Thursday, February 1, 2018

किल्ले अंकाई-टंकाई - II

अंकाई
अंकाईकडे जाताना वाटेत एका खोलीचे अवशेष शिल्लक आहेत, तिच्या मागूनच कातळ कोरीव पायऱ्यांची वाट पहिल्या दरवाजाकडे घेऊन जाते. त्याच्या मागे लगेच दुसरे प्रवेशद्वार आहे. पाहरेकर्‍यांसाठी असलेल्या देवड्या प्रशस्त आहेत. डावीकडे तटबंदी आहे तर समोर झाडांनी वेढलेली २ टाकी आहेत. उजवीकडे भग्न लेणी आहेत. ह्या लेण्यांना ब्राह्मणी लेणी म्हणून ओळखतात, गर्भगृह सुस्थितीत आहे, प्रवेशद्वारावर जय-विजय अश्या मूर्ती आहेत आणि अजूनही काही भग्न मूर्ती आहेत. आतमध्ये दरवाजाएवढीच मोठी मूर्ती असून इथे भरपूर वटवाघळे आहेत. नागमोडी वाट पुढच्या दरवाजापाशी जाते. व्दाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहेत. एकामागून एक ३ दरवाजे ह्या चढवाटेवर आहेत. पायऱ्या सुस्थितीत आहेत. त्यावर चढून गेल्यावर मागे वळून बघितल्यावर टंकाई किल्ला पूर्णपणे खिंडीपासून मुख्य दरवाजापर्यंत छान दिसतो. अजून २ दरवाजे ओलांडल्यावर समोरच मुंजा महाराज म्हणून रंगवलेली मूर्ती आहे. डाव्या बाजूला एक वाडा आहे, पुढे डाव्या बाजूला २ आणि उजव्या बाजूला २ अशी निवडुंगात लपलेली पाण्याची टाकी आहेत. त्यातली ३ भरलेली तर एक कोरडे होते. 

ब्राह्मणी लेणी
अजून काही पायऱ्या चढल्यावर समोरच गुहा आहे, हिला सीता गुहा म्हणतात. त्याच्या बाहेरच पाण्याचे टाके आहे तर आतमध्येहि खांब असलेले पाण्याचे टाके आहे. दरवाजे जाळीच्या दरवाजाने कुलूप लावून बंद केलेले आहेत. हि वाट उजवीकडून पुढे अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे जाते. आधी डावीकडेच उंचावर पाण्याचे टाके आहे आणि खोलीही आहे. ह्या आश्रमात एक बाबा आणि त्यांचे शिष्य राहतात. आतमध्ये अगस्ती ऋषी, राम-सीता, विठ्ठल-रुक्मिणी, शिव-पार्वती अशी संगमरवरी बांधलेली मंदिरे आहेत. राहणाऱ्या बाबांचे पोथी-पुस्तके असे गीता वगैरे साहित्य इथेच आहे. तर लहान मंदिरांच्या मागेही त्यांचे गॅस सिलेंडर, चादरी वगैरे सगळे समान खोल्या-खोल्यात आहे. गुहेबाहेर समोरच झाडाला पार बांधून काढलेला आहे आणि बसायला बाकडेही आहेत. पारावर हनुमान आणि शंकराचे मंदिर आहे. इथे खिंडीतून आलेली माकडे बिनधास्त हिंडत होती. गाऱ्हाणं सांगत गावकरी बसले होते. चढायला सुरुवात केल्यापासून आता पहिल्यांदा पाणी प्यालो. आता मागच्या बाजूला निघालो तर डावीकडेच छोटेसे भुयार दिसले, वर निवडुंग होते आणि माकडेही किचकीच करत निघून गेली. ३*३ च्या छोट्याश्या भुयारात, आतमध्ये मात्र ३ एकशे पान सहज उठेल असे मोठे सभागृह आहे. ४-५ खांबी पाण्याचे टाकेही आहे. 

काशीकुंड आणि अगस्ती ऋषींची समाधी
आत न घुसता गडाच्या मागच्या बाजूला निघालो. समोरच काशीकुंड नावाचे पाण्याचे तळे आहे. तळ्यात बरोबर मध्यभागी अगस्ती ऋषींची समाधी आहे. तिथे जाण्यासाठी दगडी मार्गही आहे. तळ्याच्या आधी डावीकडे ४ छोटी मंदिरे/समाधी आहेत. इथे स्वतःचा फोटो काढलाच. काशीकुंड ओलांडून पुढे गेल्यावर एक गढूळ पाण्याचा तलाव लागला. पुढे अजून एक बांधीव तलाव आहे. पाणी पिण्यायोग्य नाही. समोरच जुना गढी छाप राजवाडा अशी वास्तू आहे, त्याचे छप्पर पूर्णपणे नाहीसे झालेले असून आतमध्ये २ खोल्या आहेत. हि वास्तू म्हणजे गडाच्या ह्या टोकाचा शेवट आहे.चारही बाजूंनी मजबून तटबंदी आहे तर आतील बाजून ३५ एक कमानी आहेत. आतमध्ये खूप खोल्या असाव्यात. बरोबर मध्ये एक कोरडा पडलेला तलाव आहे. डावीकडे शाबूत असलेल्या खोलीवरती पीराचे स्थान आहे. बाहेर एक थडगेही आहे. डावीकडच्या पडक्या दरवाजाने बाहेर पडताना पूर्ण राजवाडा कॅमेरात टिपून घेतला. 

