Sunday, April 19, 2026

जिंजी - दुर्ग राजागिरी म्हणजे राजगड (तामिळनाडू)

सिंहासनाच्या पार्श्वभूमीवर दुर्ग राजगड

आधीच्या त्रिचंदी कोटावरच्या लेखात आपण बघितलंच की, हा कोट जिंजीच्या मुख्य राजागिरी गडाची मुख्य संरक्षण व्यवस्था आहे. आता एखाद्या गडाची संरक्षण व्यवस्थाच दुसरा गड आहे, याचाच अर्थ किती दुर्गम असेल तो गड-जिंकण्यासाठी!! कदाचित म्हणूनच हा गड या समूहाचा "राजा" गड आहे.

तसं बघायला गेलं, तर ह्या गडाला "राजा" आणि कृष्णगिरी गडाला "राणी" गड म्हणतात; पण तेही काही यांचं खरं नांव नाही. हल्लीच्या काळात तशी ओळख झालेली आहे असं म्हणता येईल, पण याचं मूळ नांव "कमलगिरी". आपण कृष्णगिरीच्या लेखात सात बहिणींचा उल्लेख केला होता. त्यातील एका बहिणीचं नांव "सेंजी अम्मन" आणि त्या नांवाचा गावाच्या नांवाशी संबंध पाहिला. तसंच त्यातल्याच एका बहिणीचं नांव "कमलकन्नी अम्मन". या बहिणीचं मंदिरच इथे आहे. यावरूनच या गडाचं नांव पडलं, "कमलगिरी".

तसंच "आनंदगिरी" हे या गडाचं दुसरं नांव. नंतरचं नांव "राजागिरी". हे नांव "तुबाकी कृष्णप्पा" याने ठेवलंन, असं कागदपत्रात नमूद आहे. त्याने हे नांव "नारायण कोण" यांच्या नांवावरून ठेवलंन, असं लिहिलेलं आहे. पण "नारायण कोण" आणि "राजागिरी" या नांवांचा संबंध काय ते कळत नाही. त्यानंतर स्वराज्यात आल्यावर महाराजांनी याचं नांव "राजगड" केलं.

हा गड "जिंजी" समूहातला सर्वात उंच गड आहे, सुमारे ८०० फूट. यामुळेच याला "ग्रेट माउंटन" असंही म्हटलं जातं. "फादर पिमेंटा" हा याचा उल्लेख "Troy Of East" असा करतो.

त्रिचंदी कोटाचे दरवाजे पार करत आम्ही या गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. पण ज्या गडाची भव्यता सांगायची, तर इथून बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी तब्बल ९ दरवाजे पार करावे लागतात.

पहिला दरवाजा

गडाचा पहिला दरवाजा हा भव्य तटबंदीत आहे. पण पहिलाच दरवाजा?? जरी इथे येईपर्यंत आपण चार दरवाजे पार करत आलो तरीही हा "पहिला" कसा? तर मागच्या लेखात आपण बघितलं आहे ना, की इथे येईपर्यंतचा भाग हा त्रिचंदी कोटाचा भाग आहे. म्हणजे अजून सुरुवात करायची आहे राजागिरीला. त्यामुळे आता बघायच्या असलेल्या राजागिरी किल्ल्याचा हा पहिलाच दरवाजा ना... तर हा दरवाजा पण तुबाकी कृष्णप्पा नायक या नायक राजाने बांधलान.

दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेली तटबंदी ही लांबपर्यंत गेलेली आहे. या तटबंदीने त्रिचंदी कोट आणि राजागिरी यांची सीमा आखली गेली आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना चौकोनी बुरुज आहेत.

या गडावर माकडं खूप असल्याने पुरातत्त्व खात्याने या दरवाजाच्या पायऱ्यांजवळच "Beware Of Monkeys" अशी पाटी लावलेली आहे. तसंच या दरवाजातून वर जाण्यासाठी दुपारी तीनच्या नंतर प्रतिबंध आहे. तशी पाटीही इथे लावलेली आहे. बरोबरच आहे, कारण दुपारी तीननंतर वर गेल्यास गडाचे दरवाजे बंद होईपर्यंत खाली परत येणं कठीणच आहे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, आम्ही सकाळी आधी वर जाऊन यायचं हेच ठरवलं होतं. त्यामुळे आमच्यासमोर तो प्रश्न नव्हता.

