दुर्ग साजरा
जिंजी.... नाम तो सुना ही होगा! अर्थात हे नांव माहिती नसलेला इतिहासप्रेमी विरळाच. जिंजी ही मराठ्यांची दक्षिणेकडील राजधानीच. राज्याभिषेकाच्यानंतर दोनच वर्षांनी महाराजांनी केलेली दक्षिण दिग्विजय मोहीम ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ चाललेली, अत्यंत महत्त्वाची आणि यशस्वी मोहीम. एकूण दीड वर्षे ही मोहीम चालली, म्हणजे केवढा मोठा प्रदेश पादाक्रांत केला गेला असेल, याचा अंदाज येईल! जिंजीचा दुर्ग जिंकून परतताना, वेल्लोरला येऊन त्यांनी वेल्लोरच्या कोटाला वेढा दिला. त्यासाठीच या किल्ल्याच्या बरोबर समोर असलेल्या टेकड्यांवर दुर्ग उभारणी चालू केली.
इथे जे दोन दुर्ग बांधले, ते मराठमोळे दुर्ग, "दुर्ग साजरा" आणि "दुर्ग गोजरा".
"दक्षिण दिग्विजय" या मोहिमेत त्यांनी पादाक्रांत केलेला सगळा प्रदेश तर आमच्या आठ दिवसांच्या मोहिमेत फिरून होणे, कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हते. अर्थातच, त्यामुळे तसा विचारही नव्हता. पण डोक्यात “जिंजी” हे नांव मात्र रुंजी घालत होतं. शेवटी मुहूर्त लागला आणि नियोजन ठरलं. जेव्हापासून जिंजी नांव डोक्यात होतं, तेव्हापासूनच साजरा-गोजरा ही नांवंही त्याच्याबरोबरच "आम्हाला विसरायचं नाही बरं... " अशी आठवण करून देत होती. जिंजीची जेवढी ओढ होती, तेवढीच ओढ मराठमोळं नांव मिरवत असलेले, तामिळ प्रदेशातले साजरा आणि गोजरा यांचीही होती.
मुहूर्त लागला आणि मोहीमपण घडली. लिहायचा मुहूर्त मात्र लागेना... पण एखाद्या गोष्टीची एक कळ असते. कर्नाटक मोहीम की तामिळनाडू? यात तामिळनाडूचं पारडं जड होत होतं. त्यातच काही दिवसांपूर्वी भारतातल्या १२ दुर्गांना युनेस्कोमध्ये जागा मिळाली. त्यातले महाराष्ट्रातले ११, तर महाराष्ट्राबाहेरचा एकमेव दुर्ग जिंजी!
कळ दाबली गेली, वही-पेन निघाले, आणि त्यातही साजरा-गोजरा यांनी बाजी मारलंनी, जरी ते ह्या मोहिमेतले आधी बघितलेले किल्ले नसले तरीही. मराठी म्हणून वशिलेबाजी? असुद्या कि... पण म्हणजे लेखमालेत पहिला मान पटकावला ह्यांनीच!
वेल्लोरमध्ये मुक्काम झाला. दिवसाचा पहिला मान ठरला दुर्ग साजरा! गडावरची प्रत्येक गोष्ट बघितलीच पाहिजे, हा अट्टाहास! त्यामुळे काही गोष्टी मनात नोंदवून ठेवलेल्या, त्याकडे लक्षही होतं.
साजरा दुर्ग संवर्धन वगैरे केलेला नाहीये. यापूर्वी म्हणजे २००४ सालापर्यंत तर इथे जवळपास फार कोणी जातही नसे. त्यामुळे हातभट्टी वगैरे अवैध धंदे येथे चालायचे, असं ऐकल्याचं प्रणीव भोसले यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. तसाही हा दुर्ग आजसुद्धा फार वर्दळीचा नाही. म्हणूनच वर चढण्याची वाट सापडते आहे ना? इथपासून, मनात नोंदवलेलं सगळं बघायला मिळतंय ना, तेही आधी शोधून-सापडून बघायला, याची काळजी जास्ती होती. पण जमेल तशी माहिती काढायचा आम्ही सगळेच प्रयत्न करत होतो. विनीत तर स्वप्नीलशी बोलून ताजी माहिती घेत होता. जमेल तशी बोलणीही करून ठेवलेली होती.
