Wednesday, March 14, 2018

रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड - II

महिपतगड
थोडासा फराळ केला आणि एक वाजायच्या आधीच महिपतगडकडे वाटचाल चालू केली. सिताराम जाधव यांच्या घराच्या मागच्या बाजूने ही वाट वरती महिपतगडाकडे जाते. वाटेतच 5 मिनिटांवरच एक विहीर आहे. ह्या विहीरीचे पाणी हे सर्व लोक पिण्यासाठी वापरतात. वाडी-बेलदार गावात ५-७ घरं मिळून सुमारे १८-२० लोकच राहतात. बहुतेकांची मुलेबाळे शिक्षणासाठी-नोकरीनिमित्त मुंबईत आहेत. या विहिरीतले पाणी अत्यंत सुंदर आहे. सीताराम काकांच्या बोलण्यातून विहिरीचे कौतुक लपत नव्हते. त्यांनी खास काढणे आणि Can आणला होता पाण्यासाठी. आम्ही आपापल्या बाटल्यात पाणी भरून घेतले आणि विहीर उजवीकडे ठेवत डाव्या बाजूच्या वाटेने वर निघालो. येथून वळून पाहिले तर सुमारगड स्पष्ट दिसतो. ही वाट चुकण्याची फारशी शक्यता नाही, मळलेली आहे. डावीकडेच काही अंतरावर एक बुरुज स्पष्ट दिसतो हा बुरुज आपल्याला सुरुवातीपासूनच खुणावत असतो पण तरीही हा बुरुज डावीकडे ठेवत आपण पुढे गेल्यावर समोरच एक बांधकाम दिसते आणि त्यातले एकही भोकही. इथे परत इतरांची वाट बघत थांबलो. सर्वांना येऊ दिले. इथे यायला जेमतेम ३० मिनिटे पुरतात. हे बांधकाम म्हणजे खेड/गायमुख दरवाजा. त्याच्या मागून वाटेने पुढे गेल्यावर अजून एक मोठी बांधीव विहीर आहे. या विहिरीला पंप लावून पाणी गावात यायची सोय केली आहे. 

खेड/गायमुख दरवाजा
विहिरीच्या डावीकडून वाट पारेश्वर मंदिराकडे जाते. तिकडे आधी न जाता ही विहीर समोर ठेवत उजवीकडे जावे. इथून गडाचे अवशेष दिसायला सुरू होतात. आमच्याबरोबर वाटाड्या असल्यामुळेच हे अवशेष शोधायला त्रास पडला नाही. गडावर पूर्णपणे जंगल पसरलेले असल्यामुळे वाटाड्या सोबत असणे गरजेचे ठरते नाहीतर खूप वेळ जाईल. जंगल घनदाट आहे समोरच जोत्यावर एक मंदिर आहे ज्यावर हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती ठेवली आहे. ह्या मूर्ती पश्चिममुखी आहेत. या मूर्तीजवळ आम्ही आरती केली. परत मागे फिरून आम्ही उजव्या बाजूला दिसत असलेल्या अवशेषांकडे गेलो इथे तीन मोठे चौथरे दिसतात. जागोजागी मुंग्यांचे वारूळही आहेत. थोडे डावीकडे घेऊन गेल्यावर 1 पीराचे ठिकाण दिसते. हे अतिशय सुंदर दगडी बांधकाम आहे. 

पश्चिमाभिमुख मारुती आणि गणपती
पीराचे ठिकाण - सुंदर बांधकाम
ही वाट अशीच घनदाट जंगलातून पुन्हा मोकळ्या जागेत जाते तिथे होळीचा माळ आहे. तिथेही काही अवशेष शिल्लक आहेत. तिथून पुढे गेल्यावर वाटेत पूर्वाभिमुख हनुमानाची मूर्ती आहे तर शंकराची पिंडही आहे. आमच्या वाटाड्यानी मात्र ती आम्हाला दाखवलनी नाही. पुढे वाट उत्तरेकडे असलेल्या कोतवाल दरवाजाकडे जाते. त्याचेही काही अवशेष शिल्लक नाहीत. पूर्वेला पुसाटी दरवाजा आहे असे उल्लेख आहेत. समोर महाबळेश्वर दिसते. शेजारीच भीमाची काठी, मधु-मकरंदगड, पर्वत, चकदेव तर खालच्या बाजूला उजवीकडे वडगाव दिसते. समोर डावीकडे प्रतापगड असावा. उजवीकडून पुढे गेल्यावर समोरच सुमारगड दिसतो. इथून वाट खाली वडगावमध्ये उतरते. इथून खालच्या बाजूला आग्नेयेस यशवंतदिंडी दरवाजा आणि २ बुरुज आहेत. तिथे न वापरलेल्या चुन्याचे काही अवशेषही आहेत. तिकडे खालच्या बाजूला न जाता वरतीच एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही मागे फिरलो. 

