Sunday, July 15, 2018

किल्ले रामदरणे

"Trek Alert" नावाचा एक प्रकार आहे. पत्र आल्यावर जसा आनंद होतो, ना तसाच आनंद असला alert आल्यावर होतो. आत्ताचा alert होता "रामदरणे" किल्ल्याचा.
"सह्याद्रीचे ट्रेकर" वगैरे म्हणवून घेणाऱ्या बहुतांशी लोकांना सुद्धा हा किल्ला माहित नसेल, तर माझ्यासारख्या भटक्याची गोष्टच सोडा. पण असलं नांव वाचून मला प्रचंड आनंद होतो. जत्रा नक्की नसणार या ठिकाणी, निवांत किल्ला पाहता येणार आणि मनसोक्त फोटो पण काढायला मिळणार. फक्त एकच मानसिक तयारी हवी. "किल्ला" म्हणून त्यावर काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. पण किल्ला नेमका कुठे दडलाय ते शोधणे आणि त्यावरचे अवशेष शोधून एकमेकांना दाखवणे ह्यात प्रचंड आनंद असतो हे अल्पपरिचित किल्ल्यांची भटकंती करणाऱ्यांना कळेल. अश्या किल्ल्यांची जागा आणि त्यावरचे अवशेष हे अश्याच प्रचंड भटकंती करणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेले असतात पण तरीही दुर्लक्षित ठिकाण म्हणून त्यावर लोकांचा राबता नसतो किंवा उलटं म्हणा, लोकांचा राबता नसतो म्हणून दुर्लक्षित! पण कोणीतरी काढलेला ढोबळ नकाशा, कोणीतरी लिहिलेली त्रोटक माहिती तर कोणी लिहिलेल्या दिशा आणि खुणा अश्या गोष्टी जमवून असले किल्ले आणि त्यावरचे अवशेष बघायला मजा येते. नाहीतर रसाळगड सारखा पायऱ्या, बुरुज, वाडा, मंदिर, पाण्याची टाकी आणि 15-16 तोफा बघून सुद्धा त्यावर फार काही नाही बघायला असं म्हणणारेही असतात.
तर असाच एक अल्पपरिचित किल्ला बघायला जाणारा trek alert आला होता. घरून परवानगीही मिळाली, पण... जागाच भरल्या होत्या!!
एक तर संपूर्ण मे आणि जून महिना संपून गेला तरी घरात "ट्रेक" शब्द उच्चारायला मी धजावत नव्हतो. एप्रिलमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्याने ते धाडस मला करताच येत नव्हते. नशीब! त्यामुळे मग रविवारी बाकीची बारीक सारीक कामं ठरवली, शनिवारी दुचाकीवरून सहकुटुंब जवळच भटकून आलो आणि संध्याकाळी विनीतचा फोन, येणारेस ना उद्या? भरलेल्या जागांपैकी कोणीतरी गळाला होता. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. रविवारची कामं कारणं शोधून बाजूला ठेवली गेली. उशिरा घरी आलो तरी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली. पहाटे पावणे 5 च्या आधीच घरातून आपल्या दुचाकीवरून निघालो.
पावणे 6 म्हणजे पावणे 6. प्रसाद, कौस्तुभ वेळेवर पोचले विनीतच्या घरी आणि त्याच्या Tiagoने 6 च्या आधीच निघालो. सातपुते काकांना घेऊन अलिबागकडे प्रस्थान केले. पालीकडे जाणाऱ्या फाट्यावर उडुपीच्या "मयुरी" मध्ये तुडुंब न्याहारी करून "मेली ठेचेवर ठेच" करत  वाटेला लागलो. पावसाळ्यात गाडीतून फिरणे ह्यात काहीच मजा नाही म्हणून गाडीत बसूनही होडीत बसल्याचा आनंद मिळवा ह्यासाठी भारत सरकारने ठिकठिकाणी रस्ता तसा बनवून ठेवलेला आहे. (मुंबईत तर पाणबुडीचा ही आनंद घेता येतो म्हणतात बा!)
