torch बाहेर काढली पण खालून काहीच हालचाल
दिसत नव्हती. १५-२० मिनिटांनी ४ Torch दिसल्या सगळे वर आल्यावर जिथे मुक्काम
करायचा होता तिकडे निघालो. आता पूर्ण अंधार झाला होता. चंद्राचा प्रकाश वाट दाखवत
होता आणि डोक्यावरच्या torch चा प्रकाशझोत पायाखाली काही येत नाही न याची खात्री
करून देत होता. नेहमी जी सुकलेली टाकी असे उल्लेख सापडतात ती सगळीच टाकी पाण्याने
भरलेली दिसत होती. वाड्यांचे अवशेषही दिसत होते, पण हे सगळे उद्या बघायचे होते.
आता गडाच्या डाव्या बाजूला सुरक्षा railing बांधलेले आहे. तिथून सरळ २-३ गुहा
ओलांडून मुख्य गुहेजवळ आलो. तिथे आतमध्ये मंदिर आहे, गावकरी येतात आणि तिथे एक
बुवाही राहतात म्हणून स्वच्छताही चांगली आहे. इथे शिव-पिंड, नंदी, पाण्याचे टाके,
यज्ञकुंड गुहेबाहेर आहे, तर आतमध्ये देवीचे मंदिर, थोडी भांडी, झोपायची जागा वगैरे
आहे. बुवा मात्र गायब होते आज. ८ वाजले असावेत. स्वयंपाक करायचा होता. पण त्यासाठी
म्हणून साहित्य काढायला घेतले आणि सगळ्यांनी जे मिळेल ते खायला सुरुवात केली.
पिंपळा वरून येताना १० एक भाकऱ्या आणल्या होत्या १-२ वगळता त्यांचा फडशा उडवला.
लोणचं-सॉस आमच्याकडे होताच, पण चक्क भाकरी-फरसाणही आम्ही खाल्लं. पोटातली धगधगती
आग शांत झाली आणि मग टेंट-चूल ह्या गोष्टींकडे वळलो. गुहेबाहेरच तंबू टाकावेत असे
सुंदर वातावरण होते. पौर्णिमेचा चंद्र, मोकळा परिसर दूरवर दिसणारे शहर आणि झगझगणारे
दिवे आम्हाला मोहात पडत होते पण या आधी निलेश-हर्षलला गुहेला लागूनच असलेल्या
टाक्यांजवळ विंचवांचा अनुभव असल्याने तंबू गुहेमध्ये टाकले, इथेही उंदरांचा त्रास
होतो असे ऐकून होतो. जागा ऐस-पैस होती. गुहेत साधारण ३०-४० जण राहू शकतील. त्यात
बुवांनी झोपायला मस्त मातीचा पलंग करून ठेवला होता. शेजारीच गोलाकार लाकडं
पेटवायला कुंडही केलेले आहे. गुहेतच आणखी एक खोली आहे. पण ह्यात बरीच पडझड झालेली
असल्याने राहण्यायोग्य जागा नाही. पण चूल पेटवायला मस्त जागा आहे. देवघर म्हणजे
मंदिर व्यवस्थित मोठे आहे. त्यात यथासांग पूजा झालेली देवीची मूर्ती होती आणि
समोरच छानसे एक यज्ञकुंड.
एका बाजूला चुलही पेटली होती |
गुहेबाहेर आता एका बाजूला चुलही पेटली होती, तीवर
तांदूळ शिजत ठेवले. वारा बऱ्यापैकी असला तरी मोठ्या दगडाच्या आडोश्याने आमचा बिरबलाचा
भात शिजत होता. तो झाल्यावर पिठल्याची सामुग्री बाहेर आली. पिठलं उत्तम तयार झालं.
मध्येच चुलीत ४ कांदे भाजून घेतले. चुलीवरच छानपैकी पापड भाजले आणि सगळ्यांचा
जठराग्नी परत पेटला. सगळ्याचा नैवेद्य दाखवला, देवीला नारळ वाढवला. पिठलं-भात, शिलकीतल्या
भाकऱ्या, पापड, लोणचं, खवा-पोळी असा नामी बेत बघून त्यावर तुटून पडलो. खरपूस भाजून
घेतलेला कांदा तर अप्रतिम. आता जठराग्नी शांत झाला. थोडी विश्रांती घेतली. विराग
दादांनी आधीच जरा पडी मारून घेतलेली असल्याने दूध आटवायची धुरा ते सांभाळत होते.
बाकी आम्ही पाठ टेकून घेतली. साडे अकराच्या सुमारास दूध तयार झाले. सुनील आणि
निलेश तर पाठ टेकायला गेलेले पार साखर झोपेत गेले. बाकी आम्ही मसाला दूध पिऊन
गुडूप झालो.