ग्रुप फोटो
आता आमचे ठिकाण होते पारेश्वर मंदिर. या मंदिराजवळ लहान-मोठे बरेच अवशेष शिल्लक आहेत एक चौथरा आहे. मंदिराच्या जवळच डावीकडे काही अवशेष आहेत मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे मंदिरात बऱ्याच छोट्या छोट्या मूर्ती असून पारेश्वराची  शंकराची पिंड आहे तसेच त्रिशूळ घेतलेली एक मूर्तीही आहे. पिंडीसमोर नंदीची मुर्तीही आहे. समोरच तुळशीवृंदावन असून त्याच्या शेजारी तोफेचा गोळा ही ठेवलेला आहे. मंदिराला उजवीकडे ठेवत डावीकडून एका चौथऱ्याला वळसा मारून परतीच्या वाटेवर पुन्हा काही अवशेष बघायला मिळतात. हे अवशेष सगळे गवतात दडून बसलेले आहेत. डावीकडे ती मोठी विहीर ठेवत उजवीकडे वाट जाते. तिथे गडाची माहिती वाचन झाले. वाट पुढे उजवीकडे जाऊन एका दरवाजाकडे जाते. (शिवगंगा दरवाजा?) इथे पुन्हा शंकराची पिंड-नंदी आहे. एक-दोन तोफगोळे शिल्लक आहेत. थोडी साफसफाई केली, उजव्या बाजूला एक कोरडा पडत चाललेला पाण्याचा साठा आहे. समोरच दहिवलीतून येणारी वाट दिसते. इथे शिवगंगा दरवाजाचे अवशेष असावेत. डावीकडच्या वाटेने गेल्यावर आपण त्या बुरुजावर जातो जो आपल्याला सुरुवातीपासूनच खुणावत होता. इथून आपल्याला गाव स्पष्ट दिसते. उजवीकडे दहिवलीतून वर आलेली वाट शिवगंगा दरवाजाकडे गेलेली दिसते. मागे फिरून पुन्हा उजव्या बाजूला आपण वर येताना आलेल्या वाटेने परत जायचे. साडे चार वाजेपर्यंतच आम्ही खाली परत आलो. 
शंकराची पिंड-नंदी. एक-दोन तोफगोळे
किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्नेयेस यशवंत दरवाजा. एक तर त्याचे फारच कमी अवशेष शिल्लक आहेत आणि जे आहेत त्यातलेही सगळे बघायला मिळाले नाही. आता गावात न थांबता जेवून रसाळवाडीला जायचे होते. सव्वा सहाच्या दरम्यान जेवण आमच्या समोर आले. फारशी भूक अशी लागली नव्हती. एक तर ऊन तापत होते आणि ही तशी ही जेवायची वेळही नव्हती. पण जेवायला बसलो. गरम-गरम तांदळाची भाकरी, बटाटा रस्सा, भात आणि मुगाची आमटी. नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी खाल्ली गेली. 
रसाळगड
काल रात्री तो घाट चढून आलो होतो त्यावेळी अंधार होता. उतरण्यासाठी सातच्या आधीच तिथून निघालो. आता सगळ्यांनी तो घाट बघितला. रसाळवाडी शोधत निघालो रसाळवाडीचा हा फाटा डावीकडे आहे. तिथून साधारण पाच-सात किलोमीटरवर वाडी आहे. इथेही डांबरी रस्ता असला तरी धाकधूक होतीच. पुन्हा डांबरी रस्ता संपला, कच्चा रस्ता सुरू झाला आणि आम्ही चार जण उतरून पुढे रस्ता बघायला गेलो. ८ वाजून गेले असतील, अंधार पडल्याने काहीच समजत नव्हते. खालच्या बाजूला वाडीत घरं दिसली. आमच्या डोक्यावरचा टॉर्च त्यांना दिसल्यावर खालनं आवाज आले. थोडी चौकशी केली तर साधारण डांबरी रस्ता जिथे संपतो तिथेच आसपास पायर्‍या असाव्यात अशी शक्यता वाटली. तशीही पुढे गाडी नेण्यासारखी जागा नव्हतीच. सरळ मी आणि नितीन असे दोघेजण पायर्‍या शोधात निघालो. पायवाट संपल्यावर पुढे टाकी आणि बांधीव पायर्‍या दिसल्या. आता सगळ्यांना बोलावण्यास काहीच हरकत नव्हती पण खात्री करून घेण्यासाठी तसेच पुढे निघालो. 

