Saturday, June 15, 2024

किल्ले रवळ्या-जवळ्या

"रवळ्या-जवळ्या" ही नांवं ऐकून बरीच वर्षं झालेली. तेव्हा "अहि-मही" अशी राक्षसाची जोडी माहिती होती. पण ही किल्ल्यांची जोडी पहिल्यांदाच ऐकलेली. नंतर "चंदन-वंदन", "कांचन-मंचन", "अंकाई-टंकाई" अश्या जोडगोळ्या ऐकल्या आणि भेटही दिली गेली. हे रवळ्या-जवळ्या मात्र हुलकावणी देत होते. एक तर नाशकातले किल्ले पुण्याहून जाऊन पहायचे म्हणजे पटकन उठलं आणि गेलं असं होतं नाही. वेळ आणि पैसे, असा विचार करता खरं तर एकदिवसीय भटकंती परवडतही नाही. पण एकच दिवस होता आणि ह्यांचं नियोजन ठरलं. मग त्यात बदल केला नाही. एक दिवस तर एक दिवस... राहून जाण्यापेक्षा हे बरं.

"चंदन-वंदन", "कांचन-मंचन", "अंकाई-टंकाई" ह्या जोड्या म्हणजे अगदी जोड-किल्लेच आहेत. "रवळ्या-जवळ्या" ह्यांना जोड किल्ले म्हणायचं की नाही त्यावर चर्चा होऊ शकते. कारण हे इतर जोड्यांसारखे तेवढे जोडलेले नाहीत. पण एकाच पठारावर आहेत, म्हणजे दोन्ही किल्ल्यांचा पायथा, हा एक मुख्य डोंगर म्हणता येईल. दोन मदारी असलेला उंट कसा असतो, तसं काहीसं 😄

ही नांवं रांगडी वाटतात, मराठा साम्राज्याला शोभणारी. बादशाहनामा ग्रंथात ह्यांचा उल्लेख रांगडेपणा पार बाजूला राहील असा, अगदीच पिचकवणी म्हणजे रोला-जोला ह्या नावाने आहे. ह्यात मजा नाही. असो... पण हे किल्ले अलावर्दीखानाने जिंकून घेतले. शिवाजी महाराजांच्या काळात परत स्वराज्यात आले जे महाबतखानाने जिंकून स्वराज्यातून ओढून घेतले. त्याआधी दिलेरखानानेही प्रयत्न केला होतान, पण तो मोरोपंतांच्या सैन्याने हाणून पाडला होता. महाबतखानाकडून मात्र शिरस्त्याप्रमाणे पेशवेकाळात ते स्वराज्यात आले आणि नंतर इंग्रजांकडे जाऊन इतिहासात किल्लेपण संपुष्टात आलं. इंग्रजांनी इतर ठिकाणाप्रमाणे इथेही सगळ्यात आधी तोफा लावून पायऱ्या उध्वस्त केल्या.

ह्या जोडगोळीला भेट द्यायची आणि पूर्ण किल्ले फिरायचे, म्हणजे पूर्ण दिवस हाताशी हवा. मग आमच्या नेहमीच्या पद्धतीने, म्हणजे पुण्यातून रात्री निघायचं, पायथ्याला अपरात्री (की पहाटे?) ३-४ ला पोचायचं आणि थोडक्यात विश्रांती घेऊन, उजडतानाच आयुधं घेऊन तयार व्हायचं असा साधा प्लॅन. ठरलेलं सामान, offline downloaded maps, खादंतीची पुरेशी व्यवस्था असं सगळं नेहमीप्रमाणे जमा करून पुण्यातून मी चिंचवडला पोचलो आणि सगळे मिळून नाशकाकडे गाडी हाणली. ह्या जोडगोळीचं पायथ्याचं ठिकाण हे मुळाणे बारी उर्फ बाबापूर खिंड. वास्तविक मुळाणे आणि बाबापूर ही खरी पायथ्याशी गावं. आणि ह्या गावांना जोडणाऱ्या डोंगरमार्गात असलेली खिंड हे चढाईची सुरुवात करण्याचं ठिकाण.

मुळाणे बारी उर्फ बाबापूर खिंड

इथे आम्ही पहाटे ३:३० वाजता पोचलो. ह्याच खिंडीतून एका बाजूला मार्कंड्या आहे, तर दुसऱ्या बाजूला ही रवळ्या-जवळ्या, नाही, to be exact जवळ्या-रवळ्या, if taken in order! इथे खिंडीत वनखात्याने विसाव्यासाठी बांधकाम केलेलं आहे. अर्थात हे रवळ्या-जवळ्यासाठी नाही बरं. इकडे फक्त खास भटके येतात, पर्यटक नाही. पर्यटक जाणार बारीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मार्कंड्यावर. मग खातीरदारी पण जिकडे ओढा जास्ती त्यासाठीच असणार! पण आपल्याला काय फरक पडतो 😉 खिंडीत गाडी लावली. जवळच हनुमान आमच्यासाठी आधार म्हणून सिद्ध होतेच. त्यामुळे काळजी कसली करायची? वेळ न दवडता पथाऱ्या पसरल्या आणि गुडूप झालो.

