Tuesday, July 31, 2018

रायगडच्या प्रभावळीतले किल्ले - पन्हळघर, भोपाळगड आणि सोनगड

सध्या जरा दुर्लक्षित किंवा अल्पपरिचित किल्ले यांचीच भटकंती करायची हे जणू काही ठरून गेले होते. एक तर लोकप्रसिद्ध, भरपूर अवशेष उपलब्ध असलेले किल्ले हे ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांसाठी हक्काचे ठिकाण. व्यावसायिक ट्रेक ग्रुप यांचे माहेरघर. त्यातून पावसाळा. म्हणजे हवश्या-नवश्या लोकांसाठी पर्वणी. त्यामुळे गर्दी नसलेली ठिकाणे शोधून काढणे, त्या अनवट वाटांमधून भटकणे आणि त्यात लपून बसलेले अवशेष शोधून काढणे ह्यातला आनंद वेगळाच. विनीतने ह्याच मोहात पडून असेच ३ किल्ले फिरायचे ठरवले होते, “पन्हळेदुर्ग उर्फ पन्हळघर”, “दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड” आणि “सोनगड”.
हे किल्ले रायगडच्या प्रभावळीत येतात. दुर्गदुर्गेश्वर रायगड याच किल्ल्याला राजधानीचा मान देण्यामागे ह्या किल्ल्याच्या शेजारची भौगोलिक स्थिती हे महत्वाचे कारण होते. प्रभावळ म्हणजे मुख्य किल्ल्याच्या संरक्षणाच्या बळकटीच्या दृष्टीने बांधलेल्या उपदुर्गांचा विळखा. त्या किल्ल्याच्या कोणत्याही बाजूने हल्ला करायचा म्हटला तरी प्रभावळीतले किल्ले पहिले उभे ठाकतात. प्रभावळीतल्या ह्या पाहरेकऱ्यांचा उपयोग टेहळणीसाठीही होतो. रायगडाच्या प्रभावळीत साधारणपणे ८ किल्ले येतात. मानगड, कोकणदिवा, लिंगाणा, कावळा, मंगळगड, चांभारगड, सोनगड, पन्हळघर.
मी नांवं न ऐकताच येणार हे सांगून टाकलेले होते. बरोबर कौस्तुभ, प्रसाद आणि नेहा होते. विनीतच्या Tiago ला ह्यावेळी विश्रांती देऊन आमच्या सोबतीला आली होती कौस्तुभची Skoda Laura. २९ जुलै, रविवारी सकाळी ५:३० ला आमच्या भटकंतीला सुरुवात केली आणि ताम्हिणी घाटाने Skoda चे suspension तपासून घेतलेन. माणगावपर्यंत कशीबशी कळ काढली आणि मिसळ, पोहे, इडली, वडापाव हाणले. पहिले ठिकाण होते रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील छोटेखानी पन्हळघर किल्ला.

किल्ले पन्हळघर

अवशेष - किल्ले पन्हळघर

पुण्याहून आल्यावर ताम्हिणी उतरून पुढे माणगावमध्ये पोचल्यावर लोणेरेच्या आधी डावीकडे रस्ता पन्हळघरला जातो. आदिवासी वाडीपर्यंत गाडी जाते. तिथून समोरच किल्ला दिसतो. पायथ्याशी वाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या २ मोठ्या टाक्या आहेत. तिथून सरळ वर जाण्यास सुरुवात करावी. गावातले लोक बकऱ्या चारण्यासाठी वर घेऊन येतात, त्यामुळे वाट चांगली मळलेली आहे. पावसाळ्यात दगडांवर शेवाळे साचलेले असल्याने पाउल टिकत नाही, जपून जावे. वर चढायला सुरुवात केल्यावर अवघ्या १० मिनिटांत वाटेच्या डाव्या बाजूला पाण्याच्या ३ टाक्यांचा समूह दिसतो. पाणी उत्तम असून पिण्यायोग्य आहे. माथ्यावर जाण्यासाठी हा टाकी-समूह डावीकडे ठेवत मळलेली वाट वर जाते. पण टाकी ओलांडूनही एक वाट सरळ माथ्यावर जाते. ह्या वाटेने गेल्यास माथ्यावरचे एक टाके दिसते. ह्यातीलाही पाणी अतिशय उत्तम आहे. दुर्ग संवर्धन उपक्रमातून ह्या टाक्यातील गाळ उपसून ठेवलेला दिसतो. उजवीकडे जवळच एक ध्वज उभारलेला दिसतो. उपलब्ध माहितीनुसार अजून एक टाके ह्या गडावर असल्याने त्याची शोधमोहीम सुरु झाली. त्या भानगडीत गडाला लागून असलेल्या डोंगरावर पण एक लहानशी चक्कर मारून झाली. परंतु नीट बघितल्यास ध्वजाजवळच्या टाक्यालाच एक जोडटाके असावे असं लक्षात आलं. गडावर एवढेच अवशेष उपलब्ध आहेत. ठरलेल्या वेळापत्रकाच्या मागे असल्याने पटापट गड उतरून, पुढच्या साध्याकडे निघालो.

दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड

दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड हा किल्ला अगदी महामार्गाला लागून आहे. लोणारे फाट्यापासून 10 किलोमीटरच्या आतमध्ये दासगांव गाव आहे. दासगांव खिंड ओलांडल्यावर महामार्गाला लागूनच उजवीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाणारा सिमेंटचा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरून वर चालत निघाल्यावर 2 मिनिटांतच शाळा लागते. गडाकडे जाणारा रस्ता शाळेच्या आवारातूनच जातो. शाळेच्या परिसराचे फाटक बंद असल्यास शाळेच्या उजवीकडून पाठीमागे जाणाऱ्या रस्त्याने शाळा ओलांडता येते. पुढे उजवीकडे वर जाणारी पायवाट आपल्याला गडाकडे घेऊन जाते. पावसाळ्यात गवत वाढलेले असल्याने वाटा नीट समजत नाहीत. जेमतेम 10-15 मिनिटं चालल्यावर पठाराच्या डावीकडून पुढे गेल्यावर 3 वाटा दिसतात. ह्यातली डावीकडची वाट पाण्याच्या टाक्याकडे जाते. समोरची वाट गडाच्या माथ्यावर जाते, तर उजवीकडची वाट वळसा घालून गडाच्या मागच्या बाजूला जाते. आधी डावीकडच्या वाटेने टाके पाहून घ्यावे. पाणी अतिशय सुंदर पिण्यायोग्य आहे. आम्ही तिथले पाणी पिऊन परत माथ्यावर जाण्यासाठी त्या तिठ्यावर आलो. समोरच्या वाटेने माथ्यावर जाताना प्रचंड झाडी लागली. त्यातून डासही खूप आहेत. गावातली गुरे इथून सारखी जात असावीत, त्याच्या खुणाही जागोजागी दिसतात. पुढे वाट जाण्यायोग्य न वाटल्याने परत फिरलो. उजवीकडच्या वाटेने गडाच्या मागच्या दिशेला निघालो. इथून उजवीकडे गडाखालच्या वाड्या, काळू नदीचे पात्र, रेल्वेचा ट्रॅक असे सुंदर दृश्य दिसते. ते आम्ही डोळ्यात आणि कॅमेरात साठवून वाटेला लागलो.

अवशेष - किल्ले भोपाळगड

इंग्रजांनाही मोहात पडणारे विहंगम दृश्य

गडमाथा न बघायला मिळाल्याने थोडा विरस झाला होताच. पण सुदैवाने एक गाववाले मामा गुरं घेऊन आलेले होते. त्यांना वर बुरुज, वाड्याचे काही अवशेष अशी माहिती विचारली. त्यांनी गडाच्या मागच्या बाजूने वर जाणारी वाट दाखवून दिलंनी आणि निघून गेले. त्या वाटेने खडा चढ चढल्यावर गडाच्या तटबंदीने आमचे स्वागत केले. वर लगेच कुणी उभारलेल्या ध्वजाचा खांब तेवढा शिल्लक आहे. ह्याच जागेवर चौथऱ्याचे काही अवशेष दिसतात. आम्ही झाडीत लपलेले आणखी काही अवशेष शोधले आणि गडाच्या शेवटच्या टोकाला गेलो. तिथे बुरुज असावा. त्याचे अवशेष बऱ्यापैकी आहेत. इथून दिसणारे दृष्य न चुकवण्यासारखे आहे. सावित्री नदी आणि काळू नदीचा संगम, त्यावरचा रेल्वेचा पूल आणि गाव. ह्या दृश्याचा मोहात पडून इंग्रज इथे वाडे बांधून राहिले होते. ह्या गडाचा वापर मुख्यत्वे जलवाहतूक, जमिनीवरची वाहतूक ह्यावर नजर ठेवण्यासाठी होत असावा. आमची गडफेरी पूर्ण झाली होती. वेळापत्रक मात्र कोलमडले होते. पायथा गाठला. पुढचे लक्ष होते सोनगड.

किल्ले सोनगड

दासगांव सोडल्यावर पुढे वहूर गाव लागते. महामार्गावरूनच डावीकडे डोंगरावर ध्वज दिसतो हाच सोनगड किल्ला. ह्याच वेळी उजवीकडे महेंद्रगड म्हणजे चांभारगड सुद्धा खुणावत असतो. आमचे लक्ष सोनगड होते आणि वेळ उरला तर हा चांभारगड. वहूर गावाच्या पुढे गंधारपाले लेणी रस्त्याला लागूनच डावीकडे दिसतात.