राजवाडा
तलावाजवळून आश्रमाकडे निघालो. वाटेत माकडांची टोळी बसलेली होतीच. दोघेही एकमेकांना घाबरत होतो. हातातली काठी कोणावरही न उगारता नुसती समोर धरून सुरक्षितरित्या टोळ्यातून बाहेर पडलो. आश्रमाच्या वरती टेकडी आहे, पायवाट त्यावर घेऊन जाते. वाटेत उजवीकडे कोरडे पडलेले तळे दिसते तर जवळच ३*३ चे भुयार आणि आतमध्ये आधीच्यासारखीच खोली आणि दगडी खांब असलेले टाके आहे. गडाच्या ह्या सर्वोच्च माथ्यावर फक्त एक ध्वज आणि दगडी कट्टा आहे,. पूर्वी इथे कदाचित मंदिर असावे. इथून अगस्ती समाधी, मागे २ तळी, राजवाडा दिसतो. पलीकडे गोरखगड, कात्रा, उजवीकडे हडबीची शेंडी दिसते. खाली हायवे, डावीकडे अंकाईकिल्ला रेल्वे स्टेशन तर उजवीकडे मनमाड स्टेशन दिसते. बरोबर मागे टंकाई किल्ला, विस्तीर्ण पठार आणि एकाकी महादेवाच्या मंदिरासकट सुंदर दिसतो. सोय असेल तर ३६० अंशातून Panorama फोटो जरूर घ्यावा. दुसऱ्याच एका वाटेने आश्रम ओलांडून पलीकडे असलेल्या आधीच्या गुहेकडे खाली उतरलो. गड पाहून झाला होता. खिंडीकडे निघालो. गड संपला वाटत असतानाच उतरताना दरवाजाच्या उजवीकडे अजून एक गुहा दिसली, जवळ गेलो तर डावीकडे अजून २ मोठ्या गुहा दिसल्या. अश्या राहण्यायोग्य जागा गडावर खूप आहेत.
कामगारांची कामं जोरात सुरु होती. खालून येणाऱ्या वाटेवर ते बिनधास्त दगड ढकलून देत होते. हाक मारून त्यांना थांबायला सांगितले. २-३ मिनिटातच खाली मुख्य लेण्यांजवळ येऊन पोचलो. लेण्यांची देखरेख करायला ठेवलेला सरकारी माणूस येऊन बसलेला होता. त्याने काही दरवाजे उघडून मला आतमधून लेणी पाहू दिली. स्वताहून मूर्ती दाखवत होता आणि चक्क वरच्या मजल्यावर जायची भुयारी वाटही दाखवलीन. तिथून वरही घेऊन गेला, मनसोक्त फोटो काढू दिलेन. सगळे दरवाजे उघडून पूर्ण लेणी बघू दिलीन. घरातून आणलेल्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या होत्या, त्या सरळ ओतून टाकल्या. काढणं होतंच, त्याने पाणी काढले. "इथल्या पाण्याने सर्दी होईल, खाली गावात जाऊन चांगले पाणी प्या" ह्याकडे दुर्लक्ष केलं. मेलं कोंबडं आगीला थोडंच भीतं? मी भरल्या नाकानेच तिथे पोचलेला होतो. बिनधास्त पाणी प्यालो, बाटलीही भरून घेतली.
अवघ्या ३ तासांत दोन्ही गड मनसोक्त भटकून निवांत फोटोही काढले होते. २ वेळा लेणीही बघून खाली आलो होतो. गाडीवर टांग टाकून परत हायवेला लागलो.
दोनच दिवसांपूर्वी शेगावला जाताना वाटेतच बहादरपूर किल्ला अनपेक्षितरित्या बघायला मिळाला होताच. हायवेवरूनच लळिंग, कात्रा आणि गोरखगडचेही दर्शन घडले होते. हि यात्रा सुफळ-संपूर्ण झाली होती.

No comments:

Post a Comment