२-२:३० तास पाठ टेकली आणि उजडायच्या आत उठलो पण परत. ह्यावेळी कोणतीही रहदारी नसताना काय सुंदर दिसते ही जागा... प्रसन्न वाटतं. छानसा काळोख, खिंडीतून पलीकडे चमचमतं गांव, शांतपणा जणू "हे सारं काही आत्ता तुमचंच आहे, घ्या लुटून आनंद, जग जागं व्यायाच्या आधी" अशीच जाणीव करून देत असतो. ६:३० च्या आत आवरून सिद्ध झालो.

पाठीशी मार्कंड्या

पायथ्याच्या हनुमंताला नमस्कार करून चढाईला सुरुवात केली. एकदा सुरुवात केल्यावर आमच्या पाठीशी मार्कंड्या उभा राहिला. शब्दशः पाठीशी उभा राहिला, कारण तीच खिंड ही मार्कंड्याच्या चढाईचीही सुरुवात आहे. आम्ही पूर्वेकडे तोंड करून निघालेलो असल्याने समोरचा जवळ्यापेक्षा मागचा मार्कंड्याच सोनेरी किरणांच्या उन्हात न्हाऊन निघालेला, बघण्यासारखा दिसत होता. त्यावेळी तर माझी मार्कंड्या भेटही झालेली नव्हती आणि मार्कंड्याचं असं रूपडं तसंही त्यावर गेल्यावर दिसणार नव्हतं. मग जिथवर आलो होतो त्या पठारावरूनच फोटो घेतले. त्या मार्कंड्याच्या प्रचंड परिसराच्या तुलनेत मी पण काही कमी नाहीये बरं का... असं सांगत जणू जवळ्या आपल्या सावलीने मार्कंड्याला झाकू पाहत होता. त्या सह्याद्रीच्या राकट भांडणात आपण कशाला पडा? आम्ही आपलं त्यांच्या ह्या लुटुपटूच्या लढाईकडे सरळ दुर्लक्ष केलं. आपल्याला काय दोघेही सारखेच, नाही का?

पाठारामागे डोकावणारा जवळ्या

ताठ मान करून उभा जवळ्या

विस्तीर्ण पठार आपली घडी हळू हळू उलगडत असतानाच मागून हळूच जवळ्याने डोकावून बघितलंन. ह्या किल्ल्याच्या वाटेला लागलो आणि काही वेळातच पठार सोडून वर किल्ल्याकडे मोर्चा वळवला.

किल्ल्याच्या पोटातलं भुयार

किल्ल्याच्या वाटेवर एक भुयार आहे. काहीही गरज नसताना उगाचच त्या भुयारात जाऊन आलो. म्हणजे तसं आम्ही नेहमीच प्रत्येक गोष्ट उत्साहाने बघतोच, अर्थात धोका नसेल तरच. ह्यापुढे कड्याजवळूनच चिंचोळी वाट वरच्या बाजूला जाते. वाटवरून वर येता येता उजव्या बाजूला रवळ्या दिसत राहिला.

पलीकडे रवळ्या आणि धोडप

कातळटप्पा

इथल्या कातळटप्प्यावर तटबंदीचे अवशेष आहेत. कातळतप्पा तसा फार अवघड नाही. पण दोर असल्यास उत्तम. आम्ही तर ठरवूनच दोर नेलेला होता आणि तोही तिथेच ठेवण्यासाठी. तो लावला आणि पटकन वर चढून आलो. वारा प्रचंड होता. वातावरणही चांगलं असल्याने पलीकडे रवळ्या आणि त्याच्या मागे आपल्या खास आकारात लक्ष वेधून घेत धोडप, असं चित्र निसर्गाने मांडून ठेवलं होतंन.

बाबापूर खिंड उर्फ मुळाणेबारी, मार्कंड्या आणि वणीचा डोंगर-किल्ला

सगळ्यात आधी किल्ल्याचा माथा गाठला. वाटेवर कारवीतून वाट काढावी लागली, नक्की कोणत्या दिशेने चाललोय ह्याचा अंदाज बांधत. पण पोचलो एकदाचं! ज्या बाजूने चढाईला सुरुवात केली ती बाबापूर खिंड उर्फ मुळाणेबारीकडे नजर टाकली. पूर्ण मार्कंड्या आता उन्हात चमकत होता. मस्तकावर मार्कंडेय ऋषींचं मंदिर मोठ्या दिमाखात मिरवत होता. त्याच्या पलीकडे "इकडे पण लक्ष असुद्या बरं, साडेतीन शक्तीपिठातलं एक असं महत्व आहे माझं. साक्षात देवी सप्तशृंगी वास करते" असा वणीचा डोंगर-किल्ला. चाहुबाजूचं दृश्य बघत बसावं असं ते ठिकाण. ह्या बाजूला ही अध्यात्मिक स्थानं, तर मागच्या बाजूला भौगोलिक विविधता दर्शवणारे रवळ्या आणि धोडप रांग.

पाण्याची टाकी

मन भरलं आणि पावलं सवयीने गड फिरवू लागली. ह्या गडावर किल्लेपण दर्शवणारे अवशेष म्हणजे थोडके शिल्लक तटबंदीचे दगड आणि पाण्याची टाकी.

फोटोसाठी परत चढाई.. हाय काय, नाय काय!