तर आता भरल्या पोटी ट्रेकचे नेमके ठिकाण, रस्ता, पायथ्याचे ठिकाण अश्या प्रश्नांवर विचार करण्याइतपत शक्ती आली होती. विनीत अर्थात तयारीनिशी असणार ह्यात काहीच शंका नव्हती. पण एकाला दोन बरे म्हणून उपलब्ध माहिती वाचून काढली. रामदरणे हा किल्ला अगदीच दुर्लक्षित. त्याची माहिती फक्त Trekshitij आणि सचिन जोशी यांच्या लिखाणातून मिळाली. ह्या गडावर जाण्यासाठी खूप वाटा आहेत. वायशेत, चोरोंडे, परहूरपाडा, भाल, मूळे आणि कार्ला अश्या गावातून वाटा ह्या किल्ल्यावर जातात. हा किल्ला गावातल्या लोकांनाही तेवढा परिचित नाही, जेवढे इथल्या डोंगरावरचे "रामदरणेश्वर मंदिर" आहे. त्यामुळे ह्या मंदिराची चौकशी करावी. आम्ही परहूरपाडा गावातून जायचा निर्णय घेतला होता. तिकडे चौकशी करत करत एका दुकानात "कृष्णा" नावाचा इसम आम्हाला नेऊ शकतो आणि तो "सोगांव" इथल्या आदिवासी पाड्यात राहतो हे एका आजोबांकडून कळले. परहूरपाडा पासून तसा फार लांब नाही हे सोगांव, आणि जरासा पुढे आदिवासीपाडा. पण ह्या पाड्यापर्यंत गाडी काही जात नाही. थोडी आधीच गाडी थांबवून त्या पाड्यात शिरलो. स्वागत कुत्र्यांनी केले. तिथली माणसं आमच्याकडे ढुंकूनही बघत नव्हती आणि हाकेला ओ पण देत नव्हती. बऱ्याच प्रयत्नांनंतर कृष्णा कामावर गेलेला असून आमच्या बरोबर यायला कोणीही तयार नाही असं कळलं. सोमा कि काहीसं नांव असलेल्या दादांनी जरा दया येऊन घराच्या बाहेर येऊन आमच्याशी बोलायची कृपा केली. मगाशी जिथे चौकशी केली होती त्या दुकानात बसलेला नितीन नावाचा मुलगा हा ह्या सोमाचाच मुलगा निघाला. बऱ्याच विनवण्या केल्यानंतर सोमा येतो म्हणाला पण त्याची गावात गरज आहे म्हणून नितीन आमच्याबरोबर निघाला. पाण्याची टाकी, जुन्या वाड्याचे अवशेष ह्यातले काहीही त्यांना कोणाला माहिती आहे असे दिसत नव्हते पण रामदरणेश्वर मंदिर मात्र पक्के ठाऊक होते. जवळजवळ 11 वाजले होते. Something is better than अजिबात nothing.
त्याच्या भरावशावर निघालो. किल्लाच काय, मंदिरही नक्की कुठेसे आहे ते कळत नव्हते त्या टेकड्या आणि डोंगरांमध्ये. लहान लहान पाण्याचे ओहोळ आणि मधूनच डोकावत असेलेले हिरवे गवत त्या चढाईची जाणीव होऊ देत नव्हते. एक साधारण 15 एक मिनिटांत एक पठार लागले. उजवीकडे लांबवर समुद्रात खांदेरी, उंदेरी दिसत होते. एका बाजूला वर लांबवर असलेले डोंगराचे टोक "कनकेश्वर" अशी ओळख सांगत होतं. पण ज्याच्या शोधात होतो तो किल्ला किंवा मंदिरही नेमके कुठे दडलेय त्याचा नुसताच अंदाज मनात बांधत होतो. समोरच्या डोंगरावर सरळ न जाता नितीनने मोर्चा डावीकडे वळवलान आणि एका बेचक्यात येऊन पोचलो. वाटेत उजवीकडे एक पाण्याचे टाके आहे असे नितीन हलकेच बोलला, पण किल्ल्याशी संबंधित 3 टाक्यांपैकी ते काही असावे असे त्याच्या आवाजात जाणवत नव्हते. सारखे, पाण्याची 3 टाकी, उंच वारूळ, पडक्या वाड्याचे अवशेष असे शब्द मध्ये मध्ये टाकून नितीनच्या माहितीचा अंदाज घेत होतो पण काही आशा दिसत नव्हती. त्या बेचक्याजवळ एक ब्रेक झाला आणि परत दिशांचा अंदाज घेतला. टेकड्या, वाटा अश्या खुणा बांधल्या. बेचक्यातून समोर आलेले उंच टोक, तिथेच मंदिर आहे रामदरणेश्वराचे असे नितीनने सांगितलेन. तिथे पोचल्यावर पुढचे बघता येईल म्हणून मोर्चा मंदिराकडे वळवला.

