Tuesday, March 13, 2018

किल्ले बहादरपूर

नांव चुकलं नाहीये, बहादरपूरच नांव आहे किल्ल्याचं. "बहादूर" नाही. बहादुरपूर किल्लाही आहे, पण तो हिमाचलमध्ये. मला सापडला तो महाराष्ट्रातला बहादरपूर किल्ला. "सापडला" हेच बरोबर. गुगलकृपेने सापडलाच. अतिशय अनवट म्हणावा असाच हा किल्ला आहे. पारोळा आणि अमंळनेर यांच्यामध्ये बोरी नदीकाठावर हा किल्ला आहे. किल्ल्याबद्दल माहितीही कमीच उपलब्ध आहे. पाहण्यासारख्या गोष्टीही सापडतील अश्याही कमीच आणि फोटोही कमीच उपलब्ध आहेत. या सगळ्यामागचं कारण शोधताना "दुर्दैव" हाच शब्द चपखल बसतो.

जिल्हा: जळगाव
प्रकार: भुईकोट
श्रेणी: सोपा

किल्ले बहादरपूर - पेटंट फोटो

मुळात किल्ला बघायला बाहेर पडलोच नव्हतो. निघालो होतो शेगावला आणि वाटेत थांबा होता "कोळपिंपरी" जवळच्या आडवाटेला. मुळात मी कोकणी माणूस. धुळे, जळगाव, जालना वगैरे नांवं म्हणजे अगदीच अपरिचित ठिकाणं. भूगोलाच्या नावाने गोलंच, त्यामुळे नांव सोडल्यास सगळीच बोंब! भारताच्या नकाशावर ठिकाणं कुठे आहेत हेच माहिती नाही. धुळे? ते आता सासरकृपेने बघायला मिळणार होते. अगदी गाडीत ड्रायव्हरच्या शेजारी बसून हा नवीन भूभाग मी बघत होतो. कोपरगाव सोडल्यावर थोड्याच वेळात खूप दिवसांपासून खुणावत असेलेले अंकाई-टंकाई दिसले.
कात्रा-गोरखगड, हडबीची शेंडी दिसली तेव्हा आपणहून नजर किल्ले शोधू लागली. "लळिंग" किल्लाही दिसला. गुगल मॅप अपोआप उघडलं गेलं. शेजारी ड्रायव्हर त्याच भागातला. मी सोडून सगळी मंडळी तिकडचीच. आणि मी उगाच "हां, आता डावीकडे, आता पुढे १ किमीवर उजवीकडे घ्या" वगैरे माझा आत्ताचा आणि मागचाही जन्म विदर्भात गेल्यासारखा (धुळे खानदेशात ना? माझा भूगोल!) गुगलवाल्या काकू माझ्या कानात रस्ता सांगत होत्या आणि मी ड्रायव्हरला. मंडळींनाही अगदी "exact" म्हणावा तसा रस्ता त्या आडवाटेवरच्या मंदिराचा माहिती नसल्याने मी आपणहूनच खांद्यावरचा गुगलचा हात चाचपून बघत रस्ता सांगत होतो. "कोळपिंपरीला चल" असा हुकुम मोबाईलमधल्या जीनला सोडल्यावर त्याने ईमानेइतबारे पारोळ्याहून कोळपिंपरीला वळसा पडेल म्हणून जवळचा रस्ता म्हणून त्या आधीच्या फाट्याला आतमध्ये वळा अशी विनंती केली.