मसाला दूध |
सकाळी ५ च्या
आधीच जाग आली, पण कोणीच उठले नसल्याने पडून राहिलो. ५ ला दोन गजर वाजले आणि मी
बाहेर पडलो. गजर वाजवणारे तो बंद करून परत झोपले पण आता शिकारीची वेळ होती. आधी
विको वज्रदंती काढून तोंड खंगाळून घेतले. ताजं पाणी भरून शिकारीला गेलो.
सूर्योदयाला वेळ होता, वाघ मारून आरामात परत आलो, कॅमेरा घेऊन इखाराच्या मागून वर
येत असलेला तांबूस रंग टिपायला वाड्यांच्या अवशेषांजवळ गेलो. मनसोक्त फोटो काढून
परत गुहेजवळ आलो तर सगळे शिकारीच्या मूडमध्ये होते. मी तंबू वगैरे आवरून सॅक तयार
करून ठेवली. माझ्या समोरच माकडांनी गुहेबाहेर ठेवलेले कांदे वगैरे पळवलनी. आता
पोर्टेबल स्टोव्ह पेटवून दूध गरम करायला ठेवले. सगळ्याच दुधात मसाला टाकलेला
असल्याने चहा ऐवजी मसाला दूधच झाले. सगळी आवरा-आवरी करून डाईकच्या प्रसिद्ध
खाचेकडे निघालो. सूर्य ढगाआड लपला होता. मनसोक्त फोटोसेशन झाले. आता सुभेदार हर्षल
पुढे सरसावले. ॐ केशवाय नाम:, नारायणाय नाम: च्या उत्साहात त्याने सुरुवात केली.
हा अचला, पसरलेला अहिवंत, सप्तशृंगी, समोर मार्कंड्या, अलीकडे रवळ्या-जावळ्या,
कांचना, राजदेहेर, इंद्राई, कोल्देहेर, चांदवड, इकडे चौल्हेर, मोहनदरी, साल्हेर,
सालोटा, कान्हेर, प्रेमागिरी... इखारा तर आमच्या समोरच होता. नाशिकचं ते चौफेर
उधळलेलं सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात टिपून उतरवायला सुरुवात केली. अजून सोनारमाची
बघायची होती. आणि आलेल्या shortcut ने न उतरता इखारा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या
बाजूने उतरायचे होते. सोनारमाचीवर १५ मिनिटांचा power break घेतला. सॅक तिथेच
ठेवली. सुनीलच्या ligament ने दगा दिल्याने तो रखवालदार म्हणून तिथे थांबला. आम्ही
रवळ्या-जावळ्या कडे जाणाऱ्या वाटेने गणपती मंदिराकडे निघालो. गणपतीचे छोटेसे मंदिर
आहे, त्यात शेंदूर लावलेली मूर्ती आहे. पुढे झाडाखाली विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती
आहेत, दत्ताचीही मूर्ती आहे, समोरच पादुकाही आहेत. डावीकडेच काही वर्षापूर्वी
जीर्णोद्धार केलेल्या शंकराच्या मंदिराची परत पडझड झाली आहे. शंकराची पिंड, नंदी बघितला.
त्यामागेच एक पाण्याचे टाकेही आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही. आमच्यासमोर चक्क
लहान-लहान ओढे वाहत असताना बाटली किंवा टाक्यातलं पाणी का प्या?
१.५-२ फूट डोकं उचलून तो आपला अजस्त्र देह लकबीने नागमोडी वळवत घेऊन जाऊ लागला |
आम्हाला पुढे
असलेला शेवटचा दरवाजा बघायचा होता. हीच वाट पुढे रवळ्या-जावळ्याकडे जाते. आमचं दैव
जोरदार होतं. वाटेच्या उजव्या बाजूला लागूनच ८-९ फुटी “जनावर” संपूर्ण देह उलगडून
उन खात पडलं होतं. आम्ही जवळून पुढे जातच होतो. “अजगर”! शब्द माझ्या तोंडून बाहेर
पडताक्षणी सगळे थबकले. ते त्याचं रूप कॅमेरात साठवून घेण्याचा मोह कोणाला नाही आवरणार...
माझ्या कॅमेराने नेमकी मान टाकली होती. म्हणून मोबाईल वर काम भागवत होतो. विराग
आणि हर्षलने सुंदर फोटो टिपले. आमच्या हालचालीने त्याच्या साधनेत व्यत्यय आला.