पठार
खांदेरी-उंदेरी

जंगल आणि मंदिराकडे जाणारा रस्ता
छत्री वाऱ्यापुढे टिकत नव्हती, ती घट्ट पकडली. तिच्याच आडोश्याने कॅमेरा धरून फोटो काढत होतो. निलगिरी सारख्या जातीच्या झाडांच्या बनातून वाट काढत बेडं ओलांडून मंदिरात पोचलो. मंदिराच्या बाहेरच नंदीच्या 2 जुन्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिर प्रशस्त आहे, आतमध्ये समोरच एक नंदी असून गाभाऱ्याच्या बाहेर डावीकडे एक गणपती आहे. पिंडीशेजारी 2 शंख ठेवलेले आहेत तर पिंडीवर अभिषेक पात्रही आहे. दररोज पूजा होत असावी.
12 वाजले होते, म्हणजे तासाभरात इथे तर पोचलो होतो. दर्शन घेऊन बाहेर पायऱ्यांवर बसून आणलेल्या खाऊवर ताव मारला. पावसाने आता चांगलाच जोर धरला होता. पुन्हा माहिती वाचन आणि अंदाज घेणे चालू झाले. मागे एक डोंगर, त्यावर न जाता वळसा घालून आलो तिथेच किल्ला असावा असं मला वाटत होतं. नितीनला देवीचे मंदिर माहिती होते, ते ह्या रामदरणेश्वराला नमस्कार करताना बरोब्बर पाठीकडे खालच्या बाजूला येते. 5 मिनिटातच खाली उतरून त्या मंदिरात पोचलो. वाटेत एक लहानसा ओढाही लागला.

रामदरणेश्वराचे मंदिर
देवीचे हे मंदिर मात्र जीर्णोद्धार झालेले आहे. परहूरपाडा मधून एक वाट इथे येते असं नितीन म्हणाला. जुन्या मंदिरातल्या मूर्ती इथे आणून ठेवलेल्या आहेत. बाहेर ठेवलेल्या 4 मूर्ती ओळखू न येणाऱ्या आहेत तर आतमध्ये देवीची नवीन मूर्ती आहे. मंदिराचे नवीन बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. आता खुणा जमत होत्या पण दिशा लक्षात येत नव्हती. नितीनच्या तर अजूनही गडाचे काहीही अवशेष लक्षात येत नव्हते.
मंदिराच्या बरोबर समोरचा डोंगर (देवीकडे तोंड करून उभं राहिल्यावर मागचा डोंगर) चढून गेल्यावर खरं तर किल्ला दिसतो. त्या डोंगराकडे निघालो तर जवळच अजून काही मूर्ती डावीकडे ठेवलेल्या नितीनने दाखवल्यान. ह्या मूर्ती मस्त आहेत, रेखीव. ह्यात महिषासुर मर्दिनी आणि खंडोबाच्या मूर्ती सहज ओळखता येतात. अजूनही काही मूर्ती इथे आहेत. परत वाटेला लागलो आणि माथ्यावर आलो तर पलीकडे एक डोंगर दिसला. जिकडे जायचे त्या वाटेवरून काही आवाज पण ऐकू आले. किल्ला शंभर टक्के तिकडेच असणार असा अंदाज बांधला तर काही लोकं भेटलेच. हे trekshitij वालेच लोक होते जे काही ट्रेकर ना घेऊन आलेले होते.

देवीचे मंदिर
महिषासुर मर्दिनी, खंडोबा आणि इतर मूर्ती
समोरचा किल्ला आणि उतरलेला डोंगर याच्या मधल्या घळीत हे लोक भेटले आणि खुणेचे 4 फुटी वारुळही दिसले. ही घळ मानवनिर्मित असून किल्ला आणि डोंगर वेगळा करण्यासाठी निर्माण केलेली आहे असे उल्लेख आहेत. ते वारूळ दिसल्यावर वाचलेली माहिती डोळ्यासमोर आली आणि आता आम्ही नितीनला वाट आणि खुणा दाखवू लागलो. वारूळ उजवीकडे आहे. उजवीकडून त्याच्याच बाजूने जाणारी वाट 3 टाक्यांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट बुरुज आणि अवशेषांकडे जाते. आधी उजवीकडे टाकी बघायला जावे. वाट मळलेली आहे, चुकत नाही. पण वाट खचलेली आहे आणि अरुंद. पूर्वी वाट चांगली असावी पण पावसाने दरड कोसळून खूप लहान लहान दगड वाटेवर आलेले आहेत. सांभाळून गेल्यावर 10 मिनिटात गडाच्या अवशेषांचे म्हणजे टाक्याचे दर्शन होते. पहिल्या टाके, नंतर दुसरे टाके. त्यातून जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी सुंदर दगडी पन्हळ खोदलेली आहे. लगेचच पुढे तिसरे मोठे आणि 2 खांबांवर तोललेले टाके आहे. ह्या टाक्यात एका भिंतीवर गणपतीआदी देवांची चित्रे असलेल्या 2 फारश्या लावलेल्या आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे. इथूनच एक वाट खाली वायशेत गावाकडे जात असावी.