अचानक जॅकपॉट लागला. वाटेजवळच बहादरपूर किल्ला. म्हणजे सध्या फक्त मॅपवरच! प्रत्यक्षात अजून जायचे होते. वाट कोणालाच पक्की माहिती नसल्याने पारोळ्यावरून उलटा फेरा मारावा लागेल, अंतरही जास्त पडेल (आणि माझा किल्लाही जाईल!) यासाठी याच वाटेने जायचे ठरवले. मी ड्रायव्हरनाही तसंच सांगितलं. आता जबाबदारी माझ्यावर होती, आडवाट मी पकडायला लावली होती पण रस्ता काही फार वाईट नव्हता. धुळ्याहून पारोळ्याकडे जाताना फगाणे, अजांग, कासविहीर सोडलं की डावीकडे अंमळनेरकडे जाणारा फाटा आहे. पारोळ्याच्या आधी साधारण दहा-बारा किमीवर हा फाटा आहे. बोरी नदीच्या जवळून हा रस्ता अंमळनेरकडे जातो. रस्त्याला पहिलं गाव बहादरपूर आहे. खंडेराव मंदिर गेल्यावर मुख्य रस्ता डावीकडे वळून परत उजवीकडे वळून जातो पण डावीकडे न वळता सरळ रस्ता गावात घुसतो तिकडे घुसायचं. तसंच पुढे गेल्यावर उजवीकडे डावीकडे असे वळणे घेत आपण किल्ल्याजवळ पोचतो. रस्ता डांबरी आहे पण जरासा खराब आहे. तिथे पोचेपर्यंत नेटवर माहिती घ्यायचा प्रयत्न केला होता, फार काही हाती लागलं नाही. फक्त एकच फोटो दिसत होता. ओळखीचं दिसल्यावर थांबलो. मी सोडून कोणालाच त्यात काडीचाही रस नव्हता. त्यातून शेगावला जायला उशीर होईल म्हणून नाराजी असणारच. त्यामुळे "फक्त दहा मिनिटात येतो" म्हणून धावत सुटलो. एक आजी दिसल्या त्यांना विचारलं तर फार काही कळलं नाही पण त्यांच्या मुलाने मात्र रस्ता दाखवलान बुरुजावर जायचा. “बघायला काही नाही आहे, घाणही आहे” मी ऐकलं पण वेळ नव्हता विचार करायला. धावतच निघालो, वाटेत गाढवंही होती, अर्थात उकिरडाही होताच. वर जाणाऱ्या वाटेतच २ संडासही होते. गटारं वाहत होती. उड्या मारतच वर गेलो.  वाटेत काटेरी झुडपं होती. वर तर सगळीकडे झुडपे वाढलेली होती त्यात चरायला बकऱ्या वगैरे आणत असावेत. त्यातूनच फिरलो. वर खरंच काही दिसले नाही, मात्र वरून उजवीकडे भक्कम उभ्या बुरुजाचा आतला ढासळलेला भाग दिसत होता. डावीकडच्या बुरुजाने मात्र मान टाकली होती. दोन्ही बुरुजांच्या पलीकडे बोरी नदीचा काठ छान दिसत होता. नदी आणि किल्ल्याच्या तटबंदीमधल्या भागात मंदिर आहे आणि त्याचा परिसर. मंदिर शंकराचे असून “श्रीक्षेत्र हरीहर महादेव मंदिर” अशी कमानही डाव्या बुरुजाच्या बाजूला आहे. वर काहीच नसल्याने पळत खाली आलो. 