मिशीवाला हनुमान
साधारण साडेआठ झाले होतेच. पायऱ्या चढून पुढे गेलो आणि एक दरवाजा लागला. दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर काही पायर्‍यानंतर समोरच एक हनुमानाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे या हनुमानाला असलेली मिशी! उजवीकडून वळसा मारून वर गेल्यावर अजून एक दरवाजा लागतो या दरवाजाला सुंदर कमान आहे. पायऱ्या तशाच पुढे जातात. वाटेत डावीकडे चुन्याचा घाणा दिसतो. हा भाग पुरातत्त्व खात्याने बांधून काढलेला आहे. अजून एक दरवाजा लागला की हा मार्ग संपतो. लगेच डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशी तोफ ठेवलेली आहे. समोर पायवाटेने गेल्यावर आम्हाला बॅटरीच्या प्रकाशात ते झोलाई देवीचे मंदिर दिसले. मंदिरा जवळ पोचलो. मागून मुकुंद जाधवसरही आलेच. बाकीच्या मंडळींना बोलावण्याआधी अजून काही खात्री करुन घ्यावी म्हणून मंदिराच्या पलीकडचे पाण्याचे टाके बघून ठेवले. पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिरात विजेची सोय आहे, पंखे आहेत. मंदिरासमोरच दिपमाळ आहे, त्याच चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे, एक लहान तोफही ठेवलेली आहे. जवळ एक चूल मांडलेली दिसते. जवळच लाकडे आहेत. दीपमाळे जवळच तुळशीवृंदावन आणि एक तोफ ठेवलेली आहे. तसंच मंदिराच्या कठड्यावर अजून एक तोफ ठेवलेली आहे. मंदिर झोलाई देवीचे असले तरी अजूनही देव त्यात आहेत. मंदिराच्या आतमध्ये जमवलेल्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. शिवाजी महाराजांची वस्त्र नेसवलेली मुर्तीही आहे. आता मात्र परत सगळे जण खाली गेलो. तिथे कोणाला काहीच माहिती नव्हते. इथेच गड, मंदिर, पाणी सगळे सापडल्याचा सगळ्यांना दिलासा दिला आणि जिथे डांबरी रस्ता संपतो तिथे गाडी लावण्यास सांगितले. सगळे सामान घेऊन परतलो. जेवण झालेलेच होते, आता फक्त झोपायचे बाकी होते. सकाळी पोहे करण्यासाठी लाकडे शोधून ठेवली. सगळ्यांचीच इच्छा झाल्यामुळे चहा झाला. साडेदहा वाजता आम्ही झोपलो. काही जण मंदिराच्या बाहेर झोपले तर काहीजण आतमध्ये. 