दरवाज्यावर विटांचं सुंदर बांधकाम आहे. आत शिरल्यावर समोर भिंत आहे. म्हणजे दरवाजा तश्याच पद्धतीने पूर्वाभिमुख बांधलेला आहे - समोर भिंत आणि वाट उजवीकडून वर.

दुसरा दरवाजा

तटबंदीच्या बाजूने सरळ वाटेने जात राहिल्यावर हा दरवाजा दिसतो. हा या गडाचा दुसरा दरवाजा. हाही दरवाजा पूर्वाभिमुख आहे. हा दरवाजा तर पहिल्या दरवाजापेक्षाही सुंदर आहे. याही दरवाजावर विटांचं बांधकाम आहे. दरवाजाचा उजवीकडचा बुरुज तर फारच सुंदर आहे. तसं बघायला गेलं, तर नक्षीदार पाकळ्या वगैरे काही नाहीत, परंतु चौकोनी म्हणावा, तर पायऱ्यांच्या बाजूचा कोन हा ९० अंश न ठेवता वक्राकार आहे. त्यामुळे तो मला आवडला. त्यामानाने डावीकडचा बुरुज हा मात्र थोडा "बिचारा" आहे, थोडा बुजलेला, अंग चोरून तटबंदीत सामावलेला.

दरवाजाच्या आतील बाजूने - त्रिचंदी कोट आणि इतर दुर्ग

दरवाज्याला आतमध्ये देवड्या आहेत. दरवाज्याचं छत मात्र वरच्या बाजूने मस्त दिसतं. एक तर सकाळचं वातावरण हे मस्त कुंद-धुंद होतं. ऊन नाही, पाऊस पडून गेलेला. गावावर धुक्याची चादर ओढलेली. त्या धुक्यातून वर डोकं काढत सगळे डोंगर. समोर डावीकडे कृष्णगिरी, उजवीकडे चेन्नागिरी म्हणजे चंद्रयानदुर्ग, तर खाली त्रिचंदी कोटाचे सुंदर अवशेष, कल्याण महालासह. आणि त्यात भर म्हणजे गडाला लागून असलेली हिरवीगार वृक्षसंपदा. अफाट वातावरण होतं ते!

तिसरा दरवाजा

इथून वाट डावीकडे वळते. सुंदर बांधिव पायऱ्यांनी वर जाता जाता मागे वळून पाहत राहावंसं वाटत होतं. मोठ्या शिळांच्या मधून वाट वर जात राहते. नक्की कशा प्रकारची रचना आहे, हे न उमगू देणारी तटबंदी या शिळांच्या मागे दिसते. यातच तिसरा दरवाजा आहे.

चौथा दरवाजा

वर गेल्यावर चौथा दरवाजा लागतो, परंतु आधीच्या दोन दरवाजांप्रमाणे यावर जाणाऱ्या पायऱ्या सरळ समोरून नाहीत. तर पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडे दरवाजा आहे. याला कमान वगैरे काहीही नाही, तटबंदीमध्ये बरोब्बर चौकोनी भोक पाडावं, तसा हा दरवाजा आहे. परंतु तटबंदीची रुंदी जास्त असल्याने यात शिरताना गुहेत शिरत असल्यासारखं वाटत राहतं.

तोफ

खालून येणाऱ्या पायऱ्या

ही तोफ दरवाजाच्या आधी आहे की पलीकडे गेल्यावर, हे आता नीटसं आठवत नाही. परंतु एका चौथऱ्यावर, गडाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने तोंड करून ही तोफ ठेवलेली आहे. इथूनच पलीकडे खालून वर येणाऱ्या पायऱ्याही छान दिसतात.

हिरवागार तलाव

वाटेत काही वास्तू, पायऱ्या आणि तलाव लागतो. ह्या तलावावर पूर्णपणे हिरवा थर पसरलेला होता.