गडफेरी करून परत कातळटप्प्यावर आलो. येताना दोर लावलेला असल्याने उतरताना त्रासच नव्हता. त्यात अजून काही जणंही आमच्या नंतर आलेले त्यांनी त्यांचाही दोर लावलेला होता. त्यामुळे कठीण काही राहिलंच नव्हतं. उलट खाली उतरल्यावर फक्त फोटोसाठी परत अर्ध्यात चढलो. आता ऊन चांगलंच चढायला लागलं होतं. दिवस हिवाळ्याचे असले तरी ११ वाजून गेल्याने सूर्य त्याप्रमाणेच काम चालू ठेवणार ना.. मोर्चा रवळ्याकडे वळवला.

तिवारी वस्ती आणि पाणवठा

ह्या पठारावर तिवारी लोकांची वस्ती आहे. ते मोसमी मुक्कामी असतात, इतर वेळी नाशकात स्थलांतरित झालेले आहेत. जवळ्याकडून रवळ्याकडे जाताना हे वस्तीतले लोक भेटतीलच. जवळ्या उतरायला सुरुवात केली. वाटेत त्यांची घरं लागली आणि लहानश्या पाणवठ्यावर काही लोकही दिसली. सरळ किल्ल्याच्या वाटेला लागलो. आता इथे वस्ती आहे म्हणजे त्यांची शेती किंवा जमीन असणारच. तसं कुंपणही दिसलं. रस्ता तिथूनच जातो. एक बेडं ओलांडून चालत राहिलो. गवत फार वाढलेलं असल्याने बरोबर जात आहोत ना, हा विचारही येऊन गेला. पण किल्ला समोरच होता, फार फरक पडणार नव्हता, जरा इकडे तिकडे झालो वाटेवर तरी. हळू हळू चढ लागला आणि मागे वळून पाहिल्यावर मार्कंड्या आणि वणीच्या जोडीला जवळ्याही आला.

वाटेवरच किल्ल्याच्या पोटातली पाण्याची टाकी

उध्वस्त पायऱ्या लागल्या आणि डोंगराच्या मागचं किल्लेपण समोर आलं. काही वेळातच पाण्याची टाकी पण दिसली. उन्हं डोक्यावर होतीच. बाटल्यात पाणी भरून घेतलं.

कातळटप्पा

पुढे कातळतप्पा आला. मूळ पायऱ्या आता शिल्लक नव्हत्या, तर त्यांचे उरलेले अवशेष समोर होते. त्या जरी तुटलेल्या असल्या तरी आपल्यासारख्यांना त्यावरून जायला पुरेश्या होत्या. पुढे असलेल्या पायऱ्या मात्र बऱ्यापैकी शिल्लक होत्या. पायऱ्या चढून एका छोट्याश्या फोडलेल्या कातळातूनच रस्ता वर जातो.

दरवाजा आणि शिलालेख

दरवाजाची सध्याची अवस्था

इथे एक शिलालेख आहे. तो फारसी/अरेबिकमध्ये असल्याने मी गप इमानेइतबारे फक्त फोटो काढला.

बुरुज

वर पोचलो आणि समोर एक बुरुज बघायला मिळाला. चला, आधीच्या किल्ल्यापेक्षा इथे जास्ती अवशेष पाहायला मिळत होते.

जवळ्या, मार्कंड्या आणि वणीचा डोंगर-किल्ला

धोडप रांग

आजूबाजूचा परिसर आता ईथुनही न्याहाळला. फक्त आता उन्हामुळे सकाळच्या इतका तो प्रसन्न न वाटता रुक्ष भासला.

जोड-टाकी आणि विश्रांतीसाठी सावली

अजून काही टाकी

त्यात वरती सावलीला झाडीच नव्हती. म्हणजे अजूनच रखरखाट. अवशेष पाहत पाहत पाण्याच्या टाक्यांजवळ आलो. इथे मात्र मस्त एक झाड आपली सावली जणू अमच्यासाठीच पसरून बसलेलं असावं असं वाटलं. इथे निवांत बसून थोडी विश्रांती घेतली. दुसरी जागाच कुठे होती तशी टेकायला सावलीची.. विश्रांती नंतर आजूबाजूला काही पाण्याची टाकी शोधून शोधून पाहिली. अवस्था फार चांगली दिसली नाही. गवत वाढलेलं, गाळ साचलेला आणि सफाई नसल्याने वरून मातीही पडलेली. त्यामुळे पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही बऱ्याच टाक्यातलं.

दरवाजातून खालचं दृश्य

डोंगराच्या पोटातल्या गुहा

ह्या गडावर एवढेच अवशेष आहेत. त्यामुळे इथे विश्रांती घेऊन परतीचा प्रवास चालू केला. आलो त्याच वाटेवरून परत खाली उतरायला सुरुवात केली. आता पठारापर्यन्त जाताना आलेल्या वाटेनेही जाता येऊ शकत होतं, पण तसं जायचंच नव्हतं आम्हाला. मध्येच आलेली वाट सोडली आणि डावीकडची वाट पकडली. ह्या बाजूला काही गुहा कोरलेल्या आहेत. उन्हाने तापलो होतो आम्ही. त्यात आमच्याकडे निवांत वेळ होता. दुपारचे २ वाजले होते. आता काय इथून पठारावर आणि तिथूनही खाली उतरायचंच होतं. चढ लागणार नव्हता आणि दमछाक होईल असाही काही टप्पा नव्हता पुढे. सगळे निवांत पडले. चक्क १ तास तिथेच काढला आम्ही. निघाल्यावर मग मात्र २० मिनिटांत पठारावर आलो.