वेल्लोर किल्ल्याच्या समोरच्या टेकडीवर हे दुर्ग असल्याने, काहीजण इथून दोन दुर्गांच्या मधल्या खिंडीतून जाऊन, तिथून साजऱ्यावर गेले होते. ही वाट खडतर आहे. पण हीच वाट मूळ वहिवाटेची होती असे काहींचे मत असले, तरी सध्या ह्या बाजूला अजिबातच वर्दळ नसल्यामुळे इथून वाट सापडणं कठीण आहे. त्यात जंगल. म्हणजे वाटाड्या हवाच! तमिळनाडूमध्ये भाषेचीही अडचण. पण आमच्या सुदैवाने, दुसऱ्या एका भागातून वाट झालेली आहे असं कळलं. आणि त्यातून ती वाट तुलनेने सोपी आणि लवकर सापडणारी असल्याचंही समजल्याने थोडा धीर आला.
"जुनं वेल्लोर" किंवा "जुनं गांव" असं म्हटलं जातं त्या भागातून, घराघरांमधल्या गल्ली-गल्लीतून वाट काढत पायथ्याला पोचलो. आमचं नशीब जोरावर होतं बहुतेक. मार्गाची स्थिती पाहता, नवथरच कोणीतरी इथे येऊन गेलं आहे हे लक्षात येत होतं. झाडी वगैरे साफ केलेली होती. वाट स्पष्ट होती. दगडांवर चक्क बाण काढून ठेवलेले दिसत असल्यामुळे प्रश्नच नव्हता!
![]() |
कालिका मातेचा भास व्हावा अशी देवी |
गडावर दाट जंगल आहे. पण चढायला सुरुवात करतानाच ७ वाजले होते, त्यामुळे वर पोचेपर्यंत उजाडणारच होतं. सुरुवातीलाच दिसलेल्या, कालिका मातेचा भास व्हावा, अशा देवीला नमस्कार करून श्रीगणेशा केला. तांबडं फुटायच्या आधीची वेळ असल्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक होतं.
![]() |
उघड्यावरचे शंकराचे देवस्थान |
अवघ्या दहा मिनिटांत एका प्रशस्त दगडावर असलेल्या देवस्थानाजवळ पोचलो. सध्या तरी त्या मूर्ती उघड्यावरच ठेवलेल्या दिसल्या. चौथराही अर्धवट बांधलेला, त्यावरच शंकराची पिंडी, नंदी, शेजारी त्रिशूळ वगैरे होतं. चौथऱ्याला टेकूनच एका ऋषींची मूर्तीही होती. जटाधारी, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा कदाचित शंकराचंच रूप तर नसेल?
साजरा-गोजरा या दुर्गांना इथे "टेकडीवरचे दुर्ग" म्हणून ओळखतात. वेल्लोर किल्ल्याच्या समोर असलेल्या टेकडीवर महाराजांनी हे दुर्ग बांधले असल्याने ह्या किल्ल्यांवरून वेल्लोर गाव आणि दुर्ग व्यवस्थित दिसतो. किंबहुना हाच तर हे दुर्ग बांधण्यामागचा उद्देश असणार नाही का? त्यामुळे इथून गाव संपूर्ण दिसलं. सगळे इथपर्यंत आल्यानंतर, पुढे निघालो.
![]() |
बुरुज |
वीस मिनिटांतच एकदम समोरच बुरुज दिसला. बुरुजाच्या जवळ जाण्यासाठी बरीच झाडी तुडवावी लागली. आणि, तसंही इथे ना प्रवेशद्वार आहे ना वर जायला वाट, हे स्पष्ट दिसलं.
![]() |
दरवाजा |
![]() |
झाडांनी वेढलेला दरवाजा आतील बाजूने |
मग परत पहिल्या वाटेला लागून, शेजारून वाट काढत पुढे गेलो. दोन-तीन मिनिटांतच दरवाजा दिसला... म्हणजे गड आला! आता शोधायची होती एक महत्त्वाची गोष्ट... ते म्हणजे...