पाण्याचे टाके १

पाण्याचे टाके २ आणि पन्हळ

पाण्याचे टाके ३
बुरुज आणि उर्वरित अवशेष बघण्यासाठी वारुळाकडे परत यायचे आणि सरळ उजवीकडे वरच्या बाजूला जायचे. (आता डावीकडे असलेली वाट म्हणजे जिकडून आलो तिकडे परत जाणारी वाट.) झाडी दाट आहे, झाडांच्या फांद्यापासून झालेल्या कमानीतूनही जावे लागते. इकडे चावऱ्या उपद्रवी माशा आणि डास खूप आहेत. कदाचित पावसामुळे असाव्यात. ही वाट गोलाकार बुरुजावर घेऊन जाते. वाट बुरुजवरच जाते तर पलीकडे दगडाने बांधीव भिंत दिसते. हा आणखी एक बुरुज असावा. आणि ह्या 2 बुरुजांच्या मधून मूळ वाट वर येत असावी. इथे पायऱ्यासदृश काही दगडही दिसतात. बुरुज डावीकडे ठेवत वाट सरळ वरती माथ्यावर घेऊन जाते. इथे डावीकडे एक टोक जाते त्या बाजूला वाटेवरच काही अवशेष दिसतात, हे वाड्याचे जोते असावे. पुढच्या टोकावर काही नाही. इथे गडाचे अवशेष बघून पूर्ण होतात. इथून कनकेश्वर, सागरगड दिसतात तर पाऊस आणि धुके ह्यामुळे आणखी काही स्पष्ट दिसू शकले नाही.
आता 2 वाजून गेले होते, म्हणजे पायथ्या पासून निघून 3 तास झाले होते. पण गड आणि अवशेष सापडल्याचे समाधान होते. पाऊस जराचीही उसंत घेत नव्हता.

बुरुज आणि अवशेष

परत फिरलो. नितीनला आता पुढे येणाऱ्यांना इथे घेऊन हेच अवशेष दाखव म्हणून सांगितले. परत वारूळ, मुर्त्या आणि देवीचे मंदिर इथे येऊन पोचलो. वाटेत काही खाऊ आणि चिवड्याचे बकाणे भरले. आता मात्र रामदरणेश्वराला खालूनच नमस्कार करून वर न चढता तो डोंगर डाव्या बाजूला ठेवत उजवीकडच्या वाटेने त्याला वळसा मारून परत पठारावर आलो. वाटा मात्र भरपूर असल्याने नेमकी वाट सापडणे कठीण जाते. माहितगार किंवा गावातला माणूस बरोबर असणे उत्तम. ससे पकडण्यासाठी लावलेले सापळेही दिसत होते. हिरवागार गालिचा अमच्यासाठीच पसरलेला होता. फोटो काढायचा मोह काही आवरला नाही. पटापट खाली आलो. पाऊसही तसा कमी झाला होता. साडे 3 झाले होते. ओले कपडे बदलून परतीच्या प्रवासाला लागलो. आमचं जेवण तसं झालेलं नव्हतंच. वाटेत गरम पोळ्या, भाजी पुलाव वगैरेंवर ताव मारला आणि परत एकदा ठेचेवर ठेच करत express highwayला लागलो आणि 10-10:15 ला घरी पोचलो.

परतीच्या वाटेवर - हिरवागार गालीचा


लहानगे ओहोळ
घरातून निघून पूर्ण किल्ला बघून परत घरी येईपर्यंत पावसाने काही पाठ सोडलीन नव्हती. 4 दिवसांपूर्वी ज्या किल्ल्याचे नावंही माहिती नव्हते तो किल्ला पूर्ण बघून झाला होता.

No comments:

Post a Comment