पठारावरून रवळ्या

पाण्याची कुंड

त्यातही आलेल्या वाटेने न जाता जवळ्याला प्रदक्षिणा मारायची असं ठरलेलं होतं. त्यामुळे आता जवळ्याला डावीकडे ठेवत जरा लांबचा रस्ता घेतला. ह्या बाजूला प्यायच्या पाण्याचं कुंड, शेजारी दगडी द्रोण हेही आहे. पाणी पिऊन भरूनही घेतलं. निवांत असल्याने वाटेत भेटलेल्या लोकांशी गप्पाही मारता आल्या. काही समाधी सदृश्य बांधकामही दिसलं.

समाधी आणि वास्तू

समाधी आणि वास्तू

खरं तर इतस्ततः पसरलेले घडीव दगड, मजबूत समाध्या अश्या गोष्टी पाहता, ह्या इथे कश्या आल्या हाही प्रश्न मनात येतच होता. अश्या गोष्टी काहीही आखणी न करता इकडे तिकडे उगाच थोडीच बांधल्या जातात? म्हणजे एक तर मूळ जागा दुसरीकडे तरी असावी आणि कशाही प्रकारे त्यांना इथवर आणलं गेलं असावं. किंवा इथेच त्यांची मूळ जागा असेल, पण आजूबाजूची जागा त्याला सुसंगत दिसत नव्हती. काहीतरी अभ्यास गरजेचा आहे ह्यावर. काही दगड तर मंदिराचे वाटले. एकूणच ह्या वास्तू पाहता, इथेच काहीतरी मोठे बांधकाम आणि आखणी करून बांधणी केलेली असणार हीच शक्यता वाटते. सध्या मात्र त्याचं मूळ स्वरूप उघड करण्यासाठी अभ्यास आणि कदाचित त्याला अनुसरून सफाई गरजेची आहे.

ह्या बाजूने त्या पठाराची दुसरी बाजूही बघता आली. जवळ्याचीही इकडून दिसणारी बाजू पाहता येत होती. भेटलेल्या गावकऱ्यांशी बोलत, नवनवीन झाडंही बघत, आम्ही निवांत चाललेलो. मध्ये मध्ये तर चक्क चरायला सोडलेल्या गुरांशीही जरा चर्चा झाली. म्हणजे त्यांना समजेना की आम्हाला कुठे जायचंय आणि आम्हाला समजेना की त्यांना कुठे यायचंय. मग नजरो ही नजरोमे बात हुई आणि आपापल्या वाटेने दुसऱ्याला त्रास न देता गेलो.

ना अनपेक्षित वळण, ना कहानीमे ट्विस्ट, ना काही विशेष घटना... साधं सरळ नियोजन, साधी सरळ भटकंती आणि साधे सरळ अनुभव... असा पद्धतशीर पण निवांत, पूर्ण अवशेषांसह पण त्याचाच आनंद घेत अशी ही जोडकिल्ल्यांची भेट वेळेत संध्याकाळी संपली. अर्थात रात्रीचा प्रवास, अपरात्री ठरलेल्या ठिकाणी पोचून एकांतात चांदण्यांच्या छपराखाली मुक्काम, उजाडायच्या आधी उठून शांतता आणि अपरिचित ठिकाणाचा अनुभव, Whole वावर is our, असंच वाटावं अश्या ठिकाणी पहाटेचा गरम चहा! भटकंती समृद्ध होतेच की...

नाशकातल्या भेट देण्याचा राहिलेल्या किल्ल्यांच्या यादीतील दोन किल्ले कमी झाले आणि तेवढ्याच मापाचं समाधान खात्यात जमा झालं!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Tuesday, April 30, 2024

भैरवगड ते भैरवगड - II

समोरच्या गवळदेवकडे बघून आवंढा गिळला. पण आधी त्या सॅकचं कण्हणं थांबवणं गरजेचं होतं. नाहीतर मग पुढे माझ्यावरच कण्हायची वेळ आली असती. 🙈 मग त्या बंदाला गोंजारून थोडं शांत केलं. पठार बऱ्यापैकी उतरलो.

समोर घनचक्कर आणि गवळदेव यांना जोडणाऱ्या खिंडीतून गवळदेवकडे जाणारी वाट थोडी थोडी दिसायला लागली. खिंडीतून पलीकडे गवळदेवच्या बाजूला असलेल्या दाट गवतात शेळ्या पण दिसल्या. आम्ही जसं खाली उतरायला लागलो आणि शेळ्या जवळ यायला लागल्या, तेव्हा कळलं, की त्या शेळ्या नसून गाई-गुरं आहेत, ते गवत नसून झुडपं आहेत आणि आम्ही गाढव 🤣 शांतपणे त्या गुरांना घनचक्करची वाट मोकळी करून दिली आणि त्यांनी आम्हाला गवळदेवची. एकमेकांना क्रॉस करून एक्सचेंज ऑफरमध्ये आम्ही गवळदेव डोंगरावर टेकलो आणि त्या घनचक्कर वर.