तर काय आहे, कि जेव्हा आम्हाला कळलं, ह्या गडावर एके ठिकाणी महाराजांची अश्वारूढ मूर्ती कोरलेली आहे. तेव्हापासून नुसता गड आणि वास्तू सापडल्या म्हणजे झालं असं नाही, तर हे शिल्पही नक्की शोधून पहायचं, हे ठरलेलं होतं. आता इथे येण्याचा योग आलेला होता, पण येण्यापूर्वी केलेल्या अभ्यासानुसार हे शिल्प सापडणं तितकं सोपं नाही हेही माहित होतं. अनिकेत वाघ आणि अमर साळुंखे यांनी हे शिल्प उजेडात आणलं. अनिकेतशी बोलणं झालं होतं, त्यावरून थोडाफार अंदाज आला होता. पण त्यावेळी ते ज्या वाटेने गेले आणि आम्ही ज्या वाटेने येणार होतो, त्या दोन्ही वाटा भिन्न होत्या. त्यामुळे, लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे "दिसणारी प्रत्येक वास्तू बारकाईने पाहायची!" कारण, फक्त तसंच केल्यावरच हे शिल्प सापडू शकतं.
नेहमीप्रमाणे दरवाजा न्याहाळला. कमानीवरची नक्षी, मधोमध असणारे गणपती, कमळासारखे दिसणारे शिल्प असं नेहमी दिसणारं काही दिसतं का ते पाहिलं. या दरवाज्यावर मधोमध शिल्प तर होतं, पण त्याचा काही अर्थ लागत नव्हता. उजवीकडे मोठ्या अक्षरात निळ्या रंगात "WEL COME" हा वर्तमानकाळातला रंगीत शिलालेख मात्र दिसला.
कुठल्यातरी दरवाजामागच्या खांबांवर ते शिल्प असल्याची माहिती होती. त्यामुळे दरवाजाच्या मागे असलेल्या देवड्यांमधील प्रत्येक खांब वरपासून खालपर्यंत, गोल फिरून ३६० अंशात नजरेखालून घातले. पण... इल्ला! नाही, तामिळमध्ये "इल्लाई". म्हणजे तसं गणपती, शिवपिंडी, अगदी कमंडलूसुद्धा कोरलेलं दिसलं. छताच्या आतल्या बाजूने वरती नक्षी वगैरेही होती. पण महाराज इल्लाई.... म्हणजे महाराज काय दर्शन द्यायला तयार नाहीत. चला म्हणजे इथे नाहीत तर...
पुन्हा दरवाजा आत-बाहेर करून पाहून झाला. उंबरठ्यावर दिसलेला तामिळ भाषेतला मजकूरही बघून झाला.
![]() |
दगड आणि वरती भांडं |
मग सरळ प्रदक्षिणा मार्ग धरला. आमच्याकडे असलेला नकाशा काढला. थोडीशी चर्चा झाली, मग मार्ग ठरवला. तटबंदीवरून सुरुवात केली. कोपऱ्यावर एक मोठा उभा दगड आणि त्यावर एक भांडं दिसलं. पण इतर काही नव्हतं. पुढे काही मोठे खडक, आणि त्यावर ते फोडण्यासाठी वापरत असलेल्या जुन्या काळातल्या तंत्राच्या खुणा दिसल्या. आणखी पुढे गेल्यावर अजून एक उंच दगड, त्यावर भांडं. इथे मात्र याला शंकराचं चित्र असलेल्या फरशा लावलेल्या होत्या.
![]() |
साजऱ्यावरून गोजरा |
पुढे गेल्यावर एक ठिकाण होतं तिथून गोजरा स्पष्ट दिसला. नंतर मात्र झाडीत घुसलो. तरीही झाडीतली वाट थोडी का होईना, साफ केलेली दिसत होती.