तटबंदीला धरून असलेले संडास आणि गोठा वगैरे
“अजून पाच मिनिट” असं सगळ्यांना सांगून धावतच तटबंदीला धरून नदीकडे जात असलेल्या वाड्याकडे गेलो. वाडा गुरांचा होता. तटबंदीला धरूनच हे सगळं. परवानगी मागायला तिथे कोणीही नव्हतं आणि वेळही नव्हता मी सरळ गुरांच्या कडेने गोठ्यातूनच पलीकडे गेलो. फक्त शेण आणि घाण. उतरायला पायर्‍या वगैरे नव्हत्याच. उडी मारली. तिथेच बुरुजाला लागून एक छोटे मंदिर आहे. घाणीतून पलिकडे मात्र बुरुजाच्या बाजूला मंदिराकडे जायला पायर्‍या आहेत. ही मंदिराची मागची बाजू आहे. थोडं मागे होऊन दोन्ही बुरुज व मंदिर असा पेटंट फोटो घेतला. बुरुज मात्र अत्युत्कृष्ट आहे. एकच पूर्णपणे उभा आहे आणि तोही काही वर्षात तो ढासळणार हे नक्की. सरळ सरळ किल्ल्याचा वापर संडास म्हणून होत आहे. दुसरा बुरुज तर जवळजवळ जात आलाच आहे, तोही सुंदर 40 फुटी असणारच. या बुरुजाजवळ 1 कबर आहे. एकंदरीत किल्ल्याच्या आत मध्येच गावाचा बराच भाग वसलेला आहे. किल्ला बराच मोठा असण्याची शक्यता आहे आता मात्र काहीही तसे शिल्लक राहिलेले नाही. गावात मधे-मधे तटबंदीचे उध्वस्त भाग दिसतात. गाडीजवळ येऊन परत पाच मिनिटं मागून घेतली. इंटरनेटवर एका पर्शियन भाषेतील शिलालेखाचा उल्लेख होता. तो आता ग्रामपंचायतीत आहे एवढीच माहिती मिळाली म्हणून ग्रामपंचायत कुठे आहे विचारले. “कोणती पाहिजे” असा प्रतिप्रश्न आला. इथे दोन ग्रामपंचायती आहेत. “जवळच असेल ती सांगा” म्हणून धावतच ती गाठली, तर मोठे कुलूप. वाकून बघितले तर शिलालेखाचा दगड ठेवलेला दिसला नाही. गावात कोणाला असलं काही आहे हेच माहिती असल्यासारखे दिसत नव्हते. एक तर मी धावत धावत फिरत होतो. गळ्यात कॅमेरा आणि घामेटलेला वेडाच वाटत असेल त्यांना. त्यांची काय चूक? गाडीतल्या लोकांची आठवण ठेवत तो न बघीतलेला शिलालेखाचा दगड स्वतःवर ठेवून पुढच्या प्रवासाला लागलो. गावाबाहेर पडताना तटबंदीचे अजून काही अवशेष दिसले, पण एकंदरीत आनंदच होता. मला बघायला मिळाले नाहीत, पण गावात अजुन खुप अवशेष शिल्लक आहेत तुकड्या-तुकड्याने. दोन-तीन तासांचा वेळ काढून नक्की बघायला पाहिजेत. घराबाहेर तोफेचे गोळेही पडलेले आहेत अशी माहिती आहे. तर गावाच्या बाहेर एक सुरेख मशीद आहे. त्यात दगडी बांधीव वास्तू आहे, एका खोलीत 5 तर दुसऱ्यात दोन कबरी आहेत. तळघरे आहेत. इंटरनेट वरच्या उल्लेखाप्रमाणे त्या राजघराण्यातल्या कबरी असाव्यात. दुर्दैव सोडून या किल्ल्याचे काहीच वर्णन करण्यासारखे राहिली नाहीये. दुर्दैव हे की माझ्याकडे वेळ नव्हता पूर्ण किल्ला अवशेष शोधून फिरायला. अक्षरशः जास्तीत जास्त पंधरा मिनिटात धावती भेट द्यावी लागली. अतिशय आडवाटेवरचा अजिबात माहिती नसलेला, कधीही या भागात येण्याची सुतराम शक्यता नसलेला किल्ला 15 मिनिट का होईना, बघायला मिळावा हे सुदैव!

2 comments:

  1. मस्त रे! धावतपळत का होईना किल्ला पाहिलास आणि त्यावर मस्त ब्लॉग पण लिहीलास.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!
      तसाही पूर्ण किल्ला बघायला न मिळाल्यामुळे यावर मी काही लिहिणार नव्हतो पण तू म्हटल्यामुळे हा लेख मी लिहायला घेतला.

      Delete