गवळदेववरून घनचक्करची मागची बाजू

टेकलो म्हणजे काय, तर फक्त डोंगराला लागलो. अजून गवळदेव टोक लांबच होतं. पायातल्या गोळ्याने परत आपली उपस्थिती दाखवलीन. "मी आहे, आहे अजून, गेलो नाहीये" हे उगाच ओरडून सांगतानाच, वर जाणारी वाट खड्या चढाईची नसून, फेरी मारत लांबची असली, तरी थोडी हळूहळू चढत जाणारी आहे कळलं. त्यामुळे पोटातला गोळा हळूहळू कमी झाला. एकदा मागे घनचक्करकडे बघितलं. आम्हाला घनचक्करची ही बाजू फक्त इथे आल्यावरच दिसणं शक्य होतं. निळ्या आभाळाखाली तो हिरवा घनचक्कर आणि इकडून दिसत असलेला त्याच्या मागच्या बाजूचा हा काळा कातळकडा. बऱ्याच वेळाने असं मागे वळून पाहिल्यावर फार छान वाटतं. एवढं आलो आपण याने हुरुप येतो.

डोक्यावरचं ऊन मात्र तो हुरूप बाजूला सारायचा फार प्रयत्न करत होतं. झालं होतं काय, की काल जो पाऊस पडून गेला होता, त्याने इकडच्या आकाशातलं ढगातलं पाणीच संपून गेलं होतं. सूर्याला त्याचे किरण अडवणारं कोणीच आभाळात नसल्याने, उंच अशा या डोंगर माथ्यावर तो प्रखरपणे आपली किरण फेकत होता. व्ह्यू मिळण्यासाठी म्हणून हे वातावरण उत्तम असलं, तरी ढगातलं पाणी संपवून, ते ऊन आता अंगातलं पाणी ओढून, बहुतेक आता सूर्याला अर्घ्य देत असावं. पण त्यातही मध्ये सुंदर झाडी, लहान-मोठे गारगोटीचे दगड, त्या उष्णतेतही सूर्याच्या नाकावर? किरणांवर म्हणू, टिच्चून जिवंत असलेला पाण्याचा झरा आमचं मन गार करून गेला.

उन्हापुढे आधी हात टेकले, मग आपोआप पाठ टेकली गेली

पण पायातला गोळा होताच, जो मात्र ती चाल अजूनच मंदावत होता. तशीच पावलं ओढत ओढत, ती बॅग सांभाळत एका झाडीत थांबलो. घनचक्कर माथ्यापासून बरोबर दोन तास झाले होते इथवर. टळटळीत उन्हातून ती पठारावरची आणि गवळदेवची ही पायवाट एवढा वेळ तुडवल्यावर सगळ्यांनीच उन्हापुढे हात टेकले. हाताबरोबरच मग पाठीवरच्या पिशव्या आणि हळूहळू पाठही टेकली गेली. थोडावेळ थांबलो. पायातल्या गोळ्याला विश्रांती देऊन मग मीही पाठ टेकली. तब्बल दीड तासाचं ऊन आम्ही डोक्यावर घ्यायचं सोडून वाया घालवलं.

तीन वाजून गेले. मुक्काम गवळदेवच्या पठारावरच करायचा असल्याने रात्री अंधार पडायच्या आत पायथ्याला गावात उतरायचं वगैरे नव्हतं. पण गवळदेव माथा आजच बघून घ्यावा आणि उद्या ते चढाचढीच काम टाळावं, असा ठराव मांडता मांडताच संमत झाला. आता घनचक्करचा उतार जरी उतरला असला तरी इथवर येताना चढ चढत आलं आहोतच आणि समोरच आता माथा दिसतोय, वेळही आहेच, तर वर पोचून तिथला नजरा का नको बघायला?

गवळदेव माथा.jpg

समोरच्या माथ्याला भिडलो. आता माथ्यावर पोचणार, तोच लक्षात आलं की, अरे हा तर माथा नाही पण, लहानसं पठार आहे. माथा त्याच्या पलीकडे, जरासाच वर. चला त्या टेकड्यावर लागलो, पण परत तेच... माथ्यावर पोचूच आता म्हणता म्हणता लक्षात यायचं, की हे तर लहान पठार किंवा टप्पा. माथा तर तो पलीकडे दिसतोय. असं झालं ना परत परत २-३ वेळा. का हा गवळदेव परीक्षा घेतोय हे समजलच नाही. पण आला एकदाचा खरा शिखरमाथा. आम्ही पोचलो होतो, महाराष्ट्रातल्या उंचीने तिसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर.. गवळदेव माथा!!!

गवळदेव म्हणजे गवळ्यांचा देव, गुराख्यांचा देव. कोकणात सिंधुदुर्गात गवळदेवाचा फार मोठा उत्सव असतो. आता आम्ही जिथे आलेलो, तिथे असा उत्सव वगैरे नसतो, पण अर्थ तोच. गुरख्यांचा देव. मग तो इथे का? तर भैरवगडपासून कात्राबाईपर्यंत ह्या जोडलेल्या डोंगर रांगेवर, बराचसा पठार भाग आहे. हा भाग ह्या गवळदेव व घनचक्कर डोंगरांच्या माचीवर खूप आहे आणि त्यामुळेच गुराखी अर्थात गवळ्यांची इथला उपलब्ध चारा म्हणजे पर्वणीच ना.. त्यांच्या रक्षणासाठी खास त्यांचा रक्षणकर्ता - गवळदेव!