![]() |
दुसरा दरवाजा |
पुढे एक वास्तू दिसली आणि त्यापुढे आला एक मोठा दरवाजा. दरवाज्याची एकूण रचना सुंदर आहे आणि खांबावर बऱ्यापैकी नक्षीकामही आहे हे लांबूनच लक्षात आलं. तिथूनच ठरवलं की ये एकटे-दुकटेका काम नाही... "तू इधर, मी उधर — बघू कोण काय शोधतो!" करून आम्ही विभागलो. कुठेही बघा शिल्पं, शिल्पं आणि शिल्पं! गणपती, नृत्य करणारी मंडळी, यक्ष, देवता, नृसिंह, देवी आणखी भरपूर काही! जिथे जागा मिळेल तिथे नक्षीने खांब भरलेले.
![]() |
शिवपिंडीला अभिषेक |
![]() |
हत्तीशी युद्ध करणारा वीर |
शिवपिंडीला हत्ती सोंडेतून अभिषेक घालणारे शिल्प होतं. म्हणजे मला तरी तसं वाटलं. पण हत्तीच्या सोंडेत काहीतरी दिसत होतं. काय कथा असेल काय माहिती! एका शिल्पात शिवपिंडीवर आचळातून दुधाचा अभिषेक करणारी गाय दिसली! केतनशी बोललो तर म्हणे गायीने जमीन उकरून पिंडी बाहेर काढलीन आणि दुध पाजलंन अशी कथा आहे. दुसऱ्या शिल्पात शिवपिंडी शेजारी फणा काढून बसलेला नाग... एके ठिकाणी हत्ती आणि एक माणूस खाली झोपलेला दिसला, ते म्हणे हत्तीशी युद्ध करणारा वीर आहे. एक एक काय सांगू? शिल्पांची ही जणू खाणच!
![]() |
दरवाज्याच्या मागचे शिल्प |
दरवाजा गोमुखी आहे. पुढे पाणी जाण्यासाठी किंवा तत्सम जागा होती. तिथेही जमिनीच्या खालच्या पातळीत सुंदर शिल्प! खाली उतरून त्या शिल्पासोबत फोटो काढायचा मोह आवरला नाही. तिथंच आजूबाजूला शिल्प घडवलेले दगड पडलेले दिसले. अरे हो.. एक महत्वाची गोष्टही इथे आहे ती म्हणजे शिलालेख. हा शिलालेख मराठी भाषेतील आहे आणि तो मोडी लिपीत आहे. त्यावर लिहिलेला मजकूर "शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे पहिले सरदार जाधव हवालदार, साजरा" असा काहीसा आहे असे कळते. अर्थात हा लेख पुसट झालेला आहे आणि नीटसा वाचताही येत नाही.
![]() |
इतरही अजून शिल्पं |
![]() |
इतरही अजून शिल्पं |
सगळं दिसत होतं. अचंबितही करत होतं. पण... ते शिल्प काही दिसेना! तेवढ्यात मकरंद की प्रमोद, कोणीतरी ओरडलं आणि सगळ्यांना बोलावलं. कोणी 'युरेका' असं ओरडलं नाही हे खरं, पण... सापडलं ना भौ!
![]() |
अश्वारूढ शिल्प |
एका खांबाच्या आतल्या बाजूला ते शिल्प सापडलं. महाराजांची अश्वारूढ मूर्ती असं हे शिल्प! आता हे इतकं महत्त्वाचं शिल्प इथे आतल्या बाजूला का असावं? कोणत्या प्रसंगी कोरलेलं असावं? कोणी कोरून घेतलं असेल? असे अनेक प्रश्न पडतात, आणि त्यांची उत्तरं शोधायचं काम अर्थात इतिहास संशोधकांचं. बघू ते कधी घडेल. आम्ही मात्र वेगवेगळ्या बाजूंनी त्याचे फोटो, आणि त्याच्यासोबत आमचे फोटो काढून घेतले. शिल्प व्यवस्थित न्याहाळलं. तो व्यवस्थित कोरलेला घोडा, त्यावर बसलेले महाराज. नुसते बसलेले नाही, तर हातात धोप किंवा तलवारसुद्धा! पोशाख, दाढी... सगळं स्पष्ट!