डोंगराआडून वर येताना सूर्यनारायण
मला ५च्या आधीच जाग आली पण काही चुळबूळ दिसेना, म्हणून वाट बघत तसाच पडून राहीलो. पाच वाजता एक-दोन आवाज आल्यावर लगेच उठलो आणि आवराआवर केली. ती “ठराविक” बाटली घेऊन कामाला गेलो. कालच जागा बघुन ठेवली होती. काम उरकून परत आलो तोपर्यंत अजून काही सुरवंट डोक्यावर लाईट आणि हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन जात होते तर काही फुलपाखर होऊन परत येत होते. पटापट पुढच्या कामाला लागलो. सगळ्यांचं आटपेपर्यंत आम्ही आम्ही चार-पाच जणांनी पोहे बनवले. चहा ठेवला गेला. भरपूर पोहे खाऊन घेतले, चहा घेतला तोपर्यंत सूर्याने डोके वर काढले होते. सूर्योदयाचे कितीतरी फोटो जमा झाले असले तरी कित्येक वेळा तो मोह आवरत नाही तसाच डोंगराआडून वर येताना त्या सूर्यनारायणाचा फोटो घेतला. मंदिरातल्या शिवाजी महाराजांनाही किरणांनी न्हाऊ घालण्याचा त्या सूर्यनारायणाला मोह आवरला नसावा. मला त्याचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. तो घेतला आणि सगळ्यांनी बॅगा भरून गड बघण्यासाठी कूच केली. 
झोलाई देवी मंदिर, दीपमाळ आणि ग्रुप फोटो
सुर्यनारायणाने महाराजांना किरणांनी न्हाऊ घातले
मंदिराच्या डावीकडे लागुनच पाण्याचे टाके आहे, पाणी पिण्यायोग्य आहे. ह्यात एक गुहेसारखा भागही दिसतो. त्याच्याही डावीकडे वरच्या बाजूला बालेकिल्ला आहे. त्याच्या आतमध्ये न जाता उजवीकडून वळसा घालून पलीकडे गेलो. गडाची माहिती वाचन झालं. उजवीकडे खाली डांबरी रस्ता दिसत होता, गडावर येण्याची वाटही दिसत होती. डावीकडून गड फेरीला सुरुवात केल्यावर एक बुरूज आहे त्यावर ध्वज आहे. बांधकामाचे अवशेष असे बऱ्यापैकी आहेत. इथे एक तोफही आहे. एक पाण्याचा मोठा साठा आहे पण पाणी पिणे योग्य वाटत नाही. ते टाके ओलांडून पुढे गेल्यावर समोरच एक पठार लागते. त्यावर धान्याचे कोठार आहे. कोठाराच्या मागच्या बाजूने पुढे अजून एक टाके आहे त्यात पंप बसवून गावात पाण्याची सोय केलेली दिसते. इथेच कातळात लपलेले एक टाके असल्याची माहिती होती. हे टाके सहजासहजी कोणाला सापडत नाही. बरेच लोक ते माहितीच नसल्याने न बघताच परत जातात. ते बघायचे होते पण त्याचे अचूक ठिकाण माहिती नसल्याने फोनाफोनी चालू केली. एकतर मला सोडून बाकी कोणाला फार इच्छा असल्यासारखी वाटत नव्हती किंवा मला जाणवत नव्हती. त्यातून मी एकटाच त्यासाठी हट्ट करत असल्यासारखं वाटत होतं. व्यवस्थित पण पटापट बाकी अवशेष बघत एक डोळा त्या टाक्याकडे एकीकडे ठेवून होतो. पुढे एक सोंड गडाच्या शेवटच्या टोकाकडे जाते. विनीतला फोन झाला तेव्हा सोंडेवरून शेवटाकडे न जाता उजवीकडे एक वाट खाली टाक्याकडे उतरत असल्याचे त्याने सांगितलेन. प्रत्यक्षात ती वाट काही सापडत नव्हती सोंडेकडे निघालो तेव्हा उजवीकडे खालच्या बाजूला एक मंदिर दिसले शंकराची पिंड आहे समोर एक नंदी आहे तसंच काही कोरीव दगड आहेत. ते पाहून परत आल्यावर पुढे निघाले की काही सतीचे दगड ठेवलेले दिसतात. पुढे गेलं की सोंडेचे बऱ्यापैकी शेवटचे टोक दिसते. तिथूनही पुढे गडाचा काही भाग शिल्लक आहे परंतु तिथे बघण्यास काही नाही. डावीकडच्या शेवटच्या टोकावर एक ध्वज उभारलेला दिसतो. टाके न सापडल्याने थोड्याश्या निराशेने मी परत फिरलो. 