गवळदेव वरून व्ह्यू

गवळदेवाला नमस्कार करून या सर्वोच्च माथ्यावरून सभोवतालचा परिसर डोळ्यात भरून घेतला. घनचक्कर वरून दिसलेल्या अफाट दृश्याची उजळणी झाली. त्यात मागच्या बाजूला आता कुंजरगड उर्फ कोंबडा, कलाडगड, हरिश्चंद्रगड हेही बघायला मिळाले. सगळं वेळेत चाललं होतं. साडेचार वाजलेले, निवांत खाली उतरायला सुरुवात केली. दुपारच्या विश्रांतीनंतर पायातला गोळा जणू विरघळून गेला होता.

मुक्काम

मुक्काम करण्यासाठी सुंदरसं ठिकाण निवडलं. छोटासा पाण्याचा ओहोळ आणि जवळच गवळ्यांनीच करून ठेवलेलं तात्पुरतं आसऱ्याचं ठिकाण. झापं उडून गेलेली असली तरी जागा मोक्याची निवडून ठेवलेली मिळाली ना, आणि आमच्याकडे आमचे तंबू होतेच की छप्पर म्हणून. तंबू ठोकले. सरपण गोळा केलं. चुलीची जागा मांडलेलीच होती. रात्री निवांत गप्पा, सोबत सूप, पापड, बिर्याणी असा जंगी बेत होता.

सकाळ

सकाळ

सकाळ

घरात असतो तेव्हा सात वाजून गेले, तरी लोळत पडून अंथरुणातून बाहेर यायची इच्छा होत नाही. पण डोंगरावर पहाटेच सगळे तंबूच्या बाहेर. सूर्य नंतर येतो. मग सकाळी आन्हिकं उरकल्यावर चहा-मॅगी खाऊन सगळे गडी तयार. आता सगळे गडी म्हणजे गंमतच आहे. नाना सगळ्यात मोठे तरी सगळ्यांच्या पुढे, प्रमोदना तर मी पहिल्यांदाच भेटत होतो. ते तर आधीच कोणती तरी भटकंती करून आलेले, शेडबाळे सर रद्द झाल्याने वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवलेले. मनीष चक्क दोन दिवसांची सुट्टी काढून आलेले. विनीत म्हणजे या भटकंतीचा नियोजक, आमचे वाटाडे मामा आणि गंमत म्हणजे चालक म्हणून आलेले पण खंदे भटके लालासो. यांची गंमत वेगळीच, ती नंतर सांगतो.

कात्राबाई

दगडांची खूण आणि मागे गवळदेव

दगडांची खूण

सध्या ते तंबू वगैरे सगळं आवरून, कॅम्पसाईट व्यवस्थित पाहून, कात्राबाई कडे निघालो. पुढे इथे येणाऱ्या भटक्यांसाठी सरपणाची सोय म्हणून जवळचे कागद, पुठ्ठे हे तिथेच चुलीजवळ छपराखाली ठेवले. गवळदेव सोडलं. कात्राबाईच्या रस्त्याची वाट मळलेली आहे, ही चुकायला होणार नव्हती. त्यातून वाटेत गुराख्यांनी दगडावर दगड ठेवून मध्ये मध्ये खुणा करून ठेवलेल्या आहेतच.

आजोबा, करांडा आणि कात्राबाई तिघांनी मिळून व्यापलेला Landspace

आजूबाजूचा परिसर दिसण्यासाठी अगदी शिखराच्या टोकावरच असायला पाहिजे असं काही नव्हतं. निसर्ग प्रसन्न होता. केव्हाही नजर फिरवावी, सगळीकडे सह्याद्री देखावे नुसते वाटत होता. आपण आपल्याला पाहिजे तो घ्यावा बघायला. आजोबा, करांडा आणि कात्राबाई तिघांनी मिळून अख्खा Landspace व्यापलेला दिसला.

कात्राबाई आणि जाणारी वाट

थोड्याच वेळात कात्राबाईने दर्शन दिलेन ते उजवीकडे रतनगड वगैरे साथीला घेऊनच. कात्राबाईचा पसारा सुद्धा अफाट आहे. खिंड आणि जाणारी वाट एकदा पाहून अंदाज घेतला. खिंडीपर्यंत तरी फार चढाई वगैरे दिसली नाही.

गुरांनीही साथ दिली

गुरांना निरोप दिला

सकाळच्या उन्हाचा त्रास होत नव्हता. वाटेत मध्ये-मध्ये थोडी झाडी लागली. त्यात गुरांनीही आम्हाला साथ दिली. "कशाला नको ती कटकट आम्ही निवांत चरत असताना" अशा काहीशा भावनेनेही असेल पण त्यांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं. त्यानंतर त्या वाटेवर एक सुंदरच झाड लागलं. त्याच्या सावलीत आम्ही थांबलो, तर गुरंही थांबली. "तुम्ही आमच्या मागे नको, एकदाचे पुढे जा काय ते, आमच्या मध्ये मध्ये येऊ नका" असं तर सांगत नसावेत? आम्ही त्यांचं ऐकलं, त्यांना निरोप दिला आणि तिथेच सोडून पुढे गेलो.

कात्राबाई खिंडीतील देव

इथे एक वाट कुमशेत गावात उतरते, एक वाट वर कात्राबाई माथ्यावर जाते, तर एक रतनगड किल्ल्याकडे. आम्ही खिंडीत असलेल्या देवांना नमस्कार करून कात्राबाई माथ्याकडे निघालो. वाट मळलेलीच आहे. इथेही वाटेत दगडांची लहानशी चळत मांडून ठेवलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण बरोबर वाटेवर आहोत याची खात्री करून देतात.