त्याने मान १८० अंशात वळवली, आम्हाला बघून घेतले. शेपटीचं टोक नागमोडी केलं.
फोटोच्या नादात मी त्याच्या २-३ फुटांवर आलो होतो. अलगद ४ पावलं मागे आलो. अजगर
थोडा शांत असतो, चटकन हल्ला करत नाही. पण तरीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यानेही
हळू हळू पूर्ण शरीर १८० अंशात मागे वळवलं आणि घराकडे जाऊ लागला. १.५-२ फूट डोकं उचलून
अजस्त्र देह लकबीने नागमोडी वळवत घेऊन जाऊ लागला. मी मस्त शुटींग घेतलं, पण
दुर्दैव (वेंधळेपणा म्हणा किंवा नवीनच असलेल्या मोबाईलबद्दलचे अज्ञान) शुटींग बंद
करायला गेलो तेव्हा खरं recording चालू झालं. मोबाईलच कपाळावर मारून घेणे बाकी
होते.
८-९ फुटांचा तो
अजस्त्र अजगर, Indian Rock Python, आम्ही मोकळ्या जंगलात प्रथमच पहात होतो. धोडपने
surprise gift दिले होते. ट्रेक सार्थकी लागला होता.
आता शेवटचा
दरवाजा बघितला, बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. तिथे २ गावकरी भेटले, त्यांना फोटो
दाखवल्यावर धन्य झाले, साक्षात देवानेच दर्शन दिले आणि आमच्यामुळे त्यांनाही
बघायला मिळाले म्हणून कृतकृत्य भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. आता उलट पावली सोनार
माचीवर परत आलो. बॅगा घेतल्या आणि इखाराच्या रस्त्याला लागलो. वाटेत १-२ विहिरी
लागल्या, त्यात अजून एका लहान सापाने निलेशला दर्शन दिले. पुढे कळवण दरवाज्यापाशी
पोचलो. तिथे देवनागरीत शिलालेख कोरलेला आहे. दरवाजापासून पुढे १०० पावलं अंतरावरच
उजवीकडे खाली उतरायला वाट आहे. ती लक्षात न येऊन तसेच पुढे गेले तर ही वाट एका
आश्रमाकडे आणि इखाराकडे घेऊन जाते. आम्ही उजवीकडच्या वाटेने उतरणीला लागलो.
धोपटमार्गच होता तो. झपझप खाली आलो. वाटेत टोमॅटोचं शेत लागलं, त्या काकांकडून
काही ताजे टोमॅटो घेतले. ते नाकारत असले तरी त्याच्या हातावर पैसे टेकवले.
गोळ्या-बिस्किटं घेऊन मुलांचा चेहरा चांगलाच खुलला. आता गाडीकडे परत आलो.
गावात “परदेशी”
आडनावाची वस्ती आहे. सगळे मूळ राजस्थानी. मातृभाषा म्हणून हिंदी, पण
पिढ्यान-पिढ्या इथेच स्थाईक म्हणून मराठीही उत्तम. शिवाजी महाराजांच्या काळापासून
ह्यांचे पूर्वज इथे स्थिरावले. राजस्थान म्हणजे परदेशातून आलेले म्हणून परदेशी
आडनाव लागले. ह्यांची भुईमुग, टोमॅटो, मका अशी बरीच शेती आहे.त्यांनी प्रेमाने
दिलेला शेतातला ताजा मेवा नाकारता आला नाही. २ वाजत आले होते, अजून जेवणही बाकी होते.
तडक निघून पहिला थांबा ठक्करबाजार, नाशिक. इथे सुनील बस साठी निघून गेला. “हेमंत
पोखरणकर” उर्फ “हेम” ह्या वल्लीची इथे भेट झाली. पुढे नाशकातून बाहेर पडता पडता “संजय
अमृतकर” उर्फ नाना ह्याही अशाच एका मोठ्या व्यक्तीमत्वाची भेट झाली. नाशिक-पुणे
ह्या अत्यंत सुखदायक रस्त्याचा अनुभव घेत नागमोडी रीतीने आम्ही पुण्याकडे निघालो.
इथे गडी चालवताना ड्रायव्हरचाही ट्रेक झाला असेल असं म्हणायला हरकत नाही.
सगळ्यांना त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी सोडून हर्षलकडे पोचलो तेव्हा साडे बारा झाले
होते. घरी यायला १ वाजला. सगळं समान तसंच ठेऊन झोपी गेलो.
एक आठवडा कसातरी ढकलल्यावर पुढचा शनी-रवी अलिबाग. खांदेरी-उंदेरी जलदुर्ग माझी
वाट बघत होते.
Very well written Omkar.
ReplyDelete