किल्ले सोनगडकडे - गवळीवाडी/पठारवाडीतून

सोनगडला जायला एक वाट गंधारपाले लेण्याच्या वरच्या बाजूने आहे. दुसरी वाट मोपहारे गावातून जाते असे माहिती होते. पावसामुळे झाडी प्रचंड वाढलेली होती आणि जंगल असल्याने गावातला माणूस बरोबर असावा ह्या दृष्टीने याच गावातून जायचे ठरवले. गावात पोचून चौकशी केली तर आमच्या बरोबर यायला कोणीही तयार झाले नाही. गंधारपाले जवळून कोणी येतेय का बघावे म्हणून परत फिरून लेण्याच्या आसपास आलो. एकही माणूस यायला तयार नाही म्हणून निराशा झाली. मग अजून मागे येऊन बौद्धवाडीत चौकशी केली तर तिथूनही कोणी नाही. ह्या वाडीच्या विरुद्ध दिशेला एक कच्चा रस्ता गवळीवाडीत जातो. महामार्गापासून तिथे जायला साधारण तासभर लागेल आणि तिथून किल्ला जवळ आहे असे समजले. कच्चा रस्ता न चुकणारा आहे. पाऊण तासात गवळीवाडी/पठारवाडी गाठली आणि तिथूनही कोणी माणूस मिळेना. पण उजवीकडच्या वाटेने गेल्यावर पुढची टेकडी चढून जायची आणि पुढे किल्ला दिसतो अशी माहिती मिळाली. इथे थोडी विश्रांती घेऊन वाटेत न थांबता टेकडीचा माथा गाठला. इथूनही गड दिसत नाही. झाडी दाट आहे. मग दाट झाडीत न घुसता टेकडीच्या डाव्या बाजूने निम्यात उतरून कडेने वाट काढत निघालो. गड नाही सापडला तर डोंगर फिरल्याचे समाधान मानायचे अशी मानसिक तयारी झाली होती. पण प्रबळ इच्छा आणि दीड तासाची तंगडतोड याचे फळ म्हणून किल्ला दिसला. चाल वाढली. 20 एक मिनिटात किल्ला गाठला.

अवशेष - किल्ले सोनगड

सोनगड हा जावळी जिंकल्यावर महाराजांनी चांभारगडाबरोबर जिंकला आणि हेन्री रेव्हिंगटन आणि त्याच्या सहकाऱ्यांना कैद करून सोनगडवर रावजी पंडित याच्या स्वाधीन केले. कालांतराने कैद्यांची सुटका झाली, पुरंदरच्या तहात हा गड इतर 23 किल्यांबरोबर इंग्रजांकडे गेला. पुढे पेशव्यांच्या काळात त्यांनी रायगड ताब्यात घेतल्यावर सोनगडच्या प्रदेशाचा बंदोबस्त करण्याची आज्ञा दिल्याचा उल्लेख मिळतो.
सोनगड माथ्यावर काळ्या पाषाणाची दगडी ताटभिंत आहे. त्यावर भगवा ध्वजही आहे. पूर्वेस दाट जंगल तर पश्चिमेस खोल दरी आहे. उत्तरेस गांधारी तर पश्चिमेस सावित्री नदीचे पात्र असे अप्रतिम दृश्य इथून दिसते. गडावर आजूबाजूला गवतात लपलेले जोत्याचे अनेक अवशेष दिसतात. लयाला जाण्याच्या अवस्थेत असलेल्या बुरुजाचे काही अवशेषही दिसतात. परत मागे येऊन पाषाणाची भिंत समोर ठेवल्यास डावीकडे, म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे खालच्या बाजूला कातळात कोरलेली 2 पाण्याची टाकी दिसतात. इथे जाण्यासाठी वाट बिकट असून सांभाळून जावे.
आमची गडफेरी आता पूर्ण झाली होती. साडेचार होत आले होते. चांभारगड होणारच नव्हता. दुपारचे जेवणही झालेले नव्हतेच. मग सरळ ठिय्या मारून खाऊचे बकाणे भरले. आता वाट शोधायची नव्हती. सरळ मिळेल त्या वाटेने गवळीवाडी गाठली आणि महामार्गाला लागून परतीचा प्रवास सुरु झाला. निघायला 6 वाजून गेले होते, सव्वाशे किलोमीटर पेक्षा जास्त रस्ता गाठायचा होता आणि पुढे सोमवार पूर्ण आठवडा बरोबर घेऊन आ वासून बसला होता.

7 comments:

  1. ओंकार खुप छान वर्णन केलेस.. तुझ्यासोबत ट्रेक करायला मला आवडेल.. आम्हाला घरच्या घरीच ट्रेकचा आनंद दिलास.. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. अतिशय छान ब्लॉग लिहिला आहेस

    ReplyDelete
  3. खूप छान.रक्त सळसळल.

    ReplyDelete
  4. भारीच. मस्त प्रवासवर्णन.

    ReplyDelete