कमलकन्नी अम्मन मंदिर

वाटेच्या उजवीकडे एक मंदिर लागतं. तिथे मंदिराच्या आधी एक कातळ आणि तीन त्रिशूळ दिसले. अर्थातच हे शिवमंदिर असावं, असं सहजपणे वाटतं. पण हे आहे "कमलकन्नी अम्मन" मंदिर. वाचलेल्या माहितीनुसार, ही या गडावरील सर्वात जुनी वास्तू आहे. गड जेव्हा अस्तित्वात नव्हता, तेव्हापासून हे मंदिर आहे. त्रिशुळासमोर एक कातळ आहे, साधारणपणे मंदिरात समोर कासव असतं तसा वाटतो, पण बघायला गेलं की लक्षात येतं की तो साधा नाही. किंबहुना मी तरी असा कातळ पाहिलाच नव्हता कधी.

बळीपीठ - एक भीतीदायक कातळ

या कातळावर एका बाजूला धनुष्य, तर दुसऱ्या बाजूला पाच बाण आहेत. बारकाईने पाहिल्यास, यातील मधले तीन बाण नेहमीसारखे, म्हणजे भाल्याला जसं टोक असतं त्या टोकाचे आहेत. बाजूच्या बाणांपैकी एका बाणाचं टोक चंद्रकोरीसारखं आणि दुसऱ्या बाणाचं तर तसं टोकच म्हणता येणार नाही खरं तर, कारण ते वळ्यासारखं आहे. या बाणांवरून लहानपणी दूरदर्शनवर बघितलेलं महाभारत आणि त्यातल्या युद्धात वापरत बाणांची आठवण नक्कीच होते.

कातळाच्या मध्ये तर चार मानवी मुखं आहेत. यांच्यामध्ये असलेलं एक मुख कशाचं आहे, ते कळलं नाही. त्याच्या एका बाजूला जीभ बाहेर काढलेल्या रेड्याचं तोंड, तर दुसऱ्या बाजूला मेंढ्याचं. जीभ बाहेर असलेला रेडा-मेंढा यावरून इथे ह्या प्रकारचे बळी दिले जात असावेत, हे स्पष्ट होतं, पण मधल्या मानवी मुखांवरून येथे नरबळी सुद्धा दिला जात असेल की काय, असं वाटतं. असा हा भीतीदायक कातळ आहे.

दुर्मिळ ठेवा - भित्तिचित्र

या मंदिराच्या पाठीमागे कातळ आहे. त्यावर काही चित्रं आहेत. सुरुवातीला कोणीतरी कागदी चित्रं इथे चिकटवलेली आहेत, असं मला वाटलं; परंतु ही चित्रं चक्क सतराव्या शतकातील आहेत. अतिशय दुर्मिळ ठेवा! मध्यभागी असलेला विष्णू स्पष्ट आहे, तर बाजूला दोन देवी आहेत. ही चित्रं थोडी खराब झालेली आहेत. परंतु एकूणच चित्र अतिशय सुंदर असून हे चित्र तब्बल पाच फूट उंच आहे. शेजारी नृसिंहाचं चित्र आहे, पण ते आता बऱ्यापैकी नष्ट झालेलं आहे. अजून एक छोटं चित्र आहे, ते नृत्यशिल्प आहे.

या मंदिराच्या बाजूस एक शिवलिंग आहे. कमलकन्नी मंदिराच्या दरवाजाबाहेर दोन गणेशमूर्ती आहेत.

पाचवा दरवाजा

आजूबाजूला झाडीत लपलेले अवशेष बघत आपली वाटचाल बालेकिल्ल्याकडे चालू ठेवायची. या अवशेषांपैकी काही जवळून पाहता येतात, तर काही जवळ जाताही येत नाही.

या वाटेवर आम्हाला खूप माकडं दिसली. थोडी धीट असल्याने ती जवळ यायला बघतात, त्यामुळे सांभाळून राहावं लागतं. तसं खाण्याचं कोणतंही साहित्य पाठपिशवीच्या बाहेर दिसेल असं ठेवलेलं नव्हतंच, पण तरीही प्रमोदच्या पिशवीतून डोकावणारी खोबरेल तेलाची बाटली मात्र त्यांना आवडली असावी, कारण झडप घालून त्यांनी ती पळवलंनी!