कात्राबाई माथा - मागे रतनगड, खुट्टा आणि कळसुबाई रांग

कात्राबाई माथा गाठायला फार वेळ लागत नाही खिंडीतून. अर्ध्या पाऊण तासात निवांत वर पोचलो. इथे माथ्यावरही दगडांची रास करून ठेवलेली आहे. काल पेक्षा वातावरणात आज फरक होता. थोडी अस्पष्टता होती, तरीही सुंदर परिसर दिसला. आता वेळ असल्याने फक्त भटकायचं होतं. तसंही हा किल्ला वगैरे नसल्याने अवशेष वगैरे ठराविक गोष्टींचे शोधकार्य नव्हतं.

कात्राबाईवरून मागे लागुनच करांडा आणि पलीकडे आपले नांव सार्थ करत डोकं वर काढणारा आजोबा

ज्या बाजूने आलो, ती घनचक्कर, गवळदेव आणि भैरवगडाची बाजू

हुंदडत सगळा माथा पालथा घातला. कात्राबाई माथा हा प्रचंड परिसर आहे. एका बाजूला आजोबा डोकं वर काढून होता, तर दुसरीकडे रतनगड, खुट्टा वगैरे. पाठीमागे आम्ही आलेले गवळदेव, घनचक्कर आम्हाला हात करत होते. तब्बल दीड तास फक्त कात्राबाईच्या डोक्यावर फिरत होतो आम्ही. मग मात्र झपाझप उतरतीची वाट धरली.

खाली ओढा आणि Pool दिसला

आता डोक्यातले विचार बदलले. मध्ये उगाचच काही जाणीव होत होती म्हणून खालच्या बाजूला तोंड करून भटक्यांचा ठराविक "A O", तर कधी मध्येच कोकणी "उ हूं" असे आवाज काढत होतो. अर्थात आमच्या ग्रुप मधलं पुढे कोणीच नव्हतं. सगळे मागूनच येत होते, पण उगाच एक जाणीव. तेवढ्यात पुढे खाली एक ओढा दिसला आणि त्याचं पाणी पुढे जाऊन मिनी Pool.मन तर इथेच भिजायला लागलं होतं, औपचारिकता पूर्ण करायला फक्त तिथे पोचायचं होतं. तसाही एक वाजून गेल्याने सर्वानुमते खादंती ब्रेक घ्यायचा ठरला. शेजारी पाणी असणाऱ्या ठिकाणापेक्षा अजून छान ते काय? छान सावलीत सगळं सामान ठेवलं. पाणी म्हटल्यावर कपडे घाबरतात अंगावर राहायला. ते आपसूकच बाजूला झाले. आता पाण्यात शिरणारच तेवढ्यात....

कसं होतं, आमची गाडी आम्हाला शिरपुंजे गावात सोडून कुमशेत गावात पोचणं अपेक्षित होतं आम्हाला परत घ्यायला. जे काम करण्यासाठी चालक हवा होता आणि लालासो आमच्याबरोबर चालक म्हणून आले होते. पण त्यांनाही भटकंतीची आवड, त्यामुळे ते ट्रेक करत आमच्याबरोबर गवळदेववर आले होते. आता ते हाडाचे भटके आहेत हे तर कळून चुकलं होतं, त्यामुळे आम्हालाही आनंद झाला होता ते बरोबर असल्यानं. पण गाडी? ती कशी आपोआप येणार मग कुमशेतला? गवळदेव वरून पुढचा प्रवास कात्राबाईकडे सुरू केल्यावर पुढे वाटाड्याची गरज नव्हती. वाटाड्या मामांनाही त्यांच्या शिरपुंजे गावात परत जायचं होतं, मग हे लालासो आणि वाटाडे मामा परत उलटं फिरून शिरपुंजे गावाकडे रवाना झाले होते आणि आम्ही कात्राबाईकडे मोर्चा वळवला होता. पण तरीही हे समजत नव्हतं, की आता आमच्यासाठी तर पुढचं अंतर कमीच आहे. तेव्हा कात्राबाईवर पोचून उतरून किती वेळ वाट बघायची यांची कुमशेत गावात? म्हणजे वेळ वाया जाणार ना? कारण ते ट्रेकला आले नसते, तर आमच्या आधी गाडी घेऊन पोचले असते गावात. पण आता रिव्हर्स, म्हणजे गवळदेव उतरणे, घनचक्कर चढणे, अगदीच माथ्यावर जायचं जरी टाळलं तरी पूर्ण वळसा मारून आणि भैरवगड खिंडीतून उतरून शिरपूरच्या गावात उतरणे हे करायला हवंच ना? आणि त्यानंतर मग गाडी घेऊन कुमशेत. पण मला जे इंट्युशन येत होतं कात्राबाई उतरताना, त्यामुळे या ओढ्यापर्यंत पोहोचल्यावर सुद्धा मी विशेष अश्या आवाजाचा पुकारा करत होतोच आणि काय सांगू? कुमशेत गावाच्या बाजूने आला ना प्रतिसाद.... शब्दशः फक्त आनंदाने उडी नाही मारली पाण्यात. कारण पाण्याचे कुंड खोल नव्हतं 😁 पण ओरडलोच! माझा आवाज ऐकून त्याला खालून प्रतिसाद जो दिलेला होता, तो लालासोनी. आम्ही गवळदेवला त्यांना सोडून, कात्राबाई करून इथवर येईपर्यंत हा माणूस गवळदेव वरून घनचक्कर, भैरवगड खिंड, शिरपुंजे गावात उतरून गाडी घेऊन ती कुमशेतला घेऊन आला होता. बरं ती गाडी कुमशेतला खाली लावून, तिथेच न थांबता आम्ही हाका मारत असलेला आवाज जिथे पोहोचेल, तिथपर्यंत ऑलरेडी चढून आला होता....