गडावरच्या तोफा
आत्तापर्यंत मी एकटाच त्या टाक्याच्या शोधात होतो आणि तो हट्ट सगळ्यांना कळला होता कदाचित काही जणांना रागही आला असेल अशी मला शक्यता वाटत होती. पण मलाही ते टाके बघायचे होते. शेवटच्या टोकावर नामजोशी काका आधीच पोचलेले होते. त्यांनाही तसे काही दिसले नव्हते. परत फिरताना डावीकडे खालच्या बाजूला एक कपार दिसली. निरखून पाहिल्यावर एक खांब दिसला आणि ते टाके असावे असे वाटले पण तिथे जाण्यास काही मार्ग नव्हता. रोप लावून जावे लागले असते. तसही जे मला शोधायचे होते त्या टाक्यापर्यंत वाट जाते हे मला माहिती होते. बराच फिरल्यावर मग परत येताना मी उरलेले सगळे अवशेष बघितले. ते कोठार, त्या समोर असलेली तोफही बघितली. तिथे एक अर्धवट तुटलेली तोफ शिल्लक आहे. उजवीकडे अजून एक पाण्याचे टाके आहे. जवळजवळ गडफेरी पूर्ण झाली होती. त्या मंदिराजवळचा बालेकिल्ला मात्र बघायचा शिल्लक होता. आता त्यात शिरलो आणि त्यावरून चालत चालत त्याचे चारही बुरुज बघितले. शेवटच्या मंदिराच्या कडील बुरुजावर 3 तोफा रचून ठेवलेल्या आहेत. एका तोफेचे तोंड बरोबर मुख्य दरवाजाकडे आहे. बांधकामाच्या मध्ये चुन्याचा घाणा आहे. सर्वजण मंदिरापर्यंत घेऊन पोहोचले होते गडफेरी पूर्ण झाली होती पण मला ती अपूर्णच वाटत होती. तोफा हे या गडाचे वैशिष्ठ्य. गडावर १६ तोफा असल्याचा उल्लेख आहे. आम्हाला त्यातल्या १५ दिसल्या होत्या.

कातळात लपलेले ४ खांबी टाके
मंदिरात पुजारी आलेला होता. कोणीतरी म्हणाले कि त्यांना माहिती असेल. लगेच त्यांना जाऊन त्या टाक्याचा पत्ता विचारला, त्याने सविस्तर सांगितले. माझ्याबरोबर राहुललाही ते टाके बघायचं होतं. मी ते शोधून दिसते का हे बघतो म्हणून परत निघालो. मागून प्रभू काकाही येत होते. नामजोशी काका आणि अजूनही एकदोन जणही येऊ लागले आता मात्र मला टेन्शन आलं. एकतर मी एकट्यानेच या टाक्याचा मार्ग ऐकला होता, तोही अर्धवट. त्यातून ते टाकं मिळेल की नाही याची खात्री नव्हती. उगाचच पोरं हट्ट करतात म्हणून वडीलधारी मंडळी चिडतील की काय एक शंका मनात होती. भीत भीतच मी आणि राहुल पुढे गेलो. सोंडेचा शेवटच होतो असे वाटले होते तिथुनच पुढे खाली उतरलो. नाही नाही म्हणत भवश्री पण तिथपर्यंत येऊन पोहोचली होती. खाली मात्र कोणीही येऊ नका म्हणून मी आणि राहुल पुढच्या वाटेकडे निघालो. पायवाट थोडी आशा दाखवत होती. वाट उजवीकडे खाली उतरत होती. आम्ही उतरलो, वाट अतिशय घसार्‍याची आहे. या वाटेवरच खाली गेलो आणि उजवीकडे खड्डा दिसला. आशा निर्माण झाली आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. तिथे एक तोफ ठेवलेली आहे आणि चार खांब असलेलं अतिशय सुंदर टाकं आहे. अतिशय आनंदाने सगळ्यांना ते टाकं सापडल्याचं सांगितलं. काही फोटो काढले. तोपर्यंत मालुसरे सर आणि प्रभू सर येऊन पोहोचले. त्यांच्याबरोबर नितीनही होता. तोफ अगदीच कडेला असल्यामुळे आम्ही ती टाक्याजवळ उचलुन ठेवली. टाक्यावर बरच गवत वाढलेलं होतं. तेही साफ केलं. गड फिरल्याचं समाधान मिळालं होतं. परत मंदिराजवळ आलो. सामान आवरलं आणि दहाच्या आतच परतीच्या प्रवासाला लागलो रसाळवाडी फाटा, भरणा नाका, खेड, महाड करत माणगावला पोचलो. पुढे थोडे खाणे झाले. मग मात्र कुठेही थांबा न घेता सरळ पुन्हा हिंजवडी-चिंचवड असं करत स्वारगेटला येउन पोहोचलो. साडेसहा वाजेपर्यंत चक्क मी घरात होतो. माझ्याच जिल्ह्यात असूनसुद्धा मला अपरिचित असे तीन किल्ले बघुन झाले होते.

No comments:

Post a Comment