मग काय? झाला ना गड पाहून! कारण महत्त्वाची, बहुचर्चित-बहुप्रतिक्षित गोष्ट सापडलीच. मग करून टाकायची का बघितला म्हणून खुण? पण नाही. दुर्ग पूर्ण बघितल्याशिवाय समाधान नाही. जेवढ्या माहिती आहेत, उजेडात आलेल्या आहेत आणि पाहता येतील, त्या सगळ्या वास्तू पाहून झाल्यावरच, ते समाधान मिळणार होतं. ठरल्याप्रमाणे पुढचा मार्ग धरला.
![]() |
इतर वास्तू |
अजूनही काही वास्तू दिसल्या. काहींचं प्रयोजन समजलं नाही, तर काही मंदिर असावीत, हे कळलं. काही ठिकाणी न जाता येण्याजोगं जंगल होतं, तर काही ठिकाणी थोडा साफ केलेला भाग, तिथे पडझड झालेल्या वास्तू. काही ठिकाणी मोठे खडक, त्यावर काहीतरी घडवण्याचे केलेले प्रयत्न, हे स्पष्ट दिसत होते. तर काही घडवून झालेले, पण न वापरलेले दगड तसेच पडलेले.
एके ठिकाणी झुडपात एक लपलेलं भुयार दिसलं. नीट बघितल्यावर लक्षात आलं की ते फक्त भुयार नाही, तर एक मोठी वास्तू आहे. शेजारून बाजू-बाजूने पलीकडे गेलो आणि ती पूर्ण वास्तू समजली. धान्य कोठार? दारूगोळा कोठार? पण मुळात एकूण रचना तशी नेमकी काही कळत नव्हती. लढाईच्या वेळी लपण्यासाठी सुरक्षित जागा? म्हणजे बंकर? असेल बुवा काहीही, देव जाणे!
![]() |
भुयार वाटलेली वास्तू |
पण काय सुंदर प्रकाश येत होता! फोटो काढायचा मोह कोण आवरू शकतं? निसर्गानेच सगळी व्यवस्था करून ठेवलेली. पाहिजे होती फक्त दृष्टी आणि ते टिपायला कॅमेरा. सगळ्यांनी फोटो काढले.
पुन्हा मार्गाला लागलो. उंच झाडांचं, पण विरळ असं जंगल लागलं. या वाटेने समोर बघून, नक्की कुठे पोचणार हे सांगता येत नव्हतं. पण नकाशाच्या आधी केलेल्या अभ्यासानुसार ह्या बाजूने वाट परत दरवाजात येणे अपेक्षित होतं. मी, प्रसाद आणि प्रमोद गप्पा मारत-मारत मागून चाललो होतो. विनीत, मकरंद आणि अभिषेक पुढे. आम्ही त्यांच्या मागोमाग, निवांत चाललो होतो त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत. तेवढ्यात "वा! वा! पोचलो रे!" विनीतचा आवाज आणि मागून टाळ्याही! लक्षात आलं दरवाजात पोचलो!
सगळ्यांनीच एकमेकांचं अभिनंदन केलं. सगळ्यांनाच आनंद झालेला. व्यवस्थित रस्ता मिळाला. जे बघता येणं शक्य होतं, जे बघायचंच होतं ते शिल्प, अवशेष, वास्तू सगळं बघायला मिळालं. छान फोटोही मिळाले.
महाराष्ट्राबाहेर, इतक्या लांब तामिळ प्रदेशात, स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या मावळ्यांनीच बांधलेला, मराठी स्वराज्याला साजरा असा हा "दुर्ग साजरा", उत्तमरीत्या बघायला मिळाला! आनंद तर होणारच नाही का!!!
उतरताना हनुमानांनी एकदा दर्शन दिलंनी आणि जंगल अनुभवत खाली उतरून, पुढच्या नियोजनाला लागलो. पुढचं लक्ष होतं दुर्ग गोजरा आणि त्याचा जोडदुर्ग लाजरा उर्फ मुर्तजा.
![]() |
सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |
No comments:
Post a Comment