पाण्यात खेळ.jpg

मग काय, लवकरच आमच्या ओढ्यापर्यंत ते चढून आले. चेष्टा नाही. ह्यात आम्ही जेव्हा ही भटकंती केली, तेव्हा घनचक्करला शिड्या वगैरे लावलेल्या नव्हत्या, ज्या नंतर लावून हा रस्ता सोपा केलाय आणि कमी वेळाचा झाला आहे म्हणे. तर लालासो चढून आल्यावर मग सगळ्यांनीच सुंदर जलपरी म्हणून डुंबण्याचा आनंद घेतला. खादंती झाली आणि मळलेल्या पायवाटेवरून झपझप कुमशेत गावात पोचलो, ते सुद्धा ३च्या आधी. लालासोंनी अगदी शेवटच्या घरापर्यंत गाडी आणून लावलेली होती त्याचा आनंद वेगळाच, कारण आमची मानसिक तयारी होती अजून चालायला लागणार गाडीपर्यंत पोचायला अशी.

कुमशेत गावातून मागे कात्राबाई रांग

गाडीत सगळे बसले. नाना तर मागे हौद्यात जाऊन आडवेच झाले. या सगळ्या आनंदात लालासोंनी गाडी अशी हाणली त्या कच्च्यावरून, की एकदम "ढांम्"... या आनंदात रस्त्यावरच्या उंचवट्याकडे लक्ष गेलं नाही आणि सगळ्यांना उंचवटा लक्षात येईपर्यंत आधी डोक्याला आणि मग पार्श्वभागाला जाणवला. बसलेले सगळे चक्क जागेवर उडून परत सीटवर आपटले. आमचं सोडा, पण नाना तर मागे झोपले होते. ते सर्वांगाने आडव्या स्थितीतच फुटभर हवेत उडून परत खाली. सरळ गाडी थांबवली. सगळ्यांनी आपापली सगळी हाडं, अवयव जागेवर असल्याची खात्री करून कुमशेत सोडलं.

कोथळेचा भैरवगड

आता खरंतर मूळ नियोजन इथून तडक घरी परतायचं एवढंच होतं. पण विनीतच्या डोक्यातून एक किडा आला, की इथूनच जवळच कोथळेचा भैरवगड आहे, तो बघून जायचं का? आता असला किडा आम्ही सोडणार कसा? गाडी लगेच तिकडे वळवली. तरी चार वाजून गेले होते. आता वेळ नाही असं जरी नसलं, तरी निवांतपणा न केला तरच किल्ला पाहून होईल, असं मनात घेतल्याने त्याप्रमाणे किल्ल्याकडे निघालो.

वाटेतले देव

आता इथे येणाऱ्या सर्वांचीच ही परतायची वेळ होती, त्यामुळे आम्हाला खाली परत येणारेच लोक भेटत होते. चढत फक्त आम्हीच होतो. सुरुवात केल्यापासून थोड्याच अंतरावर अनगड देवांची ठाणी लागली. दगडावर कोरलेला देव, मग दगडांना शेंदूर फासून त्रिशूलधारी देव, यानंतर जंगलातलं जाडजूड वेली, मोठे बुंधे असलेली झाडं असं वैभव न्याहाळत वाटचाल चालू झाली.

पहिली शिडी

अर्ध्या तासातच शिड्यांपाशी आलो. इथे जुनी शिडी तशीच ठेवून जरा मोठी अशी नवीन शिडी ही बसवलेली आहे. वर पोचतानाच किल्ला म्हटल्यावर ओळखीची नजर अवशेष शोधू लागली. पाण्याची टाकी, पायऱ्या, असं बघत पुढच्या शिडी जवळ आलो. मग वर माथाच की.

गडावरील देव

पाण्याची टाकी

पाण्याची टाकी

आधी देवदर्शन घेतलं. मग टाकी बघायला लागलो. या किल्ल्यावर बाकी काहीच अवशेष नाहीत. बुरुज, दरवाजा, तोफा वगैरे. थोडक्यात एक गड पदरात पाडून गाडी जवळ आलो.

कात्राबाई उतरताना Cherry on the Top Swimming Pool.jpg

"भैरवगड ते कात्राबाई" या ऐवजी "भैरवगड ते भैरवगड" असा भैरवाला वाहून घेतल्यासारखा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला. एका क्षणी पावसामुळे रद्द करावा लागतो की काय? असं होत असलेला हा ट्रेक या दोन भैरवांसोबत महाराष्ट्रातलं तीन आणि चार क्रमांकाचे शिखर चढून पाहून पूर्ण झाला. त्यात गवळदेववर मुक्काम, सगळ्याच शिखर माथ्यावरून अप्रतिम नजारे याने साज चढला. दोन दिवसाचा सगळा शीण त्या पाण्यातल्या डुंबण्यानी गेला, हे तर "Cherry on the Top" नाही का....

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!