पुढे दरवाजा लागला, हाही दगडी बांधकामात आहे आणि याच्यावरती आणि बाजूला सुद्धा विटांचं बांधकाम आहे. दरवाजावरती विटांच्या बांधकामात एक कमान आहे.

वीर हनुमान

यापुढे वाटेवरून पुढे जाताना एका दगडी शिळेला वळसा मारून वाट वरती जाते. याच शिळेवर सुंदरसा हनुमान कोरलेला आहे. आता आपण बहुतांशी गडांवर गडदेवता म्हणून हनुमान बघत असतो. त्यातल्या काही ठिकाणची मूर्ती विशेष असते, तशीच, किंबहुना अतिविशेष म्हणावी अशी ही मूर्ती आहे. अभ्यासावी अशी!

डाव्या खांद्यावर गदा, डावा हात मांडीवर तर उजवा हात उंचावलेला आहे. गळ्यात कंठा, कानात कुंडलं, कमरेला लंगोट, पोटावर श्रीवत्स कोरलेलं आहे. या हनुमानाला शेंडी दाखवलेली आहे. दोन पायांच्या मध्ये अतिशय सुंदर वैजयंतीमाळ आहे. हातात कडी तर पायात तोडे आहेत. उजवीकडून वर गेलेली शेपटी, उंचावलेल्या हातावरून, डोक्याच्या वर कोरलेल्या शंख-चक्राच्या वरून, वळून डाव्या बाजूला कमरेपर्यंत वक्राकार खाली आलेली आहे. गंमत म्हणजे या वक्राकार शेपटीत, बरोबर हनुमानाच्या डोक्यावर, शंख-चक्राच्या मध्ये, घंटा लटकवलेली आहे. शेपटीचं टोक सुद्धा सर्पाच्या वेटोळ्यासारखं वळवलेलं आहे.

हा हनुमान वीर मारुती मुद्रेत आहे. हनुमान दोन्ही पायांनी "पनवती" नावाच्या एका राक्षशिणीला तुडवताना दाखवलेला आहे. इथे असलेला एक वेगळेपणा मी कुठे पाहिलेला आठवत नाही. तो म्हणजे सगळ्यात वरती, शेपटीच्याही वरती, मधोमध, कीर्तीमुख कोरलेलं आहे!

मूर्तिकाराने आणि घडवून घेणाऱ्याने अतिशय अभ्यासपूर्ण, आखीव-रेखीव मूर्ती घडवलेली आहे. वेळ काढून, उभं राहून मूर्तीचं निरीक्षण नक्की करावं. "जाता-येता वाटेवर दिसलेला देव" म्हणून नुसतं नमस्कार करून पुढे जावं, असं हे शिल्प खचितच नाही. इथे लिहिलेल्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी माझ्या दृष्टीतून राहून गेल्या असतील. आणि हो, इथे दिवा लावता यावा म्हणून छोटी देवळीही कोरलेली आहे.

एकामागून एक पाच दरवाजे ओलांडत आम्ही इथपर्यंत आलो ते समोर एकच लक्ष्य ठेवून - बालेकिल्ला!

वाटेत लागणाऱ्या प्रत्येक वास्तू, प्रत्येक मंदिर पाहत होतोच, पण खिळवून ठेवणारं ठरलं ते कमलकन्नी अम्मन मंदिर… आणि त्यानंतर साक्षात हनुमंताने वीर रुपात दर्शन देऊन आम्हाला थबकवून ठेवलंन. आता अजून पुढे चार दरवाजे बाकी होते आणि त्या पलीकडे उभा होता बालेकिल्ला. ज्याच्याकडे आता वाटचाल सुरू होणार होती.

या लेखात इथे तात्पुरता विराम घेऊ आणि या पुढची चढाई, आणि उलगडत जाणारे अवशेष बघू, पुढच्या भागात…

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

1 comment:

  1. पुर्ण वर्णन छानच आहे पण मारूतीरायाच तर अगदी perfect... vickynatu@gmail.com

    ReplyDelete